Dated the 18 Jan 2016
न्यायनिर्णय
द्वारा- सौ.स्नेहा एस.म्हात्रे...................मा.अध्यक्षा.
1. तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार त्यांच्या पॉवर ऑफ अँटॉर्निव्दरे सामनेवाले यांचे विरुध्द दाखल केली आहे. सामनेवाले हे बांधकाम व्यावसायिक आहेत.
2. तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्या वाडा येथील मालकीच्या भुखंडावर बांधण्यात येणा-या सुशीला अपार्टमेंट हया इमारतीमध्ये पहिल्या माळयावरील सदनिका क्रमांक-106, रक्कम रु.9,25,000/- हया एकूण मोबदल्याच्या किंमतीत विकत घेण्याचे ठरवले. त्याचा प्रतिचौरस फुटाचा दर रु.1390/- होता. तक्रारदार म्हणतात, तक्रारदार यांनी ता.15.08.2008 रोजी सामनेवाले यांना रु.1,00,000/- बयाणा रकमेपोटी दिली. त्यानंतर ता.02.03.2009 रोजी रु.3,50,000/- व ता.23.09.2009 रोजी रु.4,25,000/- व रोख रकमेच्या स्वरुपात रु.50,000/- दिले. अशा प्रकारे एकूण रु.9,25,000/- ही रक्कम सामनेवाले यांना तक्रारदार यांनी दिली. परंतु सामनेवाले यांनी केवळ रु.8,25,000/- रकमेच्या पावत्या तक्रारदार यांना दिल्या. (“C 2 ”पावत्या) तक्रारदार पुढे म्हणतात, सदनिका 106 साठी सामनेवाले यांना मोबदल्याची एकूण रक्कम रु.9,25,000/- देऊनही सामनेवाले यांनी ती सदनिका दुस-या व्यक्तीस विकून त्याबाबतचा करारनामा दुस-या व्यक्तीशी करुन, तो नोंदणीकृत केला व तक्रारदार यांना सदनिका क्रमांक-106 ऐवजी त्याच इमारतीतील सदनिका क्रमांक-202 घेण्यास सांगितले. तक्रारदाराची मोठी रक्कम सामनेवाले यांचेकडे अडकून असल्याने तक्रारदार यांना सामनेवाले यांचे म्हणणे ऐकण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे तक्रारदार सदनिका क्रमांक-202 सामनेवाले यांचेकडून घेण्यास तयार झाले, सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्याकडून ता.01.01.2011 च्या पत्राव्दारे सदनिका-202 च्या अंतर्गत कामाबाबत रक्कम रु.1,33,120/- मागितली तक्रारदार यांनी ती सामनेवाले यांना दिली. परंतु त्याची पावती सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दिली नाही. सामनेवाले यांना तक्रारदार यांनी सदनिका-202 बाबत करारनामा करुन तो नोंदणीकृत करण्यास सांगितले. परंतु सामनेवाले यांनी तक्रारदार यांना इलेक्ट्रीक मीटर बसविण्यासाठी रु.26,540/- मागितले, तक्रारदार यांनी ते सामनेवाले यांना भरल्यावर सामनेवाले यांनी तक्रारदार यांना ता.10.08.2011 रोजी सदनिकेचा ताबा दिला, व सप्टेंबर-2011 पर्यंत सदनिका विक्रीचा करारनामा करुन देणार असल्याचे तक्रारदार यांना सांगितले व ता.23.09.2011 रोजी सामनेवाले यांनी तक्रारदार यांना नोटीस पाठविली त्याचे तक्रारदाराने ता.03.10.2011 रोजी उत्तर दिले व सामनेवाले यांना करारनामा करुन नोंदवून देण्याची पुन्हा विनंती केली. परंतु अदयापपर्यंत सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदनिका 202 चा करारनामा नोंदवून दिला नाही, व त्यांच्या सदनिकेचा इलेक्ट्रीक मीटरही ता.27.03.2012 रोजी काढून नेला. त्याबाबत तक्रारदाराने वाडा पोलीस स्टेशन येथे सामनेवाले विरुध्द तक्रार (एफ.आय.आर) नोंदवली, वकीलामार्फत सामनेवाले यांना नोटीस पाठवली तसेच तक्रारदार यांनी सबरजिस्ट्रार वाडा येथे सदनिकेचा करारनामा नोंदणीकृत करण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्कही भरुन ठेवले. परंतु तरीही सामनेवाले यांनी अदयापपर्यंत करारनामा स्वाक्षरीत करुन दिला नाही, त्यामुळे तक्रारदार यांनी सामनेवाले यांचे विरुध्द प्रस्तुत तक्रार मंचात दाखल करुन खालील मागण्या केल्या आहेत.
1. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिल्याचे जाहिर करावे.
2. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदनिका क्रमांक-202, सुशिला अपार्टमेंट, अशोकवन,
ता.वाडा,जिल्हा-ठाणे हीचा नोंदणी शुल्क व मुद्रांक शुल्क भरलेला करारनामा स्वाक्षरीत
करुन दयावा.
3. सामनेवाले यांनी इमारतीस ओ.सी. मिळवून दयावे.
4. तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु.2,00,000/- व न्यायिक खर्चापोटी रु.50,000/-
दयावे.
3. सामनेवाले यांना पाठविलेली नोटीस मिळाल्यावर सामनेवाले हजर झाले परंतु त्यांनी कैफीयत दाखल केली नाही. ता.21.04.2014 रोजी सामनेवाले यांच्या विरुध्द पुर्वीच्या मंचाने एकतर्फा आदेश पारित केला आहे. त्यानंतर सामनेवाले यांनी एकतर्फा आदेश रद्द करण्याचा अर्ज दिला, परंतु स्वतः पारित केलेल्या आदेशाचे पुर्नविलोकन करण्याचे अधिकार मंचास नसल्याने ता.25.05.2015 रोजीच्या मंचाने सामनेवाले यांचा प्रस्तुत अर्ज फेटाळला. परंतु त्यानंतर ता.01.09.2014 रोजी सामनेवाले विरुध्द एकतर्फा आदेश असुन देखील सामनेवाले यांनी त्यांची कैफीयत दाखल केल्याचा रोजनामा केस हिस्ट्रीवरुन दिसुन येतो. परंतु, सदर कैफीयतीवर तेव्हाच्या मंचाच्या सदस्यांच्या किंवा अध्यक्षांच्या स्वाक्ष-या (Endorsement) नाहीत. सामनेवाले यांनी त्या विरुध्द मा.राज्य आयोगात दाद मागितल्याचा उल्लेख किंवा तसा आदेश अभिलेखावर नाही. त्यामुळे सामनेवाले यांची कैफीयत विचारात घेता येणार नाही. त्यानंतर तक्रारदार यांनी पुरावा शपथपत्र व लेखी युक्तीवाद दाखल केला. त्याचे व इतर कागदपत्रांचे अवलोकन करुन मंचाने खालील मुद्यांचा तक्रारीच्या निराकरणार्थ विचार केला.
मुद्दे निष्कर्ष
1.सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदोषपुर्ण सेवा दिली हे
तक्रारदार यांनी सिध्द केले आहे का ?.................................................होय.
2.तक्रारीत काय आदेश ?.............................................तक्रार अंशतः मंजुर करण्यात येते.
4.कारण मिमांसा
अ. तक्रारदार यांनी ता.02.02.2013 रोजीच्या पॉवर ऑफ अँटॉर्निव्दारे प्रस्तुत तक्रार दाखल करण्याचे अधिकार श्री.संजय भाईर यांना दिले असुन, त्यांच्या मार्फत तक्रार दाखल केली आहे. (Exh-C 1) तक्रार विहीत मुदतीत (ता.05.03.2013) दाखल केलेली आहे, व तक्रारीचे कारण मंचाच्या भौगोलिक क्षेत्रातील असुन आर्थिक कार्यक्षेत्रातही येत असल्याने, व तक्रारदार सामनेवाले यांच्या ग्राहक असल्याने व ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम-3 नुसार अशा परिस्थितीत तक्रार दाखल करता येत असल्याने प्रस्तुत तक्रार चालविण्याचा मंचास अधिकार आहे, हीबाब सर्वप्रथम स्पष्ट करण्यात येते. तक्रारदार यांनी सामनेवाले यांना रु.9,25,000/- भरल्याचे नमुद केले आहे. परंतु सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दिलेल्या पावत्यांचे अवलोकन केले असता तक्रारदार यांनी सामनेवाले यांना रु.8,75,000/- दिल्याचा पुरावा दिसुन येतो. परंतु रोख रकमेच्या स्वरुपात रु.50,000/- दिल्याचा कोणताही पुरावा अभिलेखावर तक्रारदार यांनी दाखल केलेला नाही. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दिलेल्या (Exh-C 2) वर लावलेल्या पावत्यांवर सदर रु.8,75,000/- ही रक्कम सदनिका क्रमांक-106 सुशीला अपार्टमेंट, अशोक वन,वाडा,ठाणे बाबत स्विकारल्याचे दिसुन येते. सामनेवाले यांनी तक्रारदाराकडून ता.01.01.2011 रोजी सदनिका क्रमांक-202, सुशिला अपार्टमेंट, अशोकवन, वाडा,जिल्हा-ठाणे हया सदनिकेतील अंतर्गत कामाबाबत (tiles work kitchen platform etc) रक्कम रु.1,33,120/- मागितल्याचे (Exh-C 3) वर जोडलेल्या पत्रावरुन दिसुन येते. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना ता.06.08.2011 रोजी वीज मिटर व पाणी कलेक्शनबाबत ता.10.08.2011 पर्यंत रु.26,540/- भरण्यास सांगितल्यानुसार तक्रारदार यांनी सामनेवाले यांना भरल्याचे म्हटले आहे. परंतु सदर रक्कम भरल्याबाबतचा पुरावा तक्रारदार यांनी सादर केलेला नाही. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना ता.23.09.2011 रोजी दिलेल्या नोटीसमध्ये तक्रारदार यांनी सदनिका क्रमांक-202 चा ताबा तक्रारदार यांनी फर्निचरचे काम करायचे असल्याचे सांगुन जबरदस्तीने घेतल्याचे म्हटले आहे, परंतु त्यांस तक्रारदार यांनी ता.03.10.2011 रोजी दिलेल्या उत्तरात सदनिका-202 चा ताबा जबरदस्तीने घेतल्याचा सामनेवाले यांचा आरोप फेटाळून लावला आहे व ता.06.08.2011 रोजीच्या सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दिलेल्या पत्रांत तक्रारदाराच्या नावासमोर सदनिका क्रमांक-202 लिहून सामनेवाले यांनी तक्रारदाराकडे सदनिका 202 बाबत वीज मिटर व पाणी कनेक्शन बसविण्यासाठी रक्कम रु.26,540/- ता.10.08.2011 पर्यंत भरण्याची मागणी केल्याचे दिसुन येते. (Exh-C 4) तक्रारदार यांनी सामनेवाले यांना ता.03.10.2011 रोजी दिलेल्या सामनेवाले यांच्या नोटीसच्या जबाबात तक्रारदार यांनी सदनिका 106 बुक केली होती व ती सामनेवाले यांनी दुस-या व्यक्तीस विकल्याने व सामनेवाले यांनी गयावया करुन तक्रारदार यांना सदनिका क्रमांक-202 घेण्यास भाग पाडल्याचा उल्लेख आहे. तसेच तक्रारदारांनी त्यांची फसवणुक झाल्याने फसवणुकीचा व अब्रुनुकसानीचा दावा तसेच फौजदारी गुन्हा सामनेवाले यांचे विरुध्द दाखल करण्याचा हक्क राखुन ठेवल्याचे सदर नोटीसच्या जबाबात म्हटले आहे. सामनेवाले यांनी तक्रारदाराकडून एवढया मोठया प्रमाणात सदनिका क्रमांक-106 बाबत रक्कम स्विकारुनही तक्रारदार यांना ती सदनिका न देता त्यावर अन्य त्रयस्थ व्यक्तीचा हक्क प्रस्थापित केल्याचे तक्रारदार यांनी सामनेवाले यांना पाठविलेल्या ता.03.10.2011 रोजीच्या नोटीसमध्ये म्हटले आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना 202 हया सदनिकेची अंतर्गत कामाबाबतची रक्कम व वीज मिटरची रक्कम भरण्यास सांगितली असल्याने तक्रारदार यांना सामनेवाले यांनीच सदनिका क्रमांक-106 ऐवजी सदनिका क्रमांक-202,सुशिला अपार्टमेंट घेण्यास सांगितली व नंतर सदर सदनिकेचा ताबा दिल्याची बाब स्पष्ट होते. तक्रारदार यांनी सामनेवाले यांना सदनिका क्रमांक-202 चा करारनामा करुन देण्याबाबत नोटीसव्दारे व त्यापुर्वी विनंती करुनही सामनेवाले यांनी तक्रारदार यांना त्यांचा करारनामा स्वाक्षरीत करुन नोंदणीकृत करुन दिला नाही. केवळ त्याबाबत आश्वासन देत राहिले, त्यानुसार तक्रारदार यांनी ऑक्टोंबर-2011 मध्ये सामनेवाले व तक्रारदार यांच्यात स्वाक्षरीत करावयाच्या करारनाम्यावर सबरजिस्ट्रार वाडा यांचे समोर नोंदणीशुल्क रु.9,250/- व मुद्रांक शुल्क रु.18,510/- भरल्याचे दिसुन येते. परंतु सदर करारनाम्यावर तारीख टाकलेली नाही केवळ ऑक्टोंबर-2011 असा उल्लेख आहे, व त्यावर उभयपक्षांची केवळ नांवे लिहिली आहेत. परंतु स्वाक्षरी केलेली नाही. यावरुन सामनेवाले यांनी तक्रारदार यांना करारनामा स्वाक्षरीत करण्याचे आश्वासन देऊनही सामनेवाले सदनिका क्रमांक-202 करारनामा स्वाक्षरीत करण्यासाठी सबरजिस्ट्रार ऑफीसमध्ये हजर झाले नाहीत हे सिध्द होते. त्यानंतर तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्या विरुध्द ता.27.03.2012 रोजी केलेल्या वाडा पोलीस स्टेशनमधील एफ.आय.आर. ची छायांकित प्रत तक्रारदाराने (Exh-C-6) वर जोडली आहे. यावरुन तक्रारदाराने सामनेवाले यांना सदनिका 106 बाबत मोठया प्रमाणात रक्कम भरुन सामनेवाले यांनी ती सदनिका दुस-या व्यक्तीस विकली व तक्रारदारांना पर्यायी सदनिका क्रमांक-202, सुशिला अपार्टमेंटमधील देण्याचे कबुल करुन त्याचा ताबा दिला. परंतु अदयापपर्यंत त्याचा करारनामा स्वाक्षरीत करुन त्यानंतर रितसर नोंदवून दिला नाही, व तक्रारदाराचे सदनिका क्रमांक-202, सुशिला अपार्टमेंट बाबत नोंदणी व मुद्रांक शुल्काबाबत भरलेली रक्कमही सामनेवाले यांच्या बेजबाबदार पणामुळे वाया गेली हे दिसुन येते. त्यामुळे उपरोक्त चर्चेनुसार सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदोषपुर्ण सेवा दिल्याचे दिसुन येते.
ब. तक्रारदार यांनी सामनेवाले यांना वर नमुद केल्याप्रमाणे सदनिका क्रमांक-106 बाबत भरलेली रक्कम सदनिका क्रमांक-202 बाबत वळती करण्याचे उभयपक्षांत ठरले असतांना देखील सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदनिका क्रमांक-202 चा देखील करारनामा स्वाक्षरीत करुन अदयापपर्यंत न दिल्याने व सबरजिस्ट्रार,वाडा येथे त्याबाबत करारनामा स्वाक्षरीत करण्यासाठी येण्याचे आश्वासन देऊनही सामनेवाले तेथे हजर न राहिल्याने करारनाम्यासाठी भरलेली नोंदणी व मुद्रांक शुल्कासाठी भरलेली रक्कम सरकारकडे अडकून राहिल्याने तक्रारदार यांना जो मानसिक त्रास झाला त्याबाबत तक्रारदार सामनेवाले यांचेकडून रक्कम रु.25,000/- मिळण्यास पात्र आहेत व सामनेवाले यांचे विरुध्द तक्रारदार यांना वकीलामार्फत प्रस्तुत तक्रार दाखल करावी लागल्याने ते सामनेवाले यांचेकडून रक्कम रु.15,000/- न्यायिक खर्च मिळण्यास पात्र आहेत. तसेच सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदनिका क्रमांक-202 चा करारनामा स्वाक्षरीत करुन रितसर नोंदवून दयावा तक्रारदार यांनी त्याबाबत सब रजिस्ट्रार वाडा येथे मुद्रांक व नोंदणी शुल्कापोटी भरलेली रक्कम नविन करारनामा नोंदवितांना वळती करुन मिळण्याबाबत प्रयत्न करावे. सामनेवाले यांनी तक्रारदार रहात असलेल्या इमारतीस भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करुन दयावे अशी मागणी केली आहे, त्याबाबत तक्रारदार रहात असलेल्या इमारतीमधील इतर सदनिका धारकांसमवेत तक्रारदार यांनी स्वतंत्र तक्रार दाखल करावी असे मंचाचे मत आहे.
उपरोक्त चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येतो.
“ या मंचातील कार्यभार पाहता व इतर प्रशासकीय कारणांमुळे यापुर्वी ही तक्रार निकाली काढता येऊ शकली नाही ”.
- आदेश -1. तक्रारदार यांची तक्रार क्रमांक-79/2013 अंशतः मंजुर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदोषपुर्ण सेवा दिल्याचे जाहिर करण्यात येते.
3. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदनिका क्रमांक-202, सुशिला अपार्टमेंट,वाडा,जिल्हा-ठाणे
हया सदनिकेचा करारनामा स्वाक्षरीत करुन रितसर नोंदवून दयावा. रेकॉर्डवर एकूण
मोबदला रु.9,25,000/- पैंकी रु.8,75,000/- भरल्याचे दिसुन येत असल्याने उर्वरीत
रक्कम रु.50,000/- सामनेवाले यांना तक्रारदार यांनी भरली नसल्यास ती भरण्याबाबत
उभयपक्षांत पुर्वी ठरल्याप्रमाणे तक्रारदार यांनी योग्य ती कार्यवाही करावी. तक्रारदार यांनी
सदनिका क्रमांक-202, सुशिला अपार्टमेंटच्या जुन्या करारनाम्यावर मुद्रांक शुल्क व
नोंदणी शल्क भरले असल्याने यावेळेस नोंदणीकृत व मुद्रांकीत करावयाच्या नविन
करारनाम्याचा खर्च तक्रारदार यांनी स्वतः सोसावा,व पुर्वीच्या करारनाम्याबाबत मुद्रांक व
नोंदणी शुल्कापोटी भरलेली रक्कम नविन करारनामा नोंदवितांना संबंधीत प्राधिकारणाकडून
वळती करुन मिळण्याबाबत प्रयत्न करावे.
4. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडून भोगवटा प्रमाणपत्राबाबत केलेली मागणी फेटाळण्यात
येते. त्याबाबत सदर इमारतीमधील इतर सदनिकाधारकांसमवेत/संस्थेमार्फत स्वतंत्र
तक्रार दाखल करावी.
5. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु.25,000/- (अक्षरी रुपये पंचवीस
हजार ) व न्यायिक खर्चापोटी रु.15,000/- (अक्षरी रुपये पंधरा हजार ) दयावेत.
6. वरील आदेशाचे पालन सामनेवाले यांनी आदेश पारित तारखेपासुन एक महिन्यांचे आंत
करावे.
7. आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य व विनाविलंब पोस्टाने पाठविण्यात याव्यात.
8. तक्रारीचे अतिरिक्त संच असल्यास तक्रारदार यांना परत करण्यात यावे.
ता.18.01.2016
जरवा/