द्वारा मा. श्री. मोहन एन. पाटणकर, सदस्य
निकालपत्र
16/06/2014
1] प्रस्तुतची तक्रार श्री. सोपान भागोजी कांबळे आणि. श्री. राजेंद्र पांडुरंग नांदेडकर यांनी जाबदेणार श्री. नरसिंह दासारी बालय्या या बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध त्यांचे बांधकाम विषयक सेवेतील त्रुटीकरीता ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 12 नुसार दाखल केलेली आहे. तक्रारदारांचे कथन खालीलप्रमाणे आहे.
2] तक्रारदार हे येरवडा, पुणे – 6, येथील रहिवासी आहेत. तक्रारदार यांनी त्यांचे 152, बाबासाहेब आंबेडकर सोसायटी येथील जागेचे नुतनीकरण करण्याचे ठरविले. सदरहू काम तक्रारदारांनी जाबदेणार रा. खराडी, पुणे – 14 यांना दि. 14/01/2013 रोजी सोपविले. या कामापोटी तक्रारदार यांनी जाबदेणार यांना रक्कम रु.10,00,000/- देण्याचे ठरवून तसा करारनामा केला. जाबदेणार यांनी सदरचे काम दि. 14/04/2013 पर्यंत पूर्ण करण्याचे ठरले. तक्रारदार यांनी जाबदेणार यांना रक्कम रु. 9,50,000/- अदा केलेले आहेत. जाबदेणार यांनी दि. 03/04/2013 पासून तक्रारदारांचे बांधकाम थांबवून सोपविलेले काम अर्धवट केले आहे. जाबदेणार यांनी शिल्लक राहिलेले काम पूर्ण करण्यास नकार दिला. त्यामुळे तक्रारदारांनी जाबदेणार यांचे सेवेतील त्रुटीमुळे या मंचापुढे रक्कम रु. 4,85,000/- नुकसान भरपाई इ. मिळण्यासाठी प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे.
3] जाबदेणार, मंचामार्फत पाठविलेली नोटीस बजवूनही गैरहजर राहीले, त्यामुळे सदर प्रकरणात त्यांच्याविरुद्ध दि. 27/09/2013 रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
4] तक्रारदार यांनी, जाबदेणार यांनी किती रकमेचे काम पूर्ण केले आहे आणि शिल्लक कामासाठी किती खर्च येणार आहे याबाबत तज्ञ व्यक्तींच्या मुल्यांकनाचे प्रमाणपत्र सादर केलेले नाही. तक्रारदारांनी सादर केलेल्या करारपत्राची प्रत अपूर्ण आहे. तक्रारदारांनी बांधकामाचे एकुण 12 फोटोग्राफ्स सादर केलेले आहेत. त्यामध्ये बांधकाम काही प्रमाणात अपूर्ण असल्याचे दिसते. तक्रारदारांनी सादर केलेली तक्रार, शपथपत्र आणि अन्य कागदपत्रे अभ्यासता, जाबदेणार यांनी त्यांना सोपविलेले काम अर्धवट सोडून दिले, हे स्पष्ट होते. ही बाब म्हणजे जाबदेणार यांची सेवेतील त्रुटी आहे, असे मंचाचे मत आहे. सबब, तक्रारदार हे जाबदेणार यांचेकडून ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 14 नुसार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत, असे या मंचाचे मत आहे.
5] तक्रारदारांनी एकुण रक्कम रु. 4,85,000/- खर्च, भरपाई व तक्रारीच्या खर्चापोटी मागणी केली आहे. प्रस्तुत प्रकरणात तक्रारदार यांनी, झालेल्या कामाचा खर्च आणि शिल्लक कामासाठी लागणारा खर्च याबाबत तज्ञ व्यक्तीचे प्रमाणपत्र सादर केलेले नाही. अशा परिस्थितीत शिल्लक कामाचा प्रचलीत बाजारभावाप्रमाणे खर्च रक्कम रु. 1,00,000/- जाबदेणार यांनी तक्रारदार यांना द्यावा, असा या मंचाचा निर्णय आहे. तसेच तक्रारदारास झालेल्या मानसिक, शारिरीक आणि आर्थिक हानीपोटी जाबदेणार यांनी तक्रारदार यांना रक्कम रु. 10,000/- तसेच या तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु. 2,000/- द्यावेत, असा मंचाचा निर्णय आहे. सबब, खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
आदेश
1.
येते.
2. जाबदेणार यांनी तक्रारदार यांच्या घराचे बांधकाम अपूर्ण ठेवून सेवेमध्ये त्रुटी निर्माण केली आहे, असे जाहीर करण्यात येते.
3. जाबदेणार यांना असा आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदारांना अपूर्ण कामापोटी रक्कम रु.1,00,000/- (रु. एक लाख फक्त), मानसिक, शारिरीक व आर्थिक नुकसानापोटीपोटी भरपाई म्हणून रक्कम रु. 10,000/- (रु.दहा हजार फक्त) आणि तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु. 2,000/- (रु. दोन हजार फक्त) या आदेशाची प्रत मिळाल्यापासून सहा आठवड्यांच्या आंत द्यावेत.
4. आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क
पाठविण्यात यावी.
5. पक्षकारांना असे आदेश देण्यात येतात की त्यांनी आदेशाची प्रत मिळाल्यापासून एक महिन्याच्या आंत सदस्यांकरीता दिलेले तक्रारीचे संच घेऊन जावेत, अन्यथा सदरचे संच नष्ट करण्यात येतील.