निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा.सौ. स्मिता बी.कुलकर्णी,अध्यक्ष)
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेविरुध्द सेवेत त्रुटीच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्यात खालील प्रमाणेः-
2. अर्जदार रामराव विठठलराव भुरे हा ट्रक क्रमांक एमएच 22/एन 797 चा मालक आहे. सदरचे वाहन गैरअर्जदार यांचेकडून कर्ज स्वरुपात विकत घेतल्या कारणाने अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे. अर्जदाराचा सदर ट्रकचा व्यवसाय हा मुख्य व्यवसाय असून कुटूंब उदर्निवाह त्याचेवर अवलंबून आहे. केशव वामनराव इंगोले यांनी गैरअर्जदार यांचेकडून फायनान्सवर विकत घेतला होता. तोच ट्रक अर्जदाराने भाडेपत्रा आधारे दिनांक 13.11.2008 रोजी अर्जदाराचा भाऊ विलास भुरे यांचे हक्कात केला होता. त्यानंतर भावा-भावात वाटणी झाल्यानंतर सदर ट्रक अर्जदाराकडे आला व अर्जदाराने त्याचे फायनान्सव्दारे गैरअर्जदार यांचेकडून रक्कम रु.10,50,000/- त्याचा प्रतीमाह हप्ता रक्कम रु.27,000/- प्रमाणे 60 हप्त्यात परतफेड करण्याचे ठरले हाते. अर्जदाराने जवळपास 30 ते 35 हप्त्याचा भरणा केला. त्यानंतर गैरअर्जदार यांनी बेकायदेशीररीत्या केशव इंगोले यांचे नावावर असलेले फायनान्स कर्ज व आरसी बुकात अर्जदाराचे नाव घेण्यास संमती दिली व कायदेशीररीत्या अर्जदार हा आरटीओ कार्यालयातून सदर ट्रकचा मालक झाला. अर्जदार रामराव यांनी ठरल्याप्रमाणे गैरअर्जदार यांचेकडे नियमीतपणे कर्जाचे हप्ते भरले. परंतु दुर्देवाने अर्जदाराचा दिनांक 14.12.2011 रोजी अपघात होऊन अर्जदाराचे डोक्यास जबर मार लागला, अर्जदार कोमात गेला,त्यास यशोदा हॉस्पीटल,नांदेड येथे शरीक केले. अपघाताची सुचना बारड येथे दिली होती. अर्जदारास जवळपास 6 लाख रुपयाचा खर्च आला व अर्जदार अपंग झाला. त्यानंतर सुध्दा. अर्जदाराचे भाऊ व वडील यांनी दिनांक 25.07.2013 पर्यंत रक्कम रु.5,02,500/- चा भरणा केला व उर्वरीत रक्कम सुध्दा भरणेस अर्जदार तयार होता. असे असतांनाही, गैरअर्जदार यांनी दिनांक 29.09.2011 रोजी सदरचे वाहनावर फायनान्स करुन सदर गाडीचे केशव इंगोले यांचेवर कर्ज रक्कम परस्पर भरणा करुन घेतली, त्याचा हिशोब अद्यापही दिलेला नाही. अर्जदाराने दिनांक 25.07.2013 पर्यंत गैरअर्जदार यांचेकडे रक्कम रु.15,25,420/- एवढी रक्कम गैरअर्जदार यांचेकडे भरलेली आहे. उर्वरीत रक्कम सुध्दा अर्जदार भरणेस तयार असतांना देखील गैरअर्जदार अचानक दिनांक 10.12.2013 रोजी सदर ट्रक गॅरेजवर मालासहीत उभा असतांना अर्जदारास सुचना न देता कायदेशीर पध्दतीचा अवलंब न करता बेकायदेशीरपणे ओढून नेला व त्यांचे यार्डामध्ये जमा केला. यार्डामध्ये जमा केल्याची पावती अर्जदारास नंतर दिली. तसेच अर्जदारास किंवा अर्जदाराचे भावास कुठलीही सुचना न देता अर्जदाराचे संमतीशिवाय मार्च,2014 ते दिनांक 04.09.2014 पर्यंत सदरील ट्रकचा वापर गैरअर्जदार यांनी महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर चालू ठेवला. त्यामुळे अर्जदाराचे जवळपास रक्कम रु.2,00,000/- चे नुकसान झाले. सदरच ट्रकचा जप्तीच्या काळात बेकायदेशीर चीजवस्तू,दारु,गांजा इत्यादीची वाहतूक झाली असती तर त्यास अर्जदार जबाबदार राहिला असता. म्हणून अर्जदारास प्रचंड मानसिक व शारिरिक त्रास झाला.
गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सदर ट्रकचे हस्तांतरण करण्यासाठी अर्ज दिल्यानंतर दिनांक 01.08.2014 रोजी अर्जदाराने आरटीओ कार्यालयात अर्ज देऊन आक्षेत घेतला आहे. नंतर गैरअर्जदाराने धमकी देऊन नांव परिवर्तन करणेसाठी संमती देणेसाठी दबाव आणला. अर्जदाराने दिनांक 04.09.2014 रोजी पोलीस स्टेशन सिडको येथे अर्ज देऊन सदर ट्रकचा ताबा परत मिळवला व गैरअर्जदार व संबंधीतांवर सदर ट्रकचे गैरवापराबद्दल कार्यवाही करण्याची विनंती केली. अर्जदार हा गैरअर्जदाराने मंचात खाते उतारा दाखल केल्यास उर्वरीत रक्कम गैरअर्जदार यांचेकडे भरणेस तयार आहे. अर्जदार यांनी मंचास विनंती केलेली आहे की, गैरअर्जदार यांना अर्जदाराच्या मालकीचा ट्रक क्रमांक एमएच 22/एन 797 हा बेकायदेशीरपणे जबरदस्तीने अर्जदाराच्या ताब्यातून ओढून नेऊ नये म्हणून मनाई हुकूम पारीत करावा. तसेच अर्जदाराचा खाते उता-याप्रमाणे उर्वरीत रक्कम गैरअर्जदारास स्विकारणेचा आदेश करावा व एनओसी व इतर कागदपत्रे अर्जदारास देण्याचा आदेश करावा. अर्जदारास गैरअर्जदाराने ट्रकचा वापर केल्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून रक्कम रु.2,00,000/- व अर्जदारास दिलेल्या सेवेतील त्रुटीबद्दल रक्कम रु.80,000/- व दावा खर्च रक्कम रु.20,000/- गैरअर्जदार यांचेकडून देण्याचा आदेश करावा इत्यादी मागणी तक्रारीव्दारे केलेली आहे.
3. गैरअर्जदार यांना नोटीस तामील झाल्यानंतर वकीलामार्फत ते तक्रारीत हजर झाले व गैरअर्जदार यांनी आपला लेखी जबाब व शपथपत्र दाखल केलेला आहे.
गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणेः-
4. अर्जदार हा मंचासमोर स्वच्छ हाताने आलेला नाही. मंचापासून तथ्य लपवून आलेला आहे. अर्जदार हा ग्राहकाच्या व्याख्येत बसत नाही. या कारणाकरीता सदरील तक्रार फेटाळण्यात यावी. अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडून ट्रक विकत घेणेकरीता कर्ज घेतलेले आहे, ते अर्जदारास मान्य आहे. सदरील कर्ज घेत असतांना अर्जदाराने हायपोथीकेशन-कम-लोन †òग्रीमेंट करुन दिलेले आहे. हायपोथीकेशन-कम-लोन †òग्रीमेंट प्रमाणे अर्जदार व गैरअर्जदार यांचेमध्ये वाद उपस्थित झाल्यास तो वाद लवादाकडे नेऊन निर्णय घेण्याचे मान्य केलेले आहे. त्यामुळे मंचास हे प्रकरण चालविणेचा अधिकार नाही..
अर्जदार रामराव यांनी ट्रक विकत घेण्यापुर्वी सदरचा ट्रक केशव इंगोले यांच्या मालकीचा होता. केशव इंगोले यांनी सदरचा ट्रक विकत घेण्याकरीता गैरअर्जदार यांचेकडून रक्कम रु.11,00,000/- चे कर्ज घेतले होते. सदरचा ट्रक केशव इंगोले यांनी विक्री केलेला आहे.
अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडून ट्रक खरेदी करणेकरीता दिनांक 16.11.2011 रोजी रक्कम रु.8,50,000/- कर्ज घेतलेले आहे. सदर कर्जाची परतफेड 47 मासिक हप्त्यात करावयाची असून व्याजाची रक्कम ही रु. 3,89,912/- एवढी होती. गैरअर्जदाराने अर्जदाराच्या ट्रकचा विमा दोन वेळेस काढलेला आहे,त्यासाठी रक्कम रु.25,615/- व रक्कम रु.29,060/- एवढा खर्च गैरअर्जदार यांना आलेला आहे. अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे कर्जाची रक्कम वेळोवेळी भरलेली नाही. अर्जदाराच्या कर्ज खात्याचा उतारा गैरअर्जदार याने दाखल केलेला असून सदर खात्यामध्ये अर्जदाराकडून रक्कम रु.70,232/- येणे बाकी दाखविलेली आहे. अर्जदार थकबाकीदार झाल्यानंतर गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा ट्रक जप्त करणेसाठी गेले असता मारोती भुरे यांनी ट्रकमध्ये कोळसा आहे तुम्ही ट्रक जप्त करु नका आम्ही स्वतः ट्रक तुमच्या यार्डामध्ये लावतो असे सांगितले. त्यानंतर दिनांक 10.12.2013 रोजी मारोती भुरे व जामीनदार उमाकांत भंडारे यांनी स्वतःहून ट्रक क्रमांक एमएच 22/एन 797 गैरअर्जदाराकडे सरेंडर केला. दिनांक 19.12.2013 रोजी जय अंबे रोडलाईन,चंद्रपुर यांनी गैरअर्जदार यांचेकडे पत्र देऊन गाडीमधील कोळसा दुस-या गाडीमध्ये क्रॉसींग करुन देण्याची विनंती केली. त्यानुसार अर्जदाराने सदरील ट्रकमधील कोळसा दुस-या ट्रकमध्ये घेऊन गेला. अर्जदार हा थकबाकीदार असून सदरील ट्रक हा गैरअर्जदार याने जप्त केल्यामुळे गैरअर्जदार यांचे ताब्यात आहे. अर्जदार यांनी त्यानंतर केव्हाही थकीत रक्कम गैरअर्जदार यांचेकडे भरलेली नाही. त्यामुळे गैरअर्जदार यांनी सदरचा ट्रक लिलावाव्दारे विक्री केला. विक्री करण्यापुर्वी अर्जदारास दिनांक 08.02.2014 रोजी नोटीस पाठविली होती. परंतु अर्जदाराने कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही. गैरअर्जदाराने दिनांक 13.03.2014 रोजी खुल्या लिलावाव्दारे गैरअर्जदार क्र. 3 यांना रक्कम रु.5,15,000/- ला सदरचा ट्रक विक्री केलेला आहे. गैरअर्जदाराने ट्रक सदरचा ट्रक लिलावाव्दारे विक्री केला त्यावेळेस गैरअर्जदाराला अर्जदाराकडून रक्कम रु.3,68,536.86 येणे बाकी होती. त्या व्यतिरिक्त पुढील 20 हप्ते शिल्लक होते. त्यापैकी गैरअर्जदाराला फक्त रक्कम रु.5,15,000/- लिलावाव्दारे प्राप्त झाले. आज रोजी ट्रक विक्री केल्यानंतर सुध्दा गैरअर्जदाराला अर्जदाराकडून रक्कम रु.4,30,115/- येणे बाकी आहे. गैरअर्जदाराने अर्जदारास चुकीची सेवा दिलेली नाही. याउलट अर्जदाराने स्वतः गाडी सरेंडर करुन तथ्य मंचासमोर मांडलेले आहे व मंचाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्जदाराने दिनांक 03.09.2014 रोजी गैरकायदेशीर मार्गाने गैरअर्जदार क्र. 3 यांचेकडून ट्रकचा ताबा मिळविलेला आहे व पोलीस स्टेशन येथे खोटी तक्रार दिली. अर्जदाराचे सदरचे कृत्य बेकायदेशीर आहे. अर्जदाराला सदरचा ट्रक ठेवण्याचा अधिकार नाही. अर्जदाराने ट्रकचा ताबा मिळविल्यानंतरही थकीत हप्ते मंचासमोर जमा करण्याचा प्रयत्न केलेला नाही. उलट मनाई हुकूम मागून पुढील हप्ते भरावे लागू नये म्हणून सदरची खोटी तक्रार दाखल केलेली आहे. त्यामुळे अर्जदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी अशी विनंती गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी लेखी जबाबाव्दारे केलेली आहे.
5. अर्जदाराने तक्रार दाखल केल्यानंतर गैरअर्जदार क्र. 3,शे.हारुण पि.शेख मुसा यांनी सदर तक्रारीमध्ये गैरअर्जदार क्र. 3 म्हणून पक्षकार बनविण्यात यावे असा अर्ज दिला. अर्ज मंजूर करुन शे.हारुण पि.शेख मुसा यांना गैरअर्जदार क्र. 3 म्हणून पक्षकार बनविण्यात आले
गैरअर्जदार क्र. 3 यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणेः-
6. अर्जदाराचा अर्ज खोटा असून सत्य परिस्थिती लपवून ठेऊन दाखल केलेला आहे. गैरअर्जदार क्र. 3,शे.हारुण पि.शेख मुसा हा एका पायाने अपंग आहे, त्याला उदर्निवाहाचे साधन नसल्याने प्रपंच चालावा या उद्देशाने गैरअर्जदार यांचेकडून लिलावामध्ये सदरील वाहन खरेदी केलेले आहे. गैरअर्जदार क्र. 3,शे.हारुण पि.शेख मुसा यांनी लिलावामध्ये सामील होणेकरीता शर्तीप्रमाणे अनामत रक्कम रु.19,999/- फायनान्स कंपनीकडे जमा केली. गैरअर्जदार यांनी सदरील ट्रकला जास्त किंमत दिल्यामुळे व बोली केल्यामुळे गैरअर्जदार क्र. 3 यांनी सदरचा ट्रक लिलावाव्दारे रक्कम रु.5,15,000/- ला सदरील वाहन खरेदी केले. त्याशिवाय सर्व्हीस टॅक्स म्हणून रक्कम रु.8484/- गैरअर्जदार क्र. 1 यांना दिलेले आहे. रक्कम दिल्यानंतर गैरअर्जदार फायनान्स कंपनीने गैरअर्जदार क्र. 3,शे.हारुण पि.शेख मुसा यांचे ताब्यात सदरचे वाहन दिले. तसेच आरटीओ कार्यालयात नाव नोंदणीकरणेकरीता फॉर्म क्र. 36 व 37 देण्यात आला. सदरील वाहन ताब्यात घेतल्यानंतर वाहन यार्डामध्ये ब-याच काळापासून उभे असल्याने त्यामध्ये बिघाड झालेला होता. त्यामुळे गैरअर्जदार क्र. 3,शे.हारुण पि.शेख मुसा यांनी एकंदरीत रक्कम रु.1,50,000/- व रक्कम रु.2,00,000/- खर्च करुन वाहन दुरुस्त केलेले आहे. सदरील वाहनाव्दारे वाहतुक करीत असतांना दिनांक 03.09.2014 रोजी रात्री 9.00 वाजेच्या सुमारास सदरील ट्रकवरील ड्रायव्हर नामे काझी रजियोद्यीन पि.काझी लहीयोद्यीन हा वाहन चालवित असतांना अर्जदाराचा भाऊ विलास यांनी त्यांचे सोबत असलेल्या लोकांच्या सहायाने जबरदस्तीने वाहन पळवूननेले. गैरअर्जदार क्र. 3,शे.हारुण पि.शेख मुसा यांनी माहिती घेतली असता सदर वाहन खरेदी करण्यापुर्वी अर्जदाराचे मालकीचे होते. अर्जदाराने कर्ज परतफेड केलेली नसल्याने श्रीराम फायनान्स कंपनीने वाहन जप्त करुन आणून व सदरचा ट्रक लिलावाव्दारे विक्री केला असे समजले. गैरअर्जदार क्र. 3,शे.हारुण पि.शेख मुसा यांनी पुर्ण रक्कम श्रीराम फायनान्स कंपनीकडे भरुन वाहन ताब्यात घेतलेले आहे. वाहन ताब्यात घेतल्यानंतरही अर्जदाराने सदरील वाहन जबरदस्तीने हिसकावून आणलेले आहे. त्यामुळे गैरअर्जदार क्र. 3 यांचेवर उपासमारीची वेळ आलेली आहे. गैरअर्जदार क्र. 3 हा अपंग आहे, त्याची फार मोठी रक्कम या व्यवहारात गुंतलेली आहे. त्यामुळे त्यास विनाकारण मानसिक व शारिरिक त्रास सहन करावा लागत आहे. अर्जदाराने वाहनाचा जबरदस्तीने ताबा घेतलेला आहे व वाहनाचा वापर अर्जदार करीत आहे. गैरअर्जदार क्र. 3,शे.हारुण पि.शेख मुसा यांनी श्रीराम फायनान्स कंपनीकडे रक्कम रु.5,23,484/- वाहनाचे खरेदीसाठी जमा केलेले असून वाहन दुरुस्तीसाठी खर्च केलेला आहे. जर कोणत्याही परिस्थितीत सदरील वाहन गैरअर्जदार क्र. 3,शे.हारुण पि.शेख मुसा यांना देणे शक्य नसल्यास अर्जदार व गैरअर्जदार क्र. 1 व 2 श्रीराम फायनान्स कंपनीकडून गैरअर्जदार क्र. 3,शे.हारुण पि.शेख मुसा यांनी लिलावात जमा केलेली रक्कम रु.5,23,484/- द.सा.द.शे. 12 टक्के व्याजासह देण्याचा आदेश करावा किंवा अर्जदाराकडून वाहन गैरअर्जदार क्र. 3,शे.हारुण पि.शेख मुसा यांचेकडे सुस्थितीत हवाली करण्यात यावे अशी विनंती गैरअर्जदार क्र. 3 यांनी लेखी जबाबाव्दारे केलेली आहे.
7. अर्जदार व गैरअर्जदार यांनी पुराव्याकामी आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्टी स्पष्ट होतात.
8. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचेविरुध्द गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे वाहन बेकायदेशीररीत्या जप्त केलेले असल्यामुळे तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराचे म्हणणेनुसार गैरअर्जदार यांनी अर्जदारास कुठलीही नोटीस,पुर्वसुचना न देता अर्जदाराचे वाहन जप्त केलेले आहे. अर्जदार यांचे तक्रारीमधील दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता अर्जदाराचे वाहनास अपघात हा दिनांक 19.12.2013 रोजी झालेला आहे. अर्जदाराने दिनांक 25.07.2013 रोजी शेवटचा हप्ता गैरअर्जदार यांचेकडे भरलेला आहे. त्यामुळे अर्जदारास अपघात झाल्यामुळे हप्ता भरु शकलेला नाही हे अर्जदाराचे म्हणणे अयोग्य असल्याचे दिसून येते. अर्जदाराच्या तक्रारीसोबत दाखल केलेल्या दिनांक 10.12.2013 रोजी Vehicle Inventory Report वरुन अर्जदाराचे वाहन दिनांक 10.12.2013 रोजी गैरअर्जदार यांनी जप्त करुन यार्डमध्ये ठेवलेले आहे याची कल्पना अर्जदारास होती. कारण सदरील रिपोर्टवर गाडी मालकाने स्वतः आणून लावली असे नमुद केलेले असून त्यावर मारोती भुरे यांची स्वाक्षरी आहे. गैरअर्जदार यांनी दिनांक 21.12.2013 रोजी अर्जदाराने गैरअर्जदारास दिलेले पत्र दाखल केलेले आहे. सदरील पत्रावरुन अर्जदाराने जप्त केलेल्या वाहनामधीलन माल दुस-या गाडीमध्ये क्रॉसींग करुन मिळावा व वाहनाचे थकीत हप्ते भरल्यानंतर वाहन ताब्यात द्यावे अशी विनंती केलेली आहे. त्यानुसार गैरअर्जदार यांनी वाहनातील मालाचे क्रॉसिंग करण्याची परवानगी अर्जदारास दिलेली आहे. सदरील पत्रामध्ये अर्जदार थकीत हप्त्याची रक्कम गैरअर्जदार यांचेकडे केव्हा जमा करणार याबाबत उल्लेख केलेला नाही किंवा थकीत रक्कम भरण्याची तयार दर्शविलेली नाही. अर्जदाराने आर.टी.ओ. कार्यालयाचे दिनांक 01.08.2014 रोजीचे अर्जदाराचे वाहनाचे हस्तांतर करु नये असा अर्ज दिलेला आहे. परंतु वाहन जप्त केल्यानंतर म्हणजेच दिनांक 10.12.2013 पासून दिनांक 01.08.2014 पर्यंत अर्जदार रक्कम भरण्यास तयार असल्याद्दल किंवा रक्कम भरली असल्याबद्दलचा कोणताही पुरावा मंचासमोर दिलेला नाही. अर्जदाराने वाहन जप्त केल्यानंतर गैरअर्जदार यांनी दिनांक 19.0.2014 रोजी करारानुसार वाहन गैरअर्जदार क्र. 3 यांना विक्री केलेले आहे. दिनांक 19.03.2014 पासून सदरील वाहन गैरअर्जदार क्र. 3 यांच्या ताब्यात होते. परंतु अर्जदार यांनी दिनांक 04.09.2014 रोजी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे अर्ज देऊन वाहनाचा ताबा मिळवलेला आहे. वास्तविक पाहता अर्जदाराने थकीत हप्त्यापोटी करारानुसार गैरअर्जदार यांचेकडे हप्ते भरणे क्रमप्राप्त होते. परंतु अर्जदाराने हप्त्याची रक्कम न भरल्याने अर्जदार थकबाकीदार झालेला आहे व अर्जदाराने दरम्यानच्या कालावधीमध्ये हप्ते भरण्याची तयारीही दर्शविलेली नाही. असे असतांनाही वाहन विक्री केले किंवा नाही याची शहानिशा अर्जदाराने वाहन ताब्यात घेण्यापुर्वी गैरअर्जदार यांचेकडून करुन घ्यावयास पाहिजे होती. परंतु अर्जदाराने सदरील वाहनाचा ताबा पोलीस स्टेशन मार्फत घेतलेला आहे. अर्जदाराचे वाहन गैरअर्जदार यांनी जप्त केलेले असतांनाही वाहनाचे थकीत हप्ते भरुन वाहन ताब्यात घेण्याऐवजी सुमारे 9 ते 10 महिन्यानंतर वाहनाचा ताबा गैरअर्जदार यांच्या परस्पर घेणे ही बाब बेकायदेशीर आहे. अर्जदाराने दिनांक 01.08.2014 रोजी आर.टी.ओ. कार्यालयात वाहन हस्तांतर करण्याबाबत आक्षेप नोंदविलेला आहे. याचा अर्थ गैरअर्जदार अर्जदाराचे वाहन विक्री करणार असल्याची कल्पना अर्जदारास निश्चितच होती असे दिसून येते. अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून थकीत हप्त्याची रक्कम जमा करुन वाहन परत घेणे करारानुसार बंधनकारक असतांनाही अर्जदाराने हप्ते जमा न करता गैरअर्जदार यांच्या परस्पर वाहनाचा ताबा घेतलेला आहे व अर्जदाराने वाहन विक्री केलेले असल्याची बाब मंचासमोर जाणूनबुजून आणलेली नाही असे मंचाचे मत आहे. गैरअर्जदार क्र. 3 यांनी सदरील प्रकरणामध्ये अर्जदाराकडून वाहनाचा ताबा द्यावा अशी विनंती केलेली आहे. परंतु गैरअर्जदार क्र. 3 यांनी कायदेशीर मार्गाने वाहनाचा ताबा घेणे उचीत होईल असे मंचाचे मत आहे. अर्जदार यांनी सत्य परिस्थिती मंचापासून लपवून ठेवलेली असल्याने मंच खालील आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदार यांची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. प्रस्तुत प्रकरणामध्ये दिलेला अंतरीम आदेश रद्द करण्यात येतो.
3. खर्चाबाबत आदेश नाही.
4. दोन्ही पक्षकारास निकालाच्या प्रती मोफत पुरविण्यात याव्यात.