-निकालपत्र–
(पारित व्दारा- श्री शेखर प्रभाकर मुळे, मा.अध्यक्ष)
( पारित दिनांक-22 ऑगस्ट, 2016)
01. तक्रारकर्त्याने ही तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली विमाकृत गाडीचे दुरुस्ती खर्चाचा विमा दावा मंजूर न केल्या बद्दल विमा कंपनी आणि गाडीचे निर्माता व विक्रेता यांचे विरुध्द दाखल केली आहे.
02. तक्रारीचे स्वरुप थोडक्यात खालील प्रमाणे-
विरुध्दपक्ष क्रं-1) ही चेन्नई स्थित रॉयल सुंदरम विमा कंपनी आहे तर विरुध्दपक्ष क्रं-2) आणि क्रं-3) हे अनुक्रमे दिल्ली आणि मुंबई स्थित मरुती सुझुकी या गाडी निर्माण कंपनीचे कार्यालय असून, विरुध्दपक्ष क्रं-4) आणि क्रं-5) हे सदर गाडीचे अनुक्रमे धमतारी, छत्तीसगढ आणि नागपूर येथील विक्रेते आहेत. तक्रारकर्ता हा भंडारा जिल्हयातील तुमसर येथील रहिवासी आहे. दिनांक-11/09/2011 रोजी त्याने विरुध्दपक्ष क्रं-2) आणि क्रं-3) निर्माता कंपनीची “Maruti Swift D’zire” ही कार, विरुध्दपक्ष क्रं-4) विक्रेता यांचे कडून रुपये-7,45,421/- एवढया किंमतीत विकत घेतली. दिनांक-14/09/2011 रोजी विरुध्दपक्ष क्रं-4) विक्रेत्याने त्या गाडीचा विमा, विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीकडून काढला, तो कॉम्प्रव्हेन्सीव्ह विमा होता आणि त्या गाडीची आय.डी.व्ही. (Insured Declared Value) रुपये-6,33,475/- एवढी दर्शविली होती.
दिनांक-13/11/2011 रोजी तक्रारकर्ता सदर विमाकृत गाडीने तुमसर वरुन गांदीयाला जात असताना गाडी एकाएकी तिरोडया जवळ बंद पडली, त्याची सुचना त्याने विरुध्दपक्ष क्रं-2) निर्माता कंपनीचे अधिकृत वर्कशॉप आर्या मोटर्स, गोंदीया यांना दिली, त्याप्रमाणे आर्या मोटर्स गोंदीया तर्फे घटनास्थळा वरुन ती गाडी ओढून गोंदीया येथील त्यांचे वर्कशॉप मध्ये नेण्यात आली. तेथे तक्रारकर्त्याला तज्ञांचे मत घेण्यास विरुध्दपक्ष क्रं-5) कडे गाडी नेण्यास सुचविण्यात आले, तत्पूर्वी गाडीतील काही तात्पुरती दुरुस्तीची कामे करुन तक्रारकर्त्या कडून रुपये-7,694/- घेण्यात आले. त्यानंतर सदर विमाकृत गाडी विरुध्दपक्ष क्रं-5) कडे नागपूर येथील वर्कशॉप मध्ये दुरुस्ती करीता नेली असता तेथे गाडीची तपासणी केल्यावर गाडीमध्ये शॉर्ट इंजीन, गास्केट, रेडीएटर असेम्ब्ली, चॉर्जर असेम्बली,, हायड्रोलीक व्हॉल्व्ह तसेच संपूर्ण इंजीन ओव्हरऑल, इंजीन असेम्बली इत्यादी दुरुस्तीचे कामे आवश्यक असून त्यासाठी एकूण रुपये-1,21,129.52 पैसे एवढया खर्चाच्या रकमेचे अंदाजपत्रक त्याला देण्यात आले. गाडीमधील संपूर्ण बिघाड हा विकत घेतल्या पासून 02 महिन्याच्या आत मध्येच निर्माण झाला होता आणि गाडी नादुरुस्त होण्याचे कारण त्याला असे सांगण्यात आले की, गाडीला खालुन दगड लागला आणि त्यामुळे बिघाड निर्माण झालेत. विमाकृत गाडीच्या दुरुस्तीचे खर्चाचा दावा विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीचे नागपूर येथील कार्यालयात पाठविण्यात आला व त्यांच्या निरिक्षणा नंतर विरुध्दपक्ष क्रं-5) ने गाडीची दुरुस्ती करण्यास सुरुवात केली. गाडीची दुरुस्ती केल्या नंतर विरुध्दपक्ष क्रं-5) ने तक्रारकर्त्या कडून रुपये-1,15,478/- रकमेची मागणी केली. विम्या बद्दल विचारले असता त्याला विरुध्दपक्ष क्रं-5) तर्फे असे सांगण्यात आले की, विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीने त्याचा विमा दावा अद्दाप पर्यंत मंजूर केलेला नाही म्हणून सद्दस्थितीत रकमेचा भरणा करावा किंवा विमा दावा मंजूर होई पर्यंत विमाकृत गाडी तिथेच वर्कशॉपमध्ये राहू द्दावी. तक्रारकर्त्याला गाडीची आवश्यकता होती म्हणून त्याने रुपये-1,15,478/- एवढया रकमेचा भरणा केला आणि तो ती गाडी घेऊन निघून गेला. तक्रारकर्त्याच्या मते विमाकृत गाडीमध्ये निर्मिती दोष होता व गाडी वॉरन्टी पिरियेड मध्ये असताना सुध्दा तिचे दुरुस्तीसाठी त्याचे कडून पैसे आकारण्यात आले.
त्याने विरुध्दपक्ष क्रं-5) कडे विमाकृत गाडीच्या दुरुस्ती खर्चा संबधाने विमा दावा हा विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनी कडून मिळवून देण्याची विनंती केली परंतु त्यांनी लक्ष दिले नाही. तक्रारकर्त्याच्या मते विरुध्दपक्ष क्रं-2) आणि क्रं-3) ने त्यास जुनी गाडी, ही नविन गाडी दर्शवून विकली. अशाप्रकारे विरुध्दपक्षानीं त्याला फसविले असून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे. म्हणून त्याने अशी विनंती केली की, विरुध्दपक्षानीं त्याला विमाकृत गाडीचे दुरुस्ती संबधाने रुपये-1,23,172/- एवढी रक्कम नोव्हेंबर-2011 पासून ते प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.18% दराने व्याजासह देण्याचे आदेशित व्हावे. तसेच त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-5,00,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्च देण्याचे विरुध्दपक्षानां आदेशित व्हावे.
03. मंचाचे मार्फतीने यामधील विरुध्दपक्षांना नोटीस पाठविण्यात आली असता त्यांनी उपस्थित होऊन आप-आपले लेखी उत्तर मंचा समक्ष सादर केले.
04. विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीने आपले लेखी उत्तर नि.क्रं-12 प्रमाणे दाखल करुन तक्रार नामंजूर केली. पुढे असा आक्षेप घेतला की, या मंचाला तक्रार चालविण्याचे अधिकार क्षेत्र येत नाही. त्याच प्रमाणे त्या गाडीतील काही तांत्रिक दोष बाहेरील कारणांमुळे उत्पन्न झाले नव्हते. सर्व्हेअरने गाडीची तपासणी करुन अहवाला दिला होता, त्या अहवाला प्रमाणे विमाकृत गाडीला बाहेरुन कुठलेही नुकसान झालेले नसून इंजिनला पण काही नुकसान झालेले नाही, ज्याअर्थी त्या गाडीला बाहेरुन कुठलेही नुकसान झाले नव्हते, त्याअर्थी त्या गाडीला कुठलाही अपघात झालेला नव्हता, त्यामुळे विमा करारातील अटी व शर्ती नुसार विमा दावा मंजूर करणे शक्य नव्हते. विमा दावा तेंव्हाच मंजूर करता येतो, ज्यावेळी विमाकृत गाडीला बाहय कारणांमुळे अपघात झालेला असतो. सबब या कारणांस्तव तक्रार खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनी तर्फे करण्यात आली.
05. विरुध्दपक्ष क्रं-2) आणि क्रं-3) यांनी आपले संयुक्तिक लेखी उत्तर नि.क्रं-11 वर दाखल केले आणि नमुद केले की, तक्रारकर्ता हा त्यांचा ग्राहक होत नाही. तसेच नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी ही त्यांचेवर तेंव्हाच येते, ज्यावेळी त्या गाडीमध्ये काही निर्मिती (Manufacturing Defects) असतील. तसेच ही तक्रार आर्य मोटर्स, गोंदीया यांना प्रतिपक्ष न केल्याचे कारणावरुन चालविण्यास योग्य नाही. त्यांनी पण मंचाला तक्रार चालविण्याचे अधिकारक्षेत्र नसल्याचा आक्षेप घेतला. विमाकृत गाडीची दुरुस्ती ही आर्य मोटर्स गोंदीया आणि विरुध्दपक्ष क्रं-5) यांचे नागपूर येथील वर्कशॉप मध्ये झाली ही बाब कबुल करुन पुढे असे नमुद केले की, ज्याअर्थी विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीने विमाकृत गाडीचे दुरुस्ती खर्चाचा विमा दावा नामंजूर केला, तेंव्हा ते त्याच्यासाठी जबाबदार राहू शकत नाही. विमाकृत गाडीमध्ये निर्मिती दोष होता ही बाब नाकबुल केली. तसेच तक्रारकर्त्याला जुनी गाडी, नविन गाडी दर्शवून विकली व त्याची फसवणूक केली हा आरोप नाकबुल केला. सबब तक्रारकर्त्याची तक्रार खारीज व्हावी, अशी विनंती विरुध्दपक्ष क्रं-2) आणि क्रं-3) यांनी केली.
06. विरुध्दपक्ष क्रं-4) ने आपले लेखी उत्तर नि.क्रं-20 वर दाखल केले. त्यांनी पण मंचास तक्रार चालविण्याचे अधिकारक्षेत्र येत नसल्याचा आक्षेप घेतला. परंतु त्यांनी हे कबुल केले की, तक्रारकर्त्याने सदर विमाकृत गाडी ही त्यांचे कडून विकत घेतली होती आणि तिचा विमा विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीकडे काढला होता. विमाकृत गाडी अचानक बंद पडली ही बाब नाकबुल करुन असे नमुद केले की, तक्रारकर्ता या संबधाने काही तरी लपवून ठेवत आहे, ती गाडी कुठल्यातरी मोठया दगडावर खालुन आदळली असावी, ज्यामुळे तिचे रेडीएटर फुटले, त्यामुळे त्यातील कुलंट वाहून गेले परंतु तरी सुध्दा तक्रारकर्त्याने गाडी तशीच निष्काळजीपणाने चालविल्याने इंजिन गरम झाल्यामुळे बिघाड उत्पन्न झालेत. गाडीत निर्मिती दोष आहे तसेच जुनी गाडी ही नविन गाडी दर्शवून विकण्यात आली हे तक्रारकर्त्याचे आरोप फेटाळलेत तसेच गाडीत बिघाड झाल्या नंतर ती त्यांचेकडे दुरुस्तीसाठी कधीच आणल्या गेलेली नाही तसेच त्यांनी कुठलाही अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला नाही. तक्रार खोटी असल्याने ती खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष क्रं-4) ने केली.
07. विरुध्दपक्ष क्रं-5) ने आपले लेखी उत्तर नि.क्रं-14 वर सादर केले. त्यांनी सुध्दा मंचाला तक्रार चालविण्याचे अधिकार क्षेत्र येत नसल्याचा आक्षेप घेतला. पुढे असे नमुद केले की, ज्यावेळी विमाकृत गाडी त्यांचेकडे दुरुस्तीसाठी आणली त्यावेळी त्यांनी तिची तपासणी करुन एकूण रुपये-1,21,129.52 पैसे एवढया रकमेचे दुरुस्ती खर्चाचे अंदाजपत्रक दिले. तक्रारकर्त्याने होकार दिल्यावरच गाडीची दुरुस्ती करण्यात आली. त्यांच्या मते गाडीमध्ये बिघाड निर्माण झाल्याचे जे कारण विरुध्दपक्ष क्रं-4) ने लेखी उत्तरात दिले आहे तेच कारण विरुध्दपक्ष क्रं-5) ने पण दिले आहे. तसेच आर्य मोटर्स गोंदीया यांनी गाडीची तपासणी केल्यावर तक्रारकर्त्याला सांगितले होते की, त्या गाडीच्या इंजिनचे ओव्हरऑईलींग (over oiling ) करणे जरुरीचे आहे, तरी देखील तक्रारकर्त्याने गोंदीया पासून नागपूर पर्यंत सदर गाडी चालवित आणली, त्यामुळे इंजीन गरम होऊन त्यामध्ये बिघाड उत्पन्न झालेत. गाडीमध्ये कुठलाही निर्मिती दोष नव्हता, म्हणून त्या संबधीचे सर्व आरोप नाकबुल करुन तक्रार खारीज करण्याची विनंती केली.
08. उभय पक्षांचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. उभय पक्षां तर्फे दाखल दस्तऐवजांचे अवलोकन करण्यात आले, त्यावरुन मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे देण्यात येतो-
::निष्कर्ष ::
09. या प्रकरणातील सर्व विरुध्दपक्षांनी आक्षेप घेतला की, या मंचाला ही तक्रार चालविण्याचे स्थानीय अधिकारक्षेत्र (Territorial Jurisdiction) येत नाही. त्यांनी आपल्या जबाबां मध्ये असे नमुद केले आहे की, तक्रारकतर्याने विमाकृत गाडी ही छत्तीसगढ राज्यातून विकत घेतली होती आणि तो स्वतः तुमसर जिल्हा भंडारा येथील रहिवासी आहे. त्याचे तक्रारी प्रमाणे तथाकथीत गाडी नादुरुस्तीची घटना ही तिरोडया जवळ, जिल्हा गोंदीया येथे घडली त्यानंतर ती गाडी सर्वात प्रथम गोंदीया येथील आर्य मोटर्स वर्कशॉप मध्ये दुरुस्ती करीता नेण्यात आली. त्या गाडीचा विमा सुध्दा छत्तीसगढ येथे काढण्यात आला होता. सर्व विरुध्दपक्षांचे कार्यालय हे नागपूर जिल्हयाच्या बाहेर स्थित आहे, फक्त विरुध्दपक्ष क्रं-5) यांचेच वर्कशॉप नागपूर येथे स्थित आहे. तक्रारीत विरुध्दपक्ष क्रं-5) ला, विरुध्दपक्ष क्रं-4) चे अधिकृत वर्कशॉप म्हणून सामील केले आहे, परंतु ही बाब सर्व विरुध्दपक्षांनी नाकबुल केली आहे.
10. ग्राहक संरक्षण कायद्दा-1986 चे कलम- 11(2)(a) प्रमाणे ज्या मंचाच्या स्थानीय अधिकार क्षेत्रात (Territorial Jurisdiction) विरुध्दपक्ष राहत असतील किंवा व्यवसाय करीत असतील किंवा त्यांचे कार्यालयाची शाखा असेल त्या मंचा मध्ये तक्रार दाखल करता येते किंवा ग्राहक संरक्षण कायद्दा-1986 चे कलम-11(2)(b) प्रमाणे ज्या ठिकाणी तक्रार दाखल करण्याचे कारण उदभवले असेल त्या ठिकाणच्या मंचा मध्ये तक्रार दाखल करता येते.
11. तक्रारीतील मजकूर वाचला असता आम्हाला असे दिसून येते की, या तक्रारीचे कारण तिरोडा येथे घडले आहे आणि विरुध्दपक्ष क्रं-5) वगळता इतर सर्व विरुध्दपक्षांचे कार्यालय किंवा व्यवसायाचे ठिकाण हे निरनिराळया ठिकाणी असून, नागपूर जिल्हयामध्ये कोणाचेही कार्यालय किंवा शाखा नाही.
12. विरुध्दपक्ष क्रं-5) चा व्यवसाय नागपूर येथे असून तक्रारकर्त्याने ती गाडी दुरुस्ती करीता विरुध्दपक्ष क्रं-5) चे वर्क शॉप मध्ये नेली होती. विरुध्दपक्ष क्रं-5) ने त्या गाडीची दुरुस्ती केली व खर्चाचे रकमेची मागणी केली परंतु विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीने तक्रारकर्त्याचा विमा दावा नाकारल्याने तक्रारकर्त्याने स्वतः खर्चाची रक्कम विरुध्दपक्ष क्रं-5) ला दिली. या मध्ये विरुध्दपक्ष क्रं-5) ने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला किंवा सेवेत कमतरता ठेवली असे म्हणता येणार नाही.
13. या ठिकाणी आणखी एक बाब लक्षात घ्यावी लागेल की, तक्रारीचा मूळ मुद्दा हा विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीने तक्रारकर्त्याचा विमा दावा फेटाळल्याचे कारणा वरुन उदभवलेला आहे, परंतु या कारणासाठी विरुध्दपक्ष क्रं-4) आणि क्रं-5) जे केवळ गाडीचे विक्रेते आहेत त्यांना कोणत्याही अर्थाने जबाबदार धरता येणार नाही. त्याशिवाय विरुध्दपक्ष क्रं-5) हे इतर कोणत्याही विरुध्दपक्षाचे शाखा कार्यालय नाही, त्यामुळे ग्राहक संरक्षण कायद्दाचे कलम-11(2)(a) च्या तरतुदी नुसार या तक्रारीचे उदभवलेले कारण या मंचाचे स्थानीय अधिकारक्षेत्रा बाहेर घडलेले असल्यामुळे ही तक्रार चालविण्याचे अधिकार क्षेत्र या मंचास येत नाही.
14. याशिवाय तक्रारकर्ता स्वतः या बाबतीत शाश्वत नाही की, त्याचे विमाकृत गाडीला अपघात झाला होता की, त्यामध्ये निर्मिती दोष (Manufacturing Defects) होता. जर त्याची तक्रार निर्मिती दोषा संबधीची असेल, तर विरुध्दपक्ष क्रं-4 व क्रं-5 जे कार विक्रेते आहेत, या तक्रारीत जबाबदार होऊ शकत नाही तसेच विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनी सुध्दा गाडीतील निर्मिती दोषा संबधी जबाबदार होऊ शकत नाही. तक्रारकर्त्याने त्याचे गाडीत निर्मिती दोष होता हे दर्शविण्यासाठी कुठल्याही तज्ञांचा अहवाल किंवा तत्सम पुरावा मंचा समोर आणला नाही.
15. याउलट, विरुध्दपक्षांचे म्हणण्या नुसार गाडीत निर्मिती दोष नसून तक्रारकर्ता स्वतः गाडीत निर्माण झालेल्या दोषांसाठी जबाबदार आहे कारण गाडी चालविता असताना त्याला खालुन कुठल्या तरी जड वस्तुचा/दगडाचा आघात झाल्यामुळे त्याचे रेडीएटर फुटले व त्यामुळे कुलंट गळती झाल्याने इंजिन जास्त गरम झाल्याने गाडीत बिघाड निर्माण झाला ही बाब विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीकडे दाखल केलेल्या क्लेम फॉर्म वरुन सिध्द होते, ज्यामध्ये गाडीचे रेडीएटर फुटल्या संबधी लिहिलेले आहे.
16. विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीने त्यांचे सर्व्हेअर कडून त्या गाडीची तपासणी करुन घेतली होती, त्यांनी दिलेल्या अहवाला मध्ये गाडीतील बिघाडा विषयी असे लिहिलेले आहे की, त्या गाडीला बाहेरुन कुठलेही नुकसान झालेले नव्हते, जे काही नुकसान झाले होते ते इंजिनला झाले होते. गाडी चालवित असताना स्पिड ब्रेकरवर (Speed Breaker ) गाडी उसळली, त्यामुळे रेडीएटर क्षतीग्रस्त (Damaged) झाले. विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीचे सर्व्हेअरने दिलेला हा अहवाल विचारात घ्यावा लागेल कारण तो एका तज्ञाचा अहवाल आहे आणि त्या शिवाय तो अहवाल चुकीचा आहे असे तक्रारकर्त्याने आव्हान दिलेले नाही.
17. तक्रारकर्त्याचे वकीलांनी “New India Assurance Co.Ltd.-Versus-Pradeep Kumar”-2009 ACJ 1729 (SC) या निवाडयावर आपली भिस्त ठेवली, ज्यामध्ये असे नमुद केले आहे की, सर्व्हेअरचा अहवाल हा विमाधारकावर किंवा विमा कंपनीवर बंधनकारक नसतो. तक्रारकर्त्याच्या या युक्तीवादाशी जरी सहमती दर्शविली तरी प्रश्न असा उपस्थित होतो की, ही तक्रार विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनी विरुध्द या मंचाला स्थानीय अधिकारक्षेत्राचे कारणा वरुन चालविता येईल का आणि त्याचे कारण आम्ही पूर्वीच दिले आहे की, विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनी ही मंचाचे स्थानीय अधिकारक्षेत्रा बाहेरील असल्यामुळे तिचे विरुध्द या मंचाला निर्णय देता येणार नाही.
18. विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीचे वकीलांनी एका वरिष्ठ न्यायालयाचे निर्णयाचा आधार घेतला- “Sonic Surgical-Versus-National Insurance Company Ltd.”-(2010) 1 S.C.C.-135 या प्रकरणामध्ये “ शाखा कार्यालय” या शब्दाचे स्पष्टीकरण केलेले आहे की, असे शाखा कार्यालय जेथे तक्रार करण्याचे कारण घडते आणि इतर कुठलेही शाखा कार्यालय ज्या ठिकाणी स्थित असेल तेथे तक्रार दाखल करण्याचे अधिकारक्षेत्र येत नाही.
19. वरील सर्व बाबींचा विचार करता असे दिसून येते की, ही तक्रार न केवळ या मंचाच्या स्थानीय अधिकारक्षेत्रा (Territorial Jurisdiction) बाहेरची आहे तसेच विरुध्दपक्ष क्रं-4) आणि क्रं-5) विरुध्द कुठलेही तक्रारीचे कारण घडले नसताना दाखल केलेली आहे. सबब वरील सर्व कारणांस्तव ही तक्रार खारीज होण्यास पात्र आहे, त्यावरुन आम्ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत आहोत-
::आदेश ::
(01) तक्रारकर्त्याची, विरुध्दपक्ष क्रं-1) ते क्रं-5) विरुध्दची तक्रार खारीज करण्यात
येते.
(02) खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.
(03) प्रस्तुत निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन
देण्यात याव्यात.