द्वारा श्री.उ.वि.जावळीकर- मा.अध्यक्ष.
न्यायनिर्णय
तक्रारीचे संक्षिप्त स्वरुप खालील प्रमाणे आहे.
1. सामनेवाले नं.1 हे ठाणे येथील टुर ट्राव्हलिंग व्यवसायिक आहेत,तर सामनेवाले नं.2 हे सुध्दा मुलुंड येथील सामनेवाले नं.1 यांचे समव्यवसायीक आहेत. तक्रारदार हया मुलुंड मधील महिला रहिवासी आहेत.
2. तक्रारदाराच्या तक्रारीमधील कथनानुसार सामनेवाले यांनी चारधाम पॅकेज टुरसंबंधी जाहिरात वाचल्यानंतर त्यांनी सामनेवाले नं.2 यांची भेट घेतली व चारधाम टुर संबंधी विचारणा केल्यानंतर सामनेवाले नं.2 यांनी तक्रारदाराना सामनेवाले नं.1 यांच्याकडे घेऊन गेले. सामनेवाले नं.1 यांनी चारधाम पॅकेजची पुर्ण माहिती दिल्यानंतर तक्रारदार यांनी पाच व्यक्तींसाठी प्रत्येकी रक्कम रु.16,000/- प्रमाणे रु.80,000/- चे पॅकेज रु.22,000/- आगाऊ रक्कम देऊन ता.18.04.2009 रोजी नोंद केले. परंतु तद्नंतर 4 – 5 दिवसामध्ये तक्रारदारानी बुक केलेल्या 5 व्यक्तींपैंकी एकजण हृदयरोगाने आजारी पडल्याने व त्यांचा आजार गंभीर स्वरुपाचा झाल्याने सर्वजणानी चारधामचा नियोजित कार्यक्रम रदद केला व त्यानुसार तक्रारदारांनी सामनेवाले नं.2 यांना दुरध्वनीव्दारे कल्पना दिली तसेच आगाऊ भरलेली रक्कम रु.22,000/- परत करण्याची विनंती केली. त्यावर सामनेवाले नं.2 यांनी सामनेवाले नं.1 यांच्याशी चर्चा करुन रकमेच्या परताव्याबाबत माहिती देण्याचे आश्वासन दिले. यानंतर तक्रारदारांनी पुन्हा सामनेवाले नं.2 यांच्याकडे विचारणा केली असता सामनेवाले यांनी आगाऊ भरलेल्या रकमेपैंकी 30 टक्के रक्कम वजा करुन उर्वरीत रक्कम परत करण्याचे मान्य केले. मात्र यानंतर पुढील काही दिवसातच परताव्याच्या रकमेबाबत असे सांगितले की, तक्रारदार यांचे टुरचे पॅकेज रु.80,000/- ऐवढया रकमेचे होते या रकमेच्या 30 टक्के रक्कम म्हणजेच रु.24,000/- रक्कम रदद करण्यात येईल. तक्रारदार यांनी केवळ रु.22,000/- च जमा केले असल्यामुळे तक्रारदाराकडून अदयाप रु.2,000/- येणे असल्यामुळे तक्रारदाराना परतावाच्या कोणतीही रक्कम देय होत नाहीत. यानंतर तक्रारदार यांनी सामनेवाले नं.1 व 2 यांना वारंवार विनंती करुन आपली रु.22,000/- ही रक्कम परत देण्याची विनंती केली ती नाकारल्यानंतर तक्रारदारांनी सामनेवाले यांना कायदेशीर नोटीस पाठवून रक्कम परताव्याची मागणी केली. परंतु ती नाकारण्यात आल्यानंतर तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार दाखल करुन आपली रक्कम रु.22,000/- 24 टक्के व्याजासह परत मिळावी, नुकसानभरपाई रु.10,000/- व तक्रारखर्च रु.10,000/- मिळावे अशी मागणी केलेली आहे.
3. समानेवाले यांनी कैफीयत दाखल केली व त्यामध्ये असे नमुद केले की,तक्रारादारानी पाच माणसांचे आगाऊ बुकींग केल्यामुळे त्यांच्या जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या व त्यांच्या जागी इतरांचे बुकींग घेतले नव्हते, त्यामुळे तक्रारदारानी ऐनवेळी बुकींग रदद करुन सामनेवाले यांचे रु.58,000/- चे नुकसान केल्याने ते पैसे तक्रारदारानी सामनेवाले यांना देणे आवश्यक आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी मागणी केलेला परतावा चुकीचा व खोडसाळ आहे.
4. प्रस्तुत मंचाने तक्रारदारांची तक्रार,पुराव्याचे शपथपत्र,कागदपत्रे, लेखी युक्तीवाद, तसेच सामनेवाले यांची कैफीयत, पुराव्याचे शपथपत्र, कागदपत्रे व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. तसेच ता.05.07.2013 रोजी तक्रारदारांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला. त्यावरुन प्रस्तुत तक्रार निकालकामी खालील मुददे कायम करण्यात येतात.
मुद्दे निष्कर्ष
(1) सामनेवाले यांनी तक्रारदाराकडून चारधाम टुर्ससाठी बुकींग रक्कम रु.22,000/- तक्रारदार यांनी टुर रदद केल्या नंतर सदर रकमेचा परतावा मागणी करुन सुध्दा न देणे हीबाब सामनेवाले यांच्या सेवा सुविधा पुरविण्या मधील कसुर असल्याचे तक्रारदार सिध्द करतात काय ?............................होय.
(2) तक्रारदार सामनेवाले याजकडून आगाऊ रक्कम
रु.22,000/- चा परतावा, नुकसानभरपाई व इतर खर्च मिळण्यास पात्र आहेत काय ? ...................................................अंशतः होय.
(3) अंतिम आदेश ? ................................................तक्रार अंशतः मान्य करण्यात येते.
5. कारण मीमांसा--
(अ) तक्रारदारानी सामनेवाले यांची चारधाम टुर बाबतची जाहिरात पाहुन आपल्या इतर सहका-यां सोबत तिर्थयात्र करण्याच्या हेतुने सामनेवाले नं.2 यांचे मार्फत सामनेवाले नं.1 यांचेकडे रु.22,000/- ता.18.04.2009 रोजी जमा करुन 5 व्यक्तिसाठी आगाऊ नोंदणी केली व उर्वरीत रु.58,000/- नंतर जमा करण्याचे आश्वासन दिले. परंतु लगेचच तक्रारदारांचा एक सहकारी हृदयरोगाने गंभीर आजारी झाल्याने सर्वजणांनी तिर्थयात्रा रदद करण्याचे ठरविले. त्यामुळे तक्रारदारानी सामनेवाले यांचेकडे आगाऊ जमा केलेले रु.22,000/- परत
मिळावे अशी मागणी केली. सामनेवाले यांनी प्रथमतः 30 टक्के रक्कम वजा करुन उर्वरीत रक्कम देण्याचे मान्य केले असे तक्रारदाराच्या कथनावरुन दिसुन येते,तथापि सामनेवाले नं.1 व 2 यांनी ही बाब नाकारली असुन त्यांनी असे कथन केले आहे की,एकूण रु.80,000/- च्या 30 टक्के रक्कम वजा करुन उर्वरीत रक्कम देण्याचे मान्य केले होते व त्यामुळे तक्रारदाराकडून अजुन रु.2,000/- येणे बाकी आहे. शिवाय तक्रारदाराच्या राखीव जागेवर अन्य व्यक्तींचे आरक्षरण न केल्याने सामनेवाले यांचा तोटा झाला असुन त्यास सर्वस्वी तक्रारदार जबाबदार आहेत.
(ब) यासंदर्भात असे नमुद करणे अनिवार्य वाटते की, तक्रारदार यांनी चारधाम यात्रेचे बुकींग स्वतःच केले व ते रद्द करण्याचा निर्णय सुध्दा त्यांनी स्वतःच घेतला आहे,त्यामुळे सामनेवाले यांची सेवा सुविधा घेण्या अगोदरच त्यांनी उभय पक्षामधील कंत्राट एकतर्फी रदद केले आहे, असे जरी असले तरी सदरचे बुकींग रदद करण्या मागील कारण सुध्दा विचारात घेणे अनिवार्य आहे. तक्रारदार यांनी यासंदर्भात असे नमुद केले आहे की, त्यांचा एक सहकारी ता.22.04.2009 रोजी हृदयरोगाने आजारी झाला व 25 एप्रिल पर्यंत त्यांची प्रकृतीकस्थिती गंभिर झाल्याने ही तिर्थयात्रा करणे अनुचित होईल या सद्हेतुने सर्वजणानी ही यात्रा रदद करण्याचे ठरविले व त्यानुसार तक्रारदारानी सामनेवाले नं.2 व 1 यांना ही कल्पना दिली. सदर कारणाबाबत तक्रारदारांनी कोणताही पुरावा दिला नसला तरी तक्रारदारावर अविश्वास दाखविणे अन्यायकारक होईल,तिर्थयात्रेचे बुकींग रदद करण्याचे हे कारण निश्चितच नियंत्रणा बाहेरचे असल्याने,शिवाय ही घटना बुकींग केल्यापासुन केवळ 4 – 5 दिवसात घडल्याने सामनेवाले यांनी तक्रारदाराची रक्कम परताव्या बाबतची मागणी, त्यामागिल कारण विचारात घेऊन मान्य करणे हे केवळ नैतिकच नव्हे तर न्यायोचित होते. परंतु तसे न करता दोन्ही सामनेवाले यांनी अयोग्य कारणे पुढे करुन रक्कम परतावा नाकारल्याचे दिसुन येते.
(क) सामनेवाले यांनी तक्रारदाराशी यासंदर्भात सुरुवातीला कबुल केल्याप्रमाणे बुकींग रकमेच्या 30 टक्के रक्कम वजा करुन उर्वरीत रक्कम देण्याचे मान्य केले आहे. यासंदर्भात
उभय पक्षकारांनी या टुर पॅकेज संबंधीच्या शर्ती व अटी दाखल केलेल्या नाहीत. प्रस्तुत प्रकरणातील बुकींग रदद करण्याचे, कारण हे तक्रारदाराच्या नियंत्रणा बाहेरील असल्याने तक्रारदाराना परतावा मिळण्याचा हक्क प्राप्त होतो असे प्रस्तुत मंचाचे मत आहे. त्याच बरोबर तक्रारदारानी, सामनेवाले यांचेकडील बुकींग रदद केल्यामुळे सामनेवाले यांना झालेली गैरसोय विचारात घेता, तक्रारदारानी सामनेवाले यांचेकडे जमा केलेल्या रक्कम रु.22,000/- पैंकी 30 टक्के रक्कम म्हणजे रु.6,600/- वजावट करुन उर्वरीत रक्कम रु.15,400/- तक्रारदाराना परत करण्याचे आदेश देणे न्यायोचित होईल असे प्रस्तुत मंचास वाटते.
उपरोक्त चर्चेनुरुप व निष्कर्षानुसार खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
------ आ दे श -------
(1) तक्रार क्रमांक-549/2009 अंशतः मान्य करण्यात येते.
(2) सामनेवाले यांचेकडे तक्रारदारानी जमा केलेली आगाऊ बुकींग रक्कम,तिर्थयात्रा रदद
करण्याचे कारण विचारात न घेता, परत न केल्याची बाब ही त्यांचा सेवा सुविधा
पुरविण्या मधील कसुर असल्याचे जाहिर करण्यात येते.
(3) सामनेवाले यांच्याकडे तक्रारदारानी ता.18.04.2009 रोजी जमा केलेल्या रक्कम
रु.22,000/- पैंकी 30 टक्के रक्कम वजा करुन उर्वरीत रक्कम रु.15,400/-
तक्रारदाराना आदेशाच्या तारखेपासुन दोन महिन्यांच्या आंत अदा करावी. अन्यथा
तद्नंतर त्यावर दरसाल दर शेकडा 14 टक्के व्याज दयावे लागेल.
(4) तक्रार खर्चासाठी सामनेवाले यांनी तक्रारदाराना रु.5,000/- वरील रकमेसोबत अदा
करावे.
(5) न्याय निर्णयाच्या प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
( ना.द.कदम ) ( उ. वि.जावळीकर )
सदस्य, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे.