(पारीत व्दारा श्री नितीन माणिकराव घरडे, मा.सदस्य )
01. तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 2019च्या कलम 35 खाली विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंक आणि विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनी यांचे विरुध्द कारखान्यास लागलेल्या आगीमुळे झालेल्या नुकसानी बाबत विमा दाव्याची रक्कम मिळण्यासाठी आणि इतर अनुषंगीक मागण्यांसाठी जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे त्याचा मेर्सस नियती एंटरप्राईजेस या नावाने गट्टूचे विटा बनविण्याचा व्यवसाय मौजा अशोक नगर, भंडारा येथे आहे. त्याने सदर व्यवसायीक फर्मचे नावे विरुध्दपक्ष क्रं 1 ईलाहाबाद बॅंक, भंडारा येथून सप्टेंबर-2014 मध्ये रुपये-24,00,000/- आणि ऑक्टोंबर-2016 मध्ये रुपये-20,00,000/- रकमेचे कर्ज मालमत्ता गहाण ठेऊन घेतले होते. कर्ज घेते वेळी कर्ज रकमेच्या सुरक्षिततेसाठी त्याचे फर्म असलेली जागा गट क्रं7/1-बी, प्लॉट क्रं 2 या मिळकतीचा आणि युनिट मधील संपूर्ण उपकरण, सयंत्र ईत्यादीचा अग्नीविमा विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनी कडून काढला होता त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांचा ग्राहक आहे. तो स्वतःचे उदरनिर्वाहा करीता (Selfly livelihood) गट्टूचे विटा बनविण्याचा व्यवसाय करतो व त्या करीता त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंके कडून व्यक्तीशः स्वतःचे बळावर (In his Personal capacity he had taken a loan from the Opposite Party No. 1 Bank ) कर्ज घेतलेले आहे
विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनी कडून काढलेल्या विमा (STANDARD FIRE AND SPECIAL PERILS POLICY) पॉलिसीचा क्रमांक-2114/5678517/02/00 असा असून विमा कालावधी हा दिनांक-21.12.2018 ते दिनांक-20.12.2019 असा होता आणि विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने खालील प्रमाणे विम्याची जोखीम स्विकारली होती-
Sl.NO. | Risk Description | Sum Insured |
1 | Building including Plinth and Foundation- On building –Occupied as Bricks Manufacturing | 17,00,000/- |
2 | Others- On Plant and Machinery Rs.-30,00,000/- Plus On Furniture and Fixtues Rs.-2,90,000/- | 32,90,000/- |
3 | Stocks-On Stock pertaining to insured trade | 14,00,000/- |
| Total Risk Insured Amount | 63,90,000/- |
| | |
अशाप्रकारे वर नमुद केल्या प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने तक्रारकर्त्याचे फर्मची ईमारत, मशीनरी आणि स्टॉक मिळून एकूण रुपये-63,90,000/- एवढया रकमेची विमा जोखीम स्विकारली होती. तक्रारकर्त्याने विमा हप्त्याची रक्कम रुपये-9,500/- दिनांक-12.12.2018 रोजी विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनी मध्ये जमा केली होती. तो विरुध्दपक्ष क्रं 1 ईलाहाबाद बॅंके मधून काढलेल्या कर्जाचे परतफेडीचे हप्ते नियमित भरीत होता.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, दिनांक-20.10.2019 रोजी त्याचे फर्म मध्ये अचानक स्फोट झाला आणि त्यामध्ये उपकरणांचे, मशीनरीचे आणि ईमारतीचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले. सदर फर्मचे आगीमध्ये एका कामगाराचा मृत्यू झालेला आहे. सदर अपघाताचे घटने बाबत रिपोर्ट जवाहरनगर, भंडारा पोलीस यांचेकडे करण्यात आला असता त्यांनी दिनांक-21.10.2019 रोजी मर्ग क्रं 19/2019 नोंदविला. तक्रारकर्त्याने त्याचे फर्म मधील आगीचे घटनेमुळे मृत्यूमुखी पडलेल्या कामगाराची नुकसान भरपाईची रककम रुपये-8,39,000/- कामगार न्यायालय, भंडारा येथे जमा केली.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, आगीची घटना दिनांक-20.10.2019 ला घडल्या नंतर त्याचे दुसरेच दिवशी दिनांक-21.10.2019 रोजी त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेला माहिती दिली असता त्यांनी विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीशी संपर्क साधण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्याने त्याच दिवशी विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे नागपूर शाखेतील अधिकारी श्री विश्वास जोशी यांचेशी संपर्क साधला आणि विमा कंपनीचे ईमेल वर तसेच विमा कंपनीचे अधिकारी श्री विश्वास जोशी यांचे ई मेल वर त्याच बरोबर विमा कंपनीचे विमा दावे विभागाचे ई मेलवर सविस्तर घटनेची माहिती दिली. दिनांक-23.10.2019 रोजी विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे सर्व्हेअर श्री संदीप मशरुफ यांनी प्रत्यक्ष मोक्यावर येऊन अपघाताची पाहणी केली आणि तक्रारकर्त्याला आगीमुळे झालेल्या नुकसानी संबधात ईमारत, उपकरणे व सयंत्रे याचे झालेल्या नुकसानीचे निर्धारण/अंदाजपत्रक खाजगी नोंदणीकृत इंजिनियर यांचे कडून करवून घेण्यास सांगितले.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, सदर आगीचे घटनेमध्ये फर्म मधील ऑटोक्लेव्ह व ईतर यंत्र क्षतीग्रस्त झाले होते आणि त्याचे दुरुस्तीचे खर्चाचे अंदाजपत्रक विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने सिन्नार ब्रिक्स पुणे रिपेअर एजन्सी यांचे कडून करावयास सांगितले होते, त्यानुसार सिन्नर ब्रिक्सचे पुणे येथील मालक व अभियंता श्री योगेश मुथ्थुल तसेच विमा कंपनीचे सर्व्हेअर श्री संदीप मशरुफ यांचे सहायक श्री अविनाश यांनी घटनास्थळाला भेट दिली व नुकसानीचे खर्चाचे अंदापजत्रक बनवून दिले. सिन्नर ब्रिक्स, पुणे यांनी ऑटोक्लेव्ह मशीनरी यंत्राचे दुरुस्तीचा खर्च रुपये-19,87,604/- दिला.
विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे सुचने प्रमाणे तक्रारकर्त्याने नोंदणीकृत अभियंता श्री प्रणय कराडे यांचे कडून अंदाजपत्रक बनवून घेतले, त्यांनी खालील प्रमाणे अंदाजपत्रक दिले-
Sl.No. | Description of actual Damages | Actual Loss Amount |
1 | Plant and Machinery Foundation | 5,49,000/- |
2 | Building | 6,70,230/- |
| Total Plant & Machinery Foundation & Building | 12,19,230/- |
3 | As per Stock Register self assessment of loss | 1,80,489/- |
| Total Loss | 13,99,719/- |
अशाप्रकारे वर नमुद केल्या प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने सिन्नार ब्रिक्स, पुणे या रिपेअर एजंसीचे मालक व अभियंता श्री योगेश मुथ्थुल यांचे कडून ऑटोक्लेव्ह यंत्राचे दुरुस्तीचा खर्च रुपये-19,87,604/- एवढे निर्धारित केले तसेच विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे सुचने प्रमाणे नोंदणीकृत अभियंता श्री प्रणय कराडे यांनी प्लॅन्ट मशीनरी फाऊंडेशन,बिल्डींग याचे नुकसान रुपये-12,19,230/- निर्धारित केले. त्याच बरोबर तक्रारकर्त्याने स्वतः स्टॉक रजिस्टर प्रमाणे स्टॉकचे झालेले नुकसानीचे केलेले मुल्यांकन रुपये-1,80,489/- या सर्व बाबींची बेरीज केली असता झालेले एकूण नुकसान हे रुपये-33,87,323/- एवढे येते.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने घटने नंतर जवळपास 06 महिने वेळोवेळी घटनास्थळाची पाहणी केली तसेच विमा कंपनीचे मागणी प्रमाणे दिनांक-10.02.2020 पर्यंत दस्तऐवजाची पुर्तता केली. विरुध्दपक्ष क्रं 2विमा कंपनी तर्फे श्री गणेश गाडगे यांनी दिनांक-27.02.2020 रोज ई मेल पाठवून क्लेम फार्म सादर करण्यास सुचित केलेत्यानुसार तक्रारकर्त्याने दिनांक-28.02.2020 रोजी क्लेम फार्मसह सर्व दस्तऐवज विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे मुंबई येथील कार्यालयात पाठविले. मार्च-2020 मध्ये कोवीड रोगाचा प्रार्दुभाव वाढला होता. तक्रारकर्त्याने वेळोवेळी ई मेल पाठवून विमा दावा चौकशी केली. विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने त्याने केलेल्या रुपये-33,87,323/- विमा दावा मागणीच्या रकमेच्या तुलनेत फक्त रुपये-4,86,540/- एवढयाच रकमेचा विमा दावा मंजूर केल्या बाबत दिनांक-05.09.2020 रोजीचे पत्र पाठविले. तक्रारकर्त्याला मंजूर विमा दाव्याची रक्कम पाहून आश्चर्याचा धक्का बसला वस्तुतः त्याचे झालेले नुकसान फार मोठे होते. तक्रारकर्त्याने दिनांक-24.09.2020 रोजी विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे ई मेल वर त्यास सदर विमा दाव्याची मंजूरीची रक्कम मान्य नसल्याचे कळविले. अशाप्रकारे विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने विमा दाव्या पोटी अत्यंत कमी रक्कम मंजूर करुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला, त्यामुळे त्याला आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. सदर विमा हा विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंके मार्फतीने विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनी कडून काढलेला असल्याने दोन्ही विरुध्दपक्ष हे नुकसान भरपाईची रक्कम देण्यास जबाबदार आहेत. म्हणून शेवटी तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल करुन त्याव्दारे विरुध्दपक्षा विरुध्द पुढील प्रमाणे मागण्या केल्यात-
1. विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने विमा पॉलिसी पोटी त्याचे फर्मला लागलेल्या आगीमुळे झालेल्या नुकसानीची रक्कम रुपये-33,87,323/- (जी.एस.टी.सह) आणि सदर रकमेवर दिनांक-21.10.2019 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.18 टक्के दराने व्याज यासह तक्रारकर्त्याला रक्कम देण्याचे आदेशित करावे.
2. दिनांक-20.10.2019 पासून ते प्रस्तुत तक्रारीचा निकाल लागे पर्यंत विरुध्दपक्ष क्रं 1 ईलाहाबाद बॅंकेनी तक्रारकर्त्याला दिलेल्या कर्जा बाबत सक्तीची वसुलीची कोणतीही कार्यवाही करु नये असे आदेशित व्हावे तसेच कर्जावरील व्याज, विलंब शुल्क अशा रकमा विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीकडून विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेनी वसुल करावे असे आदेशित व्हावे.
3. विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंक आणि विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने नुकसान भरपाईची रक्कम व्यक्तीशः अथवा संयुक्तिकरित्या देण्याचे आदेशित व्हावे.
4. तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-5,00,000/- तसेच प्रस्तुत तक्रारीचा खर्च रुपये-1,00,000/- विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनी कडून देण्याचे आदेशित व्हावे.
5. तक्रारकर्त्यास विरुध्दपक्ष यांच्यामुळे झालेलया आर्थिक त्रासासाठी रुपये-10,00,000/- देण्याचे आदेशित व्हावे.
6. या शिवाय योग्य ती दाद त्याचे बाजूने मंजूर करण्यात यावी.
03. विरुध्दपक्ष क्रं 1 ईलाहाबाद बॅंक, भंडारा यांनी जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष लेखी उत्तर दाखल केले. तक्रारकर्त्याने सन 2014 व सन 2016 मध्ये मालमत्ता गहाण ठेऊन त्यांचे बॅंके मधून कर्ज घेतले होते व कर्जाची परतफेड 60 महिन्यात करण्याचे ठरले होते या बाबी मंजूर केल्यात. तक्रारकर्त्याने विरुघ्दपक्ष क्रं 2 विमा कंपनी कडून दिनांक-21.12.2018 ते दिनांक-20.12.2019 या कालावधी करीता अग्नी विमा काढला होता ही बाब मान्य केली. विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेनी, विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीशी संपर्क साधण्यास सांगितले होते ही बाब मान्य केली. तक्रारकर्त्याने तक्रारी मधून विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंके विरुध्द केलेले संपूर्ण आरोप आणि मागण्या या नामंजूर करण्यात येतात. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंके मधून कर्ज घेतलेले असल्याने कर्ज रकमेच्या सुरक्षितेसाठी विमा घेण्यास त्यास सांगण्यात आले होते परंतु विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनी कडूनच विमा काढावा अशी अट घातलेली नव्हती. थकीत कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी तक्रारकर्त्याची आहे. त्यांनी तक्रारकर्त्यास कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही तसेच अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला नाही. सबब विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंके विरुध्दची तक्रार खारीज करण्याची विनंती केली.
04. विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनी तर्फे प्राथमिक आक्षेपाचा अर्ज आणि तक्रारीस लेखी उत्तर जिल्हा ग्राहक आयोगा समोर दाखल केले. विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने प्राथमिक आक्षेपाचे अर्जात असे नमुद केले की, तक्रारकर्ता हा व्यवसायीक दृष्टीकोनातून मोठया प्रमाणावर गट्टू विटांचे उत्पादन करुन त्याची विक्री ग्राहकांना करतो. तक्रारकर्त्याचा हा व्यवसाय असून सदर व्यवसायासाठी लागणा-या मशीनरीचा विमा तक्रारकर्त्याने काढलेला आहे. तसेच तक्रारकर्त्याने सदर व्यवसायासाठी नियती एंटरप्राईजेस नावाने विरुध्दपक्ष क्रं 1 ईलाहाबाद बॅंके मधून कर्ज सुध्दा घेतलेले आहे. तक्रारकर्त्याचा मोठया प्रमाणावर व्यवसाय असल्याने तो ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदी प्रमाणे ग्राहक होत नाही त्यामुळे प्रस्तुत तक्रार चालविण्याचा अधिकार जिल्हा ग्राहक आयोग, भंडारा यांना नाही. विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे सर्व्हेअर यांचे अहवालानुसार विमा कंपनीने रुपये-4,86,540/- चा विमा दावा मंजूर केलेला आहे. त्यामुळे विमा कंपनीने कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही तसेच अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला नाही. तक्रारकर्त्याने विमा दाव्याची रक्कम रुपये-33,87,323/- ची मागणी केलेली आहे आणि विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने विमा रक्कम रुपये-4,86,540/- मंजूर केलेली आहे अशाप्रकारे विमा दावा रकमेच्या संबधात मोठया प्रमाणावरील रकमेच्या तफावती संबधी विस्तृत प्रमाणावर साक्षीपुरावा, उलट तपासणी तसेच कागदपत्रांची तपासणी होणे गरजेचे आहे परंतु ग्राहक संरक्षण कायदा-2019 चे कलम 38 (6) अन्वये ग्राहक तक्रार ही शपथे वरील पुरावा व कागदपत्र यांचे आधारावरच करण्याचा जिल्हा ग्राहक आयोगास अधिकार आहे. उपरोक्त आक्षेपावरुन प्रस्तुत तक्रार जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष चालू शकत नाही करीता प्राथमिक आक्षेपाचे स्तरावर तक्रार खारीज करण्यातयावी असे नमुद केले.
विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने लेखी उत्तरामध्ये सुध्दा प्राथमिक आक्षेप घेऊन तक्रारकर्ता ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदी प्रमाणे ग्राहक होत नसल्याने जिल्हा ग्राहक आयोग, भंडारा यांना प्रस्तुत तक्रार चालविता येत नाही असे नमुद केले. वर नमुद केल्या प्रमाणे विमा दाव्याची रक्कम निश्चीतीसाठी तक्रारीमध्ये मोठया प्रमाणावर साक्षी पुरावा, कागदपत्रांची तपासणी होणे आवश्यक आहे परंतु ग्राहक संरक्षण काया-2019 चे कलम 38 (6) अन्वये जिल्हा ग्राहक आयोगाचे मर्यादित अधिकार क्षेत्रात हे शक्य नसल्याचे नमुद केले. तक्रारकर्त्याची संपूर्ण तक्रार आणि मागण्या या नामंजूर असल्याचे नमुद केले. आपले खास कथनात असे नमुद केले की, विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनी तर्फे सर्व्हेअर श्री संदिप मशरु अॅन्ड कपनी यांची नियुक्ती केली होती. सर्व्हेअर यांनी प्रत्यक्ष मोका तपासणी आणि कागदपत्रांची पडताळणी करुन अंतीम सर्व्हे अहवाल विमा कंपनी कडे दिनांक-4.02.2020 रोजीसादरककेला, त्यानुसार विमा कंपनीने नियमा नुसार विमा रक्कम रुपये-4,86,540/- मंजूर केला परंतु तक्रारकर्त्याने डिसचार्ज व्हाऊचरवर सही करण्यास नकार दिला. तक्रारकर्त्याचे तक्रारी मध्ये काहीही तथ्य नसल्याने तक्रार खारीज करण्यात यावी असे नमुद केले.
05. तक्रारकर्त्याची तक्रार, शपथे वरील पुरावा व लेखी युक्तीवाद तसेच विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेचे लेखी उत्तर, विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचा प्राथमिक आक्षेप अर्ज तसेच लेखी उत्तर, दोन्ही विरुध्दपक्षांनी दाखल केलेला शपथे वरील पुरावा आणि प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवजांचे अवलोकन करण्यात आले. तक्रारकर्त्या तर्फे वकील श्री तौसीफ खान तर विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंके तर्फे वकील श्रीमती आर.एस. रामटेके यांचा तर विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनी तर्फे वकील कु. आयुषी विजय दलाल यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला, त्यावरुन जिल्हा ग्राहक आयोगाचा निष्कर्ष खालील प्रमाणे आहे-
::निष्कर्ष::
06. प्रस्तुत तक्रारीमध्ये गुणवत्तेवर निर्णय देण्यापूर्वी विरुध्दपक्षक्रं 2 विमा कंपनी तर्फे प्राथमिकआक्षेपाचा अर्ज दाखल करण्यात आला, त्यावर प्रथम विचार होणे आवश्यक आहे-
विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचा आक्षेप असा आहे की, तक्रारकर्ता हा व्यवसायीक दृष्टीकोनातून मोठया प्रमाणावर गट्टू विटांचे उत्पादन करुन त्याची विक्री ग्राहकांना करतो. तक्रारकर्त्याचा हा व्यवसाय असून सदर व्यवसायासाठी लागणा-या मशीनरीचा विमा तक्रारकर्त्याने काढलेला आहे. तसेच तक्रारकर्त्याने सदर व्यवसायासाठी नियती एंटरप्राईजेस नावाने विरुध्दपक्ष क्रं 1 ईलाहाबाद बॅंके मधून कर्ज सुध्दा घेतलेले आहे. तक्रारकर्त्याचा मोठया प्रमाणावर व्यवसाय असल्याने तो ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदी प्रमाणे ग्राहक होत नाही त्यामुळे प्रस्तुत तक्रार चालविण्याचा अधिकार जिल्हा ग्राहक आयोग, भंडारा यांना नाही.
या संदर्भात विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनी तर्फे अधिवक्ता श्री विजय माधव दलाल यांनी आपली भिस्त मा. राज्य ग्राहक तक्रार निवारणआयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी दिलेला निवाडा-Complaint Case No.-CC/13/270,Order dated-27th July, 2017 in “Consumer Welfare Association Through its Joint Secretary Mr. Jahangir Gai +1 –Versus- The Oriental Insurance Company Ltd. Through Divisional Manager Mumbai+01
सदर निकालपत्रात मा. राज्य ग्राहक आयोग, मुंबई यांनी खालीलप्रमाणे मत व्यक्त केले-
19. Here in the present case, complainant No. 2 is a commercial organization running commercial activity. To protect machinery for running business, the policy was taken from the opponent and hence, purpose of aailing services of the opponent is certainly for commercial purpose. Hence, we find that the complainant is not a consumer as contemplated under the Consumer Protection Act,1986.
हातातील प्रकरणात मा. राज्य ग्राहक आयोगाचा निवाडा लागू होत नाही, याचे कारण असे आहे की, हातातील प्रकरणात तक्रारकर्त्याचा गट्टू विटा बनविण्याचा व्यवसाय आहे आणि सदर गट्टू बनविण्या-या मशीनरीचा विमा त्याने विरुध्दपक्ष क्रं 2 कडून काढलेला आहे. तक्रारकर्ता हा मे. नियती एंटरप्राईजेस या फर्मचे नावाने व्यवसाय करतो. तक्रारकर्त्याने आपले तक्रारीतील परिच्छेद क्रं 11 मध्ये स्पष्टपणे नमुद केलेले आहे की, तो स्वतःचे उदरनिर्वाहा करीता (Selfly livelihood) गट्टूचे विटा बनविण्याचा व्यवसाय करतो व त्या करीता त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंके कडून व्यक्तीशः स्वतःचे बळावर (In his Personal capacity he had taken a loan from the Opposite Party No. 1 Bank ) कर्ज घेतलेले होते. यावरुन ही बाब दिसून येते की, तक्रारकर्त्याचा स्वतःचा व्यक्तीगत व्यवसाय असून सदर व्यवसाय तो स्वतःचे उदरनिर्वाहा करीता करतो. त्याचा फार मोठया प्रमाणावर व्यवसाय नसून युनिटला लागलेल्या आगीमुळे त्याला विरुध्दपक्ष क्रं 1बॅंकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे सुध्दा कठीण झालेले आहे असे दिसूनयेते.
07. तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचा ग्राहक आहे या बाबत जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे खालील मा. वरिष्ठ न्यायालयाचे निवाडयावर भिस्त ठेवण्यात येते-
HON’BLE H. P. STATE CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION SHIMLA First Appeal No. : 37/2019 Order dated: 09.12.2019 in “ Reliance Gen. Ins. Co. Ltd. vs Sh. Mahender Pal”
या निवाडया प्रमाणे तक्रारकर्ता महेंद्र पाल याने जेसीबी मशीन विकत घेतली होती आणि त्याचा विमा विरुध्दपक्ष रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी कडे काढला होता. पावसाचे दिवसात चिखला मध्ये अडकून सदर मशीन ही 200 मीटर खाली पडून पूर्णपणे क्षतीग्रस्त झाली होती. तक्रारकर्त्याने मशीन दुरुस्तीसाठी रुपये-14,34,790/-खर्च करुन विरुध्दपक्ष विमा कंपनी कडे विमा दावा दाखल केला होता.
विरुध्दपक्ष विमा कंपनीने विमा दावा नामंजूर करताना मशीनचा उपयोग हा व्यवसायीक होत होता आणि म्हणून तक्रारकर्ता ग्राहक होत नसल्याने विमा दावा नामंजूर केला होता. जिल्हा ग्राहक आयोगाने रुपये-4,50,000/- वार्षिक 9 टक्के व्याज दराने देण्याचे आदेशित केले होते. विरुध्दपक्ष विमा कंपनीने मा. राज्य ग्राहक आयोगा समोर अपिल दाखल केले होते, त्यामध्ये मा.राज्य ग्राहक आयोगाने असे नमुद केले की,
As per section 2(0) of Consumer Protection Act 1986 and as per section 2(42) of Consumer Protection Act 2019 service means service of any description rendered by Insurance company. State Commission is of the opinion that as per section 2(0) of Consumer Protection Act 1986 and as per section 2(42) of Consumer Protection Act 2019 service of any description rendered by Insurance company whether commercial or non commercial falls within the domain of consumer Authority. State Commission is of the opinion that word service of any description is a material word in section 2(0) of Consumer Protection Act 1986 and in section 2(42) of Consumer Protection Act 2019. State Commission is of the opinion that word service of any description rendered by Insurance company include commercial and non commercial matters under Consumer Protection Act. Hence it is held that matter falls within domain of Consumer Protection Act. See 2005(1) The Reliance General Insurance Co. Ltd. Versus Mahender Pal F.A. No.37/2019 CPJ 27 NC titled Harsolia Motors Versus National Insurance Co. Ltd. See 1995(2) CPC 2 Apex Court titled Laxmi Engineering Works Versus P.S.G. Industrial Institute.
उपरोक्त मा.राज्य ग्राहक आयोगाचे निवाडया प्रमाणे तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 व ग्राहक संरक्षण कायदा 2019 अनुसार विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून विम्याची सेवा घेतलेली आहे आणि सदर घेतलेली सेवा ही व्यवसायीक कारणासाठी वा अव्यवसायीक कारणासाठी घेतली असली तरी ती सेवा ग्राहक संरक्षण कायदयामध्ये मोडते असे स्पष्टपणे नमुद केलेले आहे. त्यामुळे सदर निवाडा आमचे हातातील प्रकरणात लागू होतो असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे.
08. विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने असाही आक्षेप घेतलेला आहे की, विम्याचे रकमेचे निर्धारण करण्यासाठी मोठया प्रमाणावर साक्ष पुरावे तपासणे तसेच कागदपत्रांची पडताळणी करणे आवश्यक आहे आणि जिल्हा ग्राहक आयोगाचे मर्यादित अधिकार क्षेत्रात ते शक्य नाही परंतु हातातील प्रकरणात तक्रारकर्त्याचे युनिटला आगीमुळे झालेले नुकसान आणि त्या संबधात विम्याचे रकमेचे निर्धारण एवढाच वादातील मुद्दा आहे आणि उपलब्ध दस्तऐवजावरुन सदर वादातील मुद्दावर निर्णय देणे सहज शक्य आहे आणि म्हणून विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे आक्षेपामध्ये जिल्हा ग्राहक आयोगास तथ्य दिसून येत नाही.
09 विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे लेखी उत्तरा प्रमाणे त्यांनी सर्व्हेअर श्री संदिप मशरु अॅन्ड कपनी यांची नियुक्ती केली होती. सर्व्हेअर यांनी प्रत्यक्ष मोका तपासणी आणि कागदपत्रांची पडताळणी करुन अंतीम सर्व्हे अहवाल विमा कंपनी कडे दिनांक-04.02.2020 रोजी सादर केला, त्यानुसार विमा कंपनीने नियमा नुसार विमा रक्कम दावा रुपये-4,86,540/- मंजूर केला. परंतु विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने सदर सर्व्हेअर श्री संदिप मशरु अॅन्ड कंपनी यांचा सर्व्हे अहवाल जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष पुराव्यार्थ सादर केला, त्यावरुन असे दिसून येते की, सर्व्हेअर यांनी प्लॅन्ट आणि मशीनरी बिल्डींग आणि स्टॉकचे नुकसानीचे निर्धारण रुपये-6,48,718/- एवढेच केले ते अत्यंत कमी रकमेचे दिसून येते. त्याच बरोबर तसेच सदर सर्व्हेअर यांचे शपथपत्र सुध्दा पुराव्यार्थ विरुध्दपक्ष विमा कंपनीने दाखल केलेले नाही. तसेच विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने तक्रारकर्त्याच्या युनिटचे आगीमुळे झालेल्या नुकसानी संबधात विमा रक्कम रुपये-4,86,540/- निर्धारण कोणत्या आधारावर केले या बाबत कोणताही प्रकाश टाकलेला नाही. विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने तक्रारकर्त्याने तक्रारीतून विॅम्यापोटी जी नुकसान भरपाईची रक्कम रुपये-33,87,323/- मागणी केलेली आहे, त्याला केवळ विरोध दर्शविलेला आहे परंतु सदर विरोध कोणत्या कारणासाठी विमा कंपनी करीत आहे त्याचे कोणतेही स्पष्टीकरण तसेच पुरावा दाखल केलेला नाही.
10 तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे सदर आगीचे घटनेमध्ये युनिट मधील ऑटोक्लेव्ह व ईतर यंत्र क्षतीग्रस्त झाले होते आणि त्याचे दुरुस्तीचे खर्चाचे अंदाजपत्रक विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने सिन्नर ब्रिक्स पुणे रिपेअर एजन्सी यांचे कडून करावयास सांगितले होते, त्यानुसार सिन्नर ब्रिक्सचे पुणे येथील मालक व अभियंता श्री योगेश मुथ्थुल तसेच विमा कंपनीचे सर्व्हेअर श्री संदीप मशरुफ यांचे सहायक श्री अविनाश यांनी घटनास्थळाला भेट दिली व नुकसानीचे खर्चाचे अंदापजत्रक बनवून दिले. सिन्नर ब्रिक्स, पुणे यांनी ऑटोक्लेव्ह यंत्राचे दुरुस्तीचा खर्च रुपये-19,87,604/- एवढा दिल्याचे नमुद केले. सदर तक्रारकर्त्याचे तक्रारी मधील विधानावर जसे विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे म्हणण्या नुसार सिन्नर ब्रिक्स पुणे यांनी अंदाजपत्रक दिले होते त्यावर विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने कोणतेही उत्तर दिले नाही तसेच या बाबत मौन बाळगले. विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे मान्यते नुसार जर सिन्नर ब्रिक्सपुणे रिपेअर एजंसी यांचे कडून ऑटोक्लेव्ह यंत्राचे दुरुस्तीचे अंदाजपत्रक रुपये-19,87,604/- रकमेचे आहे, तर सदर अंदाजपत्रकीय खर्चास विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने मान्यता का दिली नाही आणि केवळ ऑटोक्लेव्ह यंत्र दुरुस्तीचा खर्च जर रुपये-19,87,604/- आहे तर तक्रारकर्त्याचे नुकसानीचे निर्धारण सर्व्हे अहवाला प्रमाणे केवळ रुपये-4,86,540/- कसे काय काढले हे येथे अनाकलनीय दिसून येते. तक्रारकर्त्याने सिन्नर ब्रिक्स, पुणे यांचे दिनांक-06.11.2019 चे दुरुस्तीचे अंदाजपत्रकाची प्रत दाखल केली त्यानुसार एकूण खर्च रुपये-19,87,604/- दर्शविलेला आहे,
11. दुसरी महत्वाची बाब अशी आहे की, तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे त्याने विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे सुचने प्रमाणे नोंदणीकृत अभियंता श्री प्रणय कराडे यांचे कडून प्लॅन्ट मशीनरी फाऊंडेशन,बिल्डींग याचे नुकसान रुपये-12,19,230/- निर्धारित केले. तक्रारकर्त्याने पुराव्या दाखल श्री प्रणय कराडे यांचे शपथपत्र दाखल केले. त्याच बरोबर तक्रारकर्त्याने स्वतः स्टॉक रजिस्टर प्रमाणे स्टॉकचे झालेले नुकसानीचे केलेले मुल्यांकन रुपये-1,80,489/- केले. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे सुचने प्रमाणे अभियंता श्री प्रणय कराडे यांचेकडून प्लॅन्ट मशीनरी फाउंडेशन बिल्डींग याचे नुकसानीचे निर्धारण केले परंतु या विधानावर सुध्दा विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने लेखी उत्तरामध्ये तसेच पुराव्यामध्ये मौन बाळगलेले आहे. विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनी सदर अभियंता श्री प्रणय कराडे यांना जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष तपासू शकली असती परंतु त्यांनी तसे केलेले नाही. अभियंता श्री प्रणय कराडे यांनी बाब निहाय खुलासेवार अहवाल दाखल केलेला आहे, त्याचे अवलोकन जिल्हा ग्राहक आयोगा व्दारे करण्यात आले. या शिवाय तक्रारकर्त्याने त्याचे नियती एंटरप्राईजेस भंडारा येथील स्टॉक रजिस्टर दिनांक-20 ऑक्टोंबर,2019 ची प्रत पुराव्यार्थ दाखल केली. जिल्हा ग्राहक आयोगाचे मते विमाधारकाचा कल जास्त नुकसान भरपाई मिळण्या कडे असतो ही बाब लक्षात घेता तक्रारकर्त्याने प्लॅन्ट मशीनरी व फाऊंडेशन बिल्डींग यासाठी मागणी केलेली रक्कम रुपये-12,19,230/- अधिक स्टॉकचे झालेल्या नुकसानीची मागणी केलेली रक्कम रुपये-1,80,489/- अधिक सिन्नर ब्रिक्स पुणे यांचे अंदाजपत्रका नुसार येणारी रक्कम रुपये-19,87,604/- बरोबर एकूण नुकसानीची रक्कम रुपये-33,87,323/- पैकी 60 टक्के एवढी विमा रक्कम रुपये-20,32,394/- आणि सदर विमा रकमेवर विरुध्दपक्ष विमा कंपनीने विमा दाव्याचे रकमे बाबत कळविल्याचा दिनांक-05.09.2020 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-7 टक्के दराने व्याज मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल. त्याच बरोबर विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्याला जो शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागला त्याबाबत रुपये-10,000/- आणि प्रस्तुत तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे. विरुध्दपक्ष क्रं 1 ईलाहाबाद बॅंक शाखा भंडारा यांनी तक्रारकर्त्यास कोणतीही दोषपूर्ण् सेवा दिलेली नसल्याने त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे.
12. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, आम्ही तक्रारी मध्ये खालील प्रमाणे अंतीम आदेश पारीत करीत आहोत-
::अंतिम आदेश::
- तक्रारकर्ता श्री निखील पुरुषोत्तम तिरपुडे यांची तक्रार विरुध्दपक्ष क्रं 2 युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही विमा कंपनी आणि तिचे तर्फे मालक / संचालक मंडळ मार्फत सक्षम अधिकारी, शाखा कार्यालय धरमपेठ, नागपूर यांचे विरुध्द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष क्रं 2 युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही विमा कंपनी आणि तिचे तर्फे मालक/संचालक मंडळ मार्फत सक्षम अधिकारी, शाखा कार्यालय धरमपेठ, नागपूर यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्यास (STANDARD FIRE AND SPECIAL PERILS POLICY) पॉलिसीचा क्रमांक-2114/5678517/02/00 अनुसार त्याचे विमाकृत युनिट मे. नियती एंटरप्राईजेसला
आगीमुळे झालेल्या नुकसानी पोटी विमा रक्कम रुपये-20,32,394/- (अक्षरी रुपये वीस लक्ष बत्तीस हजार तिनशे चौ-याण्णऊ फक्त) आणि सदर विमा रकमेवर विमा कंपनीने दाव्याचे रकमे बाबत तक्रारकर्त्यास कळविल्याचा दिनांक-05.09.2020 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-7 टक्के दराने व्याज अशा रकमा तक्रारकर्त्यास अदा कराव्यात.
- विरुध्दपक्ष क्रं 2 युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही विमा कंपनी आणि तिचे तर्फे मालक/संचालक मंडळ मार्फत सक्षम अधिकारी, शाखा कार्यालय धरमपेठ, नागपूर यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि प्रस्तुत तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) अशा रकमा दाव्यात.
- विरुध्दपक्ष क्रं 1 ईलाहाबाद बॅंक शाखा भंडारा तर्फे शाखा व्यवस्थापक यांनी त्यांचे कर्तव्य योग्य रितीने पार पाडल्याने व त्यांनी तक्रारकर्त्यास कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नसल्यामुळे तसेच ते औपचारीक प्रतिपक्ष असल्याने त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
- सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं 2 युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही विमा कंपनी आणि तिचे तर्फे मालक/संचालक मंडळ मार्फत सक्षम अधिकारी, शाखा कार्यालय धरमपेठ, नागपूर यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या प्रस्तुत निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.
- निकालपत्राच्या प्रथम प्रमाणित प्रती सर्व पक्षकांराना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
- सर्व पक्षकारांनी अतिरिक्त संच जिल्हा आयोगाचे कार्यालयातून परत घेऊन जावेत.