जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 58/2022. तक्रार दाखल दिनांक : 24/02/2022. तक्रार निर्णय दिनांक : 17/02/2023.
कालावधी : 00 वर्षे 11 महिने 24 दिवस
शबाना महताब मुल्ला (सय्यद), वय 34 वर्षे,
व्यवसाय : घरकाम, रा. सावरी, ता. निलंगा, जि. लातूर. तक्रारकर्ती
विरुध्द
(1) शाखा व्यवस्थापक, भारतीय जीवन बीमा निगम (एलआयसी),
शाखा क्रमांक 98 सी, धुत कॉम्प्लेक्स, बिदर रोड,
निलंगा, ता. निलंगा, जि. लातूर.
(2) विभागीय व्यवस्थापक, भारतीय जीवन बीमा निगम (एलआयसी),
दावा विभाग, 'जीवन प्रकाश', अदालत रोड, औरंगाबाद - 431 005. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ती यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. आसिफ एम. के. पटेल
विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. संदीप एस. औसेकर
आदेश
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, त्यांचे पती महताब रमजान मुल्ला (सय्यद) [यापुढे "विमाधारक महताब"] यांनी विरुध्द पक्ष क्र.1 व 2 [यापुढे 'बीमा निगम'] यांच्या अभिकर्त्याकडून जीवन रक्षक (लाभसहीत) विमापत्र घेतले होते. त्यांचा विमापत्र क्रमांक 910266308 व विमा कालावधी दि.26/6/2018 ते 26/6/2038 होता. विमा जोखीम रक्कम रु.75,000/- व दुर्घटना हितलाभ रु.75,000/- अनुज्ञेय होता. विमाधारक महताब यांनी नियमाप्रमाणे प्रतिवर्ष रु.2,780/- याप्रमाणे सन 2018 व 2019 चे विमा हप्ते भरणा केले. सन 2020 चा हप्ता भरण्याच्या कालावधीमध्ये कोविड-19 च्या लॉकडाऊन दरम्यान विमाधारक महताब यांचा मृत्यू झाला. त्यामुळे सन 2020 चा हप्ता भरण्याकरिता जाणीवपूर्वक विलंब झालेला नसून कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे घडला. विमापत्राकरिता तक्रारकर्ती यांना नामनिर्देशीत करण्यात आलेले आहे.
(2) तक्रारकर्ती यांचे पुढे कथन असे की, दि.20/8/2020 रोजी विमाधारक महताब हे शिधावाटप दुकानातून गव्हाचे पोते डोक्यावर घेऊन पायरी उतरत असताना तोल जाऊन पडले आणि त्यांच्या मानेस गंभीर मार लागला. त्यांना उपचारास्तव जिल्हा रुग्णालय, सोलापूर येथे दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान दि.7/9/2020 रोजी त्यांचा मृत्यू झाला. अपघाती घटनेबद्दल पोलीस ठाणे, औराद शहाजनी येथे आकस्मिक मृत्यू क्र. 38/2020 प्रमाणे नोंद करण्यात आली.
(3) तक्रारकर्ती यांचे पुढे कथन असे की, विमाधारक महताब यांच्या मृत्यूपश्चात विमा रक्कम मिळण्याकरिता बीमा निगमकडे मुळ विमापत्रासह प्रस्ताव सादर केला; परंतु त्यांना विमा रक्कम लाभ देण्यात आला नाही. विधिज्ञांद्वारे सूचनापत्र पाठवून विमा रकमेची मागणी केली असता बीमा निगमने दखल घेतली नाही. त्यांनी यापूर्वी जिल्हा आयोगामध्ये दाखल केलेल्या ग्राहक तक्रार क्र. 82/2021 मध्ये दि.10/3/2021 रोजी दिलेल्या आदेशानुसार बीमा निगमकडे पुन्हा कागदपत्रांची पूर्तता केली; परंतु बीमा निगमने विमा दाव्याचा निर्णय कळविला नाही. बीमा निगमने सेवेमध्ये त्रुटी व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे. उक्त वादकथनाच्या अनुषंगाने विमा लाभ रु.75,000/- व अपघाती लाभ रु.75,000/- याप्रमाणे रु.1,50,000/- व्याजासह रक्कम देण्याचा; शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रु.10,000/- व ग्राहक तक्रारीचा खर्च रु.5,000/- देण्याचा बीमा निगमला आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ती यांनी केली आहे.
(4) बीमा निगमने लेखी निवेदनपत्र सादर केले. त्यांनी ग्राहक तक्रारीमध्ये नमूद कथने अमान्य केले आहेत. त्यांचे कथन असे की, विमाधारक महताब यांनी दि.26/6/2018 रोजी विमापत्र क्र. 910266308 घेतले होते आणि विमापत्राचा प्रत्येक वर्षाच्या जुन महिन्यामध्ये विमा हप्ता भरण्यासंबंधी त्यांच्यावर जबाबदारी होती. परंतु विमाधारक महताब यांनी विमापत्राचा जुन 2020 चा विमा हप्ता सवलत कालावधीनंतरही भरणा नाही आणि विमापत्र बंद स्थितीत असल्यामुळे विमा जोखीम उपलब्ध नाही. विमा हप्ता दि.26/6/2020 पर्यंत भरणे आवश्यक होते. तसेच दि.26/7/2020 पर्यंत सवलत कालावधी होता. दि.7/9/2020 रोजी विमाधारक महताब यांचा मृत्यू झाला. विमापत्राचा हप्ता भरण्यात आला नसल्यामुळे तक्रारकर्ती यांना विमापत्राचे लाभ अनुज्ञेय नाहीत. तक्रारकर्ती यांचा विमा दावा नामंजूर करण्यात आलेला आहे. अंतिमत: ग्राहक तक्रार नामंजूर करण्यात यावी, अशी विनंती बीमा निगमने केली आहे.
(5) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार, बीमा निगम यांचे लेखी निवेदनपत्र, उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) बीमा निगमने तक्रारकर्ती यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
केल्याचे सिध्द होते काय ? होय.
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? होय.
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(6) मुद्दा क्र. 1 ते 3 :- मुद्दा क्र.1 ते 3 परस्परपुरक असल्यामुळे त्यांचे एकत्र विवेचन करण्यात येते. प्रामुख्याने, विमाधारक महताब यांना दि.26/6/2018 पासून विमा जोखीम देणारे विमापत्र क्र. 910266308 बीमा निगमने निर्गमीत केले, ही मान्यस्थिती आहे. विमाधारक महताब यांनी सन 2018 व 2019 चे वार्षिक हप्ते भरणा केले, याबद्दल वाद नाही. विमापत्रानुसार प्रतिवर्ष हप्ता भरणे आवश्यक होते, असे दिसून येते. विमाधारक महताब यांनी सन 2020 चा हप्ता भरणा केला नाही, ही मान्यस्थिती आहे. अभिलेखावर दाखल पोलीस कागदपत्रे व शवचकित्सा अहवाल पाहता विमाधारक महताब यांचा मृत्यू अपघाती आहे, असे स्पष्ट होते.
(7) तक्रारकर्ती यांच्या कथनानुसार बीमा निगमकडे विमा दावा व कागदपत्रे सादर केले असता बीमा निगमने विमा रक्कम देण्याबद्दल दखल घेतली नाही. उलटपक्षी, बीमा निगमचा प्रतिवाद असा की, विमाधारक महताब यांनी जुन 2020 चा विमा हप्ता सवलत कालावधीनंतरही भरणा केला नाही आणि विमापत्र बंद स्थितीत गेल्यामुळे विमापत्राचे लाभ अनुज्ञेय नसल्यामुळे तक्रारकर्ती यांचा विमा दावा नामंजूर करण्यात आला आहे.
(8) निर्विवादपणे, विमाधारक महताब यांनी विमा हप्ता भरण्याची तारीख 26 जुन, 2020 किंवा त्यापुढे दिलेला सवलत कालावधी म्हणजे दि.26 जुलै, 2020 पर्यंत वार्षिक हप्त्याचा भरणा केलेला नाही. त्या अनुषंगाने तक्रारकर्ती यांचे कथन असे की, विमाधारक महताब यांनी विमा हप्ता भरण्यासाठी जाणीवपूर्वक विलंब केलेला नाही आणि कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे घडलेला आहे. उलटपक्षी, बीमा निगमचा प्रतिवाद असा की, भारतीय कराराचा कायदा, 1872 च्या तरतुदीनुसार दोन्ही पक्षांना कराराच्या अटी व शर्तीचे पालन करणे आवश्यक आहे आणि एखाद्या पक्षाने अटी व शर्तीचा भंग केल्यास अन्य पक्षावर अटी बंधनकारक होत नाहीत. विमाधारक महताब यांनी विमा हप्ता नियोजीत वेळेमध्ये भरणा न केल्यामुळे विमा करार संपुष्टात येऊन विमापत्राचे लाभ देय ठरत नाहीत.
(9) विमापत्रामध्ये नमूद अटीची दखल घेतली असता जर विमापत्राच्या संदर्भात तीन वर्षांपेक्षा कमी हप्ता भरला गेला असेल आणि त्यानंतरचा कोणताही हप्ता योग्य प्रकारे भरला गेला नसेल तर विमापत्राचे सर्व लाभ हे न भरलेल्या हप्त्याच्या तारखेपासून सवलत कालावधी संपुष्टात आल्यानंतर बंद होतील आणि काहीही देय असणार नाही.
(10) विमा हा संविदेशी निगडीत विषयवस्तू आहे आणि विमापत्रास संविदालेखाचे स्वरुप असते. निर्विवादपणे, विमापत्रानुसार विमाधारकाने विमा हप्त्याचा भरणा नियमीतपणे केला पाहिजे. तथापि, अनेकवळा विमापत्रामध्ये काही अपवाद ठेवण्यात आलेले असतात; परंतु येथे काही अपवाद दिसून येत नाही. मुख्य प्रश्नाच्या अनुषंगाने तक्रारकर्ता यांच्या विधिज्ञांचा युक्तिवाद असा की, विमाधारक महताब यांनी विमा हप्ता भरण्यासाठी जाणीवपूर्वक विलंब केलेला नाही आणि कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे घडलेला आहे. आमच्या मते, तक्रारकर्ता यांच्या युक्तिवादामध्ये निश्चितच तथ्य आढळते. कारण सन 2020 मध्ये कोरोना-19 मुळे जागतिक महामारीस सामोरे जावे लागले, हे वास्तव आहे. जीविताच्या भितीमुळे अनेक दिवस लोकांना घराबाहेर निघणे अशक्य होते. विमाधारकाने योग्यवेळी विमा हप्ते भरणे आवश्यक असले तरी कोरोना कालावधीमध्ये विमा हप्ते कशाप्रकारे स्वीकारले जातील, याबद्दल बीमा निगम यांच्या काही मार्गदर्शक सूचना दिसत नाही. कोरोना कालावधीमध्ये विमा हप्ते स्वीकारण्यासाठी बीमा निगमने कोणत्या अपेक्षीत उपाययोजना केलेल्या होत्या, याबद्दल स्पष्टता नाही. अशा स्थितीत, विमाधारक महताब यांनी विमा हप्ता भरण्यामध्ये हेतु:पुरस्सर विलंब केला, असे म्हणता येणार नाही. आमच्या मते, प्रस्तुत प्रकरणामध्ये बीमा निगमने विमाधारक महताब यांच्याबद्दल सहानुभूती दर्शवून सानुग्रह स्वरुपात विमा दावा मंजूर करणे योग्य ठरले असते. परंतु बीमा निगमने केवळ व्यवसायिक भुमिका ठेवून दावा नामंजूर केला आणि प्रस्तुत कृत्य सेवेतील त्रुटी मानले पाहिजे, या निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत.
(11) उक्त विवेचनाअंती तक्रारकर्ती ह्या बीमा निगमकडून विमा रक्कम मिळण्याकरिता पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत. तसेच विमाधारक महताब यांच्या मृत्यू अपघाती असल्यामुळे विमापत्रानुसार देय लाभ मिळण्यास तक्रारकर्ती पात्र ठरतात.
(12) उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष बीमा निगम यांनी तक्रारकर्ती यांना विमापत्रानुसार मुळ विमा रक्कम रु.75,000/- व अपघाती लाभ विमा रक्कम रु.75,000/- असे एकूण रु.1,50,000/- द्यावेत.
(3) विरुध्द पक्ष बीमा निगम यांनी प्रस्तुत आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत उक्त विमा रक्कम न दिल्यास आदेश तारखेपासून विमा रक्कम अदा करेपर्यंत विमा रकमेवर द.सा.द.शे. 6 टक्के व्याज देय राहील.
(4) विरुध्द पक्ष बीमा निगम यांनी प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-