जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 256/2022. आदेश दिनांक : 25/11/2022.
खाजासाहेब महंमद साहेब शेख, वय 52 वर्षे,
व्यवसाय : नोकरी, रा. न्यू काझी मोहल्ला, लेबर कॉलनी,
सोफिया मस्जीदजवळ, लातूर, ता. जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) शाखा व्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र,
शाखा एम.आय.डी.सी., लातूर.
(2) युसूफ जाफरसाब शेख, वय : सज्ञान, व्यवसाय : एजंट (गृहकर्ज),
रा. टाके नगर, विरहणमंतवाडी, लातूर, ता. जि. लातूर.
(3) ॲड. प्रशांत जाधव, वय : सज्ञान, व्यवसाय : वकिली, रा. जुना गुळ
मार्केट चौक, अयोध्या लॉजच्या बाजूस, लातूर, ता. जि. लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- दौलत एस. दाताळ
आदेश
श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) प्रस्तुत ग्राहक तक्रार नोंद करण्यात येऊन दाखलपूर्व युक्विवादासाठी ठेवण्यात आलेली आहे.
(2) ग्राहक तक्रारीमध्ये तक्रारकर्ता यांचे कथन असे की, विरुध्द पक्ष क्र.1 यांनी त्यांना प्लॉट खरेदी करण्यासाठी दि.9/7/2020 रोजी रु.15,00,000/- गृह कर्जाचा धनाकर्ष दिला. विरुध्द पक्ष क्र.2 हे विरुध्द पक्ष क्र.1 यांचे अभिकर्ता आहेत आणि त्यांच्या सांगण्यानुसार विरुध्द पक्ष क्र.1 यांच्या संचिकेवर स्वाक्ष-या केल्या. त्यावेळी विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्ता यांच्याकडून 4 कोरे बाँड पेपर व 12 को-या धनादेशावर स्वाक्ष-या करुन घेतल्या.
(3) तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, त्यांनी दिलेल्या को-या बाँडचा गैरवापर करुन विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी घर बांधकामाचा लेखी करारनामा तयार केला. करारनाम्यानुसार विरुध्द पक्ष क्र.1 यांचे आरमान कन्स्ट्रक्शन यांच्यामार्फत तक्रारकर्ता यांना घर बांधून देण्याचा करार केला. त्या करारनाम्याच्या अनुषंगाने विरुध्द पक्ष क्र.1 यांनी परस्पर विरुध्द पक्ष क्र.2 यांना दि.30/7/2020 रोजी रु.10,00,000/-; दि.3/10/2020 रोजी रु.6,00,000/-; दि.9/11/2020 रोजी रु.6,00,000/- याप्रमाणे रु.22,00,000/- दिले. त्या रकमा तक्रारकर्ता यांना न देता त्यांच्या पत्नीच्या खात्यावर वर्ग करुन परस्पर विरुध्द पक्ष क्र.2 यांना दिल्या. त्याबाबत चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आले. त्यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार केली असता विरुध्द पक्ष क्र.3 यांनी तक्रार परत घ्यावयास लावली. अशाप्रकारे विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी त्यांची फसवणूक करुन रकमेचा अपहार केला आहे. अंतिमत: त्यांनी रु.22,00,000/- व अन्य नुकसान भरपाई देण्याचा विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती केलेली आहे.
(4) प्रकरणामध्ये तक्रारकर्ता यांच्या विधिज्ञांचा दाखलपूर्व युक्तिवाद ऐकला. अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले.
(5) विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्ता यांना निर्देशीत केलेल्या दि.6/7/2020 रोजीच्या पत्राचे अवलोकन केले असता प्लॉट खरेदीसाठी रु.15,00,000/- व गृह बांधणीसाठी रु.25,00,000/- कर्ज मंजूर केल्याचे निदर्शनास येते. तक्रारकर्ता यांनी कर्ज खाते क्र. 60360420585 व 60362525189 चे खाते उतारे दाखल केले आहेत. सकृतदर्शनी, विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्ता यांना प्लॉट खरेदी व गृह बांधणीसाठी 2 स्वतंत्र कर्ज मंजूर केल्याचे निदर्शनास येते. असे असताना तक्रारकर्ता यांचे कथन असे आहे की, त्यांनी दिलेल्या को-या बाँड पेपरचा गैरवापर करुन विरुध्द पक्ष क्र.1 यांनी विरुध्द पक्ष क्र.2 यांना रु.22,00,000/- परस्पर दिले आहेत. प्रामुख्याने, विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी फसवणूक केल्याचे नमूद केलेले आहे.
(6) प्रामुख्याने, विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार फसवणूक केली, असा वाद उपस्थित केलेला आहे. सकृतदर्शनी, तक्रारकर्ता यांची कथने फौजदारी गुन्ह्याचे स्वरुप निर्देशीत करतात. प्रकरणातील वाद-तथ्ये पाहता प्रस्तुत ग्राहक तक्रार दाखल करुन घेणे कायदेशीरदृष्टया समर्थनिय नाही. तक्रारकर्ता यांना योग्य कायदेशीर कार्यवाही करण्याचे किंवा योग्य न्यायालयात अनुतोष मागण्याचे स्वातंत्र्य आहे. ग्राहक तक्रार दाखलपूर्व स्वरुपात रद्द करणे न्यायोचित आहे. त्या अनुषंगाने प्राथमिक स्तरावर ग्राहक तक्रार रद्द करण्यात येते.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-