जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 218/2022. तक्रार नोंदणी दिनांक : 21/07/2022.
तक्रार दाखल दिनांक : 25/08/2022. तक्रार निर्णय दिनांक : 04/06/2024.
कालावधी : 01 वर्षे 10 महिने 14 दिवस
विवेक पिता तुकाराम मदने, वय 45 वर्षे,
व्यवसाय : व्यापार, रा. दयाराम रोड, खडक हनुमान, लातूर. :- तक्रारकर्ता
विरुध्द
शाखा व्यवस्थापक, बजाज एलीयंज जनरल इन्शुरन्स कंपनी लि.,
शाखा : प्लॉट नं. डी-5/1, ऑफीस नं. 7-103, तिसरा मजला,
एबीसी इस्ट बिल्डींग, प्रोजान मॉलजवळ, चिकलठाणा,
एम.आय.डी.सी., औरंगाबाद. :- विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. राम एन. पाटील
विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. सुधीर गुरव
आदेश
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, त्यांच्या अशोक लिलँड दोस्त कंपनीच्या ॲटो क्र. एम.एच.24/ए.यू.5362 (यापुढे 'विमाकृत वाहन') याचा विरुध्द पक्ष (यापुढे 'विमा कंपनी') यांच्याकडे विमापत्र क्र. ओजी-21-2007-1803-00000482 अन्वये दि.12/11/2020 ते 11/11/2021 कालावधीकरिता रु.28,220/- विमा हप्ता भरणा करुन विमा उतरविलेला होता. दि.5/8/2021 रोजी विमाकृत वाहन लातूर येथून नांदेड येथे जात असताना अपघात होऊन रु.63,918/- चे नुकसान झाले. त्यानंतर विमा कंपनीने तक्रारकर्ता यांच्याकडे अनावश्यक कागदपत्रांची मागणी केली. मात्र विमाकृत वाहन घटनास्थळावरुन परस्पर नेल्यामुळे व वाहनामध्ये परवान्यापेक्षा जास्त व्यक्ती असल्याचे खोटे कारण नमूद करुन नुकसान भरपाई देण्यास नकार दिला. तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, विमाकृत वाहन संबंधीत पोलीस यांनी नेले होते आणि माल वाहतुकीमुळे विमाकृत वाहनामध्ये माल भरणे-उतरविण्याकरिता मजूर होते. विमा कंपनीने विमा रक्कम देण्यास टाळाटाळ केल्यामुळे सूचनापत्र पाठविले असता विमा कंपनीने दखल घेतली नाही. उक्त कथनांच्या अनुषंगाने रु.93,918/- नुकसान भरपाई देण्याचा; मानसिक त्रासाकरिता रु.25,000/- व ग्राहक तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- देण्याचा विमा कंपनीस आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.
(2) विमा कंपनीने लेखी निवेदनपत्र दाखल केले आणि ग्राहक तक्रारीतील कथने त्यांनी अमान्य केले आहेत. त्यांचे कथन असे की, तक्रारकर्ता त्यांचे ग्राहक नाहीत. तक्रारकर्ता यांना अटी व शर्तीस अधीन राहून विमापत्र निर्गमीत केलेले होते. विमापत्राच्या अटी व शर्ती उभय पक्षांवर बंधनकारक आहेत. तक्रारकर्ता यांनी विमापत्राच्या अटी व शर्तींचा भंग केलेला आहे. अपघातसमयी वाहन चालकाकडे विमाकृत वाहन चालविण्याचा परवाना, परमीट व फिटनेस प्रमाणपत्र नव्हते. अपघात घडल्याच्या 46 दिवसानंतर विमा कंपनीस सूचना देण्यात आलेली असून विमापत्राच्या अट क्र.1 चा भंग झालेला आहे. विमा कंपनीस सूचना न देता परस्पर अपघातस्थळावरुन विमाकृत वाहन हलविल्यामुळे अपघाताचे कारण व नुकसानीच्या मुल्यमापनासंबंधी कार्यवाही करता आलेली नाही. विमाकृत वाहनामध्ये चालकासह अन्य 1 व्यक्तीची आसनक्षमता असताना अपघातसमयी विमाकृत वाहनामध्ये अवैधरित्या 3 व्यक्ती प्रवास करीत होत्या. विमा कंपनीने तक्रारकर्ता यांना विमाकृत वाहनाचे कागदपत्रे, पोलीस कागदपत्रे, विमा दावा इ. कागदपत्रांची मागणी केली असता त्याची पूर्तता केलेली नाही. अशाप्रकारे विमापत्राच्या अटी व शर्तींचा भंग झाल्यामुळे कायदेशीरित्या विमा दावा नामंजूर करण्यात आला आणि त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही. अंतिमत: ग्राहक तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी, अशी विनंती करण्यात आलेली आहे.
(3) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, विमा कंपनीचे लेखी निवेदनपत्र व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) तक्रारकर्ता हे विमा कंपनीचे ग्राहक आहेत काय ? होय
(2) विमा कंपनीने तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
केल्याचे सिध्द होते काय ? होय
(3) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? होय
असल्यास किती ? अंतिम आदेशाप्रमाणे
(4) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(4) मुद्दा क्र. 1 :- प्रामुख्याने तक्रारकर्ता यांच्या विमाकृत वाहनाचा विमा कंपनीकडे विमा उतरविण्यात आला, ही मान्यस्थिती आहे. तक्रारकर्ता त्यांच्या विमाकृत वाहनाकरिता विमा कंपनीकडून विमा संरक्षण सेवा घेत असल्यामुळे व त्याचे प्रतिफल विमा हप्त्याच्या स्वरुपामध्ये अदा केल्यामुळे ते ग्राहक संरक्षण अधिनियम, 2019 चे कलम 2 (7) अन्वये 'ग्राहक' संज्ञेत येतात. करिता, विमा कंपनीचा बचाव अमान्य करण्यात येतो आणि मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
(5) मुद्दा क्र. 2 ते 4 :- मुद्दा क्र. 2 ते 4 एकमेकांशी संलग्न असल्यामुळे त्यांचे विवेचन संयुक्तपणे करण्यात येत आहे. प्रामुख्याने, तक्रारकर्ता यांच्या विमाकृत वाहनाचा विमा कंपनीकडे विमा उतरविण्यात आला आणि विमा कालावधीमध्ये त्याचा अपघात झाला, याबद्दल मान्यस्थिती आढळते. विमा कंपनीने तक्रारकर्ता यांचा विमा दावा नामंजूर केला, याबद्दल विवाद नाही.
(6) विमा कंपनीने विमा दावा नामंजूर करण्यासाठी सूचना देण्यास 46 दिवसांचा विलंब, विनासंमती वाहन हलविणे, अनधिकृतपणे 3 व्यक्तींचा विमाकृत वाहनातून प्रवास, कागदपत्रांची अपूर्तता इ. कारणे देऊन विमापत्राच्या अटी व शर्तीचा भंग झाल्याचे नमूद केले. तसेच तक्रारकर्ता यांनी विमा कंपनीच्या पत्रास उत्तर देऊन विमा नुकसान भरपाई देण्याची विनंती केलेली आहे.
(7) विलंबाने सूचना देण्याबद्दल विमा कंपनीचा प्रतिवाद पाहता मा. सर्वोच्च न्यायालय व मा. राष्ट्रीय आयोगाद्वारे निर्णयीत प्रकरणांमध्ये सत्य दावे विलंबाने सूचना दिल्याच्या कारणास्तव नामंजूर करता येत नाहीत, असे न्यायिक तत्व आढळते.
(8) विमाकृत वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र पाहता Vehicle Class : Goods Carrier - TR व Seat. Capacity : 002 नमूद दिसते. अपघातसमयी वाहनामध्ये 3 व्यक्ती प्रवास करीत होत्या, हे तक्रारकर्ता यांना मान्य आहे. असे असले तरी, वाहनामध्ये प्रवास करणा-या अन्य व्यक्ती प्रवासाचे भाडे देऊन प्रवास करीत असल्याबद्दल पुरावा नाही. तसेच अन्य प्रवाशांमुळे अपघात घडला असा पुरावा नाही. सकृतदर्शनी, विमाकृत वाहनाच्या आसन क्षमतेपेक्षा अतिरिक्त प्रवाशी वाहतूक केल्याचे सिध्द होत असले तरी ते विमापत्रातील तरतुदींचे मुलभूत उल्लंघन ठरत नाही, असे जिल्हा आयोगाचे मत आहे.
(9) तक्रारकर्ता यांचे कथन असे की, अपघातस्थळावरुन वाहन पोलीस यंत्रणेने विमाकृत वाहन हलविल्यामुळे त्यांच्याकडे अन्य विकल्प नव्हता. निर्विवादपणे, विमाकृत वाहनाच्या अपघाताबद्दल पोलीस कार्यवाही झाल्याचे दिसून येते. अपघातानंतर विमाकृत वाहन पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आले असल्यास त्याकरिता तक्रारकर्ता यांचा दोष देता येणार नाही. तसेच, विमाकृत वाहन पोलीस ठाण्यामध्ये होते आणि त्यावेळी विमाकृत वाहनासंबंधी आवश्यक कार्यवाही करण्याच्या संधीपासून वंचित रहावे लागले, हा विमा कंपनीचा प्रतिवाद स्वीकारार्ह नाही.
(10) विमा कंपनीने लेखी निवेदनपत्रामध्ये कागदपत्रांची मागणी केली असता तक्रारकर्ता यांनी त्याची पूर्तता केली नाही, असा प्रतिवाद केला आहे. विमा कंपनीचे दि.23/10/2021 रोजीचे पत्र पाहता वाहन चालकाचा कलम 161 प्रमाणे जबाब, वैद्यकीय उपचाराची कागदपत्रे व एम.एल.सी., चालकाचे अटकपत्र व जामीन कागदपत्रे, वाहनाचा मुक्तता आदेश, वाहनाचा टोचन तपशील इ. कागदपत्रांची मागणी केलेली आहे. प्रामुख्याने, विमा दावा निर्णयीत करण्यासाठी त्या कागदपत्रांची आवश्यकता का लागते, याचे स्पष्टीकरण नाही.
(11) असे दिसते की, सर्वेक्षकाकडून विमाकृत वाहनाचे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. त्यामध्ये नुकसानीकरिता रु.31,314/- चे मुल्यनिर्धारण केले आहे. तक्रारकर्ता यांनी सर्वेक्षण अहवालाचे खंडन केलेले नाही किंवा स्वतंत्र पुरावा सादर केलेला नाही.
(12) तक्रारकर्ता यांचा विमा दावा असत्य असल्याचे सिध्द होत नाही. विमा कंपनीने तक्रारकर्ता यांचा विमा दावा नामंजूर करण्यासाठी दिलेले कारणे असंयुक्तिक व अनुचित आहेत. आमच्या मते, विमा कंपनीने चूक व अयोग्य कारणास्तव विमा दावा नामंजूर करुन सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होते आणि तक्रारकर्ता विमा रक्कम मिळण्याकरिता पात्र ठरतात.
(13) तक्रारकर्ता यांनी रु.93,918/- नुकसान भरपाईची मागणी केलेली असली तरी रु.71,995/- चे देयके दाखल केलेले आहेत. सर्वेक्षण अहवालानुसार रु.31,314/- मुल्यनिर्धारण करण्यात आलेले आहे. अपघातसमयी विमाकृत वाहनामध्ये आसन क्षमतेपेक्षा अतिरिक्त प्रवाशी असल्यामुळे दावा नॉन-स्टॅन्डर्ड तत्वावर निर्णीयीत होणे आवश्यक आहे. त्यानुसार रु.31,314/- च्या 75 टक्के रक्कम म्हणजेच रु.23,486/- मिळण्याकरिता तक्रारकर्ता पात्र ठरतात.
(14) तक्रारकर्ता यांनी मानसिक त्रासाकरिता रु.25,000/- व ग्राहक तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- रकमेची मागणी केलेली आहे. आमच्या मते, प्रकरणानुरुप परिस्थितीजन्य गृहीतकाच्या अनुषंगाने नुकसान भरपाईची रक्कम निश्चित केली पाहिजे. असे दिसते की, तक्रारकर्ता यांना विरुध्द पक्ष यांच्याकडे पाठपुरावा करावा लागलेला आहे. तसेच तक्रारकर्ता यांना जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला व सहायता, विधिज्ञांचे शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. शिवाय, ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो आणि तक्रारकर्ता यांना मानसिक त्रास होणे नैसर्गिक व स्वाभाविक आहे. योग्य विचाराअंती मानसिक त्रासाकरिता रु.5,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत जिल्हा आयोग येत आहे.
(15) उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र. 2 व 3 चे उत्तर होकारार्थी देऊन मुद्दा क्र.4 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
ग्राहक तक्रार क्र. 218/2022.
आदेश
(1) ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारकर्ता यांना रु.23,486/- विमा रक्कम द्यावी.
(3) विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारकर्ता यांना मानसिक त्रासापोटी रु.5,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- द्यावेत.
(4) विरुध्द पक्ष विमा कंपनीने प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्री. अमोल बा. गिराम)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-