जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 41/2020. तक्रार दाखल दिनांक : 07/02/2020. तक्रार निर्णय दिनांक : 02/01/2023.
कालावधी : 02 वर्षे 10 महिने 26 दिवस
श्रीमती विमल ऊर्फ गयाबाई तुकाराम कांबळे, वय 55 वर्षे,
व्यवसाय : घरकाम, रा. बेलगाव, ता. अहमदपूर, जि. लातूर. तक्रारकर्ती
विरुध्द
(1) शाखा व्यवस्थापक, लाईफ इन्शोरन्स कार्पोरेशन (एल.आय.सी.),
नांदेड रोड, अहमदपूर, जि. लातूर.
(2) तहसीलदार, तहसील कार्यालय, अहमदपूर, जि. लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ती यांचेकरिता विधिज्ञ :- अभिषेक एस. शिंदे
विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकरिता विधिज्ञ :- संदीप एस. औसेकर
आदेश
श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, त्यांचे पती तुकाराम पिता भागुराम कांबळे (यापुढे 'तुकाराम') यांनी आम आदमी विमा योजनेकरिता विरुध्द पक्ष क्र.1 (यापुढे 'भारतीय आयुर्विमा महामंडळ') यांच्याकडे विमा हप्ता भरणा केला आणि विमा योजनेचे सदस्यत्व स्वीकारले. दि.9/5/2017 रोजी ट्रकने धडक दिल्यामुळे तुकाराम यांचा अपघाती मृत्यू झाला. रु.75,000/- विमा रक्कम मिळण्याकरिता तक्रारकर्ती यांनी कागदपत्रे सादर केले असता तुकाराम यांच्या पतीचे वय 60 पेक्षा जास्त असल्याच्या कारणास्तव विमा दावा नामंजूर केला. उक्त कथनाच्या अनुषंगाने रु.75,000/- विमा रक्कम व्याजासह देण्याचा; आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.30,000/- देण्याचा व तक्रार खर्च रु.5,000/- देण्याचा आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ती यांनी केली आहे.
(2) भारतीय आयुर्विमा महामंडळाने लेखी निवेदनपत्र सादर केले. त्यांनी ग्राहक तक्रारीतील कथने अमान्य केले आहेत. त्यांचे कथन असे की, तुकाराम यांच्या मृत्यूनंतर तक्रारकर्ती यांनी मृत्यू दावा सादर केला. त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांनुसार तुकाराम यांचे मृत्यूसमयी 69 वर्षे वय आढळून आले. त्यामुळे विमा दावा नामंजूर करण्यात आला. परंतु विधिज्ञांचे सूचनापत्र व शाळा सोडल्याचा दाखल्याचा विचार करुन मृत्यू दाव्याचा पुन:विचार केला आणि तक्रारकर्ती यांच्या बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा हाडोळती येथील खाते क्र. 25016662532 मध्ये दि.9/8/2019 रोजी रु.75,000/- जमा करण्यात आले. त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही. अंतिमत: ग्राहक तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती केली आहे.
(3) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार, भारतीय आयुर्विमा महामंडळाचे लेखी निवेदनपत्र, उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) भारतीय आयुर्विमा महामंडळाने तक्रारकर्ती यांना द्यावयाच्या
सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होते काय ? नाही.
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ती अनुतोषास पात्र आहेत काय ? नाही.
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(4) मुद्दा क्र. 1 ते 3 :- प्रामुख्याने, तुकाराम यांनी भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या आम आदमी बीमा योजने सदस्यता प्रमाणपत्र स्वीकारले आणि त्यांचा सदस्यत्व क्र. 28003000000000002979 आहे, याबद्दल विवाद नाही. तुकाराम यांचा मृत्यू झाला, हे विवादीत नाही. तुकाराम यांच्या मृत्यूनंतर तक्रारकर्ती यांनी मृत्यू दावा सादर केला आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाने त्यांचा विमा दावा नामंजूर केला, याबद्दल विवाद नाही.
(5) वाद-तथ्ये व कागदपत्रांच्या अनुषंगाने दखल घेतली असता आम आदमी बीमा योजने सदस्यता प्रमाणपत्रामध्ये तुकाराम यांचे वय 60 वर्षे नमूद आहे. सदस्यता प्रमाणपत्र दि.16/10/2007 रोजी निर्गमीत केले आणि तुकाराम यांचा मृत्यू दि.21/5/2017 रोजी झाला. महाराष्ट्र शासनाच्या समाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्र. आआवि 2007/प्र.क्र.356/विसयो, दि.16/10/2007 चे अवलोकन केले असता 18-59 वयोगटातील भूमीहीन कुटुंबातील कुटुंब प्रमुख व्यक्तीस विमा सरंक्षण दिलेले आहे. त्या अनुषंगाने भारतीय आयुर्विमा महामंडळाने तक्रारकर्ती यांचा विमा दावा नामंजूर केला. असे असले तरी, ज्यावेळी तक्रारकर्ती यांनी आवश्यक कागदपत्रे सादर केली, त्यावेळी भारतीय आयुर्विमा महामंडळाने तक्रारकर्ती यांच्या बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा हाडोळती येथील खाते क्र. 25016662532 मध्ये दि.9/8/2019 रोजी रु.75,000/- जमा केले, असे दिसून येते. भारतीय आयुर्विमा महामंडळाने अभिलेखावर रक्कम जमा केल्यासंबंधी कागदपत्रे दाखल केले आहेत. असे दिसते की, भारतीय आयुर्विमा महामंडळाने जमा केलेली रक्कम तक्रारकर्ती यांनी वेळावेळी उचललेली आहे. तुकाराम यांच्या मृत्यू दाव्याच्या अनुषंगाने भारतीय आयुर्विमा महामंडळाने तक्रारकर्ती यांच्या बँक खात्यामध्ये जमा केलेल्या रकमेचा विनियोग केलेला आहे.
(6) उक्त वस्तुस्थिती पाहता तक्रारकर्ती यांच्या वादविषयानुसार मागणी केलेली रक्कम रु.75,000/- भारतीय आयुर्विमा महामंडळाने दि.9/8/2019 रोजी तक्रारकर्ती यांच्या खात्यामध्ये जमा केलेली असताना त्याच रकमेसाठी तक्रारकर्ती यांनी दि.7/2/2020 रोजी जिल्हा आयोगापुढे प्रस्तुत तक्रार दाखल केली. ग्राहक तक्रार दाखल केल्यानंतर तक्रारकर्ती व त्यांचे विधिज्ञ सातत्याने अनुपस्थित आहेत. असे दिसते की, तक्रारकर्ती यांनी स्वच्छ हाताने ग्राहक तक्रार दाखल केलेली नाही. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 26 अन्वये ज्यावेळी जिल्हा मंचापुढे दाखल केलेली ग्राहक तक्रार क्षुल्लक व त्रासादायक असल्याचे सिध्द होते, त्यावेळी विरुध्द पक्ष यांना रु.10,000/- पेक्षा जास्त नसेल इतका खर्च देण्यासंबंधी तक्रारकर्ता यांना आदेश करता येतो. निश्चितच, भारतीय आयुर्विमा महामंडळाने विमा रक्कम अदा केलेली असताना तक्रारकर्ती यांची प्रस्तुत तक्रार त्यांच्याकरिता त्रासदायक ठरते. विमा योजनेचा उद्देश पाहता व तक्रारकर्ती ह्या भूमीहीन कुटुबांतील असल्यामुळे त्यांच्यावर खर्च रक्कम आकारणे उचित होणार नाही, असे जिल्हा आयोगाचे मत आहे.
(7) ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये नमूद 'त्रुटी' संज्ञेनुसार भारतीय आयुर्विमा महामंडळाने तक्रारकर्ती यांना सेवा देण्यामध्ये त्रुटी किंवा कमतरता ठेवलेली नाही. त्या अनुषंगाने तक्रारकर्ती अनुतोषास पात्र नसल्यामुळे ग्राहक तक्रार नामंजूर करणे न्यायोचित आहे. मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी देऊन खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) ग्राहक तक्रार नामंजूर करण्यात येते.
(2) खर्चासंबंधी आदेश नाहीत.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-