जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 116/2022. तक्रार दाखल दिनांक : 20/04/2022. तक्रार निर्णय दिनांक : 20/02/2024.
कालावधी : 01 वर्षे 10 महिने 00 दिवस
राम पिता नामदेवराव गायकवाड, वय 51 वर्षे,
व्यवसाय : शेती, रा. डोंगरगांव (बोरी), ता. शिरुर अनंतपाळ,
जि. लातूर, ह. मु. सुरज निवास, बोधे गार्डन, बोधे नगर, लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) शाखा व्यवस्थापक, आय.सी.आय.सी.आय. लोंबार्ड जनरल इन्शुरन्स
कं.लि., औसा रोड, पारिजात मंगल कार्यालय, लातूर, ता. जि. लातूर.
(2) व्यवस्थापक, आय.सी.आय.सी.आय. लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कं.लि.,
मध्यवर्ती बिल्डींग नं. 16, सहावा मजला, ऑफीस नं. 601 व 602,
नवीन लिंक रोड, मालाड (प.), मुंबई - 400 064. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष
श्रीमती रेखा जाधव, सदस्य
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- सुनिल एस. शिंदे
विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- सुरेश डोईजोडे
आदेश
श्रीमती रेखा जाधव, सदस्य यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, होंडा कंपनीच्या त्यांच्या कार नोंदणी क्र. एम.एच.25 ए.एल.1754 (यापुढे "कार") करिता विरुध्द पक्ष (यापुढे "विमा कंपनी") यांच्याकडे विमापत्र क्र. 3001/215706807/00/बी001 अन्वये दि.13/2/2021 ते 12/2/2022 कालावधीकरिता विमा उतरविलेला होता. कार चालविण्याकरिता त्यांनी सुरज गौतम कांबळे यांना वाहन चालक नेमलेले होते. दि.25/6/2021 रोजी सुरज गौतम कांबळे कार चालवत असताना निटूर गावाजवळ कुत्रा आडवा आल्यामुळे त्यास वाचविण्याच्या प्रयत्नात कार रस्त्यावरील पुलाच्या कठड्याला आदळली आणि अपघातामध्ये कारचे नुकसान झाले. अपघाताबद्दल तक्रारकर्ता यांनी पोलीस ठाणे, शिरुर अनंतपाळ येथे कळविले आणि अपघाताबद्दल स्टेशन डायरी क्र. 11 व 178/2021 अन्वये नोंद करण्यात आली. त्याच दिवशी पोलीस यंत्रणेने घटनास्थळ पंचनामा केला. तसेच, तक्रारकर्ता यांनी विमा कंपनीस अपघाताबद्दल भ्रमणध्वनीद्वारे सूचना देऊन अपघाताची माहिती ऑनलाईन पाठविली.
(2) तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, अपघातामध्ये कारचे नुकसान झाल्याबद्दल त्यांनी विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर कळविले आणि त्याची नोंद घेतली गेली. त्यानंतर कार स्टार मोटार्स, कन्हेरी चौक, लातूर येथे दुरुस्तीकरिता आणण्यात आली. परंतु विमा कंपनीचे प्रतिनिधी कारचे सर्वेक्षण करण्यासाठी आले नाहीत. त्याबद्दल पाठपुरावा केला असता विमा कंपनीने दि.12/11/2021 रोजीच्या पत्राद्वारे वाहन परवाना व राम गायकवाड यांचा वाहन परवान्याची मागणी केली. अपघातसमयी तक्रारकर्ता हे वाहन चालवत नसतानाही त्यांना वाहन परवान्याची मागणी करण्यात आलेली आहे.
(3) तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, दि.2/12/2021 रोजी तक्रारकर्ता यांनी अर्ज देऊन वाहन चालक सुरज गौतम कांबळे यांचा वाहन चालविण्याचा परवाना विमा कंपनीकडे सादर केला. मात्र विमा कंपनीने पुन्हा त्याच आशयाचे पत्र तक्रारकर्ता यांना पाठविले. अपघातग्रस्त कारचे सर्वेक्षण, पाहणी व अन्य कार्यवाही होत नसल्यामुळे तक्रारकर्ता यांनी विमा कंपनीस विधिज्ञांमार्फत सूचनापत्र पाठविले; परंतु विमा कंपनीने दखल घेतली नाही. त्यामुळे तक्रारकर्ता यांनी ए.जी. कोटे, सर्वेक्षक व नुकसान निर्धारक, लातूर यांच्याकडून कारचे सर्वेक्षण करुन अहवाल घेतला. सर्वेक्षण अहवालानुसार कारचे रु.5,16,042/- नुकसान झाले आणि स्टार मोटार्स, लातूर यांनी कार दुरुस्तीकरिता रु.4,89,600/- रकमेचे अंदाजपत्रक दिले. मात्र कारची दुरुस्ती केली तरी वापरण्यायोग्य नसल्यामुळे विमापत्रानुसार कारचे विमाधारकाद्वारे घोषीत मुल्य रु.7,50,000/- मिळण्यास ते पात्र आहेत. अशाप्रकारे विमा कंपनीने सेवेमध्ये अक्षम्य त्रुटी केल्याचे नमूद करुन रु.7,50,000/- व्याजासह देण्याचा; अन्य वाहनाच्या वापराचा खर्च रु.1,00,000/-; मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.30,000/- व ग्राहक तक्रार खर्च रु.20,000/- देण्याचा विमा कंपनीस आदेश करावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केली आहे.
(4) विमा कंपनीने अभिलेखावर लेखी निवेदनपत्र दाखल केले. त्यांनी ग्राहक तक्रारीतील कथने अमान्य करुन पुराव्याद्वारे सिध्द करणे आवश्यक असल्याचे नमूद केले. विमा कंपनीचे कथन असे की, तक्रारकर्ता यांच्याकडून कारच्या अपघाताची माहिती प्राप्त झाल्यानंतर त्यांनी दि.12/11/2021 व 30/11/2021 रोजी पत्र पाठवून तक्रारकर्ता यांच्या वाहन चालविण्याच्या परवान्याची मागणी केली. परंतु तक्रारकर्ता यांनी त्याप्रमाणे पूर्तता केलेली नाही. त्यामुळे त्यांनी क्षतीग्रस्त कारची पाहणी करण्यासाठी सर्वेक्षक नियुक्त केला नाही. तक्रारकर्ता यांनी विमा कंपनीच्या परवानगीशिवाय परस्पर वाहनाचे सर्वेक्षण केले असल्यामुळे सर्वेक्षण अहवाल त्यांच्यावर बंधनकारक नाही. त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही आणि ग्राहक तकार खोटी असल्यामुळे रद्द करण्यात यावी, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.
(5) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, विमा कंपनीचे लेखी निवेदनपत्र, अभिलेखावर दाखल कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विमा कंपनीने तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
केल्याचे सिध्द होते काय ? होय
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? होय
असल्यास किती ? अंतिम आदेशाप्रमाणे
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(6) मुद्दा क्र. 1 ते 3 :- मुद्दा क्र.1 ते 3 परस्परपुरक असल्यामुळे त्यांचे एकत्र विवेचन करण्यात येते. तक्रारकर्ता यांच्या कारसाठी विमा कंपनीकडे विमापत्र क्र. 3001/215706807/00/बी001 अन्वये दि.13/2/2021 ते 12/2/2022 कालावधीकरिता विमा उतरविण्यात आला, असे दर्शविणारे विमापत्र अभिलेखावर दाखल आहे. दि.25/6/2021 रोजी कारचा अपघात झाला, हे दर्शविणारे पोलीस कागदपत्रे अभिलेखावर दाखल आहेत. अपघातामध्ये कारचे नुकसान झाले, हे दर्शविणारे छायाचित्रे अभिलेखावर दाखल आहेत. प्रामुख्याने, विमा कंपनीने तक्रारकर्ता यांच्या ग्राहक तक्रारीतील कथने अमान्य केले तरी दि.12/11/2021 व 30/11/2021 रोजी पत्र पाठवून तक्रारकर्ता यांच्या वाहन चालविण्याच्या परवान्याची मागणी केली आणि त्याप्रमाणे पूर्तता न केल्यामुळे क्षतीग्रस्त कारची पाहणी करण्यासाठी सर्वेक्षक नियुक्त केला नसल्याचे त्यांनी नमूद केलेले आहे. एका अर्थाने, कारचा विमा, कारचा अपघात, कारचे नुकसान ई. बद्दल विमा कंपनीची मान्यता दिसते.
(7) प्रस्तुत प्रकरणामध्ये कारच्या अपघात व नुकसानीबद्दल सूचना प्राप्त झाल्यानंतर विमा कंपनीने कारचे सर्वेक्षण करुन घेण्याची कार्यवाही केलेली नाही. असे दिसते की, क्षतीग्रस्त कारच्या सर्वेक्षणाची जबाबदारी पूर्ण करण्याऐवजी विमा कंपनीने कागदोपत्री पूर्ततेचे कारण देऊन विमा दायित्व अमान्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पोलीस कागदपत्रांवरुन दिसते की, वाहनचालक कार चालवत होता आणि अपघात झालेला आहे. अपघातसमयी तक्रारकर्ता हे कार चालवत होते, असाही विमा कंपनीचा बचाव नाही. तक्रारकर्ता यांचा वाहन चालविण्याचा परवाना विमा दावा निर्णयीत करण्यासाठी कसा महत्वपूर्ण व अत्यावश्यक ठरतो ? याचे विवेचन नाही. आमच्या मते, क्षतीग्रस्त कारचा विमा दावा निर्णयीत करण्यासाठी तक्रारकर्ता यांचा वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक ठरु शकत नाही आणि त्या कारणास्तव विमा संरक्षणाच्या दायित्वातून विमा कंपनीस मुक्त होता येणार नाही.
(8) सकृतदर्शनी, कारचा विमा, कारचा अपघात, कारचे नुकसान, तक्रारकर्ता यांच्याद्वारे क्षतीग्रस्त कारचे केलेले सर्वेक्षण इ. बाबी सिध्द होतात. निश्चितच, विमा कंपनीने तक्रारकर्ता यांच्या कारच्या विम्याबद्दल अत्यंत उदासिन व नकारात्मक दृष्टीकोन ठेवलेला आहे. सिध्द बाबी पाहता तक्रारकर्ता यांच्या कारचे अपघातामध्ये नुकसान झालेले असताना विमा कंपनीने अनुचित व अयोग्य कारणे देऊन विमा रक्कम देण्याची जबाबदारी टाळलेली असून त्यांचे कृत्य सेवेतील त्रुटी ठरते. उक्त विवेचनाअंती तक्रारकर्ता विमा नुकसान भरपाई मिळण्यास पात्र ठरतात, या निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत.
(9) तक्रारकर्ता यांनी क्षतीग्रस्त कारच्या दुरुस्तीबद्दल स्टार मोटार्स, लातूर यांनी दिलेले खर्चाचे अंदाजपत्रक व ए.जी. कोटे, सर्वेक्षक व नुकसान निर्धारक यांचा सर्वेक्षण अहवाल दाखल केला. सर्वेक्षण अहवालानुसार कारच्या नुकसानीकरिता रु.5,00,000/- निर्धारण केलेले आहे. तक्रारकर्ता यांच्या कथनानुसार क्षतीग्रस्त कारची दुरुस्ती केली तरी वापरण्यायोग्य नसल्यामुळे विमापत्रानुसार विमाधारकाद्वारे घोषीत मुल्य रु.7,50,000/- मिळण्यास पात्र ठरतात. अभिलेखावर दाखल सर्वेक्षण अहवालानुसार कारचे संपूर्ण नुकसान झाले, हे निर्देशीत होत नाही. विमा कपंनीद्वारे सर्वेक्षण अहवालाचे खंडन केले असले तरी त्याबद्दल पुरावा दाखल केलेला नाही. सामान्यत: नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी सर्वेक्षण अहवाल महत्वपूर्ण मानण्यात येतो. त्यामुळे कारची विमा संरक्षीत रक्कम रु.7,50,000/- मिळण्याचे तक्रारकर्ता यांचे कथन स्वीकारार्ह नाही. विमापत्रानुसार कारसाठी Zero Depreciation होते. ज्यावेळी कारसाठी 'शुन्य' घसारा धरण्यात येऊन विमा हप्ता स्वीकारला गेला, त्यावेळी कारच्या दुरुस्ती खर्चातून घसारा वजावट करता येणार नाही. अंतिमत: सर्वेक्षकांनी कारचे दुरुस्ती तत्वावर दुरुस्ती खर्चाचे निर्धारण केले असल्यामुळे रु.5,00,000/- मिळण्यास तक्रारकर्ता पात्र ठरतात.
(10) तक्रारकर्ता यांनी अपघात तारखेपासून द.सा.द.शे. 15 टक्के व्याज दराने विमा रकमेची मागणी केलेली आहे. प्रकरणाची वस्तुस्थिती विचारात घेऊन जिल्हा आयोगामध्ये ग्राहक तक्रार दाखल केल्याच्या तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज देण्याकरिता विमा कंपनीस आदेश करणे न्यायोचित राहील, या निष्कर्षाप्रत येत आहोत.
(11) तक्रारकर्ता यांनी अन्य वाहन वापरावे लागले, त्यासाठी रु.1,00,000/- मागणी केले. वास्तविक पाहता, उचित पुरावा दाखल नसल्यामुळे त्याबद्दल दखल घेता येणार नाही.
(12) तक्रारकर्ता यांनी मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.30,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.20,000/- रकमेची मागणी केलेली आहे. आमच्या मते, प्रकरणानुरुप परिस्थितीजन्य गृहीतकाच्या अनुषंगाने नुकसान भरपाईची रक्कम निश्चित केली पाहिजे. असे दिसते की, तक्रारकर्ता यांना विमा कंपनीकडे पाठपुरावा करावा लागलेला आहे. तसेच तक्रारकर्ता यांना जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला व सहायता, विधिज्ञांचे शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. शिवाय, ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो आणि तक्रारकर्ता यांना मानसिक व शारीरिक त्रास होणे नैसर्गिक व स्वाभाविक आहे. योग्य विचाराअंती मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत जिल्हा आयोग येत आहे.
(13) उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 विमा कंपनीने तक्रारकर्ता यांना रु.5,00,000/- विमा नुकसान भरपाई द्यावी.
तसेच, विरुध्द पक्ष क्र.1 व 2 विमा कंपनीने तक्रारकर्ता यांना उक्त रकमेवर दि.20/4/2022 पासून रक्कम अदा करेपर्यत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज द्यावे.
(3) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 विमा कंपनीने तक्रारकर्ता यांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- द्यावेत.
ग्राहक तक्रार क्र. 116/2022.
(4) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 विमा कंपनीने प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव) (श्री. अमोल बा. गिराम)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-