जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 162/2017. तक्रार दाखल दिनांक : 18/08/2017. तक्रार निर्णय दिनांक : 30/09/2021.
कालावधी : 04 वर्षे 01 महिने 12 दिवस
सादिक कासीम सय्यद, वय 33 वर्षे,
धंदा : व्यापार, रा. बस्तापुरे नगर, लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
शाखा व्यवस्थापक, आय.सी.आय.सी.आय. बँक,
शाखा औसा रोड, लातूर, ता.जि. लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्री. कमलाकर अ. कोठेकर, अध्यक्ष
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
मा. श्रीमती रेखा जाधव, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- सचिन एन. जावळे
विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- आय.आर. शेख
न्यायनिर्णय
मा. श्री. कमलाकर अ. कोठेकर, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता हा विरुध्द पक्ष बँकेचा ग्राहक आहे. त्याने आपल्या तक्रारीत असे नमूद केले आहे की, त्याला नंदकुमार कांबळे याने रु.75,000/- चा धनादेश कृष्णा ग्रामीण बँक, सास्तापूर, ता. बसवकल्याण, जि. बिदर, कर्नाटक या बँकेवर काढलेला दिला होता. सदरचा धनादेश त्याने विरुध्द पक्ष बँकेमध्ये वसुलीसाठी लावला. परंतु त्याला या धनादेशाचे पैसे मिळू शकले नाहीत. बँकेकडे याबाबत चौकशी केली असता त्याला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला असे सांगण्यात आले की, कर्मचा-याकडून धनादेश गहाळ झाला आहे. त्याने याबाबत पाठपुरावा केला तरीही त्याला पैसे अथवा योग्य प्रतिसाद मिळाला नाही. त्याने पोलीस स्टेशनला तक्रार दिली. नंतर वकिलामार्फत नोटीस पाठविली. तरीही विरुध्द पक्षाने प्रतिसाद दिला नाही. म्हणून शेवटी ही तक्रार केली आहे. या तक्रारीत त्याचे म्हणणे असे आहे की, त्याला रु.75,000/- च्या धनादेशाची रक्कम, त्यास झालेला खर्च, मानसिक व शारीरिक त्रास इ. पोटी एकूण रु.1,16,000/- मिळावेत.
(2) या तक्रारीच्या उत्तरात विरुध्द पक्षातर्फे आपल्या लेखी म्हणण्यामध्ये हे मान्य करण्यात आले आहे की, तक्रारकर्ता बँकेचा ग्राहक आहे. त्याने सदरचा चेक वसुलीसाठी बँकेत दिला होता. हा चेक क्लिअरन्ससाठी लातूरला एस.बी.आय. मध्ये पाठविला असता wrongly delivered not drawn on us अशा उल्लेखासह तो परत आला. त्यावेळी सी.टी.एस. सिस्टीम नव्हती. हा चेक ज्या बँकेवर काढण्यात आला, त्या कृष्णा ग्रामीण बँक, सास्तापूर, बसवकल्याण या बँकेकडे वठविण्यासाठी पाठविण्याची प्रकिया चालू होती. त्याच काळात बँकेमध्ये काही नुतनीकरणाचे काम देखील चालू होते. त्यामुळे त्या घाईमध्ये हा चेक गहाळ झाला. लगेच तक्रारकर्त्याला त्याबद्दल सूचित कराण्यात आले. कृष्णा बँकेला देखील सूचित करुन या चेकबाबतचे व्यवहार करु नयेत, असे कळविण्यात आले. तक्रारकर्त्याला गहाळ झालेल्या चेकबाबत योग्य ते सहकार्य करण्याची तयारी बँकेने दर्शविली. नंतर असे समजले की, चेक काढणारे नंदकुमार कांबळे यांने त्याचे त्या बँकेतील खाते बंद केले आहे. त्या नंदकुमार विरुध्द काय ती कार्यवाही झाल्यास विरुध्द पक्ष बँक तक्रारकर्त्याला योग्य ते सहकार्य करेल, असे तक्रारकर्त्याला सांगण्यात आले. परंतु तरीही तक्रारकर्त्याने हेतु:पुरस्सर ही खोटी तक्रार केली आहे; ती फेटाळण्यात यावी.
(3) या प्रकरणामध्ये तक्रारकर्त्याचे वकील गेल्या ब-याच काळापासून प्रकरणात गैरहजर आढळून येतात. एप्रिल 2018 मध्ये तक्रारकर्त्यातर्फे पुराव्याचे शपथपत्र सादर करण्यात आले आणि त्यानंतर पासून वारंवार तक्रारकर्ता व त्याचे वकील गैरहजर आढळून येतात. पुढे प्रकरण युक्तिवादाला लागल्यानंतर पासून देखील ब-याच काळापासून तक्रारकर्ता व त्याचे वकील गैरहजर होते. शेवटी विरुध्द पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकूण प्रकरण निवाड्यासाठी नियुक्त करण्यात आले.
(4) उपलब्ध निवेदन व पुरावा विचारात घेता निकालासाठी मी खालील मुद्दे निश्चित करतो व त्यावरील माझा निर्णय कारणमीमांसेसह पुढीलप्रमाणे देत आहे.
मुद्दे उत्तर
(1) तक्रारकर्त्याने हे सिध्द केले काय की, विरुध्द पक्षाने त्याला चुकीची व नकारार्थी
दोषपूर्ण सेवा पुरविली ?
(2) काय आदेश ? तक्रार फेटाळण्यात येते.
कारणमीमांसा
(5) मुद्दा क्र. 1 व 2 :- या प्रकरणात हे स्पष्ट आहे की, तक्रारकर्ता याला नंदकुमार कांबळे याने एप्रिल 2017 मध्ये रु.75,000/- चा चेक दिला होता. हा चेक कृष्णा ग्रामीण बँक, सास्तापूर, ता. बसवकल्याण या बँकेवर काढण्यात आला होता. तक्रारकर्त्याने हा चेक विरुध्द पक्ष बँकेमध्ये वसुलीसाठी जमा केला. बॅकेमध्ये त्यावेळी नुतनीकरणाचे काम देखील चालू होते. संबंधीत बँक कर्मचा-याच्या हाताळणीमध्ये तो चेक गहाळ झाला.
(6) यात बँकेचे हे स्पष्ट निवेदन आहे की, चेक गहाळ झाल्यावर लागलीच त्यांनी कृष्णा बॅकेला त्याबद्दल कळविले आणि त्या चेकबाबत पुढील व्यवहार होऊ नयेत, याची दक्षता घेतली. त्यांनी तक्रारकर्त्याला देखील कळविले आणि त्यांनी चेकसंबंधाने तक्रारकर्त्याला पुढे काय कायदेशीर कार्यवाही करावयाची असल्यास त्याला सहकार्य करण्याचे देखील मान्य केले. या प्रकरणामध्ये तक्रारकर्त्याने काही कागदपत्रे सादर केली आहेत. त्यांनी आपले शपथपत्र देखील सादर केले आहे. ते सर्व विचारात घेता असे दिसते की, चेक गहाळ झाला; परंतु गहाळ झालेल्या चेकबद्दल बँकेने पुढील लगेच योग्य ती कार्यवाही केली आहे. बँकेने जो पुरावा सादर केला त्यात हे स्पष्टपणे नमूद केलेले आहे की, गहाळ झालेल्या चेकबद्दल कृष्णा ग्रामीण बँकेला कळविण्यात आले; तक्रारकर्त्याला देखील कळविण्यात आले व त्याला पुढील सहकार्य करण्याचे आश्वासन देखील देण्यात आले.
(7) वस्तुत: एकदा चेक बॅकेत वसुलीसाठी दिल्यानंतर नैसर्गिकरित्या त्या चेकचे पैसे संबंधीत खात्याला जमा होणे अपेक्षीत आहे. परंतु या प्रकरणात ही वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात आलेली आहे की, त्या काळामध्ये विरुध्द पक्ष बॅकेचे नुतनीकरणाचे काम चालू होते, त्यावेळी सदरचा चेक गहाळ झाला. संबंधीत कर्मचारी व बँकेने प्रयत्न करुनही तो आढळून आला नाही आणि म्हणून बँकेने त्याबाबत योग्य ती काळजी घेतली. गहाळ झालेल्या चेकचा गैरवापर होऊ नये इ. उद्देशाने बँकेने कृष्णा बँकेला सूचित केले; तक्रारकर्त्यालाही सूचित केले व त्याबाबत पुढील सहकार्य करण्याचे आश्वासन देखील दिले. परंतु पुढील योग्य कायदेशीर कार्यवाही न करता तक्रारकर्त्याने बॅकेचे संबंधीत अधिका-यांच्या विरुध्द पोलीसांमध्ये तक्रार केली. तक्रारकर्त्याने स्वत: त्याने पोलिसात जी तक्रार दिली, त्याची प्रत सादर केली आहे. यावरुन असे दिसते की, तक्रारकर्त्याने त्याच वेळी बँकेचे व्यवस्थापक व इतर कर्मचारी यांनी त्याची फसवणूक केल्याबद्दल तक्रार दिलेली आहे. जर अशी फसवणूक झाली असे तक्रारकर्त्याचे म्हणणे होते तर या पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पुढे काय कार्यवाही झाली; पोलिसांमार्फत काय कार्यवाही करण्यात आली, याबाबतचा पुरेसा तपशील तक्रारकर्त्याने या आयोगासमक्ष सादर केलेला नाही.
(8) चुका टाळणे अपेक्षीत असले तरी एखाद्या वेळी विशिष्ट परिस्थितीमध्ये चुका होऊ शकतात. परंतु त्यानंतर जी आवश्यक काळजी घ्यावयास पाहिजे ती घेतली की नाही, हे पाहणे देखील महत्वाचे आहे. या प्रकरणात असे दिसते की, बँकेच्या कर्मचा-याच्या हाताळणीमध्ये चेक गहाळ झाल्यानंतर लगेचच संबंधीत बँकेला व तक्रारकर्त्याला कळविण्यात आले व त्याबाबत कार्यवाहीसाठी सहकार्य करण्याचे तक्रारकर्त्याला आश्वासित करण्यात आले. परंतु तक्रारकर्त्याने बँक कर्मचा-यांच्या विरुध्द पोलिसांकडे तक्रार दिली व पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत पुढे काय प्रगती झाली, याचा तपशील सादर न करता तक्रारकर्त्याने ही तक्रार आयोगासमोर सादर केलेली आहे. आमचे असे मत आहे की, याबाबतीत झालेली चूक लक्षात येताच बँकेने पुढील योग्य ती कार्यवाही केलेली आहे आणि म्हणून विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला कुठलीही चुकीची अथवा हेतु:पुरस्सर दोषपूर्ण सेवा पुरविली, असे म्हणता येणार नाही. तक्रारकर्ता काही गोष्टी लपवून ठेवत आहे. त्याने पोलिसाकडे केलेल्या तक्रारीत पुढे काय कार्यवाही झाली, याबाबतचा तपशील या प्रकरणात सादर केलेला नाही. अशा परिस्थितीत तक्रारकर्त्याला वारंवार संधी देऊनही तो व त्याचे वकील गैरहजर आढळून येतात. उपलब्ध कागदपत्रांवरुन व पुराव्यावरुन आम्ही अशा निष्कर्षाला आलो आहेत की, विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला कुठलीही हेतु:पुरस्सर व चुकीची अथवा दोषपूर्ण सेवा पुरविलेली नाही आणि म्हणून तक्रारकर्त्याला त्याच्या मागणीप्रमाणे नुकसान भरपाई व रक्कम मिळू शकत नाही. म्हणून त्याप्रमाणे निर्णीत करुन मी खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
(1) तक्रार फेटाळण्यात येते.
(2) पक्षकारांनी आपआपला खर्च सहन करावा.
(3) उभय पक्षकारांना या निवाड्यांच्या प्रती विनामुल्य त्वरीत देण्यात याव्यात.
(श्रीमती रेखा जाधव) (श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्री. कमलाकर अ. कोठेकर)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-