जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 130/2020. तक्रार दाखल दिनांक : 22/09/2020. तक्रार निर्णय दिनांक : 30/08/2022.
कालावधी : 01 वर्षे 11 महिने 08 दिवस
अलसबा पिता मोहम्मद रफी लदाफ, वय 21 वर्षे,
व्यवसाय : शिक्षण, रा. रहेमत नगर, बनशेळकी रोड,
उदगीर, ता. उदगीर, जि. लातूर. तक्रारकर्ती
विरुध्द
शाखा प्रबंधक, भारतीय स्टेट बँक, शाखा उदगीर,
पटवारी कॉम्प्लेक्स, नांदेड रोड, उदगीर, ता. उदगीर, जि. लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ती यांचेकरिता विधिज्ञ :- एम.एफ. सिद्दीकी
विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- उपेंद्र सी. महाजन
आदेश
श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी आहे की, त्यांचे विरुध्द पक्ष बँकमध्ये बचत खाते क्रमांक 34094381801 आहे. दि.9/6/2020 रोजी त्या खात्यामध्ये तक्रारकर्ती यांनी रु.1,10,000/- जमा केले. त्यानंतर बचत खात्याशी संलग्न भ्रमणध्वनी क्रमांक 9604985825 द्वारे संदेश प्राप्त झाला की, त्यांच्या खात्यातून बाबू एस.के. व्यक्तीच्या नांवे रु.1,12,000/- हस्तांतरीत करण्यात आले. तक्रारकर्ती यांनी ऑनलाईन व्यवहार केलेला नव्हता आणि त्यांच्याकडून one time password ची मागणी केलेली नव्हती. तक्रारकर्ती यांनी दि.9/6/2020 रोजी विरुध्द पक्ष यांच्याशी संपर्क साधून दि.11.50 वाजता लेखी अर्ज केला आणि त्यांनी व्यवहार केलेला नसल्यामुळे रक्कम परत करण्यासाठी विनंती केली.
(2) तक्रारकर्ती यांचे पुढे असे कथन आहे की, विरुध्द पक्ष बँकेने खोट्या व्यवहाराबाबत शहानिशा करुन तो व्यवहार स्थगित ठेवल्याबाबत तक्रारकर्ती यांच्या भ्रमणध्वनीवर संदेश पाठविला. परंतु विरुध्द पक्ष बँकेने पुन्हा संदेश पाठवून खोटा व्यवहार बंद करण्यास असमर्थ असल्यासंबंधी दिलगीरी व्यक्त केली. त्यानंतर कोविड-19 प्रादुर्भावामुळे असणा-या लॉकडाऊनमुळे तक्रारकर्ती ह्या विरुध्द पक्ष बँकेशी संपर्क साधू शकल्या नाहीत. लॉकडाऊन संपल्यानंतर दि.17/8/2020 रोजी त्यांनी त्यांच्या खात्यातून बेकायदेशीररित्या खोट्या व्यवहाराद्वारे कपात झालेले रु.1,12,000/- परत जमा करण्यासाठी विनंती केली; परंतु विरुध्द पक्ष बँकेने दखल घेतली नाही. उक्त वादकथनांच्या अनुषंगाने रु.1,12,000/- व्याजासह देण्याचा; मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.1,00,000/- देण्याचा; नुकसान भरपाई रु.25,000/- देण्याचा व तक्रार खर्च रु.10,000/- देण्याचा विरुध्द पक्ष बँकेस आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ती यांनी केलेली आहे.
(3) विरुध्द पक्ष बँकेने लेखी निवेदनपत्र सादर केले आहे. त्यांनी ग्राहक तक्रारीमध्ये नमूद असणारा बहुतांश मजकूर अमान्य केला आहे. त्यांचे कथन असे की, कथित व्यवहार हा ऑनलाईन बँकींग सुविधेद्वारे झालेला असल्यामुळे ऑनलाईन बँकींगच्या प्रणालीद्वारे प्रत्येक व्यवहाराकरिता संदेश पाठविला जातो आणि त्याप्रमाणे तक्रारकर्ती यांना संदेश प्राप्त झालेला असावा. तसेच ओ.टी.पी. चा वापर केल्याशिवाय व तो योग्य असल्याशिवाय रक्कम वर्ग होऊ शकत नाही. तक्रारकर्ती यांनी स्वत: ओ.टी.पी. वापरलेला असावा किंवा अन्य कोणाशी शेअर केला असावा. तक्रारकर्ती यांनी त्यांच्याकडे अर्ज दिलेला असला तरी खात्यावरील व्यवहार ऑनलाईन बँकींग सुविधेद्वारे झालेला असल्यामुळे काही कार्यवाही करण्यास विरुध्द पक्ष बँक असमर्थ होती. संदेशामध्ये नमूद असणा-या क्रमांक 1800111109 व 9223008333 वर संपर्क साधला असता तर तक्रारकर्ती यांचे व ज्या खात्यावर रक्कम वर्ग झाली, ते खाते रोखून ठेवले असते. परंतु तक्रारकर्ती यांनी त्याप्रमाणे कार्यवाही न करता विरुध्द पक्ष बँकेकडे अर्ज केला.
(4) विरुध्द पक्ष बँकेचे पुढे असे कथन आहे की, तक्रारकर्ती यांची पुढील फसवणूक टाळण्याकरिता तक्रारकर्ती व बाबू एस.के. यांचे खाते hold केले होते; परंतु दरम्यानच्या काळात त्या व्यक्तीने अन्य खात्यामध्ये रक्कम वर्ग केलेली होती. त्यामुळे विरुध्द पक्ष बँक तक्रारकर्ती यांची मदत करु शकली नाही. कथित व्यवहार तक्रारकर्ती किंवा त्यांच्या प्रतिनिधीद्वारे केलेला असल्यामुळे तक्रारकर्ती यांची रु.1,12,000/- परत मिळण्यासाठी केलेली विनंती खोटी व चूक आहे.
(5) विरुध्द पक्ष बँकेचे पुढे असे कथन आहे की, तक्रारकर्ती यांनी त्यांच्या बंधुसोबत पोलीस ठाणे, उदगीर ग्रामीण येथे 18/6/2020 रोजी कथित व्यवहारासंबंधी रोहन रमेश जाधव यांच्याविरुध्द फिर्याद दाखल केलेली आहे. त्यामध्ये रोहन रमेश जाधव यांनी तक्रारकर्ती यांच्या खात्यावर इंटरनेट बँकींग सुविधा कार्यान्वित केल्याचे व तक्रारकर्ती यांना भ्रमणध्वनी करुन ओ.टी.पी. माहिती दिल्याचे नमूद केले. तक्रारकर्ती यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे रोहन रमेश जाधव यांनी तक्रारकर्ती यांच्या खात्यातून रु.1,10,000/- चा व्यवहार झालेला आहे. तक्रारकर्ती यांच्या निष्काळजीपणामुळे रक्कम बाबू एस.के. यांच्या खात्यामध्ये वर्ग झालेली आहे. अंतिमत: विरुध्द पक्ष बँकेने तक्रारकर्ती यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी केलेली नसल्यामुळे ग्राहक तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी, अशी विनंती केलेली आहे.
(6) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी निवेदनपत्र, उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ती यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
केल्याचे सिध्द होते काय ? नाही
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ती अनुतोषास पात्र आहेत काय ? नाही
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(7) मुद्दा क्र. 1 ते 3 :- मुद्दा क्र.1 ते 3 हे एकमेकांशी पुरक असल्यामुळे एकत्र विवेचन करण्यात येते. प्रामुख्याने, तक्रारकर्ती यांचे विरुध्द पक्ष बँकेमध्ये बचत खाते क्रमांक 34094381801 आहे, ही बाब विवादीत नाही. दि.9/6/2020 रोजी तक्रारकर्ती यांच्या बचत खात्यातून बाबू एस.के. ह्या व्यक्तीच्या नांवे रु.1,12,000/- हस्तांतरीत झाले, हे विवादीत नाही.
(8) तक्रारकर्ती यांच्या कथनानुसार बाबू एस.के. ह्या व्यक्तीच्या नांवे रु.1,12,000/- हस्तांतरीत होण्याकरिता त्यांनी व्यवहार केलेला नव्हता आणि त्याकरिता विरुध्द पक्ष बँकेकडे अर्ज करुनही त्यांच्या खात्यामध्ये रक्कम परत जमा झालेली नाही. उलटपक्षी, विरुध्द पक्ष यांनी बँकेचा प्रतिवाद असा आहे की, ओ.टी.पी. चा वापर केल्याशिवाय व तो योग्य असल्याशिवाय रक्कम वर्ग होऊ शकत नाही आणि तक्रारकर्ती यांनी स्वत: ओ.टी.पी. वापरलेला असावा किंवा अन्य कोणाशी शेअर केला असावा.
(9) विरुध्द पक्ष बँकेचा असाही बचाव आहे की, तक्रारकर्ती यांच्या खात्यावरील व्यवहार ऑनलाईन बँकींग सुविधेद्वारे झालेला असल्यामुळे काही कार्यवाही करण्यास विरुध्द पक्ष बँक असमर्थ होती. तसेच तक्रारकर्ती यांनी त्यांच्या बंधुसोबत पोलीस ठाणे, उदगीर ग्रामीण येथे दाखल केलेल्या फिर्यादीनुसार रोहन रमेश जाधव यांनी तक्रारकर्ती यांच्या खात्यावर इंटरनेट बँकींग सुविधा कार्यान्वित केल्याचे व तक्रारकर्ती यांना भ्रमणध्वनी करुन ओ.टी.पी. माहिती दिल्याचे नमूद आहे आणि तक्रारकर्ती यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे रोहन रमेश जाधव यांनी तक्रारकर्ती यांच्या खात्यातून रु.1,10,000/- चा व्यवहार झालेला आहे, असे नमूद केले.
(10) हे सत्य आहे की, तक्रारकर्ती यांच्या बचत खात्यातून बाबू एस.के. ह्या व्यक्तीच्या नांवे रु.1,12,000/- रक्कम हस्तांतरीत झालेली आहे. त्यानंतर तक्रारकर्ती यांनी विरुध्द पक्ष बँकेकडे तात्काळ अर्ज करुन कथित आर्थिक व्यवहार केलेला नाही, असे कळविलेले आहे. कथित व्यवहाराच्या अनुषंगाने तक्रारकर्ती यांच्या बंधुने फिर्याद दाखल केलेली आहे. फिर्यादीमध्ये नमूद दिसते की, रोहन रमेश जाधव यांनी तक्रारकर्ती यांच्या खात्यावर इंटरनेट सुविधा कार्यान्वित केली आणि त्यानंतर तक्रारकर्ती यांच्या खात्यातून रु.1,12,000/- हस्तांतरीत होण्याचा कथित व्यवहार झाला.
(11) या ठिकाणी हे स्पष्ट आहे की, तक्रारकर्ती यांच्या खात्यातून झालेला कथित व्यवहार हा फसवणुकीसंबंधी आहे. त्याबाबत रितसर पोलीस फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे. इंटरनेट सुविधा कार्यान्वित करण्यासाठी तक्रारकर्ती यांनी त्रयस्थ व्यक्तीस खात्यासंबंधी तपशील कळविलेला आहे. त्यामुळे कथित व्यवहारासंबंधी विरुध्द पक्ष बँक जबाबदार ठरेल काय ? हा प्रश्न निर्माण होतो. त्यासंबंधी दखल घेतली असता तक्रारकर्ती यांनी अभिलेखावर भारतीय रिझर्व बँकेच्या परिपत्रक क्र. DBR No. Leg.BC.78/09.07.005/2017-18, दि. 6 जुलै, 2017 रोजीचे परिपत्रक दाखल केले आहे. तसेच त्यांनी मा. राष्ट्रीय आयोगाने रिव्हीजन पिटीशन नं. 3333/2013, ‘एच.डी.एफ.सी. बँक लिमिटेड /विरुध्द/ जेस्ना जोसे’ व मा. राष्ट्रीय आयोगाच्या 'पंजाब नॅशनल बँक /विरुध्द/ लिडर व्हॉल्वज् लि.", 2 (2020) सी.पी.जे. 92 (एन.सी.) या न्यायनिर्णयांचा संदर्भ सादर केला. या न्यायनिर्णयामध्ये मा. राष्ट्रीय आयोगाने तक्रारकर्ता / खातेधारक यांच्याशिवाय बँक यंत्रणा किंवा अन्य व्यक्तीद्वारे गैरप्रकार घडला असल्यास त्याकरिता बँकेस जबाबदार धरलेले आहे.
(12) हे सत्य आहे की, कथित व्यवहार हा त्रयस्थ व्यक्तीद्वारे झालेला आहे. निश्चितपणे, तक्रारकर्ती यांनी त्या व्यक्तीस बँक खात्यासंबंधी आवश्यक माहिती पुरवलेली आहे आणि त्याकरिता विरुध्द पक्ष बँकेची चूक किंवा निष्काळजीपणा म्हणता येणार नाही. तसेच उक्त न्यायनिर्णयातील न्यायिक प्रमाण प्रस्तुत तक्रारीतील वाद-तथ्यांशी सुसंगत ठरत नाही. वाद-तथ्ये व अनुषंगिक पुरावे पाहता विरुध्द पक्ष बँकेने तक्रारकर्ती यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी निर्माण केल्याचे सिध्द होत नाही. त्या अनुषंगाने तक्रारकर्ती अनुतोषास पात्र नाहीत. मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार नामंजूर करण्यात येते.
(2) खर्चासंबंधी आदेश नाहीत.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-