जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 60/2020. तक्रार दाखल दिनांक : 04/03/2020. तक्रार निर्णय दिनांक : 29/11/2022.
कालावधी : 02 वर्षे 08 महिने 25 दिवस
संजय पि. हणुमंत पतंगे, वय : 45 वर्षे, व्यवसाय : मजुरी,
रा. ह.मु. मजगे नगर, कव्हा रोड, अपोलो टायरजवळ, लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
शाखाधिकारी, बैंक ऑफ बडोदा, चंद्र नगर, लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- अशोक यू. कावळे
विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- निलेश एन. जाजू
आदेश
श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, त्यांचे विरुध्द पक्ष (यापुढे "बडोदा बँक") यांच्याकडे सन 2004 पासून बचत खाते असून खाते क्रमांक 09900100005108 आहे. तक्रारकर्ता हे निरक्षर आहेत. दि.16/3/2018 रोजी रक्कम काढण्याकरिता बडोदा बँकेमध्ये गेले असता खात्यामध्ये रक्कम नसल्याचे सांगण्यात आले. चौकशीअंती रु.2,000/- जमा असल्याचे व सन 2014 पासून अज्ञात इसम खात्यातून वेळोवेळी रक्कम काढत असल्याचे दिसून आले. त्यामुळे दि.16/3/2018 रोजी अनोळखी व्यक्तीस दिलेले ATM कार्ड बंद करण्यासाठी अर्ज दिला असता ते बंद केले नाही. त्यानंतर त्यांच्या खात्यातून रु.1,500/- काढण्यात आले. तक्रारकर्ता यांनी पोलीस ठाणे, गांधी चौक, लातूर येथे तक्रार केली. अनोळखी व्यक्तीने ATM द्वारे त्यांच्या खात्यातून रु.27,000/- काढलेले आहेत. तक्रारकर्ता यांनी ATM मिळण्याकरिता मागणी केलेली नव्हती किंवा प्रपत्र भरुन दिलेले नव्हते. विधिज्ञांमार्फत सूचनापत्र पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली असता बडोदा बँकेने दखल घेतलेली नाही. बडोदा बँकेने त्यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली आहे. उक्त वादकथनांच्या अनुषंगाने रु.44,000/- व्याजासह देण्याचा; मानसिक त्रासाकरिता रु.10,000/- देण्याचा व तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- देण्याचा बडोदा बँकेस आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.
(2) बडोदा बँकेने लेखी निवेदनपत्र दाखल केले आहे. त्यांनी ग्राहक तक्रारीमध्ये नमूद कथने अमान्य केले. त्यांचे कथन असे की, बचत खाते उघडण्यासंबंधी तक्रारकर्ता यांनी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर खाते क्रमांक 09900100005108 दिले आणि तक्रारकर्ता बचत खात्याचा वापर करीत आहेत. सवलती व योजनेकरिता खात्याचा वापर करीत असताना जमा व काढलेल्या रकमेसंबंधी बचत खात्याशी संलग्न भ्रमणध्वनीवर संदेश पाठविण्यात येतात. त्यांचे पुढे कथन असे की, ATM सवलत घेण्याकरिता तक्रारकर्ता यांच्या मागणीनुसार त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर ATM पाठविण्यात आले आणि ते स्वीकृत करुन वापरण्यास प्रारंभ केला. तक्रारकर्ता यांना दि.16/3/2018 रोजीच्या अर्जानुसार माहिती देण्यात आली. तसेच ATM बंद करण्यासंबंधी दिलेल्या अर्जानुसार नोंदणीकृत भ्रमणध्वनीवरुन संदेश प्रणालीद्वारे ATM बंद करण्यासाठी सांगितले. परंतु तक्रारकर्ता यांनी त्याप्रमाणे कार्यवाही केली नाही आणि त्यांच्या खात्यातून रु.1,500/- काढण्यात आले. त्यानंतर तक्रारकर्ता यांचे खाते लिन मार्क करुन त्यांच्या नोंदणीकृत भ्रमणध्वनीद्वारे संदेश पाठवून ATM कार्ड बंद केले. त्यांनी सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली नाही. अंतिमत: ग्राहक तक्रार नामंजूर करण्यात यावी, अशी विनंती केलेली आहे.
(3) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, बडोदा बँकेचे लेखी निवेदनपत्र, उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) बडोदा बँकेने तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
केल्याचे सिध्द होते काय ? नाही.
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? नाही.
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(4) मुद्दा क्र. 1 ते 3 :- मुद्दा क्र.1 ते 3 परस्परपुरक असल्यामुळे त्यांचे एकत्र विवेचन करण्यात येते. प्रामुख्याने, बडोदा बँकेमध्ये तक्रारकर्ता यांचे बचत खाते क्रमांक 09900100005108 असल्याबद्दल विवाद नाही. ग्राहक वादाच्या अनुषंगाने तक्रारकर्ता यांच्या बचत खात्याकरिता दिलेल्या ATM कार्डद्वारे केलेल्या व्यवहाराकरिता बडोदा बँक जबाबदार आहे काय ? हा प्रश्न उपस्थित होतो. तक्रारकर्ता यांचे कथन असे की, ते निरक्षर आहेत आणि त्यांनी बडोदा बँकेकडे ATM कार्ड मिळण्याकरिता मागणी केलेली नव्हती. असे असताना अनोळखी व्यक्ती त्यांच्या खात्यातून ATM कार्डद्वारे रक्कम काढत होता. उलटपक्षी, बडोदा बँकेचे कथन असे की, ATM सवलत घेण्याकरिता तक्रारकर्ता यांनी मागणी केल्यानुसार त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर ATM पाठविण्यात आले आणि ते स्वीकृत करुन वापरण्यास प्रारंभ केला.
(5) वाद-तथ्ये व कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारकर्ता यांच्या बचत खात्यातून अनेकवेळा ATM कार्डद्वारे रक्कम काढल्याचे दिसते. तक्रारकर्ता यांच्या दि.27/3/2018 रोजी पोलीस ठाणे, गांधी चौक, लातूर यांना दिलेल्या अर्जामध्ये त्यांच्या खात्यातून अपरोक्षपणे ATM कार्डद्वारे रक्कम काढण्यात येत असल्यामुळे त्यांची फसवणूक झाल्याचे नमूद आहे. असे दिसते की, सन 2014 पासून अनोळखी व्यक्ती त्यांच्या खात्याशी संलग्न ATM कार्डचा वापर करीत असून त्यांच्या खात्यातून रक्कम काढत आहे. सकृतदर्शनी, तक्रारकर्ता यांनी पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या अर्जानुसार फौजदारी गुन्ह्याचे स्वरुप निर्देशीत होते. बडोदा बँकेच्या प्रतिवादाची दखल घेतली असता ATM कार्ड निर्गमीत करताना संबंधीत ग्राहक खातेदाराच्या मागणीनंतर प्रपत्र भरुन घेतले जाते. आमच्या मते, खातेदार ग्राहकास ज्यावेळी अतिरिक्त सेवा ग्राहक खातेदारास आवश्यक असते, त्यावेळी बँकेकडे स्वतंत्र मागणी केली जाते. ATM कार्ड अतिरिक्त सेवा असल्यामुळे त्याकरिता स्वतंत्र मागणी केल्याशिवाय निर्गमीत केले जाऊ शकत नाही. ATM कार्ड ग्राहक खातेदाराच्या पत्त्यावर पाठविल्यानंतर ते अंमलात आणण्यासाठी किंवा अद्ययावत करण्यासाठी गोपनीय पध्दती ठरवून दिलेल्या जातात. अशा स्थितीत, बडोदा बँकेने तक्रारकर्ता यांच्या मागणी व संमतीशिवाय ATM कार्ड निर्गमीत केले, हे सहजपणे मान्य करता येत नाही. इतकेच नव्हेतर, आर्थिक व्यवहाराचे संदेश खात्याशी संलग्न भ्रमणध्वनीवर पाठविले जातात. आमच्या मते, तक्रारकर्ता यांच्या बचत खात्याशी संलग्न ATM कार्डाद्वारे झालेल्या व्यवहारासंबंधी बडोदा बँक दोषी असल्याचे किंवा त्यांनी सेवा देण्यामध्ये त्रुटी निर्माण केल्याचे सिध्द होत नाही. त्यामुळे तक्रारकर्ता हे अनुतोषास पात्र नसल्यामुळे मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर नकारार्थी देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार नामंजूर करण्यात येते.
(2) खर्चासंबंधी आदेश नाहीत.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-