Maharashtra

Latur

CC/5/2019

संतोष माणिकराव पवार - Complainant(s)

Versus

शाखा अधिकारी, बॅक ऑफ बडोदा - Opp.Party(s)

अ‍ॅड. शशीकांत टेळे

08 Mar 2023

ORDER

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
जिल्‍हा परिषदेचे गेट क्र.2 शेजारी, लातूर - 413512
 
Complaint Case No. CC/5/2019
( Date of Filing : 08 Jan 2019 )
 
1. संतोष माणिकराव पवार
f
...........Complainant(s)
Versus
1. शाखा अधिकारी, बॅक ऑफ बडोदा
f
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. REKHA R. JADHAV PRESIDENT
 HON'BLE MR. Ravindra S. Rathodkar MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 08 Mar 2023
Final Order / Judgement

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.

 

ग्राहक तक्रार क्रमांक : 5/2019.                                तक्रार दाखल दिनांक : 08/01/2019.                                                                           तक्रार निर्णय दिनांक : 08/03/2023.

                                                                                       कालावधी : 04 वर्षे 02 महिने 00 दिवस

 

संतोष माणिकराव पवार, वय 32 वर्षे,

व्यवसाय : शेती व व्यापार, रा. साई, ता. जि. लातूर.                                               तक्रारकर्ता

 

                        विरुध्द

 

(1) शाखा अधिकारी, बँक ऑफ बडोदा, शाखा : लातूर,

     गंजगोलाई, बस स्टॅन्डजवळ, लातूर.

(2) शाखाधिकारी, ॲक्सीस बँक, पुणे, सहकारी नगर, पुणे - 411 046.                 विरुध्द पक्ष

 

गणपूर्ती :          श्रीमती रेखा जाधव, अध्‍यक्ष (अतिरिक्त कार्यभार)

                        श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य

                                   

तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :-  शशिकांत टेळे

विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकरिता विधिज्ञ :-  निलेश एन्. जाजू

विरुध्द पक्ष क्र.2 यांचेकरिता विधिज्ञ :-  रविकिरण एस. गिरी

 

आदेश 

श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य यांचे द्वारा :-

 

(1)       तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, त्यांचे विरुध्द पक्ष क्र.1 (यापुढे 'बडोदा बँक') यांच्याकडे सन 2014 पासून बचत खाते क्र. 09900100014420 आहे. संदीप तुकाराम खांडेकर यांच्याकडून कायदेशीर येणे रकमेकरिता तक्रारकर्ता यांना विरुध्द पक्ष क्र.2 (यापुढे "ॲक्सीस बँक") यांचा धनादेश क्र. 149276, रक्कम रु.2,00,000/-, दि. 15/6/2018 दिलेला होता. तक्रारकर्ता यांनी तो धनादेश दि.11/9/2018 रोजी बडोदा बँकेच्या चेक बॉक्समध्ये जमा केला. बडोदा बँकेने दि.12/9/2018 रोजी तो धनादेश ॲक्सीस बँकेकडे पाठविला. धनादेशाची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होण्याकरिता विलंब होत असल्यामुळे चौकशी केली असता टाळाटाळ करण्यात आली. तक्रारकर्ता यांच्या पाठपुराव्याअंती बडोदा बँकेने दि.6/10/2018 रोजीच्या पत्राद्वारे ॲक्सीस बँकेने मुदतीमध्ये कार्यवाही न केल्यामुळे धनादेश वटला नसल्याचे कळविले. तसेच त्यांना रु.295/- दंड आकारण्यात आला. तक्रारकर्ता यांनी विधिज्ञांमार्फत सूचनापत्र पाठविले असता दखल घेण्यात आली नाही. बडोदा बँक व ॲक्सीस बँकेच्या सेवेतील त्रुटीमुळे व कृत्यामुळे त्यांना रु.2,00,000/- आर्थिक नुकसान सहन करावे लागले. उक्त कथनाच्या अनुषंगाने रु.2,00,000/- देण्याचा; मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.50,000/- भरपाई देण्याचा व कायदेशीर कार्यवाहीसाठी खर्च रु.50,000/- देण्याचा बडोदा बँक व ॲक्सीस बँकेस आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केली आहे.

 

(2)       बडोदा बँकेने लेखी निवेदन दाखल केले. त्यांनी ग्राहक तक्रारीतील कथने अमान्य करुन पुराव्याद्वारे सिध्द करणे आवश्यक असल्याचे नमूद केले. त्यांचे कथन असे की, तक्रारकर्ता यांनी दि.11/9/2018 रोजी वादकथित धनादेश वटविण्याकरिता सादर केला. त्यानंतर दि.12/9/2018 रोजी तो धनादेश त्यांनी ECS Clearing System प्रणालीद्वारे ॲक्सीस बँकेकडे सादर केला. रक्कम जमा होण्यासंबंधी ॲक्सीस बँकेने बडोदा बँकेकडे संपर्क साधला नाही. बडोदा बँकेने पत्र पाठवून व ई-मेल पाठवून कळविले असता ॲक्सीस बँकेने दखल घेतली नाही. त्यानंतर CTS depatment Data Centre, Mumbai यांनी धनादेश deleted झाल्यामुळे re-lodge करण्यासंबंधी बडोदा बँकेस कळविले. तक्रारकर्ता यांच्या सूचनेनुसार दि.1/10/2018 रोजी धनादेश वटविण्यासाठी सादर केला असता Cheque validity expired कारणास्तव परत करण्यात आला. दि.5/10/2018 रोजी तक्रारकर्ता यांना धनादेश परत केला. त्यांनी तक्रारकर्ता यांना सेवा देण्यामध्ये त्रुटी निर्माण केलेली नाही. अंतिमत: ग्राहक तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती केली आहे.

 

(3)       ॲक्सीस बँकेने लेखी निवेदनपत्र दाखल केले. ग्राहक तक्रारीमध्ये नमूद कथने असत्य व चूक असल्याचे नमूद करुन अमान्य केले. त्यांचे कथन असे की, तक्रारकर्ता यांचे त्यांच्याकडे खाते नाही आणि तक्रारकर्ता यांनी त्यांच्याकडून सेवा उपभोगलेली नाही. तक्रारकर्ता यांच्याकडून त्यांना प्रतिफल प्राप्त झालेले नाही आणि त्यांच्यामध्ये संविदाजन्य हितसंबंध नसल्यामुळे तक्रारकर्ता  हे त्यांचे 'ग्राहक' नाहीत. त्यांचे पुढे निवेदन असे की, दि.19/6/2018 व 30/6/2018 रोजी धनादेश जमा केला असता दोन्ही वेळेस Insufficent Funds कारणास्तव परत करण्यात आला आणि ही बाब तक्रारकर्ता यांनी विषद केलेली नाही. ॲक्सीस बँकेकडे धनादेश प्राप्त झाल्यानंतर कायदेशीर व योग्यप्रकारे हाताळला आहे. दि.11/9/2018 रोजी किंवा त्यानंतर धनादेश वैधता कालावधीमध्ये कथित धनादेश ॲक्सीस बँकेकडे सादर केलेला नाही किंवा त्यांना प्राप्त झालेला नाही. दि.1/10/2018 रोजी धनादेश सादर केला असता त्याची 3 महिन्याची वैधता संपुष्टात आलेली असल्यामुळे वैध व कायदेशीररित्या दि.1/10/2018 रोजी परत करण्यात आला. त्यामुळे त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही. ॲक्सीस बँकेस दि.11/9/2018 ते 1/10/2018 कालावधीमध्ये National Payment Corporation of India यांच्याकडून Unique Document Key प्राप्त झाली नाही. अंतिमत: ग्राहक तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती केलेली आहे.

 

(4)       तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, बडोदा बँक व ॲक्सीस बँकेचे लेखी निवेदनपत्र, उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्‍यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्‍यात येतात आणि त्‍या मुद्दयांची कारणमीमांसा त्‍यांच्‍यापुढे दिलेल्‍या उत्‍तराकरिता खालीलप्रमाणे देण्‍यात येते.

                       

मुद्दे                                                                                                 उत्तर

 

(1) तक्रारकर्ता ॲक्सीस बँकेचे 'ग्राहक' आहेत काय ?                                                  होय.

(2) विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्‍ये त्रुटी

      केल्‍याचे सिध्‍द होते काय ?                                                                                    होय.

(3) मुद्दा क्र.1 च्‍या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय  ?                         होय.

     असल्‍यास किती ?                                                                                   अंतिम आदेशाप्रमाणे

(4) काय आदेश  ?                                                                                      अंतिम आदेशाप्रमाणे

कारणमीमांसा

 

(5)       मुद्दा क्र. 1 :- सर्वप्रथम ॲक्सीस बँकेचा बचाव असा की, तक्रारकर्ता यांचे त्यांच्याकडे खाते नाही आणि तक्रारकर्ता यांनी त्यांच्याकडून सेवा उपभोगलेली नाही. तक्रारकर्ता यांच्याकडून त्यांना प्रतिफल प्राप्त झालेले नाही आणि त्यांच्यामध्ये संविदाजन्य हितसंबंध नसल्यामुळे तक्रारकर्ता  हे त्यांचे 'ग्राहक' नाहीत. उक्त प्रतिवादाची दखल घेतली असता तक्रारकर्ता यांना तुकाराम संदिपान खांडेकर यांनी ॲक्सीस बँकेचा धनादेश क्र.149276 दिला आणि त्यांचे ॲक्सीस बँकेमध्ये खाते आहे, ही मान्यस्थिती आहे. तो धनादेश दि.19/6/2018, 30/6/2018 व 1/10/2018 रोजी वटविण्याकरिता सादर करण्यात आला, हे ॲक्सीस बँकेस मान्य आहे. तुकाराम संदिपान खांडेकर यांनी धनादेश दिलेला असल्यामुळे वटविण्याकरिता ॲक्सीस बँकेकडे पाठविण्यात आल्याचे स्पष्‍ट होते.  हे सत्य आहे की, तक्रारकर्ता यांचे ॲक्सीस बँकेमध्ये खाते नाही. परंतु हेही तितकेच सत्य आहे की, ॲक्सीस बँकेद्वारे देण्यात येणारी सेवा किंवा सुविधा नि:शुल्क नाही. धनादेश वटविण्याकरिता ॲक्सीस बँकेने प्रत्यक्षरित्या शुल्क आकारणी केल्याचे दिसत नसले तरी बँकींग प्रणालीनुसार त्या सुविधा नि:शुल्क आहेत, असे ॲक्सीस बँकेचे प्रतिपादन नाही. त्यामुळे तक्रारकर्ता हे ॲक्सीस बँकेचे "ग्राहक" नाहीत, हा बचाव कायदेशीरदृष्टया संयुक्तिक नाही आणि तो अमान्य करण्यात येतो. त्यामुळे मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.

 

(6)       मुद्दा क्र. 2 ते 4 :- मुद्दा क्र. 2 ते 4 परस्परपुरक असल्यामुळे त्यांचे एकत्र विवेचन करण्यात येते. प्रामुख्याने, तक्रारकर्ता यांनी वादकथित धनादेश वटविण्याकरिता दि.11/9/2018 रोजी बडोदा बँकेकडे जमा केला, ही मान्यस्थिती आहे. बडोदा बँकेच्या कथनानुसार दि.12/9/2018 रोजी तो धनादेश त्यांनी ECS Clearing System प्रणालीद्वारे ॲक्सीस बँकेकडे सादर केला. त्यानंतर बडोदा बँकेने पत्र पाठवून व ई-मेल पाठवून कळविले असता ॲक्सीस बँकेने दखल घेतली नाही. तसेच CTS depatment Data Centre, Mumbai यांनी धनादेश deleted झाल्यामुळे re-lodge करण्यासंबंधी बडोदा बँकेस कळविले. तक्रारकर्ता यांच्या सूचनेनुसार दि.1/10/2018 रोजी धनादेश वटविण्यासाठी सादर केला असता Cheque validity expired कारणास्तव परत करण्यात आला आणि दि.5/10/2018 रोजी तक्रारकर्ता यांना धनादेश परत करण्यात आला. ॲक्सीस बँकेचे कथन  असे की, दि.19/6/2018 व 30/6/2018 रोजी धनादेश जमा केला असता दोन्ही वेळेस Insufficent Funds कारणास्तव परत करण्यात आला. त्यानंतर दि.11/9/2018 रोजी किंवा त्यानंतर धनादेशाच्या वैधता कालावधीमध्ये कथित धनादेश ॲक्सीस बँकेकडे सादर केलेला नाही किंवा त्यांना प्राप्त झालेला नाही. दि.1/10/2018 रोजी धनादेश सादर केला असता त्याची 3 महिन्याची वैधता संपुष्टात आलेली असल्यामुळे वैध व कायदेशीररित्या दि.1/10/2018 रोजी परत करण्यात आला.

 

(7)       निर्विवादपणे, तुकाराम संदीपान खांडेकर यांनी ॲक्सीस बँकेचा दि.15/6/2018 रोजी धनादेश क्र. 149276, रु.2,00,000/- रकमेचा तक्रारकर्ता यांना दिला, ही मान्यस्थिती आहे. निर्विवादपणे, धनादेशाची वैधता 3 महिन्याची असल्यामुळे दि.14/9/2018 पर्यंत धनादेश वैध होता.  तक्रारकर्ता यांनी दि.11/9/2018 रोजी बडोदा बँकेमध्ये धनादेश जमा केला, ही मान्यस्थिती आहे. धनादेश विहीत मुदतीमध्ये न वटल्यामुळे तक्रारकर्ता यांना धनादेशाची रक्कम प्राप्त झालेली नाही. धनादेश न वटण्यासंबंधी बडोदा बँक व ॲक्सीस बँकेने बचाव व प्रतिवाद सादर केले. तक्रारकर्ता यांचा धनादेश दि.12/9/2018 रोजी ECS Clearing System प्रणालीद्वारे ॲक्सीस बँकेकडे सादर केला, असे निवेदन बडोदा बँकेतर्फे करण्यात आले. तसेच दि.11/9/2018 रोजी किंवा त्यानंतर धनादेशाच्या वैधतेच्या कालावधीमध्ये धनादेश प्राप्त झाला नाही आणि तो दि.1/10/2018 रोजी परत करण्यात आला, असे निवेदन ॲक्सीस बँकेतर्फे करण्यात आले. प्रथमत: हे स्पष्ट करणे आवश्यक आहे की, बडोदा बँक व ॲक्सीस बँकेने स्वत:च्या बचाव व प्रतिवादापृष्ठयर्थ उचित कागदोपत्री पुरावे सादर केलेले नाहीत. ॲक्सीस बँकेने ज्या National Payment Corporation of India चा उल्लेख केला आहे आणि बडोदा बँकेने ज्या ECS Clearing System चा उल्लेख केला आहे, त्या यंत्रणा प्रस्तुत प्रकरणामध्ये पक्षकार नाहीत. त्यामुळे निर्दोषत्व सिध्द करण्यासाठी उचित पुरावे सादर करण्याची बडोदा बँक व ॲक्सीस बँकेस उचित संधी उपलब्ध होती. धनादेश वटविण्यासाठी कधी सादर केला किंवा ॲक्सीस बँकेस तो कधी प्राप्त झाला, यासंबंधी पुरावा नाही. अशा स्थितीत, धनादेश विहीत व वैध मुदतीमध्ये न वटण्याकरिता बडोदा बॅंक व ॲक्सीस बँक संयुक्त जबाबदार आहे, असे अनुमान निघते. आमच्या मते, बडोदा बँक व ॲक्सीस बँकेने तक्रारकर्ता यांचा धनादेश विहीत मुदतीमध्ये वटविण्याकरिता निष्काळजीपणा केलेला आहे आणि त्यांचे कृत्य निश्चितच सेवेतील त्रुटी ठरते.

 

(8)       तक्रारकर्ता यांच्या कथनानुसार त्यांना धनादेशाची रक्कम रु.2,00,000/- तोटा सहन करावा लागला. निश्चितच, तक्रारकर्ता यांना धनादेशाची रक्कम प्राप्त होऊ शकलेली नाही. तक्रारकर्ता यांच्या नुकसान भरपाईच्या दृष्टीने विचार केला असता धनादेश सादर केल्यानंतर म्हणजेच दि.11/9/2018 ते 14/9/2018 या कालावधीमध्ये तुकाराम संदिपान खांडेकर यांच्या खात्यामध्ये धनादेश वटण्याइतपत रक्कम होती, असा पुरावा नाही. शिवाय, तक्रारकर्ता यांना त्यांच्या येणे रकमेसंबंधी तुकाराम संदिपान खांडेकर यांच्याकडे पाठपुरावा करता येणे शक्य आहे. तुकाराम संदिपान खांडेकर यांनी तक्रारकर्ता यांना नवीन धनादेश किंवा त्याची रक्कम देण्यास नकार दिला, असा पुरावा नाही. आमच्या मते, तुकाराम संदिपान खांडेकर यांच्याकडून नवीन धनादेश मिळविणे किंवा त्या धनादेशाची रक्कम किंवा येणे रक्कम वसूल करण्यासाठी तक्रारकर्ता यांना योग्य कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत. त्यामुळे धनादेशाच्या रकमेसंबंधी तक्रारकर्ता यांची मागणी कायदेशीरदृष्टया समर्थनिय नाही.

 

(9)       विरुध्द पक्ष क्र.1 यांनी मा. राष्ट्रीय आयोगाच्या 'बी. सितराम रेड्डी /विरुध्द/ मॅनेजर देना बँक', न्यायनिर्णय दि. 13/3/2018 व "बँक ऑफ पतियाला /विरुध्द/ राजेंद्र लाल", IV (2003) CPJ 53 (NC) या न्यायनिर्णयांचा संदर्भ सादर केला. मा. राष्ट्रीय आयोगाच्या न्यायनिर्णयाचे अवलोकन केले असता त्यामध्ये धनादेशाची रक्कम न देता नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिसून येतात.

 

(10)     तक्रारकर्ता यांनी मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.50,000/- व आर्थिक खर्चाकरिता रु.50,000/- रकमेची मागणी केलेली आहे. नुकसान भरपाईची रक्‍कम निश्चित करताना प्रकरणानुरुप गृहीतक निश्चित केले जातात. तक्रारकर्ता यांना धनादेशाच्या मुदतीमुळे रक्कम प्राप्त न झाल्यामुळे निश्चितच पाठपुरावा करावा लागला आहे. तसेच त्यांना जिल्‍हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले. शिवाय, संबंधिताकडून धनादेशाची रक्कम वसूल करण्यासाठी अन्य प्रयत्न करावे लागणार आहेत. प्रस्तुत प्रकरणाच्या कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्‍ला व सहायता, विधिज्ञांचे शुल्क इ. खर्चाच्‍या बाबी आहेत. ग्राहक तक्रार न्‍यायप्रविष्‍ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्‍यय होतो आणि तक्रारकर्ता यांना मानसिक व शारीरिक त्रासासह आर्थिक खर्च होणे स्‍वाभाविक आहे.  योग्‍य विचाराअंती शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रु.10,000/- व अन्य आर्थिक नुकसान भरपाईसह तक्रार खर्चाकरिता रु.10,000/- मंजूर करणे न्याय्य ठरेल.

 

(11)     उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र. 2 व 3 चे उत्तर होकारार्थी देऊन मुद्दा क्र. 4 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.

 

 

आदेश

 

(1) ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्‍यात येते.     

(2) विरुध्‍द पक्ष क्र.1 बडोदा बँक व विरुध्द पक्ष क्र. 2 ॲक्सीस बँक यांनी तक्रारकर्ता यांना मानसिक व शारिरीक त्रासाकरिता रु.10,000/- व आर्थिक नुकसान भरपाईसह तक्रार खर्चाकरिता रु.10,000/- द्यावेत.

(3) विरुध्‍द पक्ष क्र.1 बडोदा बँक व विरुध्द पक्ष क्र. 2 ॲक्सीस बँक यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.

 

 

(श्री. रविंद्र शे. राठोडकर)                                                         (श्रीमती रेखा  जाधव)                

            सदस्‍य                                                                           अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)             

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)

-०-

 
 
[HON'BLE MRS. REKHA R. JADHAV]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. Ravindra S. Rathodkar]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.