जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
किरकोळ अर्ज क्रमांक : 7/2020. अर्ज नोंदणी दिनांक : 08/10/2020.
अर्ज निर्णय दिनांक : 22/05/2024.
कालावधी : 03 वर्षे 07 महिने 14 दिवस
मिना भ्र. माधव गुराळे, रा. अंकुलगा राणी,
तालुका : शि. अनंतपाळ, जिल्हा : लातूर. :- अर्जदार
विरुध्द
(1) शाखाधिकारी, भारतीय स्टेट बँक,
शाखा : शिरुर अनंतपाळ, ता. शिरुर अनंतपाळ, जि. लातूर.
(2) सहायक महाप्रबंधक, भारतीय स्टेट बँक, क्षेत्रीय व्यवसाय
कार्यालय, खर्डेकर स्टॉप, औसा रोड, जि. लातूर.
(3) शाखाधिकारी, नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड,
शाखा कार्यालय, हनुमान चौक, मालू बिल्डींग,
बस स्टॅन्डजवळ, मेन रोड, लातूर, ता. व जि. लातूर.
(4) शाखाधिकारी, नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड,
रिजनल कार्यालय, स्टर्लिंग सिनेमा बिल्डींग, पाचवा मजला,
मुर्झाबन स्ट्रीट, फोर्ट, मुंबई - 400 001. :- उत्तरवादी
गणपूर्ती : श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष
श्रीमती रेखा जाधव, सदस्य
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
अर्जदार यांचेकरिता विधिज्ञ :- ए.पी. मेखले / ए. के. जवळकर
उत्तरवादी क्र.1 व 2 यांचेकरिता विधिज्ञ :- बी. बी. कुलकर्णी
उत्तरवादी क्र.1 व 2 यांचेकरिता विधिज्ञ :- सुरज एस. पाटील
आदेश
श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(1) अर्जदार यांनी प्रस्तुत किरकोळ अर्जाद्वारे ग्राहक तक्रार दाखल करण्यास झालेला विलंब क्षमापीत करण्याची विनंती केलेली आहे.
(2) अर्जदार यांचे कथन असे की, त्यांचे पती मयत माधव गोविंद गुराळे (यापुढे "मयत माधव") यांचे विरुध्द पक्ष क्र.1 (यापुढे विरुध्द पक्ष क्र.1 व 2 "बँक") यांच्याकडे बचत खाते क्र. 11658404765 होते. दि.29/5/2016 रोजी मयत माधव यांनी प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजनेंतर्गत रु.12/- विमा हप्ता भरलेला आहे. तो हप्ता बँकेने विरुध्द पक्ष क्र.3 व 4 (यापुढे "विमा कंपनी") यांच्याकडे पाठविला. दि.17/1/2017 रोजी वाहन अपघातामध्ये मयत माधव यांचा मृत्यू झाला. त्यानंतर विमा रक्कम मिळण्याकरिता अर्जदार यांनी बँकेकडे विमा दावा व कागदपत्रे सादर केली. ते कागदपत्रे विमा कंपनीकडे पाठविण्यात आल्याचे बँकेतर्फे सांगण्यात आले. त्यानंतर अर्जदार यांचा विमा दावा प्रलंबीत ठेवण्यात आला आणि पाठपुरावा करुनही विमा रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यामुळे अर्जदार यांनी विधिज्ञांमार्फत बँक व विमा कंपनीस सूचनापत्र पाठविले असता त्यास उत्तर किंवा विमा रक्कम देण्यात आली नाही. त्यामुळे अर्जदार यांच्या ग्राहक तक्रारीस निर्माण झालेले वादकारण सातत्यपूर्ण असले तरी तांत्रिक कारणास्तव त्यांनी मयत माधव यांच्या मृत्यू तारखेपासून ग्राहक तक्रारीकरिता झालेला विलंब 1 वर्षे 8 महिने 17 दिवस क्षमापीत व्हावा, अशी विनंती केलेली आहे.
(3) प्रस्तुत अर्जाच्या अनुषंगाने बँकेने लेखी निवेदनपत्र दाखल केले आणि अर्जातील कथने अमान्य केले आहेत. अर्जदार यांनी दि.21/7/2020 रोजी सूचनापत्र पाठविल्याचे त्यांनी मान्य करुन अर्ज नामंजूर करण्यात यावा, अशी विनंती केलेली आहे.
(4) विमा कंपनीने लेखी निवेदनपत्र दाखल करुन ग्राहक तक्रारीस अवाजवी विलंब झाल्यामुळे अर्ज नामंजूर करण्याची विनंती केली. त्यांचे कथन असे की, अर्जदार यांनी विमापत्राचे पुरावे दाखल केले नाहीत. बँकेने त्यांच्याकडे मयत माधव यांचा विमा दावा दाखल केलेला नाही. बँकेने मयत माधव यांचा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेखाली विमा कंपनीकडून विमा काढल्यासंबंधी पुरावा नाही. अर्जदार यांचा विमा दावा त्यांच्याकडे प्रलंबीत नसल्यामुळे दावा रक्कम देण्याचे त्यांच्यावर बंधन नाही. अंतिमत: अर्ज नामंजूर करावा, अशी विनंती विमा कंपनीतर्फे करण्यात आली.
(5) उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकला. कागदपत्रांचे अवलोकन केले.
(6) मयत माधव यांचे बँकेचे पासबुक पाहता दि.19/5/2015 रोजी PMSBY UPTO 31-05-16 नमूद करुन रु.12/- नांवे टाकल्याचे दिसून येते. अर्जदार यांनी दि.31/3/2017 रोजी बँकेकडे नोंदणीकृत डाकेद्वारे विमा रक्कम मिळण्याकरिता अर्ज व कागदपत्रे पाठविल्याचे दिसून येते. बँकेने दि.1/6/2017 रोजी अपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करण्याबद्दल पत्र पाठविलेले दिसते. त्यानंतर मयत माधव यांच्या विम्याची रक्कम मिळण्याकरिता अर्जदार यांनी बँक व विमा कंपनीस सूचनापत्र पाठविलेले आहे.
(7) बँकेने अर्जदार यांचे सूचनापत्र प्राप्त झाल्याचे मान्य केले. अर्जदार व बँकेमध्ये झालेला पत्रव्यवहार पाहता अर्जदार यांनी मयत माधव यांच्या मृत्यूपश्चात विमा रक्कम मिळण्यासाठी पाठपुरावा केल्याचे सिध्द होते. उभयतांचा वाद-प्रतिवाद पाहता बँकेने विमा कंपनीकडे दावा दाखल केला किंवा नाही, याबद्दल उचित स्पष्टीकरण व पुरावा नाही. मात्र अर्जदार यांनी आवश्यक व अपेक्षीत कार्यवाही केलेली आहे. आमच्या मते, बँक किंवा विमा कंपनीच्या पुढील कार्यवाहीअभावी अर्जदार यांच्या कायदेशीर हक्कास बाधा पोहोचू शकत नाही.
(8) विमा कंपनीतर्फे मा. राष्ट्रीय आयोगाच्या "न्यू इंडिया अश्युरन्स कं.लि. /विरुध्द/ न्यू पद्मा इंटरप्रायजेस" I (2019) CPJ 464 (NC) न्यायनिर्णयाचा संदर्भ सादर करण्यात आला. ज्यामध्ये बँकेने विमा दावा पाठविला नसल्यामुळे उद्भवलेल्या प्रकरणाबद्दल विवेचन आढळते.
(9) अर्जदार यांच्यातर्फे मा. राष्ट्रीय आयोगाच्या "बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज लि. /विरुध्द/ न्यू इंडिया अश्युरन्स कं. लि." 2016 (2) CPR 388 (NC) न्यायनिर्णयाचा संदर्भ सादर करण्यात आला. ज्यामध्ये विमा कंपनीने अंतिम निर्णय घेतल्यानंतर वादकारण सुरु होते, असे निरीक्षण आढळते.
(10) उक्त विवेचनाअंती अर्जदार यांचा विमा दावा कागदपत्रे बँकेकडे पाठविण्यात आल्याचे सिध्द होते. त्यानंतर बँक किंवा विमा कंपनीच्या स्तरावर विमा दाव्यासंबंधी कार्यवाही किंवा निर्णय झाल्याचे आढळत नाही. अशा स्थितीत, विमा रक्कम मिळण्याकरिता अर्जदार यांच्या ग्राहक तक्रारीस निर्माण होणारे वादकारण सातत्यपूर्ण व निरंतर ठरते. अर्जदार यांनी केवळ तांत्रिक स्वरुपात त्रुटी राहू नये, याकरिता अर्ज सादर केलेला दिसतो. अंतिमत: खालीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आदेश
(1) किरकोळ अर्ज मंजूर करण्यात येतो.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव) (श्री. अमोल बा. गिराम)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-