जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 186/2022. तक्रार दाखल दिनांक : 10/06/2022. तक्रार निर्णय दिनांक : 17/04/2023.
कालावधी : 00 वर्षे 10 महिने 07 दिवस
(1) श्रीमती जयश्री भ्र. जयराम क्षीरसागर, वय 57 वर्षे,
व्यवसाय : घरकाम, रा. सद्भावना नगर, लातूर.
(2) अंजली पि. जयराम क्षीरसागर, वय 27 वर्षे,
व्यवसाय : घरकाम, रा. सद्भावना नगर, लातूर.
(3) कृष्णानंद पि. जयराम क्षीरसागर, वय 25 वर्षे,
व्यवसाय : काही नाही, रा. सद्भावना नगर, लातूर.
(4) अनुजा पि. जयराम क्षीरसागर, वय 23 वर्षे,
व्यवसाय : शिक्षण, रा. सद्भावना नगर, लातूर.
(5) कर्णमनोज पि. जयराम क्षीरसागर, वय 15 वर्षे, व्यवसाय : शिक्षण,
रा. सद्भावना नगर, लातूर, अ.पा.क. तक्रारकर्ती क्र.1. तक्रारकर्ते
विरुध्द
(1) शाखाधिकारी, एच.डी.एफ.सी. लाईफ इन्शुरन्स कंपनी लि.,
नरिमन हाईटस्, तिसरा मजला, सर्वे नं. 404, 'ए' ॲन्ड 'बी',
नंदी स्टॉप, औसा रोड, लातूर.
(2) शाखाधिकारी, एच.डी.बी. फायनान्शीयल सर्व्हीसेस लि.
दुसरा मजला, यश प्लाझा, शिवनेरी गेटजवळ, कवा रोड, लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- एस.व्ही. तापडिया
विरुध्द पक्ष क्र.1 व 2 :- अनुपस्थित / एकतर्फा
आदेश
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ते यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, तक्रारकर्ती क्र.1 ह्या मयत जयराम मनोहरराव क्षीरसागर (यापुढे 'मयत जयराम') यांच्या पत्नी आहेत आणि तक्रारकर्ती क्र. 2 व 4 ह्या त्यांच्या मुली व तक्रारकर्ते क्र. 3 व 5 मुले आहेत. मयत जयराम यांनी विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडून कर्ज घेतलेले होते. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी विमापत्र क्रमांक : PP000239 अन्वये दि.30/6/2019 ते 29/6/2024 कालावधीकरिता रु.15,97,474/- विमा हमी रकमेकरिता विमाकृत केले. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी मयत जयराम यांच्या कर्ज रकमेतून रु.97,475/- विमा हप्ता वजावट केला आणि मयत जयराम व त्यांच्या कर्ज खात्यास विमा संरक्षण घेतले. मयत जयराम यांच्या सुरक्षा हमीकरिता विरुध्द पक्ष क्र.2 यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडून रु.9,33,842/- व मयत जयराम यांच्या सुरक्षा हमीकरिता रु.33,842/- कर्ज खात्यातून वजावट करुन विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडून विमापत्र घेतले होते.
(2) तक्रारकर्ते यांचे पुढे कथन असे की, दि.25/9/2020 रोजी मयत जयराम यांना थोडा ताप आला आणि कोवीडची साथ सुरु असल्यामुळे मयत जयराम यांना विवेकानंद रुग्णालय, लातूर येथे दाखल करण्यात आले. तपासणीअंती मयत जयराम यांना SARI साथरोगाची लागण असल्याचे निदान झाले आणि वैद्यकीय उपचारादरम्यान दि.5/10/2020 रोजी मयत जयराम यांचा मृत्यू झाला. मयत जयराम यांच्या मृत्यू प्रमाणपत्रातील वैद्यकीय अहवालानुसार त्यांचा मृत्यू ह्दयविकाराच्या झटक्यामुळे झाल्याचे नमूद आहे.
(3) तक्रारकर्ते यांचे पुढे कथन असे की, मयत जयराम यांच्या मृत्यूनंतर तक्रारकर्ती क्र.1 यांनी विरुध्द पक्ष क्र.2 यांच्यामार्फत विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे विमा रकमेची मागणी केली असता विरुध्द पक्ष क्र.1 यांनी दि.29/3/2021 रोजीच्या पत्राद्वारे आरोग्याविषयी खोटी माहिती दिल्याचे व मधुमेह असल्यासंबंधी माहिती न दिल्याचे कारण देऊन विमा दावा नामंजूर केला. तक्रारकर्ती क्र.1 यांनी विमा लोकपाल यांच्याकडे अर्ज केला असता योग्य न्याय मिळाला नाही. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी खोटे व चुकीचे कारण देऊन विमा दाव नामंजूर करुन सेवेमध्ये त्रुटी निर्माण केल्याचे नमूद करुन रु.15,97,474/- व्याजासह देण्याचा; मानसिक त्रासाकरिता रु.1,00,000/- देण्याचा व रु.50,000/- तक्रार खर्च देण्याचा विरुध्द पक्ष क्र.1 यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ते यांनी केलेली आहे.
(4) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना जिल्हा आयोगाचे सूचनापत्र प्राप्त झाले. मात्र विरुध्द पक्ष क्र.1 व 2 हे जिल्हा आयोगापुढे उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात येऊन सुनावणी पूर्ण करण्यात आली.
(5) तक्रारकर्ते यांची ग्राहक तक्रार, त्यांनी अभिलेखावर दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन केले. तसेच विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकण्यात आला.
(6) तक्रारकर्ते यांनी अभिलेखावर मयत जयराम यांचे विमापत्र, मृत्यू प्रमाणपत्र, विरुध्द पक्ष क्र.2 यांनी निर्गमीत केलेले कर्ज वितरण पत्र, विमा दावा प्रपत्र, विमा दावा नामंजूर करणारे पत्र, बीमा लोकपाल यांचा निवाडा, पत्रव्यवहार इ. कागदपत्रे दाखल केलेले आहेत. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 हे जिल्हा आयोगापुढे अनुपस्थित असून त्यांनी तक्रारकर्ते यांची ग्राहक तक्रार व दाखल पुराव्यांचे खंडन केले नाही. अशा स्थितीत, तक्रारकर्ते यांची ग्राहक तक्रार, शपथपत्र व दाखल कागदपत्रांना विरोधी पुरावा नाही.
(7) कागदपत्रे व वाद-तथ्यांच्या अनुषंगाने दखल घेतली असता मयत जयराम यांनी विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडून कर्ज घेतल्याचे स्पष्ट होते. पुढे असे दिसते की, विरुध्द पक्ष क्र.1 यांनी HDFC LIFE Group Credit Protect Plus Insurance Plan अंतर्गत मयत जयराम यांचा विमा प्रमाणपत्र क्रमांक PP00023901Q7F00 निर्गमीत केले होते. विमा प्रमाणपत्रानुसार पायाभूत विमा जोखीम रु.15,97,474/- आहे आणि रु.82,605.38 विमा हप्ता व रु.14,686.96 कर आकारल्याचे दिसून येते. विमा जोखीम कालावधी दि.30/6/2019 ते 29/6/2024 दिसून येतो. विमा प्रमाणपत्रानुसार तक्रारकर्ती क्र.1 यांना नामनिर्देशीत केलेले आहे. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी दि.29/3/2021 रोजीच्या पत्राद्वारे विमा दावा नामंजूर केल्याचे निदर्शनास येते.
(8) विवेकानंद हॉस्पिटल, लातूर यांनी मयत जयराम यांच्या मृत्यूचे प्रमाणपत्र दिलेले आहे. त्यामध्ये UID No. 0406132 अंतर्गत मयत जयराम हे दि.25/9/2020 रोजी दाखल झाल्याचे व दि.5/10/2020 रोजी मृत्यू पावल्याचा उल्लेख आढळतो. तसेच मृत्यूचे कारण Immediate Cause : Acute Cardio Respioratory Arrest; Antecedent Cause : Severe Acute Respiratory Infection (SARI) याप्रमाणे नमूद आहे. त्यानुसार मयत जयराम यांच्या मृत्यूचे कारण Severe Acute Respiratory Infection दर्शविते आणि अंतिमत: Acute Cardio Respioratory Arrest मुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट होते. विरुध्द पक्ष क्र.1 यांचे दि.29/3/2021 रोजीचे पत्र पाहता विमाधारकास अनेक दिवसापासून Diabetics Mellitus आजार असल्यामुळे विमा दावा स्वीकारण्यास असमर्थता दर्शविलेली आहे. तसेच वैद्यकीय प्रश्नावलीच्या भाग - 'बी' च्या अनुक्रमांक 1 व 6 चे उत्तरे मयत जयराम यांनी नकारार्थी दिल्याचे नमूद केले.
(9) निर्विवादपणे विमा हा संविदेशी निगडीत विषय आहे आणि विमाधारक व विमा कंपनी यांच्या एकमेकांवरील अत्युच्च परम विश्वासावर विमा संविदा अस्तित्वात येते. विमाधारकाने विमा प्रस्ताव किंवा घोषणापत्रामध्ये आवश्यक व सत्य माहिती नमूद करणे आवश्यक आहे. विमा कंपनीने विमा प्रस्तावास अधीन राहून विमापत्र निर्गमीत करावे आणि विमा संविदा अस्तित्वात यावी, हे विम्याचे सर्वमान्य तत्व आहे.
(10) विमापत्राद्वारे संविदाजन्य तत्व अंगीकारल्यानंतर उद्भवणा-या विमा दाव्यासंबंधी ज्यावेळी विमा कंपनी विमाधारकाचा विमा दावा रक्कम देण्याकरिता असमर्थता दर्शविते; त्यावेळी त्या असमर्थतेकरिता दिलेले कारण सिध्द करण्याची जबाबदारी विमा कंपनीवर येते. प्रस्तुत प्रकरणाच्या अनुषंगाने दखल घेतली असता मयत जयराम यांना अनेक दिवसांपासून Diabetics Mellitus आजार होता आणि त्याबद्दलची माहिती विमापत्राकरिता अर्ज करताना दिली नाही, असे कारण विमा कंपनीने दिलेले आहे. मुख्यत: विरुध्द पक्ष क्र.1 यांच्या पत्रामध्ये त्यांच्या अन्वेषणानुसार मयत जयराम यांना अनेक दिवसांपासून Diabetics Mellitus आजार असल्याचे निष्पन्न झाल्याचे नमूद केले आहे. परंतु विमापत्र घेण्यापूर्वी मयत जयराम यांना Diabetics Mellitus आजार असल्यासंबंधी; मयत जयराम यांच्या दाव्यासंबंधी अन्वेषण केल्यासंबंधी किंवा अन्य उचित कागदोपत्री पुरावा नाही. इतकेच नव्हेतर, मयत जयराम यांच्या मृत्यूबद्दल वैद्यकीय अधिका-यांनी नमूद केलेले मृत्यूचे कारण व दि.29/3/2021 रोजीच्या पत्रामध्ये नमूद कारण पाहता त्यांचा एकमेकांशी संबंध नाही. आमच्या मते, Diabetics Mellitus आजारामुळे मयत जयराम यांचा मृत्यू झालेला नाही. अशा स्थितीत, विमापत्र घेण्यापूर्वी मयत जयराम यांना Diabetics Mellitus आजार असल्याचे व त्याबद्दल माहिती लपवून ठेवल्याचे सिध्द होत नाही. त्या अनुषंगाने विमा दावा नामंजूर करण्याचे विरुध्द पक्ष क्र.1 यांचे कृत्य सेवेतील त्रुटी ठरते, या निष्कर्षाप्रत जिल्हा आयोग येतो.
(11) तक्रारकर्ते यांनी रु.15,97,474/- रकमेची मागणी दि.5/10/2021 पासून 18 टक्के व्याज दराने मिळावी, अशी विनंती केलेली आहे. प्रकरणाची वस्तुस्थिती विचारात घेतली असता विमा दावा नामंजूर केल्याच्या तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज देण्याकरिता विरुध्द पक्ष क्र.1 यांना आदेश करणे न्यायोचित होईल.
(12) तक्रारकर्ते यांनी मानसिक त्रासाकरिता रु.1,00,000/- व ग्राहक तक्रार खर्चाकरिता रु.50,000/- रकमेची मागणी केलेली आहे. नुकसान भरपाईच्या रकमेची निश्चिती त्या–त्या परिस्थितीजन्य गृहीतकावर अवलंबून असते. असे दिसते की, तक्रारकर्ते यांचा विमा दावा नामंजूर केल्यामुळे बिमा लोकपाल यांच्याकडे पाठपुरावा करावा लागलेला आहे. तसेच तक्रारकर्ते यांना जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला व सहायता, विधिज्ञांचे शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. शिवाय, ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो आणि तक्रारकर्ते यांना मानसिक त्रास होणे नैसर्गिक व स्वाभाविक आहे. योग्य विचाराअंती मानसिक त्रासाकरिता रु.10,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- मिळण्यास तक्रारकर्ते पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत जिल्हा आयोग येत आहे.
(13) उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्ते यांना रु.15,97,474/- विमा रक्कम द्यावी.
तसेच, विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्ते यांना उक्त रकमेवर दि.29/3/2021 पासून रक्कम अदा करेपर्यत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज द्यावे.
(3) विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्ते यांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.10,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- द्यावेत.
(4) विरुध्द पक्ष क्र.1 यांनी प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-