तक्रारदारांतर्फे आई हजर.
जाबदेणार एकतर्फा
द्वारा- श्रीमती, अंजली देशमुख, मा. अध्यक्ष यांचेनुसार,
**निकालपत्र **
दिनांक 30/07/2012
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदारांनी जाबदेणार क्र.2 यांच्याकडून दिनांक 17/10/2010 रोजी व्हिडीओकॉन डबल डोअर फ्रिज 230 लिटर रुपये 11,115/- देऊन खरेदी केला. खरेदी केल्यापासून फ्रिज मध्ये काही ना काही दोष निर्माण झाले; तक्रारदारांनी जाबदेणार क्र.1 व 2 यांच्याकडे ब-याच वेळा तक्रारी नोंदविल्या. जाबदेणार यांनी तक्रारदारांचे वरवर समाधान केले. वर्ष संपल्यानंतर आता दुरुस्तीसाठी येणारा खर्च तक्रारदारांना दयावा लागेल असे जाबदेणार यांनी सांगितले. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार फ्रिजमध्ये जास्त थंड होणे, बर्फ जास्त साठणे, आवाज येणे, फ्रिजमधील वस्तू खराब होणे इ. समस्या आहेत. दोन्ही जाबदेणार फ्रिज व्यवस्थित दुरुस्त करुन देत नाहीत. तक्रारींकडे दुर्लक्ष करतात. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून फ्रिज बदलून मिळावा व बदलून न मिळाल्यास मुळ रक्कम रुपये 11,115/- 18 टक्के व्याजासह मागतात. तसेच नुकसान भरपाई पोटी रुपये 5,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 3,000/- मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार क्र.1 व 2 यांना मंचाची नोटीस लागूनही गैरहजर. म्हणून जाबदेणार क्र.1 व 2 यांच्याविरुध्द मंचाने एकतर्फा आदेश पारीत केला.
3. तक्रारदारांनी तक्रारीसोबत फ्रिज खरेदी केल्याची दिनांक 17/10/2010 रोजीची पावती दाखल केली आहे. तसेच तक्रारदारांनी दाखल केलेल्या दिनांक 28/11/2011 रोजी जाबदेणार क्र.1 यांना लिहीलेल्या पत्राचे अवलोकन केले असता फ्रिज वारंवार खराब होत असल्याबद्यल व इतर दोष निर्माण होत असल्याबद्यल कळविल्याचे पत्रावरुन स्पष्ट होते. तसेच कस्टमर केअरकडे तक्रारदारांनी दिनांक 8/1/2011, 22/9/2011 व 23/11/2011 रोजी तक्रारी केल्याचेही सदर पत्रात नमूद केले आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार वॉरंटी कालावधीतच फ्रिज खरेदी केल्यापासून लगेचच त्यात दोष निर्माण झाले, जाबदेणार यांना पत्र पाठवून, कस्टमर केअरकडे तक्रारी करुनही उपयोग झाला नाही, जाबदेणार यांनी तक्रारीचे पुर्णपणे निराकरण केले नाही. फक्त वरवर दुरुस्ती करुन, फ्रिज वर्षभर नादुरुस्त राहिला, त्यानंतर वॉरंटी संपल्याचे सांगून जाबदेणार तक्रारदारांकडून दुरुस्ती खर्च मागतात असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. तक्रारदारांनी वॉरंटी कार्ड दाखल केलेले नाही. परंतु सर्वसाधारणपणे सर्व रेफ्रिजरेटरच्या कॉम्प्रेसरला पाच वर्षाची वॉरंटी असते. तक्रारदारांच्या फ्रिजमधील जास्त थंड होणे, बर्फ जास्त साठणे, आवाज येणे, फ्रिजमधील वस्तू खराब होणे इ. समस्यांचे जाबदेणार यांनी निराकरण केले नाही. तक्रारदारांनी फ्रिज दिनांक 17/10/2010 रोजी खरेदी केल्यापासून त्यात लगेचच दिनांक 8/1/2011 पासून समस्या सतत निर्माण झाल्या. त्यामुळे जाबदेणार समस्या दूर करण्यास जबाबदार ठरतात. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून फ्रिज बदलून मिळावा व बदलून न मिळाल्यास मुळ रक्कम परत मागतात. परंतु संपूर्ण फ्रिज खराब असल्याबद्यलचा स्वतंत्र पुरावा तक्रारदारांनी मंचासमोर दाखल केलेला नाही. त्यामुळे तक्रारदारांची ही मागणी मंच नामंजुर करीत आहे.
वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
[1] तक्रार अंशत: मान्य करण्यात येत आहे.
[2] जाबदेणार क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या आणि संयुक्तिकरित्या
तक्रारदारांचा फ्रिज आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत दोषरहित करुन दयावा, नवीन पार्टस वॉरंटीसहीत बसवावेत.
[3] जाबदेणार क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या आणि संयुक्तिकरित्या तक्रारदारांना तक्रारीचा खर्च रुपये 1000/- अदा करावा.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.