(पारीत व्दारा श्री भास्कर बी. योगी, मा.अध्यक्ष)
01. तक्रारदारांनी प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्या कलम 35 खाली विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा पवनी आणि विरुध्दपक्ष क्रं 2 ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी यांचे विरुध्द विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेचे मृतक खातेधारक श्री वामन डोमळू वैद्द यांचे अपघाती निधनामुळे कायदेशीर वारसदार म्हणून विम्याची रक्कम मिळावी तसेच इतर अनुषंगीक मागण्यांसाठी जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केलेली आहे. तक्रारदारांनी विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे कार्यालय पुणे येथील असल्यामुळे व ते जिल्हया बाहेरील असल्यामुळे ग्राहक सरक्षण कायद्दाचे कलम 34 (ब) अंतर्गत परवानगी अर्ज सुध्दा दाखल केलेला आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारदार क्रं 1 ते 3 यांचे तक्रारी प्रमाणे ते उपरोक्त नमुद पत्त्यावर राहत असून ते सर्व मृतक श्री वामन डोमळू वैद्द यांचे कायदेशीर वारसदार आहेत. मृतक हे तक्रारकर्ती क्रं 1 यांचे पती आहे तर तक्रारदार क्रं 2 ते 3 हे मृतकाचे मुले आहेत. मृतक श्री वामन वैद्द हे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा विरली बुज, पंचायत समिती लाखांदूर, तहसिल लाखांदूर जिल्हा भंडारा येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते आणि त्यांचा दिनांक-07.10.2020 रोजी सोमनाळा खुर्द, तहसिल पवनी, जिल्हा भंडारा येथे ते पिंपळगाव ते कातुर्ली रस्त्यावर टीव्हीएस स्टॉर सिटी मोटर सायकल क्रं-एमएच-36/एम-9478 ने जात असताना त्यांच्या आंगावर विज पडून अपघाती मृत्यू झाला आहे.त्यांचे अपघाती मृत्यूची सुचना त्याच दिवशी पोलीस स्टेशन, अडयाळ येथे दिली असता त्यांनी गुन्हा नोंद करुनघटनास्थळाचापंचनामा केला तसेच मरणान्वेषन प्रतीवृत्ततयार केले तसेच शासकीय रुग्णालय अडयाळ येथे शव विच्छेदन करण्यात आले असून सदर शव विच्छेदन अहवाला मध्ये विज आंगावर पडून मृत्यू झाल्याचे नमुद आहे. मृतक श्री वामन वैद्द यांचे पगाराचे खाते विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा पवनी येथे होते आणि त्यांचे खात्याचा क्रमांक-60356584459 असा आहे. विरुध्दपक्ष क्रं 1 महाराष्ट्र बॅंके मधील पगारी खातेधारकांना विरुध्दपक्ष क्रं 2 ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी कडून ग्रुप पर्सनल अॅक्सीडेंट विमा योजने अंतर्गत विमा संरक्षण दिल्यामुळे मृतक हे विरुध्दपक्षांचे ग्राहक होते. विरुध्दपक्ष क्रं 1 महाराष्ट्र बॅंकेने घोषीत केलेल्या योजनेनुसार कर्मचा-यांचे पगार खाते बॅंकेत काढल्यास त्या खात्यावर विमा सरंक्षण देण्याचे मान्य करण्यात आले होते आणि बॅंकेच्या ग्राहकाचा अपघाती मृत्यू झाल्यास रुपये-40,00,000/- विमा लाभ मृतकाचे वारसदारांना देण्याचे घोषीत करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र शासनाने सुध्दा कर्मचा-यांना पगार खात्यावर विमा संरक्षण देण्यासंबधी परिपत्रक क्रं-संकीर्ण-2019/प्र.क्रं 141/2019/कोषा-प्रशा-5, दिनांक-08 ऑक्टोंबर,2020 रोजी निर्गमीत केलेले आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्रने त्यांचे दिनांक-21.09.2020 रोजीचे पत्राव्दारे शिक्षण विभागास कर्मचा-यांचे बॅंक खाते त्यांचे बॅंके मध्ये वर्ग करण्या बाबत व विमा संरक्षण असल्या बाबत कळविलेले आहे. मृतक श्री वामन वैद्द यांनी त्यांचे वेतनाचे खाते विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा पवनी येथे दिनांक-30 मे, 2020 रोजी उघडले होते. मृतक श्री वामन वैद्द यांचा दरमहाचा पगार हा विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंके मध्ये मृत्यू दिनांका पर्यंत नियमित होता.
तक्रारदारांनी पुढे असे नमुद केले की, विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा पवनी,जिल्हा भंडारा यांनी त्यांचे बॅंकेतील पगारी खातेदारांची ग्रुप इन्शुरन्स विमा पॉलिसी विरुध्दपक्ष क्रं 2 ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी मध्ये काढली होती त्या विमा पॉलिसीचा क्रं-163600/48/2021/1095 असून विमा पॉलिसीचा वैध कालावधी हा दिनंक-24.04.2000 पासून ते दिनांक-23.04.2021 असा आहे आणि मृतक बॅंक खातेधारक श्री वामन वैद्द यांचा
मृत्यू दिनांक-07.10.2020 रोजी विम्याचे वैध कालावधीत झालेला आहे. मृतकाचे मृत्यू नंतर त्यांची पत्नी तक्रारकर्ती क्रं 1 हिने विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंक ऑफ महाराष्ट्र पवनी येथे दिनांक-26.10.2020 रोजी संपूर्ण दस्तऐवजांसह विमा दावा दाखल केला होता तसेच दिनांक-28.12.2020, दिनांक-29.12.2020, दिनांक-24.06.2021 रोजी विम्या बाबत विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंके मध्ये लेखी पत्रव्यवहार केला होता. परंतु विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा पवनी, जिल्हा भंडारा यांनी दिनांक-17.07.2021 रोजीचे पत्रान्वये तक्रारकर्ती क्रं 1 चा विमा दावा नामंजूर केला. सदर विमा दावा नामंजूरीचे पत्रात मृतक श्री वामन वैद्द यांनी केवायसी सोबत त्यांच्या नौकरीच्या कार्यालया कडून एम्प्लॉयर सर्टिफीकेट जोडले नसल्याने विमा दावा देय नसल्याचे नमुद केले परंतु खातेधारक श्री वामन वैद्द यांचे कडे विरुध्दपक्ष क्रं 1 महाराष्ट्र बॅंकेनी एम्प्लायर सर्टीफीकेटची मागणी लिखित स्वरुपात केली होती असे कोणतेही पत्र विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेनी दिले नव्हते त्यामुळे विमा दावा नामंजूरीचे पत्रात दर्शविलेले कारण संयुक्तिक व कायदेशीर नाही. अशाप्रकारे तक्रारकर्ती क्रं 1 हिचा विमा दावा नामंजूर करुन विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांनी दोषपूर्ण सेवा दिल्यामुळे तक्रारदारांना आर्थिक, शारिरीक, मानसि कत्रास सहन करावा लागत आहे
तक्रारदारांनी पुढे असेही नमुद केले की, विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंक ऑफ महाराष्ट्र यांनी निर्गमित केलेल्या जाहिराती मध्ये कोठेही एम्प्लायर सर्टिफीकेट अनिवार्य असल्याचे नमुद केलेले नाही तसेच महाराष्ट्र शासनाने उपरोक्त नमुद केलेल्या परिपत्रका मध्ये सुध्दा एम्प्लॉयर सर्टीफीकेट अनिवार्य असल्याचे नमुद केलेले नाही. ही अट स्टेट गव्हर्नमेंट सॅलरी पॅकेज (State Government Salary Package SGSP) अंतर्गत खाते काढताना अनिर्वाय नव्हती. मृतक श्री वामन वैद्द यांचे मृत्यू समयी वय 53 वर्ष होते आणि निवृत्ती पर्यंत म्हणजे 58 वर्षा पर्यंत त्यांना प्रतीमाह रुपये-80,090/- प्रमाणे रुपये-48,05400/- पगाराव्दारे मिळाले असते त्यामुळे कुटूंबाचे आर्थिक नुकसान झालेले आहे. म्हणून शेवटी तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार दोन्ही विरुध्दपक्षां विरुध्द जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केली असून त्याव्दारे विरुध्दपक्षां विरुध्द खालील मागण्या केल्यात-
1. विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंक ऑफ महाराष्ट्र व विरुध्दपक्ष क्रं 2 ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या मृतक श्री वामन वैद्द यांचे अपघाती मृत्यू बाबत विमा रक्कम रुपये-40,00,000/- आणि सदर रकमेवर मृत्यू दिनांक-07.10.2020 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो वार्षिक 15 टक्के व्याज यासह रक्कम तक्रारदार आणि मृतकाचे कायदेशीर वारसदार यांना देण्याचे जिल्हा ग्राहक आयोगाने आदेशित करावे.
2. तक्रारदारांना झालेल्या आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-1,00,000/- तसेच तक्रारीचा खर्च रुपये-25,000/- विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांचे कडून देण्याचे आदेशित व्हावे. या शिवाय योग्य ती दाद त्यांचे बाजूने मंजूर करण्यात यावी.
03. विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा पवनी, जिल्हा भंडारा यांनी आपले लेखी उत्तर जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केले, त्यांनी आपले लेखी उत्तरा मध्ये नमुद केले की, मृतक वामन वैद्द यांनी त्यांचे खाते बॅंकेतील शाखे मध्ये दिनांक-30.05.2020 रोजी उघडले होते आणि त्याचा खाते कं-6035658459 असा असून सदर खाते दिनांक-05.06.2020 रोजी पगार खात्या मध्ये परावर्तीत केले होते परंतु पगार खाते वेळी मृतक वामन वैद्द यांनी कर्मचारी असल्याचे प्रमाणपत्र दिले नव्हते आणि म्हणून सदर खात्याला विमा संरक्षण मिळालेले नाही. विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंके तर्फे मृतक श्री वामन वैद्द यांना वारंवार दुरध्वनी वरुन कर्मचारी असल्याचे प्रमाणपत्र सादर करण्यास कळविले होते परंतु त्यांनी सदर मागणी कडे दुर्लक्ष्य केले. मृतकाने पगार खाते उघडल्या नंतर चारच महिन्यानी दिनांक-07.10.2020 रोजी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यू नंतर सुध्दा त्यांची पत्नी तक्रारकर्ती क्रं 1 हिने मृतकाचे एम्प्लायर प्रमाणपत्र पुरविले नाही. मृतकाचे दरमहा वेतन त्यांचे बॅंकेतील पवनी शाखेत नियमित जमा होत होते आणि सदर खाते मृतकाचे मृत्यू पर्यंत नियमित सुरु होते ही बाब मान्य केली. कागदपत्रांची पुर्तता करण्या बाबत प्रत्येक खातेधारकाशी व्यक्तीगतरित्या पत्रव्यवहार करणे विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेला शक्य नाही, बॅंकेत आवश्यक असलेल्या दस्तऐवजाची पुर्तता करण्याची जबाबदारी संबधीत ग्राहकाची आहे. त्यांचे बॅंकेतील खातेधारकांची ग्रुप इन्शुरन्स विमा पॉलिसी विरुध्दपक्ष क्रं 2 ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीकडे काढली होती त्या विमा पॉलिसीचा क्रं-163600/48/2021/1095 असा असून विमा पॉलिसीचा वैध कालावधी हा दिनांक-24.04.2000 पासून ते दिनांक-23.04.2021 असा आहे ही बाब मान्य केली. विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेच्या संगणकीय प्रणाली मध्ये कर्मचारी असल्याचे प्रमाणपत्र दिल्या शिवाय विमा संरक्षण योजनच्या पॉलिसी मध्ये नाव समाविष्ट होत नाही. परंतु मृतकाने कर्मचारी प्रमाणपत्र विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेत पुरविले नसल्याने विमा संरक्षण मिळाले नाही. मृतकाने बॅंक खाते काढताना जिल्हा परिषद, भंडारा यांनी निर्गमित केलेले जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाखा विरलीबुज तालुका पवनी, जिल्हा भंडारा यांचे ओळखपत्र जोडले होते ही बाब मान्य केली. तक्रारदारांची तक्रार आणि तक्रारीतील मागण्या या अमान्य असून त्यांनी कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नसल्याने विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंके विरुध्दची तक्रार खारीज करण्याची विनंती केली.
04. विरुध्दपक्ष कं 2 ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीने आपले लेखी उत्तर जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केले. त्यांनी आपले लेखी उत्तरा मध्ये मृतक श्री वामन वैद्द यांचा अपघाती मृत्यू आणि त्यांचे कायदेशीर वारसदार हा अभिलेखाचा भाग असल्याचे नमुद केले. विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंक ऑफ महाराष्ट्र यांनी विरुध्दपक्ष क्रं 2 ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीला पुरविलेल्या यादीत मृतक श्री वामन वैद्द यांचे नावाचा समावेश नव्हता आणि त्यामुळे मृतकाचे विमा हप्त्याची रक्कम विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीला मिळालेली नाही परिणामी मृतकाचे पगाराचे खाते क्रं-6035658459 ग्रुप पर्सनल अॅक्सीडेंट स्कीम विमा पॉलिसी क्रं-163600/48/2021/1095 अंतर्गत विमा संरक्षणा मध्ये येत नाही. विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने विरुध्दपक्ष क्रं1 बॅंकेला मृतकास विमा रक्कम देय नसल्या बाबत कळविलेले आहे. त्यांनी कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही करीता त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्याची विनंती केली.
05. तक्रारदारांची तक्रार व तक्रारकर्ती क्रं 1 हिचा शपथे वरील पुरावा तसेच विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंक ऑफ महाराष्ट्र पवनी यांचे लेखी उत्तर, विरुध्दपक्ष क्रं 2 ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीचे लेखी उत्तर तसेच प्रकरणातील उपलबध दस्तऐवजांचे अवलोकन करण्यात आले. तक्रारदारां तर्फे वकील श्री महेंद्र गोस्वामी तर विरुध्दपक्ष क्रं 1 महाराष्ट्र बॅंके तर्फे वकील श्रीमती सुषमा सिंग तर विरुध्दपक्ष क्रं 2 ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी तर्फे वकील श्री एम.ए. चौधरी यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला, त्यावरुन जिल्हा ग्राहक आयोगाचा निष्कर्ष खालील प्रमाणे आहे-
::निष्कर्ष::
06. सदर प्रकरणातील विवादास्पद मुद्दांचा विचार करण्या पूर्वी सर्व पक्षांना मंजूर असलेल्या बाबींचा उल्लेख होणे जरुरीचे आहे. मृतक श्री वामन वैद्द हे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा विरली बुज, पंचायत समिती लाखांदूर, तहसिल लाखांदूर जिल्हा भंडारा येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते आणि त्यांचा दिनांक-07.10.2020 रोजी सोमनाळा खुर्द, तहसिल पवनी, जिल्हा भंडारा येथे पिंपळगाव ते कातुर्ली रस्त्यावर टीव्हीएस स्टॉर सिटी मोटर सायकल क्रं-एमएच-36/एम-9478 ने जात असताना त्यांच्या आंगावर विज पडून अपघाती मृत्यू झाला आहे. त्यांचे अपघाती मृत्यूची सुचना त्याच दिवशी पोलीस स्टेशन, अडयाळ येथे दिली असता त्यांनी गुन्हा नोंद करुन घटनास्थळाचा पंचनामा केला तसेच मरणान्वेषन प्रतीवृत्त तयार केले तसेच शासकीय रुग्णालय अडयाळ येथे शव विच्छेदन करण्यात आले असून सदर शव विच्छेदन अहवाला मध्ये विज आंगावर पडून मृत्यू झाल्याचे नमुद आहे या बाबी दस्तऐवजाव्दारे सिध्द झालेल्या आहेत. मृतकाचे शाळेतील मुख्यायापक यांनी दिनांक-20.10.2021 रोजी दिलेल्या प्रमाणपत्रात मृतक त्यांचे शाळेत मृत्यू दिनांका पर्यंत 07.10.2020 पर्यंत सहायक शिक्षक या पदावर कार्यरत होते ही बाब सिध्द होते. पोलीस स्टेशन अडयाळ जिल्हा भंडारा यांचे दस्तऐवजा वरुन मृतकाचा अपघाती मृत्यू आंगावर विज कोसळून झाला होता ही बाब सिध्द होते. वैद्दकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालयअडयाळ यांचे शव विच्छेदन अहवाला मध्ये मृतकाचे मृत्यूचे कारण “Death due to lightning” असे नमुद आहे. त्याच बरोबर मृतक वामन वैद्द यांनी त्यांचे खाते विरुध्दपक्ष क्रं 1 महाराष्ट्र बॅंकेच्या पवनी शाखे मध्ये दिनांक-30.05.2020 रोजी उघडले होते आणि त्याचा खाते कं-6035658459 असा असून सदर खाते दिनांक-05.06.2020 रोजी पगार खात्या मध्ये परावर्तीत केले होते. बॅंकेतील खातेधारकांची ग्रुप इन्शुरन्स विमा पॉलिसी विरुध्दपक्ष क्रं 2 ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीकडे काढली होती त्या विमा पॉलिसीचा क्रं-163600/48/2021/1095 असा असून विमा पॉलिसीचा वैध कालावधी हा दिनंक-24.04.2000 पासून ते दिनांक-23.04.2021 असा आहे या बाबी दोन्ही विरुध्दपक्षांना मान्य आहेत आणि सदर ग्रुप इन्शुरन्स विमा पॉलिसीची प्रत अभिलेखावर दाखल आहे.
07. सदर प्रकरणातील विवादास्पद मुद्दा एवढाच आहे की, विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंक ऑफ महाराष्ट्र तर्फे लेखी उत्तरात असे नमुद करण्यात आले की, पगार खाते वेळी मृतक वामन वैद्द यांनी कर्मचारी असल्याचे प्रमाणपत्र दिले नव्हते आणि म्हणून सदर खात्याला विमा संरक्षण मिळालेले नाही. विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंके तर्फे मृतक श्री वामन वैद्द यांना वारंवार दुरध्वनी वरुन कर्मचारी असल्याचे प्रमाणपत्र सादर करण्यास कळविले होते परंतु त्यांनी सदर मागणी कडे दुर्लक्ष्य केले. विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेच्या संगणकीय प्रणाली मध्ये कर्मचारी असल्याचे प्रमाणपत्र दिल्या शिवाय विमा संरक्षण योजनच्या पॉलिसी मध्ये नाव समाविष्ट होत नाही. विरुध्दपक्ष कं 2 विमा कंपनीचे लेखी उत्तरा प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंक ऑफ महाराष्ट्र यांनी विरुध्दपक्ष क्रं 2 ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीला पुरविलेल्या यादीत मृतक श्री वामन वैद्द यांचे नावाचा समावेश नव्हता आणि त्यामुळे मृतकाचे विमा हप्त्याची रक्कम विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीला मिळालेली नाही परिणामी मृतकाचे पगाराचे खाते क्रं-6035658459 ग्रुप पर्सनल अॅक्सीडेंट स्कीम विमा पॉलिसी क्रं-163600/48/2021/1095 अंतर्गत विमा संरक्षणामध्ये येत नाही.
08. जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवजाचे अवलोकन करण्यात आले. विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा पवनी, जिल्हा भंडारा यांनी तक्रारकर्ती कं 1 यांचे नावे दिनांक-17.07.2021 रोजी जे विमा दावा नामंजूरी संबधात पत्र पाठविलेले आहे, त्यामध्ये असे नमुद केले की, त्यांनी मृतक श्री वामन वैद्द यांचे अपघाती मृत्यू विमा दावा ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी कडे दिनांक-27.10.2020 रोजी दाखल केला होता परंतु विमा कंपनीने दिनांक-27.10.2020 रोजी पाठविलेल्या ई मेल मध्ये मृतकाचे नावाची विमा जोखीम वैयक्तिक ग्रुप अपघात विमा पॉलिसी मध्ये नाही. मृतकाने बॅंकेत खाते उघडते वेळी के.वाय.सी दस्तऐवज दाखल करताना एम्प्लायर सर्टीफीकेट दिले नव्हते त्यामुळे विमा दावा देय होत नाही .
09. तक्रारदारांचे अधिवक्ता श्री महेंद्र गोस्वामी यांनी आपले मौखीक युक्तीवादाचे वेळी काही प्रकरणातील दाखल दस्तऐवजां कडे जिल्हा ग्राहक आयोगाचे लक्ष वेधले, त्यांनी विरुध्दपक्ष क्रं 1 महाराष्ट्र बॅंकेचे जाहिरातीचे पत्रक Mahabank Salary Account Scheme त्यामध्ये खालील प्रमाणे नमुद आहे-
Who can open Account- All Employees of Govt. Deptt / PSU / Corporate having salary payment arrangement with
the bank.
Group Insurance (Accidental) – Personal Accident Death cover and
permanent total disability cover of
Rs. 40 Lakhs.
सदर प्रसिध्दीपत्रकात कोठेही कर्मचा-याने एम्प्लायरचे सर्टीफीकेट सादर करणे बंधनकारक केलेले नाही तसेच असे प्रमाणपत्र सादर करावे लागेल असे कुठेही जाहिरात पत्रकात नमुद नाही.
त्याच बरोबर महाराष्ट्र शासन, वित्त विभाग, मंत्रालय मुंबई यांचे दिनांक-08 ऑक्टोंबर, 2020 रोजीचे परिपत्रका कडे लक्ष वेधले, त्यामध्ये असे नमुद आहे की, शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे वेतन खाते कोणत्या बॅंकेत असावे या बाबत शासन कोणतेही निर्देश देऊ शकत नाही तथापि वेतन खात्याशी संलग्न असणा-या अपघात विमा विषयक विविध योजना या अधिकारी/कर्मचारी यांच्या वैयक्तिक फायद्दाच्या आहेत त्या करीताबॅंका कडून कोणतेही वेगळे शुल्कआकारल्या जात नाही तसेच अशा योजना वेतन खात्याशी संलग्न असल्याने वेतन खाते उघडल्या नंतर त्या आपोआप लागू ठरतात त्यामुळे काही राष्ट्रीयकृत बॅंका कडून प्राप्त State Government Salary Package (SGSP) अपघात विमा योजनेचा लाभ मिळण्या संदर्भात अधिकारी/कर्मचारी यांना परिपत्रकान्वये अवगत करणे आवश्यक वाटते. बॅंका कडील वेतन खात्याशी संलग्न योजनांच्या माहिती अभावी शासकीय अधिकारी/कर्मचारी अशा योजनां पासून वंचित राहू नये अशी या मागची शासनाची भूमीका आहे. राष्ट्रीयकृत बॅंका कडून प्राप्त State Government Salary Package (SGSP) अंतर्गत अपघात विमा योजनचे विविध लाभ यांची माहिती दर्शविलेली आहे. अधिकारी/कर्मचारी यांनी खाते कोणत्या बॅंकेत असावे या बाबतचा निर्णय कर्मचा-याने घ्यावयाचा आहे असे नमुद आहे. तक्रारदारांचे अधिवक्ता श्री गोस्वामी यांचा असा युक्तीवाद आहे की, सदर महाराष्ट्र शासनाचे परिपत्रकात सुध्दा कुठेही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी एम्प्लायर प्रमाणपत्र दाखल करावे असे नमुद नाही.
10. जिल्हा ग्राहक आयोगाचे असे मत आहे की, शासकीय अधिकारी/कर्मचारी ज्यांचे पगारी खाते विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंक ऑफ महाराष्ट्र या राष्ट्रीयकृत बॅंके मध्ये आहेत अशा खातेधारकांसाठी बॅंके मार्फत जी वैयक्तिक अपघात विमा योजनेचा लाभ देण्याची योजना सुरु केलेली आहे, त्या योजनेच्या प्रसिध्दी पत्रकात संबधित खातेधारकाने एम्प्लायर सर्टीफीकेट देणे बंधनकारक केलेले नाही. दुसरी महत्वाची बाब अशी दिसून येते की, विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा पवनी जिल्हा भंडारा यांनी शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी बॅंकेत खाते उघडताना वैयक्तिक विमा अपघात योजनेचा लाभ पाहिजे असल्यास एम्प्लायरचे प्रमाणपत्र दाखल करावे लागेल या संबधी कुठलीही लेखी सुचना मृतक श्री वामन वैद्द यांना दिलेली नाही वा तशी लेखी सुचना दिल्या बाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेनी आपले लेखी उत्तरात त्यांनी वारंवार तोंडी स्वरुपात एम्प्लायर सर्टीफीकेट आणण्याबाबत मृतक वामन वैद्द यास कळविले होते असे नमुद केले परंतु लेखी पुराव्या शिवाय या विधानास अर्थ उरत नाही. विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेनी लेखी उत्तरात असेही नमुद केले की, विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेच्या संगणकीय प्रणाली मध्ये कर्मचारी असल्याचे प्रमाणपत्र दिल्या शिवाय विमा संरक्षण योजनच्या पॉलिसी मध्ये नाव समाविष्ट होत नाही. मात्र मृतकाने बॅंक खाते काढताना जिल्हा परिषद, भंडारा यांनी निर्गमित केलेले जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाखा विरलीबुज तालुका पवनी, जिल्हा भंडारा यांचे ओळखपत्र जोडले होते ही बाब मान्य केलेली आहे. यावरुन असे दिसून येते की, मृतका हा शासकीय कर्मचारी होता ही बाब विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेला माहिती होती, तेंव्हा त्यांनी मृतकास एम्प्लायरचे प्रमाणपत्र दाखल करण्याची लेखी सुचना देणे बंधनकारक होते आणि मृतकाचे नावाचा बॅंकेच्या संगणकीय प्रणाली मध्ये विमा योजनेचा लाभ देण्यासाठी समावेश करणे जरुरीचे व बंधनकारक होते परंतु विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेनी सदर शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचेसाठी शासना मार्फतीने काढलेल्या राष्ट्रीयकृत कल्याणकारी विमा योजने कडे संपूर्णतः दुर्लक्ष्य करुन तक्रारदारांना सेवेत त्रृटी दिल्याची बाब पुराव्यानिशी सिध्द होते.
11. विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंक ऑफ महाराष्ट्र तर्फे त्यांचे अधिवक्ता श्रीमती सुषमा सिंग यांनी विमा कंपनीचे प्रधान कार्यालय यांचे दिनांक-16.04.2020 रोजीचे परिपत्रकावर आपली भिस्त ठेवली त्यामध्ये सर्व बॅंकेच्या शाखांना खालील प्रमाणे सुचना दिेलेल्या आहेत-
Introduction of Mahabank Salary Account Scheme, we request you to upadate the following details of all account holders of Mahabank Salary Account Scheme-
- Employers Detail (In 2nd Screen of CIF Creation or amendment)
- Nominee Detail (Name and Address)
We also request you to ensure that the following fields are correctly filled in the CBS to avoid any dispute in future.
- Name of account holder.
- Date of Birth
- Mobile Number.
Above mentioned details are required by Insurance Company for providing the insurance coverage (Mainly for Golden hour Cashless treatment as mentioned in product) In accounts where said information is not updated in CBS the Bank will not be able to provide insurance Coverage. It will be primary responsibility of branch to update the aforemended data in each account under the product.
उपरोक्त नमुद परिपत्रकाचे वाचन केले तर Employers Detail (In 2nd Screen of CIF Creation or amendment, Nominee Detail (Name and Address) Name of account holder, Date of Birth, Mobile Number या सर्व बाबींची पुर्तता करण्याची जबाबदारी संबधित शाखे मधील शाखा अधिकारी यांचेवर टाकलेली आहे आणि सदर परिपत्रका मध्ये असेही नमुद केलेले आहे की, जर सदर डाटा CBS मध्ये अपडेट न केल्यास बॅंक विमा जोखीम खातेदारास पुरवू शकणार नाही. थोडक्यात संबधित सरकारी अधिकारी/कर्मचारी यांचे कडून विम्या संबधी आवश्यक माहितीची दस्तऐवजी पुर्तता करण्याची जबाबदारी संबधित बॅकेच्या शाखा अधिका-यांची आहे असे दिसून येते.
12. विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे असे म्हणणे आहे की, विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंक ऑफ महाराष्ट्र यांनी विरुध्दपक्ष क्रं 2 ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीला पुरविलेल्या यादीत मृतक श्री वामन वैद्द यांचे नावाचा समावेश नव्हता आणि त्यामुळे मृतकाचे विमा हप्त्याची रक्कम विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीला मिळालेली नाही, परिणामी मृतकास विमा रक्कम देय नाही.
13. जिल्हा ग्राहक आयोगाचे असे मत आहे की, शासनाने शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचा अपघाती मृत्यू आल्यास वैयक्तिक अपघात विमा योजने व्दारे त्यांचे वारसदारांना विम्याचे रकमेचा लाभ व्हावा यासाठी राष्ट्रीयकृत बॅंका व्दारे सदर कल्याणकारी विमा योजना सुरु केलेली आहे आणि अशा कल्याणकारी योजनेचा लाभ प्रत्येक शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना मिळावा यासाठी संबधित राष्ट्रीयकृत बॅंकेतील अधिकारी/कर्मचारी यांनी काळजीपूर्वक लक्ष घालून संबधित खातेधारका कडून आवश्यक दस्तऐवज प्राप्त करुन तसेच बॅंकेच्या संगणक प्रणाली मध्ये सर्व खातेधारकांचे नावाची नोंद झाली किंवा कसे याची पडताळणी करणे आवश्यक आहे परंतु तसे या प्रकरणात झालेले नाही. दुसरी महत्वाची बाब अशी आहे की, वैयक्तिक अपघात विमा योजना ही विरुध्दपक्ष क्रं 1 महाराष्ट्र बॅंक आणि विरुध्दपक्ष क्रं 2 ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी यांचे मधील संलग्न योजना (Tieup) आहे, अशा परिस्थितीत विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेनी केलेल्या चुकी बाबत संबधित खातेधारकाचे वारसदारांना विमा योजनेच्या लाभा पासून वंचित ठेवता येत नाही. विमा योजनेचे कार्य हे विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंक आणि विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनी यांचे परस्पर सहकार्यावर अवलंबून आहे. शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे अपघाती मृत्यू संबधात विमा रक्कम संरक्षण हा या कल्याणकारी योजनेचा उदात्त हेतू आहे ही बाब विरुध्दपक्ष क्रं 1 महाराष्ट्र बॅंकेनी लक्षात घेणे जरुरीचे आहे. मृतक श्री वामन वैद्द यांनी वि.प.क्रं 1 बॅंकेत खाते उघडताना शाळेचे ओळखपत्र दाखल केले होते ही बाब सुध्दा पुरेशी आहे की, मृतक हा शासकीय कर्मचारी होता. केवळ विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेच्या यादी मध्ये मृतकाचे नावाचा समावेश नव्हता या कारणास्तव विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने मृतकाचा विमा दावा नाकारला ही बाब दोषपूर्ण सेवे मध्ये मोडते. अशाप्रकारे विरुध्दपक्ष क्रं 1 महाराष्ट्र बॅंकेनी शासनाचे कल्याणकारी योजने कडे संपूर्णतः दुर्लक्ष्य करुन तक्रारदारांना ते मृतकाचे कायदेशीर वारसदार असून सुध्दा विमा रकमेपासून वंचित ठेऊन दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते.
14. विरुध्दपक्ष क्रं 1 महाराष्ट्र बॅंकेच्या चुकीमुळे विरुध्दपक्ष क्रं 2 ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी तर्फे तक्रारदारांना मृतक श्री वामन वैद्द यांचे अपघाती मृत्यू संबधात वैयक्तिक अपघात विमा योजना अंतर्गत देय विमा रक्कम रुपये-40,00,000/- मिळू शकलेली नाही आणि त्यासाठी सर्वस्वी विरुध्दपक्ष क्रं 1 महाराष्ट्र बॅंक सर्वस्वी जबाबदार आहे असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करता विरुध्दपक्ष क्रं 1 महाराष्ट्र बॅंकेनी मृतक श्री वामन वैद्द यांचे अपघाती मृत्यू संबधात वैयक्तिक अपघात विमा योजना विमा पॉलिसी क्रं-163600/48/2021/1095 अंतर्गत देय विमा रक्कम रुपये-40,00,000/- आणि सदर विमा रकमेवर विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने विरुध्दपक्ष क्रं 1 बॅकेला दिनांक-27.10.2020 रोजी पाठविलेल्या ई मेल व्दारे मृतकाचे नावाची विमा जोखीम वैयक्तिक ग्रुप अपघात विमा पॉलिसी मध्ये नाही या कारणास्तव विमा दावा नाकारल्याचे दिनांका पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-7 टक्के दराने व्याज मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे. त्याच बरोबर विरुध्दपक्ष क्रं 1 महाराष्ट्र बॅंकचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारदारांना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-10,000/- आणि प्रस्तुत तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-10,000/- अशा नुकसान भरपाईच्या रकमा तक्रारदारांना मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे. विरुध्दपक्ष क्रं 2 ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी मार्फत व्यवस्थापक, पुणे यांचे विरुध्दची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे, त्यावरुन जिल्हा ग्राहक आयोगा व्दारे प्रस्तुत तक्रारी मध्ये खालील प्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्यात येत आहे-
::अंतिम आदेश::
- तक्रारदार क्रं 1 श्रीमती गिता वामन वैद्द आणि ईतर दोन यांची तक्रार विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंक ऑफ महाराष्ट्र मार्फत शाखा व्यवस्थापक, शाखा पवनी जिल्हा भंडारा यांचे विरुध्द खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंक ऑफ महाराष्ट्र मार्फत शाखा व्यवस्थापक, शाखा पवनी जिल्हा भंडारा यांना आदेशित करण्यात येते की, तक्रारदार क्रं 1 ते 3 मार्फत तक्रारकर्ती क्रं 1 श्रीमती गीता वामन वैद्द यांना त्यांचा मृतक पती श्री वामन डोमळू वैद्द यांचे अपघाती मृत्यू संबधात वैयक्तिक अपघात विमा योजना ग्रुप पॉलिसी क्रं-163600/48/2021/1095 अंतर्गत देय विमा रक्कम रुपये-40,00,000/- (अक्षरी रुपये चाळीस लक्ष फक्त)अदा करावी आणि सदर विमा रकमेवर वि.प.क्रं 2 विमा कंपनीने विमा दावा नाकारल्याचा दिनांक-27.10.2020 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-7 टक्के दराने येणा-या व्याजाची रक्कम दयावी.
- विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंक ऑफ महाराष्ट्र मार्फत शाखा व्यवस्थापक, शाखा पवनी जिल्हा भंडारा यांना आदेशित करण्यात येते की,त्यांनी दिलेल्या दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारदारांना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) अशा रकमा तक्रारदार क्रं 1 ते 3 मार्फत तक्रारकर्ती क्रं 1 श्रीमती गीता वामन वैद्द यांना दयाव्यात.
- सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंक ऑफ महाराष्ट्र मार्फत शाखा व्यवस्थापक, शाखा पवनी जिल्हा भंडारा यांनी प्रस्तुत निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत मिळाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.
- विरुध्दपक्ष क्रं 2 ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मार्फत व्यवस्थापक, अब्बास चेंबर्स, 3 रा माळा, एम.जी.रोड, पुणे-411001 यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
- निकालपत्राच्या प्रथम प्रमाणित प्रती सर्व पक्षकांराना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
- उभय पक्षकारांनी दाखल केलेले अतिरिक्त संच जिल्हा आयोगाचे कार्यालयातून परत घेऊन जावेत.