(पारीत व्दारा श्री नितीन माणिकराव घरडे, मा.सदस्य)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्या कलम 35 खाली विरुध्दपक्ष क्रं 1) ते 3) नॅशनल इन्शुरन्स कंपनी यांचे विरुध्द त्याचे विमाकृत बसचा अपघात होऊन वाहन क्षतीग्रस्त झाल्याने दुरुस्तीपोटी आलेल्या खर्चाची विमा रक्कम मिळावी आणि इतर अनुषंगीक मागण्यांसाठी दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे त्याचे मालकीचे खालील वर्णनातीत वाहन होते-
Mahindra Company Bus-Capicity-14th Seats
Registration No-M.H.-36/F-3203
तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष नॅशनल इन्शुरन्स कंपनी यांचे कडून सदर बसची विमा पॉलिसी काढली असून सदर विमा पॉलिसीचा क्रं-281303/31/1916360002494 असा असून सदर विमा पॉलिसीचा कालावधी हा दिनांक-16/11/2019 पासून ते दिनांक-15/11/2020 असा होता.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, त्याचा मंडप डेकोरेशन व कॅटरींगचा व्यवसाय असून तसेच त्याचे भाऊ हेमंत वाघमारे याचे मालकीचे हेमंत सेलीब्रेशन व पुजा बॅंकेट हॉल भंडारा येथे आहे. तक्रारकर्ता हा विमाकृत बसचा वापर त्याचे भाऊचे व्यवसाया करीता करीत होता. दिनांक-29.08.2020 रोजी भंडारा जिल्हयाला अचानक महापुर आला. तक्रारकर्त्याचे भाऊचे पुजा बॅंक्वेट या हॉल व हॉलचे परिसरात 5 ते 6 फूट उंची पर्यंत पाणी होते तसेच आसपासचे आवारात पाणीच पाणी होते. महापुरामुळे झालेल्या नुकसानीचा शासनाचे वतीने मोक्यावर येऊन पंचनामा करण्यात आला. तक्रारकर्त्याची विमाकृत बस महापुराचे पाण्यामुळे दिनांक-29.08.2020 पासून ते दिनांक-31.08.2020 पर्यंत पाण्यात बुडून होती, पुरामुळे तिला पाण्यातून बाहेर काढता आले नाही. पुराचे पाण्यामुळे सदर बसचे बरेचसे भाग खराब झाले होते. तक्रारकर्त्याने पुरामुळे झालेल्या विमाकृत बसचे नुकसानी बाबत विरुध्दपक्ष क्रं 2 व क्रं 3 विमा कंपनीला कळविले असता त्यांनी सर्व्हेअरची नियुक्ती केली. त्यावेळी सर्व्हेअर यांनी असे सांगितले की, विमाकृत बस महिंद्रा कंपनीमध्ये दुरुस्ती केल्यास खर्च विमा कंपनी देणार नाही व तक्रारकर्त्यास क्षतीग्रस्त विमाकृत बस खाजगी दुकानात दुरुस्ती करण्या करीता सांगितले. त्याप्रमाणे तक्रारकर्त्याने क्षतीग्रस्त विमाकृत बस दुरुस्ती संबधात खाजगी दुकानातून कोटेशन घेतले व ते विरुध्दपक्ष विमा कंपनीचे कार्यालयात सादर केले.
तक्रारकर्त्याने आपले तक्रारीतील परिच्छेद क्रं 6 मध्ये त्याचे मालकीच्या वाहनाची खाजगी दुकानात दिनांक-30.09.2020 रोजी दुरुस्ती केली त्याचे विवरण खालील प्रमाणे नमुद केलेले आहे-
नाज मोटर्सचे दिनांक-30.09.2020 रोजीचे बिल रक्कम रुपये-83,400/-
नाज मोटर्सचे दिनांक-30.09.2020 रोजीचे बिल रक्कम रुपये-60,500/-
किरकोळखर्च रुपये-7000/-
एकूण रुपये-1,50,900/-
त्यानंतर तक्रारकर्त्याने खाजगी दुकानातून विमाकृत बस दुरुस्तीची बिले विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे कार्यालयात सादर केलीत परंतु विरुध्दपक्ष विमा कंपनीने बिले मंजूर केली नाहीत त्यामुळे त्याचे रुपये-1,50,000/- चे नुकसान झाले. तक्रारकर्त्याने वकील श्री के.एस. भुरे यांचे मार्फतीने विरुध्दपक्ष विमा कंपनीला दिनांक-12.07.2021 रोजीची नोटीस पाठविली परंतु विरुध्दपक्ष विमा कंपनीचे वकील श्री दलाल यांचे मार्फतीने विमा कंपनीने खोटे उत्तर पाठविले. म्हणून शेवटी त्याने प्रस्तुत तक्रार जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल करुन त्याव्दारे विरुध्दपक्ष विमा कंपनी विरुध्द खालील प्रमाणे मागण्या केल्या-
1. विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 नॅशनल इन्शुरन्स कंपनीला आदेशित करण्यात यावे की, त्यांनी तक्रारकर्त्यास विमाकृत क्षतीग्रस्त दुरुस्ती संबधात नुकसान भरपाईची रक्कम रुपये-1,50,000/- आणि सदर रकमेवर नुकसान झाल्याचे तारखे पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो वार्षिक 18 टक्के दराने व्याज देण्याचे विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांना अदेशित व्हावे.
2. त्याला झालेल्या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासा बद्दल रुपये-50,000/- तसेच तक्रार खर्च म्हणून खर्च रुपये-25,000/- विरुध्दपक्षां कडून मिळावे. या शिवाय योग्य ती दाद त्याचे बाजूने मंजूर करण्यात यावी.
03. विरुध्दपक्ष क्रं 1 नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कोलकाता यांना जिल्हा ग्राहक आयोगाची रजि. पोस्टाव्दारे पाठविलेली नोटीस दिनांक-15.11.2021 रोजी मिळाल्या बाबत रजि. पोस्टाची पोच अभिलेखावर दाखल आहे परंतु अशी नोटीस मिळूनही वि.प.क्रं 1 विमा कंपनी तर्फे कोणीही उपस्थित झाले नाही म्हणून त्यांचे विरुध्द तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश प्रकरणात दिनांक-25.03.2022 रोजी पारीत केला.
04. विरुध्दपक्ष क्रं 2 व क्रं-3 नॅशनल इन्शुरन्स कंपनी तर्फे एकत्रीत लेखी उत्तर जिल्हा ग्राहक आयोगा समोर दाखल करण्यात आले. विरुध्दपक्ष विमा कंपनीचे लेखी उत्तरा प्रमाणे तक्रारीतील परिच्छेद क्रं 1 ते 3 व क्रं 10 ते 12 तसेच परिच्छेद क्रं 7 अभिलेखाचा भाग असल्याने उत्तर देण्याची गरज नसल्याचे नमुद केले. तक्रारीतील परिच्छेद क्रं 4, क्रं 6, क्रं 8, क्रं 9 मधील मजकूर मान्य नसल्याचे नमुद केले. आपले खास कथनात असे नमुद केले की, विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्याला दिनांक-01.09.2020 रोजी ई मेल व्दारे तसेच दिनांक-13.11.2020, दिनांक-08.12.2020 व दिनांक-22.12.2020 अन्वये दोन कागदपत्रांची मागणी (1) Verified copy of permit valid as on date of accident (2) Original bills along with payment receipt केली होती व असे सुध्दा लेखी कळविले होते की, 07 दिवसांचे आत कागदपत्रांची पुर्तता न केल्यास विमा दाव्याची फाईल “No Claim” म्हणून बंद करण्यात येईल परंतु तरी सुध्दा तक्रारकर्त्याने मागितलेल्या दस्तऐवजाची पुर्तता केलेली नसलयाने विमा दावा नामंजूर केला. तक्रारकर्त्याने विमाकृत बस दुरुस्तीची जी बिले दाखल केलेली आहेत ती खोटी आहे. तक्रारकर्त्याने रुपये-1,50,900/- चे बिल नमुद केले आहे ते Naz Motors यांचे Quotation होते परंतु अस्सल दस्तऐवज क्रं 11 प्रमाणे रुपये-68,470/- एवढा खर्च झालेला आहे. तक्रारकर्ता हा जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष स्वच्छ हाताने आलेला नाही व ही बाब त्याने दाखल केलेल्या दस्तऐवजा वरुन सिध्द होते व या कारणामुळे त्याचा विमा दावा विरुध्दपक्ष विमा कंपनीने नामंजूर केलेला आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष विमा कंपनीने मागणी केल्या नुसार दस्तऐवजाची पुर्तता केली नाही तसेच खोटी बिले दाखल केलीत म्हणून विमा दावा नामंजूर केला. त्यांनी कोणतीही दोषपूर्ण सेवा तक्रारकर्त्यास दिलेली नाही. सबब तक्रारकर्त्याची तक्रार खर्चासह खारीज करावी असे नमुद केले.
05. तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्दपक्ष क्रं 2 व क्रं 3 विमा कंपनीचे लेखी उत्तर, तसेच तक्रारकर्त्या तर्फे दाखल शपथे वरील पुरावा, विरुध्दपक्ष क्रं 2 व क्रं 3 तर्फे शपथे वरील पुरवा त्याच बरोबर उभय पक्षां तर्फे दाखल दस्तऐवजांचे अवलोकन करण्यात आले. तक्रारकर्त्या तर्फे वकील श्री के.एस. भुरे तर विरुध्दपक्ष क्रं 2 व क्रं 3 विमा कंपनी तर्फे वकील कु. आयुषी दलाल यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला, त्यावरुन जिल्हा ग्राहक आयोगाचा निष्कर्ष खालील प्रमाणे आहे-
::निष्कर्ष::
06. तक्रारकर्त्याचे भाऊ हेमंत सेलीब्रेशन यांनी तहसिलदार, भंडारा यांचे कडे दिनांक-29.08.2020 ते 31.08.2020 रोजी आलेल्या महापुरामुळे झालेल्या नुकसानी बाबत निवेदन व निवेदना सोबत पुरामुळे झालेल्या नुकसानीची यादी दाखल केलेली आहे, त्यावर पोच म्हणून तहसिलदार कार्यालयाचा शिक्का व सही आहे, सदर यादी मध्ये चार चाकी वाहन (विमाकृत वाहन) महिन्द्रा अॅन्ड महिन्द्रा Registration No. MH-36/F 3203 नमुद असून नुकसानीची अंदाजीत किम्मत रुपये-90,000/- दर्शविलेली आहे.
07 त्याच बरोबर तक्रारकर्त्याचे अधिवक्ता श्री के.एस. भुरे यांनी विरुध्दपक्ष नॅशनल इन्शुरन्स कंपनीला जी दिनांक-12.07.2021 रोजीची कायदेशीर नोटीस पाठविली त्यामध्ये तक्रारकर्त्याने पुरामुळे विमाकृत बसचे संबधात रुपये-1,50,000/- नुकसान झाल्याचे नमुद केलेले आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष विमा कंपनीचे कार्यालयात दिनांक-01.10.2020 रोजी जो विमा दावा भरुन दिलेला आहे त्यामध्ये नाझ मोटर्स भंडारा यांचे कोटेशन रुपये-1,43,900/- चा उल्लेख केलेला आहे. तक्रारकर्त्याने तक्रारी सोबत नाझ मोटर्स भंडारा यांचे कॅश मेमो क्रं 93, क्रं 94 व क्रं 95 दिनांक-15.10.2020 रोजीचे दाखल केले, त्यामध्ये अनुक्रमे रकमा या रुपये-25,170/- अधिक रुपये-5100/- अधिक रुपये-38,200/- असे मिळून एकूण रुपये-68,470/- येते.
08. जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे विशेष नमुद करणे आवश्यक आहे की, तक्रारकर्त्याने जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दिनांक-08.07.2022 रोजी जे शपथपत्र दाखल केलेले आहे, त्यामध्ये असे नमुद केलेले आहे की, त्याने विमाकृत क्षतीग्रस्त बस आमीर ऑटो कुल यांचे कडून दुरुस्त केलेले असून त्याचा तपशिल खालील प्रमाणे दिलेला आहे-
बिल क्रं 174, बिल दिनांक-17.09.2020, बिलाची रक्कम रुपये-1,44,775/-
बिल क्रं 175 बिल दिनांक-17.09.2020, बिलाची रक्कम रुपये-82,606/-
बिल क्रं 176 बिल दिनांक-17.09.2020, बिलाची रक्कम रुपये-36,000/-
एकूण बिलाची रक्कम रुपये-2,63,381/-
09. जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे विशेषत्वाने नमुद करण्यात येते की, तक्रारकर्त्याने तक्रारीतील मागणी मध्ये विमाकृत क्षतीग्रस्त बस दुरुस्ती संबधात रुपये-1,50,000/- ची मागणी केलेली आहे. तसेच तक्रारकर्त्याने तक्रारी सोबत नाझ मोटर्स भंडारा यांचे कॅश मेमो क्रं 93, क्रं 94 व क्रं 95 दिनांक-15.10.2020 रोजीचे दाखल केले, त्यामध्ये अनुक्रमे रकमा या रुपये-25,170/- अधिक रुपये-5100/- अधिक रुपये-38,200/- असे मिळून एकूण रुपये-68,470/- येते.
09. तक्रारकर्त्याने आपले तक्रारीतील परिच्छेद क्रं 6 मध्ये त्याचे मालकीच्या वाहनाची खाजगी दुकानात दुरुस्ती केली त्याचे विवरण खालील प्रमाणे दिलेले आहे-
नाज मोटर्सचे दिनांक-30.09.2020 रोजीचे बिल रक्कम रुपये-83,400/-
नाज मोटर्सचे दिनांक-30.09.2020 रोजीचे बिल रक्कम रुपये-60,500/-
किरकोळ खर्च रुपये-7000/-
एकूण रुपये-1,50,900/-
परंतु तक्रारकर्त्याने नाझ मोटर्स भंडारा यांची दिनांक-30.09.2020 रोजीची दुरुस्तीची बिले एकूण रुपये-1,50,900/- पुराव्यार्थ दाखल केलेली नाहीत.
10. तक्रारकर्त्याने नाझ मोटर्स भंडारा यांचे कॅश मेमो क्रं 93, क्रं 94 व क्रं 95 दिनांक-15.10.2020 रोजीचे दाखल केले, त्यामध्ये अनुक्रमे रकमा या रुपये-25,170/- अधिक रुपये-5100/- अधिक रुपये-38,200/- असे मिळून एकूण रुपये-68,470/- येते परंतु या प्रमाणे तक्रारकर्त्याने मागणी केलेली नाही. तसेच कॅश मेमो ही प्रत्यक्ष अदा केलेली बिले आहेत कि कोटशनची बिले आहेत याचा सुध्दा उलगडा होत नाही.
11. तसेच तक्रारकर्त्याचे शपथपत्रा मध्ये विमाकृत क्षतीग्रस्त बस आमीर ऑटो कुल यांचे कडून दिनांक-17.09.2020 रोजी दुरुस्त केल्याचे नमुद करुन बिलांचा तपशिल खालील प्रमाणे दिलेला आहे.
बिल क्रं 174, बिलाची रक्कम रुपये-1,44,775/-
बिल क्रं 175 बिलाची रक्कम रुपये-82,606/-
बिल क्रं 176 बिल बिलाची रक्कम रुपये-36,000/-
एकूण बिलाची रक्कम रुपये-2,63,381/-
परंतु सदर बिलाच्या प्रती पुराव्यार्थ अभिलेखावर दाखल नाहीत. तक्रारकर्ता आपले शपथपत्रात एकीकडे नमुद करतो की, त्याने आमीर ऑटो कुल यांचे कडून दिनांक-17.09.2020 रोजी क्षतीग्रस्त विमाकृत वाहन दुरुस्त केले तर दुसरी कडे नाझ मोटर्स भंडारा यांची दिनांक-15.10.2020 रोजीची रक्कम रुपये-68,470/-ची बिले कॅश मेमो म्हणून दाखल केलेली आहेत.
12. तक्रारकर्त्याने तक्रारीतील परिच्छेद क्रं 6 मध्ये नाझ मोटर्स भंडारा यांचे कडून विमाकृत क्षतीग्रस्त वाहन हे दिनांक-30.09.2020 रोजी दुरुस्त केल्याचे नमुद करुन एकूण खर्च रुपये-1,50,900/- दर्शविलेला आहे परंतु दिनांक-30.09.2020 रोजीची बिले पुराव्यार्थ दाखल केलेली नाहीत. यावरुन असे दिसून येते की, तक्रारकर्त्याने विमाकृत क्षतीग्रस्त बस दुरुस्ती संबधात वेगवेगळी विसंगत विधाने केलेली असून आपले विधानाचे पुराव्यार्थ योग्य प्रकारचा पुरावा दाखल केलेला नाही. त्याच बरोबर कोटेशन मध्ये नमुद केलेली तारीख आणि प्रत्यक्ष दुरुस्त बिलाची तारीख यांचा ताळमेळ खात नाही याचे कारण असे की पहिले कोटेशन आणि त्यानंतर दुरुस्तीची देयके असे यावयास पाहिजे. तसेच तक्रारी मधील मागणी मध्ये मागितलेली रक्कम आणि पुराव्याव्दारे मागणी केलेली रक्कम या मध्ये सुध्दा विसंगती दिसून येते.
13. उपरोक्त नमुद वस्तुस्थितीचा विचार करता प्रस्तुत तक्रारीमध्ये योग्य असा पुरावा न आल्यामुळे आणि तक्रार अर्ज व शपथे वरील पुरावा यामध्ये सुध्दा विसंगती असल्याचे दिसून येते.अशा परिस्थितीत योग्य असा निष्कर्ष काढता येत नसल्याने तक्रारकर्त्याची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे, त्यावरुन आम्ही प्रस्तुत तक्रारी मध्ये खालील प्रमाणे अंतीम आदेश पारीत करीत आहोत-
::अंतिम आदेश::
- तक्रारकर्ता श्री नरेंद्र मोतीराम वाघमारे यांची तक्रार विरुध्दपक्ष नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तर्फे विरुध्दपक्ष क्रं 1 व्यवस्थापक, कोलकाता, विरुध्दपक्ष क्रं 2 व्यवस्थापक नागपूर आणि विरुध्दपक्ष क्रं 3 व्यवस्थापक भंडारा यांचे विरुध्दची योग्य तो पुरावा न आल्याचे कारणावरुन खारीज करण्यात येते.
- खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाही.
- निकालपत्राच्या प्रथम प्रमाणित प्रती सर्व पक्षकांराना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
- उभय पक्षकारांनी अतिरिक्त संच जिल्हा आयोगाचे कार्यालयातून परत घेऊन जावेत.