निकाल
दिनांक- 10.07.2014
(द्वारा- श्रीमती मंजुषा चितलांगे, सदस्य)
तक्रारदार सुंदरराव बाबासाहेब काकडे यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाला यांनी मुदतठेवीची रक्कम व त्यावरील व्याज देण्यास टाळाटाळ केली व सामनेवाला यांनी सेवेमध्ये कसूर केली म्हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणे, तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्या बँकेत दि.23.03.2002 रोजी रक्कम रु.21,000/- मुदतठेवीत ठेव म्हणून जमा केलेली आहे. सदर पावतीचा क्रमांक 000062 आहे व फोलिओ नं.1/91 असा आहे. सदर पावतीची मुदत ही दहा वर्षाकरता मुदतठेव म्हणून ठेवलेली आहे. मुदत संपल्यानंतर सदर पावतीची रक्कम रु.1,00,000/- अशी आहे. तक्रारदाराने सामनेवाला यांच्या बँकेत ठेवलेल्या ठेवीचा कालावधी हा दहा वर्षाचा आहे. सदर कालावधी हा दि.24.03.2012 रोजी संपला आहे. सदर ठेवीवर सामनेवाला यांनी तक्रारदारास दहा वर्षाच्या मुदतीवर रु.1,00,000/- देण्याचे कबूल केले आहे. तक्रारदाराने ठेवीची मुदत संपल्यानंतर सामनेवाला यांच्या बँकेत रक्कम घेण्यासाठी गेले असता तेव्हा सामनेवाला यांच्या बँकेचे चेअरमन, व्यवस्थापक व कर्मचारी यांनी सांगितले की, बँकेची सध्या आर्थिक अडचण असल्यामुळे ठेवीचे पैसे देऊ शकत नाही. 15 दिवसांनी व्यवस्था करुन तुम्हास ठेवीचे पैसे देण्यात येतील. तदनंतर तक्रारदार यांनी वेळोवेळी सामनेवाला यांच्याकडे पाठपुरावा केला. तसेच तक्रारदाराने उपनिबंधक बीड यांच्याकडे पत्रव्यवहार करुन पैसे देण्याबाबत विनंती केली. तक्रारदार यांनी वेळोवेळी पाठपुरावा करुनही सामनेवाला यांनी अद्याप पर्यंत तक्रारदारास ठेवीचे पैसे परत दिलेले नाही. सबब तक्रारदार यास शारिरिक, आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागला. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्या बँकेत ठेवलेली रक्कम रु.21,000/- मुदतीनंतरची ठेव रक्कम रु.1,00,000/- व्याजासह मागणी केलेली आहे. तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.25,000/- देण्याची विनंती केलेली आहे. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात यावी.
सामनेवाला क्र.1 व 2 यांना जाहीर प्रगटन अन्वये नोटीस तामिळ झालेली आहे. सामनेवाला क्र.1 व 2 हे मंचासमोर हजर झाले नाही. त्यामुळे त्यांचे विरुध्द सदर प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश झालेला आहे.
तक्रारदार यांनी तक्रारीसोबत निशाणी 3 अन्वये कागदपत्र दाखल केलेले आहे. तक्रारदाराने उपनिबंधक यांना दिलेले पत्र, सामनेवाला यांना दिलेले पत्र, मुदतठेवीची पावती इत्यादी कागदपत्र दाखल केलेले आहे. तक्रारदार यांनी स्वतःचे पुराव्याचे शपथपत्र दाखल केलेले आहे, सदर कागदपत्र पुराव्याचे शपथपत्र व तक्रारदार यांचा युक्तीवाद ऐकला. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1) सामनेवाला यांनी तक्रारदारास मुदत ठेवीची
रक्कम न देऊन सेवा देण्यात त्रुटी ठेवली आहे,
ही बाब तक्रारदार यांनी शाबीत केली आहे काय ? होय.
2) तक्रारदार हे तक्रारीतील मागणी मिळण्यास
पात्र आहे काय? होय.
3) आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 ते 3 ः- तक्रारदार यांनी असा युक्तीवाद केला की, त्यांनी सामनेवाला यांच्याकडे दि.23..03.2002 रोजी रक्कम रु.21,000/- मुदतठेव म्हणून दहा वर्षाकरता सामनेवाला यांच्याकडे जमा केली आहे. सदर ठेवीवर सामनेवाला यांनी तक्रारदारास दहा वर्षाच्या मुदतीवर व्याजासह रु.1,00,000/- देण्याचे कबूल केलेले आहे. मुदत संपल्यानंतर म्हणजे दि.24.03.2012 रोजी सदर ठेवीच्या पावतीची मुदत संपली आहे. तदनंतर तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडे सदर ठेवीचे पैसे परत मिळण्याबाबत विचारपूस केली असता सामनेवाला यांनी तक्रारदारास मुदतठेव रक्कम देण्यास टाळाटाळ केलेली आहे. तक्रारदार यांनी उपनिबंधक यांना दि.11.06.2012 आणि 11.09.2012 रोजी पैसे मिळणेबाबत विनंती पत्र दाखल केलेले आहे. अद्याप पर्यंत तक्रारदारास सामनेवाला यांनी मुदतठेवीची रक्कम परत दिली नाही किंवा देण्याचे आश्वासन व तयारी दर्शविली नाही. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात यावी.
वर नमुद केलेला युक्तीवाद याचे अवलोकन केले. तसेच तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र व पुराव्याचे शपथपत्र याचे अवलोकन केले. यावरुन असे निदर्शनास येते की, तक्रारदार यांनी सामनेवाला यांचे बँकेत रक्कम रु.21,000/- दहा वर्षाच्या मुदतीसाठी ठेवलेले आहे, सदर मुदतठेवीवर सामनेवाला यांनी दि.24.03.2012 रोजी मुदत संपल्यानंतर रक्कम रु.1,00,000/- देण्याचे कबूल केलेले आहे. तक्रारदार यांनी सदर मुदतठेव ही आपल्या मुलीच्या लग्नाकरता कामी येईल म्हणून सामनेवाला यांच्याकडे मुदतठेव म्हणून ठेवलेली होती. तक्रारदार यांनी दाखल केलेले मुदतठेवीची पावती ही मा.मंचाने मुळ पावतीवरुन पडताळणी केली आहे. ठेवीदाराने ठेवलेली रक्कम व त्यावरील व्याज मुदत संपताच रक्कम देण्याची जबाबदारी सामनेवाला यांची आहे. तक्रारदार हे आपली ठेवलेली रक्कम योग्य वेळी कामी यावी म्हणून मुदत ठेव सामनेवाला यांच्याकउे ठेवतात, जेणेकरुन तक्रारदारास आपल्या पैशाचा योग्य वेळी योग्य लाभ घेता यावा परंतू मुदतठेवीची मुदत संपल्यानंतरही सामनेवाला यांनी तक्रारदारास मुदतठेवीची रक्कम देण्यास टाळाटाळ केली. सबब सामनेवाला यांनी तक्रारदारास द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवलेली आहे असे म्हणता येईल. यावरुन मंचाचे असे मत आहे की, सामनेवाला यांनी तक्रारदारास मुदतठेवीची रक्कम रु.1,00,000/- द.सा.द.शे.9 टक्के दराने परत करावी. शारिरिक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.3,000/- तसेच तक्रारीचा खर्च म्हणून रक्कम रु.1,000/- देण्यात यावा. म्हणून मुददा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
2) सामनेवाला क्र.1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी
तक्रारदार यांच्या मुदतठेवीची रक्कम रु.1,00,000/- (अक्षरी
रु.एक लाख) तसेच सदर रकमेवर दि.24.03.2012 पासून पूर्ण
रक्कम वसूल होईपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के दराने निकाल
कळाल्यापासून 30 दिवसाच्या आत द्यावे.
3) सामनेवाला क्र.1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी
तक्रारदार यांना मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रुपये
3,000/- (अक्षरी रु तीन हजार ) व तक्रारीचा खर्च म्हणून
रक्कम रु.1,000/- (अक्षरी रु.एक हजार) दयावे.
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील
कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला
परत करावेत.
श्री.रविंद्र राठोडकर, श्रीमती मंजूषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड