Maharashtra

Latur

CC/203/2021

सरोज अंतेश्वर स्वामी (रंभापुरे) - Complainant(s)

Versus

व्यवस्थापक, रिलायंस जनरल इंंश्युरंस कं. लि. - Opp.Party(s)

अ‍ॅड. ए. एम. के. पटेल

02 Mar 2023

ORDER

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
जिल्‍हा परिषदेचे गेट क्र.2 शेजारी, लातूर - 413512
 
Complaint Case No. CC/203/2021
( Date of Filing : 30 Sep 2021 )
 
1. सरोज अंतेश्वर स्वामी (रंभापुरे)
...........Complainant(s)
Versus
1. व्यवस्थापक, रिलायंस जनरल इंंश्युरंस कं. लि.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. REKHA R. JADHAV PRESIDENT
 HON'BLE MR. Ravindra S. Rathodkar MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 02 Mar 2023
Final Order / Judgement

 

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.

 

ग्राहक तक्रार क्रमांक : 203/2021.                             तक्रार दाखल दिनांक : 30/09/2021.                                                                                       तक्रार निर्णय दिनांक : 02/03/2023.

                                                                                        कालावधी :  01 वर्षे 05 महिने 02 दिवस

 

सरोजा भ्र. अंतेश्वर स्वामी (रंभापुरे), वय 44 वर्षे,

व्यवसाय : घरकाम व शेती, रा. अपचुंदा, ता. औसा, जि. लातूर.

ह. मु. : संभाजी नगर, कव्वा नाका, लातूर, ता. जि. लातूर.                                      तक्रारकर्ती

 

                        विरुध्द

 

व्यवस्थापक, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.,

सन प्लाझा, दुसरा मजला, मोरारजी पेठ, सिटी सर्वे नं. 85/11,

सुभाष चौक, मोरारजी चौक, सोलापूर - 413 001.                                              विरुध्द पक्ष

 

गणपूर्ती :          मा. श्रीमती रेखा जाधव, अध्‍यक्ष (अतिरिक्त कार्यभार)

                        मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य

                                   

तक्रारकर्ती यांचेकरिता विधिज्ञ :- ए.एम.के. पटेल

विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- सुरेश जी. डोईजोडे

 

आदेश 

 

मा. श्रीमती रेखा जाधव, अध्‍यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-

 

(1)       तक्रारकर्ती यांच्या ग्राहक तक्रारीचा आशय असा की, त्यांचे पती मयत अंतेश्वर पि. प्रल्हाद स्वामी (रंभापुरे) (यापुढे "मयत अंतेश्वर") यांनी खरेदी केलेल्या हिरो कंपनीच्या दुचाकी वाहन क्र. एम.एच.24/बी.बी.3976 करिता विरुध्द पक्ष (यापुढे 'विमा कंपनी') यांच्याकडून विमापत्र क्र. 600621823120004580 घेतलेले होते. विमापत्र कालावधी दि. 26/7/2018 ते 25/7/2019 होता. विमापत्रानुसार वाहनाच्या मालक व चालकाचा अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास रु.1,00,000/- विमा जोखीम स्वीकारलेली आहे.

 

(2)       तक्रारकर्ती यांचे पुढे कथन असे की, दि.27/12/2018 रोजी मयत अंतेश्वर हे विमा संरक्षीत दुचाकीवर सतिश दुधभाते यांच्या पाठीमागे बसून जात असताना लातूर शहरामध्ये आयशर टेम्पोने धडक दिल्यामुळे गंभीर जखमी होऊन मयत अंतेश्वर व सतिश दुधभाते यांचा मृत्यू झाला. गांधी चौक पोलीस ठाणे, लातूर येथे क्र. 448/2018 अन्वये घटनेची नोंद करण्यात आली.

 

(3)       तक्रारकर्ती यांचे पुढे कथन असे की, त्यांनी विमापत्रानुसार विमा लाभ मिळण्याकरिता विमा कंपनीकडे विमा दावा व अन्य कागदपत्रे सादर केली. परंतु विमा कंपनीने त्यांना विमा रक्कम न दिली नाही. विधिज्ञातर्फे सूचनापत्र पाठविले असता विमा कंपनीने सूचनापत्र स्वीकारले नाही. अशाप्रकारे विमा कंपनीने सेवेमध्ये त्रुटी केलेली आहे. उपरोक्त वादकथनाच्या अनुषंगाने विमा कंपनीकडून विमा रक्कम रु.1,00,000/-; शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रु.10,000/- व तक्रार खर्च रु.5,000/- अशी रक्कम अपघात तारखेपासून द.सा.द.शे. 15 टक्के व्याज दराने देण्याचा विमा कंपनीस आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ती यांनी केलेली आहे.

 

(4)       विमा कंपनीने अभिलेखावर लेखी निवेदनपत्र सादर केले. त्यांनी ग्राहक तक्रारीतील बहुतांश मजकूर अमान्य केला. त्यांच्या कथनानुसार तक्रारकर्ती यांचा विमा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्याची छाननी केली आणि विमा प्रस्ताव विमापत्राच्या अटी व शर्तीमध्ये बसत नसल्यामुळे दि.13/2/2019 रोजी नामंजूर करण्यात आला. विमाधारक यांच्याकडे अपघातसमयी वाहन चालविण्याचा परवाना नसल्यामुळे विमा दावा नामंजूर केला. त्यांनी सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली नाही आणि अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला नाही. अंतिमत: ग्राहक तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती विमा कंपनीतर्फे करण्यात आलेली आहे.

 

(5)       तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार, विमा कंपनीचे लेखी निवेदनपत्र, उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे मुद्दे निश्चित करण्‍यात येतात आणि त्‍या मुद्दयांची कारणमीमांसा त्‍यांच्‍यापुढे दिलेल्‍या उत्‍तराकरिता खालीलप्रमाणे देण्‍यात येते.

                       

मुद्दे                                                                                     उत्तर

 

(1) विमा कंपनीने तक्रारकर्ती यांना द्यावयाच्‍या सेवेमध्‍ये त्रुटी

      केल्‍याचे सिध्‍द होते ?                                                                                 होय

(2) मुद्दा क्र.1 च्‍या अनुषंगाने तक्रारकर्ती अनुतोषास पात्र आहेत काय  ?              होय

     असल्‍यास किती ?                                                                         अंतिम आदेशाप्रमाणे

(3) काय आदेश  ?                                                                             अंतिम आदेशाप्रमाणे

 

कारणमीमांसा

 

(6)       मुद्दा क्र. 1 ते 3 :- वाद-तथ्ये, कागदपत्रे व उभय पक्षांचा वाद-प्रतिवाद पाहता मयत अंतेश्वर यांनी त्यांच्या हिरो पॅशन प्रो दुचाकी वाहन क्र. एम.एच.24/बी.बी.3976 करिता विमा कंपनीकडून विमापत्र क्र. 600621823120004580 घेतले होते; विमापत्र कालावधी दि. 26/7/2018 ते 25/7/2019 होता; विमापत्रामध्ये Compulsory PA cover to Owner Driver अन्वये विमा जोखीम दिलेली होती; दि.27/12/2018 रोजी विमा संरक्षीत दुचाकीचा अपघात झाला; अपघातामध्ये मयत अंतेश्वर यांचा घटनास्थळी मृत्यू झाला; तक्रारकर्ती यांनी विमा कंपनीकडे विमा दावा दाखल केला; विमा कंपनीने तक्रारकर्ती यांना विमा रक्कम दिली नाही इ. बाबी विशेष विवादीत नाहीत.

 

(7)       विमा कंपनीचा मुख्य बचाव असा की, अपघातसमयी मयत अंतेश्वर यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नव्हता आणि विमा दावा विमापत्राच्या अटी व शर्तीमध्ये बसत नसल्यामुळे दि.13/2/2019 रोजी तो नामंजूर करण्यात आला. त्या पृष्ठयर्थ विमा कंपनीने अभिलेखावर दि.13/2/2019 रोजीचे पत्र दाखल केले; ज्यामध्ये विमाधारकाकडे अपघातसमयी वाहन चालविण्याचा वैध परवाना नव्हता, असे नमूद दिसते.

 

(8)       अभिलेखावर प्रथम खबर अहवाल, पोलीस घटनास्‍थळ पंचनामा, मरणोत्‍तर पंचनामा, शवचिकित्‍सा अहवाल इ. कागदपत्रे दाखल आहेत. त्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता मयत अंतेश्वर विमा संरक्षीत वाहनाच्या अपघातामध्ये मृत झाल्‍याचे निदर्शनास येते. तक्रारकर्ती यांचेतर्फे निवेदन असे की, मयत अंतेश्वर हे दुचाकी चालवत नव्हते आणि ते दुचाकीवर पाठीमागे बसलेले असल्यामुळे वाहन चालविण्याचा परवाना दाखल करण्याची आवश्यकता नाही. उलटपक्षी, विमा कंपनीतर्फे निवेदन असे की, अपघातसमयी मयत अंतेश्वर यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नव्हता. त्यापृष्ठयर्थ विमा कंपनीने अन्वेषण अहवाल व शिवप्रसाद अंतेश्वर स्वामी यांचा जबाब दाखल केला. सकृतदर्शनी, विमा कंपनीच्या अन्वेषकांने जबाब घेतला, असे सिध्द होण्यासाठी समर्पक पुरावा नाही. जबाबामध्ये संबंधीत अन्वेषकाचे नांव व स्वाक्षरी नाही. तसेच कथित अन्वेषण अहवालामध्ये केवळ Facts & Findings असे नमूद दिसतात. अहवालावर केवळ Charterhouse Detective Services असे नमूद आहे. अन्वेषण अहवालावर संबंधीत अन्वेषकाचे नांव व स्वाक्षरी नाही.  संबंधीत अन्वेषकाचे शपथपत्र अभिलेखावर दाखल नाही. त्यामुळे पुराव्याच्या दृष्टीने कथित अहवाल व जबाब हे कायदेशीरदृष्टया महत्वपूर्ण ठरत नाहीत, असे जिल्हा आयोगाचे स्पष्ट मत आहे.

 

(9)       अभिलेखावर दाखल कागदपत्रांनुसार अपघातसमयी मयत अंतेश्वर दुचाकी चालवत होते, असा पुरावा नाही. विमापत्राच्या अनुषंगाने विमा कंपनीने Reliance Two Wheeler Package Policy Wording दाखल केले. त्यातील Section III - Personal Accident Cover for owner-driver कलमामध्ये This cover is subject to : (a) the owner-driver is the registered owner of the vehicle insured herein; (b) the owner-driver is the insured named in this policy. (c) the owner-driver holds an effective driving license in accordance with the provisions of Rule 3 of the Central Motor Vehicle Rules, 1989 at the time of accident.  असे नमूद आहे. उक्त तरतुदीनुसार owner-driver म्हणजे वाहनाचा नोंदणीकृत मालक व विमाधारकाचे नांवे विमापत्र आहे. तसेच अपघातसमयी नियम 3 नुसार वाहन चालविण्याचा कार्यक्षम परवाना धारण करीत असले पाहिजे. उक्त तरतुदीनुसार owner-driver यांनी केवळ विमा संरक्षीत वाहन चालविताना अपघात घडल्यासच विमा रक्कम देय राहील, हे स्पष्ट होत नाही. आमच्या मते, owner-driver हे विमा संरक्षीत वाहनावर पाठीमागे बसलेले असताना अपघात झालेला असल्यास संबंधीत owner-driver यांचा वाहन चालविण्याचा परवाना गौण ठरतो. प्रस्तुत प्रकरणामध्ये मयत अंतेश्वर हे अपघातसमयी विमा संरक्षीत वाहनाच्या पाठीमागे बसलेले होते आणि विमा संरक्षीत वाहनाकरिता ते owner-driver असल्यामुळे विमा कंपनीद्वारे विमा दावा नामंजूर करण्याचे कृत्य चूक व अनुचित ठरते. आमच्या मते, विमा कंपनीने तक्रारकर्ती यांना विमा दावा नामंजूर करुन सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली आहे आणि तक्रारकर्ती ह्या विमा रक्‍कम रु.1,00,000/- मिळण्यास पात्र ठरतात.

 

(10)     तक्रारकर्ती यांनी अपघात तारखेपासून द.सा.द.शे. 15 टक्के व्याज दराने विमा रक्कम मिळावी, अशी विनंती केलेली आहे. योग्य विचाराअंती विमा दावा नामंजूर केल्याच्या तारखेपासून द.सा.द.शे. 6 टक्‍के दराने व्‍याज आकारणे उचित ठरेल, असे जिल्हा आयोगास वाटते.

 

(11)     तक्रारकर्ती यांनी मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.10,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- रकमेची मागणी केलेली आहे. नुकसान भरपाईची रक्‍कम निश्चित करताना प्रकरणानुरुप गृहीतक निश्चित केले जातात. असे दिसते की, तक्रारकर्ती यांना पतीच्या अपघाती मृत्यूपश्चात विमा रक्कम परत मिळविण्‍याकरिता पाठपुरावा करावा लागलेला आहे. विमा रक्कम न दिल्‍यामुळे तक्रारकर्ती यांना जिल्‍हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्‍ला व सहायता, प्रकरण शुल्‍क इ. खर्चाच्‍या बाबी आहेत. तसेच ग्राहक तक्रार न्‍यायप्रविष्‍ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो. अशा स्थितीत, तक्रारकर्ती यांना मानसिक व शारीरिक त्रास होणे नैसर्गिक व स्‍वाभाविक आहे.  त्यामुळे योग्‍य विचाराअंती मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- मिळण्‍यास तक्रारकर्ती पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत जिल्हा आयोग येत आहोत.

 

(12)     उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.

 

 

आदेश

 

(1) ग्राहक तक्रार अंशत: मंजूर करण्‍यात येते.

(2) विरुध्‍द पक्ष विमा कंपनीने तक्रारकर्ता यांना रु.1,00,000/- (रुपये एक लक्ष फक्‍त) विमा रक्‍कम द्यावी.

तसेच, उक्त विमा रकमेवर दि.13/2/2019 पासून संपूर्ण विमा रक्‍कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्‍के दराने व्‍याज द्यावे.

(3) विरुध्‍द पक्ष विमा कंपनीने तक्रारकर्ती यांना मा‍नसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चापोटी रु.3,000/- द्यावेत.

(4) विरुध्‍द पक्ष विमा कंपनीने प्रस्तुत आदेशांची अंमलबजावणी आदेश प्राप्‍तीपासून 45 दिवसाचे आत करावी.

 

 

(श्री. रविंद्र शे. राठोडकर)                                                   (श्रीमती रेखा  जाधव)                

             सदस्‍य                                                                     अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)             

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)

-०-

 
 
[HON'BLE MRS. REKHA R. JADHAV]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. Ravindra S. Rathodkar]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.