जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 166/2022. तक्रार नोंदणी दिनांक : 07/06/2022. तक्रार निर्णय दिनांक : 11/03/2024.
कालावधी : 01 वर्षे 09 महिने 06 दिवस
आशा परमेश्वर हालकरे, वय 32 वर्षे,
व्यवसाय : घरकाम, रा. मदनसुरी, ता. निलंगा, जि. लातूर. तक्रारकर्ती
विरुध्द
(1) विभागीय व्यवस्थापक, युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कं. लि.,
विभागीय कार्यालय : नं. 202, दुसरा मजला, विनर्स कोर्ट,
झेड के वरती, लुल्ला नगर, सहाने सुजान पार्क, पुणे - 411 040.
(2) व्यवस्थापक, जयका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा. लि., दुसरा मजला,
जयका बिल्डींग, कमर्शिअल रोड, सिव्हील लाईन्स्, नागपूर - 440 001.
(3) तालुका कृषि अधिकारी, कृषि कार्यालय, निलंगा, ता. निलंगा, जि. लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष
श्रीमती रेखा जाधव, सदस्य
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ती यांचेकरिता विधिज्ञ :- प्रमोद एल. शिंदे
विरुध्द पक्ष क्र.1 व 2 :- अनुपस्थित / एकतर्फा
विरुध्द पक्ष क्र.3 :- स्वत:
आदेश
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेद्वारे राज्यातील सर्व शेतक-यांचा विमा उतरविला असून शेतकरी व्यक्तीच्या अपघाती मृत्यूपश्चात त्यांच्या वारसास रु.2,00,000/- देण्याची तरतूद आहे. विरुध्द पक्ष क्र.1 (यापुढे 'विमा कंपनी') हे विमा कंपनी, विरुध्द पक्ष क्र.2 (यापुढे 'जयका इन्शुरन्स') मध्यस्त व विरुध्द पक्ष क्र.3 (यापुढे 'तालुका कृषि अधिकारी') हे तालुक्याचे कृषि अधिकारी आहेत.
(2) तक्रारकर्ती यांचे पुढे कथन असे की, त्यांचे पती परमेश्वर विठ्ठल हलकरे (यापुढे 'मयत परमेश्वर') यांच्या नांवे मौजे मदनसुरी, ता. निलंगा, जि. लातूर येथे गट क्र.97 मध्ये 83 आर. शेतजमीन होती. दि.14/2/2020 रोजी मयत परमेश्वर यांच्या दुचाकी क्र. एम.एच. 12 सी.एफ. 2388 वाहनास लामजना पाटी ते औसा रस्त्यावर बोलेरो जीप क्र. एम.एच. 42 / 9040 वाहनाने धडक दिली आणि अपघातामध्ये मयत परमेश्वर गंभीर जखमी होऊन घटनास्थळी मृत्यू पावले. घटनेसंबंधी पोलीस ठाणे, किल्लारी येथे गु. र. नं. 40/2020 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पोलीस यंत्रणेद्वारे घटनास्थळ पंचनामा व मरणोत्तर पंचनामा करण्यात येऊन मयत परमेश्वर यांची शवचिकित्सा करण्यात आलेली आहे.
(3) तक्रारकर्ती यांचे पुढे कथन असे की, मयत परमेश्वर हे शेतकरी असल्यामुळे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे लाभार्थी होते. तक्रारकर्ती यांनी मयत परमेश्वर यांच्या वारस नात्याने विमा रक्कम मिळण्याकरिता तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे विमा दाव्यासह आवश्यक कागदपत्रे सादर केले. त्यानंतर तालुका कृषि अधिकारी यांनी जयका इन्शुरन्स यांच्याकडे प्रस्ताव पाठवून दिला. दि.23/2/2021 रोजी तालुका कृषि अधिका-यांच्या सूचनेप्रमाणे त्रुटीयुक्त कागदपत्रांची पूर्तता केली. मात्र तालुका कृषि अधिकारी यांनी दि.6/5/2021 रोजीच्या पत्राद्वारे दुचाकी वाहन चालविण्याचा परवाना नसल्याच्या कारणास्तव दावा नामंजूर केला. वास्तविक पाहता, तक्रारकर्ती यांनी मयत परमेश्वर यांच्या वाहन चालविण्याच्या परवान्याची प्रत सादर केली असताना चुकीच्या कारणास्तव विमा दावा नामंजूर केला. अशाप्रकारे सेवेमध्ये त्रुटी केल्याचे नमूद करुन रु.2,00,000/- व्याजासह देण्याचा; शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रु.50,000/- व ग्राहक तक्रार खर्च रु.25,000/- देण्याचा विमा कंपनी, जयका इन्शुरन्स व तालुका कृषि अधिकारी यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ती यांनी केली आहे.
(4) जिल्हा आयोगाचे सूचनापत्र प्राप्त झाल्यानंतर विमा कंपनी व जयका इन्शुरन्स हे जिल्हा आयोगापुढे उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात आले.
(5) तालुका कृषि अधिकारी यांनी लेखी निवेदनपत्र दाखल केले. त्यांच्या कथनानुसार तक्रारकर्ती यांनी मयत परमेश्वर यांचा प्रस्ताव दि.11/5/2020 रोजी कार्यालयास सादर केला आणि पुढील मंजुरीसाठी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, लातूर यांच्याकडे पाठविण्यात आला. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांच्या सूचनेनुसार त्रुटीची पूर्तता करण्यात आली असता विमा कंपनीने अवैध वाहन चालविण्याचा परवाना असल्यामुळे दावा रद्द केला.
(6) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, तालुका कृषि अधिकारी यांचे लेखी निवेदनपत्र व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी होय
केल्याचे सिध्द होते काय ? (विमा कंपनीने)
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? होय
असल्यास किती ? अंतिम आदेशाप्रमाणे
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(7) मुद्दा क्र. 1 ते 3 :- प्रकरणामध्ये अ.क्र.22 वर दाखल विमा कंपनीच्या दि.6/5/2021 रोजीच्या पत्राचे अवलोकन केले असता त्यांच्याकडे सुपूर्द केलेला वाहन चालविण्याचा परवाना दुचाकीसाठी नसून इतर वाहनासाठी असल्यामुळे कायद्याचे उल्लंघन झाल्याच्या कारणास्तव विमा दावा रद्द केल्याचे दिसून येते. प्रामुख्याने, मयत परमेश्वर शेतकरी असल्याबद्दल 7/12 उतारा अभिलेखावर दाखल आहे. पोलीस कागदपत्रे पाहता रस्ता अपघातामध्ये मयत परमेश्वर यांच्या दुचाकी वाहनास बोलेरो जीपने धडक दिल्यामुळे अपघात झाल्याचे निदर्शनास येते. शवचिकित्सा अहवालावरुन मयत परमेश्वर यांना गंभीर इजा झाल्यामुळे मृत्यू झाल्याचे दिसून येते.
(8) विमा कंपनी जिल्हा आयोगापुढे अनुपस्थित राहिल्यामुळे एकतर्फा चौकशी आदेश करण्यात आले. तक्रारकर्ती यांचे वादकथने व कागदोपत्री पुराव्यांकरिता खंडन किंवा विरोधी पुरावे उपलब्ध नाहीत.
(9) मयत परमेश्वर हे शेतकरी होते; विमा लाभार्थी होते आणि त्यांचा रस्ता अपघातामध्ये मृत्यू झाला इ. बाबी स्पष्ट असल्यामुळे विमा लाभ देण्याकरिता त्यांचा वाहन चालविण्याचा परवाना अत्यावश्यक ठरतो काय ? हाच एकमेव प्रश्न विचारार्थ येतो. विमा कंपनी जिल्हा आयोगापुढे अनुपस्थित आहे आणि त्यांच्याद्वारे विमा संविदा किंवा विमा संविदेच्या अटी व शर्ती अभिलेखावर दाखल करण्याचा प्रयत्न झालेला नाही. असेही दिसते की, तक्रारकर्ती यांनी सुध्दा विमा संविदा दाखल केलेली नसल्यामुळे विमा संविदेनुसार मयत परमेश्वर यांचा वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक ठरतो काय ? हा प्रश्न अनुत्तरीत राहतो.
(10) मात्र, तक्रारकर्ती यांच्याद्वारे अभिलेखावर मा. राज्य आयोग, मुंबई यांच्या औरंगाबाद परिक्रमा पिठाने 'अनिता भाऊसाहेब देशमुख /विरुध्द/ ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि.' प्रथम अपिल क्र. 155/2020 मध्ये दि.22/3/2022 रोजी दिलेल्या आदेशाचा संदर्भ सादर करण्यात आला. ज्यामध्ये विमा संविदेच्या तरतुदीच्या अनुषंगाने दोषी वाहन चालकासंबंधी विस्तृत विवेचन केले आहे. तसेच मा. बॉम्बे उच्च न्यायालयाच्या "लताबाई रावसाहेब देशमुख /विरुध्द/ स्टेट ऑफ महाराष्ट्र" (2019) 2 ALLMR 859 या न्यायनिर्णयाचा संदर्भ सादर करण्यात आला. ज्यामध्ये विमा कंपनी ज्यावेळी मयताकडे वैध वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचा आक्षेप घेते, त्यावेळी विमापत्राच्या अटीचे उल्लंघन झाल्याच्या सिध्देतेचा भार विमा कंपनीवर येतो, असे प्रमाण आढळते. तसेच मा. बॉम्बे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाचा "न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लि. /विरुध्द/ मंगला" (2009) 3 ALLMR 887 या निवाड्याचा संदर्भ सादर केला असला तरी तो न्यायनिर्णय मोटार अपघात दावा प्राधिकरणाच्या प्रकरणामध्ये दिलेला दिसतो.
(11) प्रस्तुत प्रकरणामध्ये कागदपत्रांचे अवलोकन केले असता अपघातामध्ये मयत परमेश्वर यांचा दोष असल्याचे आढळून येत नाही. आमच्या मते प्रकरणाची वस्तुस्थिती, कागदपत्रे व वरिष्ठ न्यायालयांचे न्यायिक दृष्टांत पाहता मयत परमेश्वर यांचा वाहन चालविण्याच्या परवान्याची विमा कंपनीची मागणी अनावश्यक ठरते. त्यामुळे विमा कंपनीने तक्ररकर्ती यांचा विमा दावा अनुचित व अयोग्य कारणास्तव नामंजूर केलेला आहे आणि त्यांचे कृत्य सेवेमध्ये त्रुटी ठरते. तक्रारकर्ती विमा योजनेनुसार रु.2,00,000/- विमा रक्कम मिळण्यास पात्र आहेत. तसेच विमा रक्कम द.सा.द.शे. 12 टक्के व्याज दराने मिळण्यासंबंधी तक्रारकर्ती यांची विनंती पाहता विमा दावा नामंजूर केल्याच्या तारखेपासून म्हणजेच दि. 6/5/2021 पासून द.सा.द.शे. 6 टक्के दराने विमा रकमेवर व्याज मंजूर करणे न्यायोचित ठरते.
(12) तक्रारकर्ती यांनी मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.50,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.25,000/- रकमेची मागणी केलेली आहे. नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करताना त्या–त्या परिस्थितीवर गृहीतक आधारीत असतात. असे दिसते की, विमा कंपनीने विमा दावा नामंजूर केल्यामुळे विमा रक्कम मिळविण्याकरिता तक्रारकर्ती यांना पाठपुरावा करावा लागलेला आहे. शिवाय, तक्रारकर्ती यांना जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला व सहायता, प्रकरण शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. तसेच ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो. त्यामुळे तक्रारकर्ती यांना मानसिक व शारीरिक त्रास होणे नैसर्गिक व स्वाभाविक आहे. योग्य विचाराअंती मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- व तक्रार खर्चाकरिता एकत्रिरित्या रु.3,000/- मिळण्यास तक्रारकर्ती पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत येत आहोत.
(13) विमा योजनेसंबंधी दाव्याच्या अनुषंगाने जयका इन्शुरन्स हे विमा सल्लागार व तालुका कृषि अधिकारी हे शासकीय स्तरावरुन कार्यवाही करतात. वाद-तथ्ये व पुराव्यानुसार त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी असल्याचे सिध्द होत नाही.
(14) अंतिमत: मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) ग्राहक तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 विमा कंपनीने तक्रारकर्ती यांना रु.2,00,000/- (रुपये दोन लक्ष फक्त) विमा रक्कम द्यावी.
तसेच, उक्त विमा रकमेवर दि.6/5/2021 पासून संपूर्ण विमा रक्कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज द्यावे.
(3) विरुध्द पक्ष क्र.1 विमा कंपनीने तक्रारकर्ती यांना मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चापोटी रु.3,000/- द्यावेत.
(4) विरुध्द पक्ष क्र.1 विमा कंपनीने आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाचे आत उक्त आदेशाची अंमलबजावणी करावी.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव) (श्री. अमोल बा. गिराम)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-