Maharashtra

Latur

CC/312/2022

अशपाक अहेमद पठाण - Complainant(s)

Versus

व्यवस्थापक, युनिव्हर्सल सोम्पो जनरल इंश्युरंस कं. लि. - Opp.Party(s)

अ‍ॅड. एल. डी. पवार

05 Jan 2024

ORDER

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
जिल्‍हा परिषदेचे गेट क्र.2 शेजारी, लातूर - 413512
 
Complaint Case No. CC/312/2022
( Date of Filing : 10 Nov 2022 )
 
1. अशपाक अहेमद पठाण
लातूर
...........Complainant(s)
Versus
1. व्यवस्थापक, युनिव्हर्सल सोम्पो जनरल इंश्युरंस कं. लि.
लातूर
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Amol B. Giram PRESIDENT
 HON'BLE MRS. Rekha R. Jadhav MEMBER
 HON'BLE MR. Ravindra S. Rathodkar MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 05 Jan 2024
Final Order / Judgement

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.

 

ग्राहक तक्रार क्रमांक : 312/2022.                            तक्रार दाखल दिनांक : 10/11/2022.                                                                             तक्रार निर्णय दिनांक : 05/01/2024.

                                                                                       कालावधी : 01 वर्षे 01 महिने 26 दिवस

 

अशपाक अहेमद पठाण, वय 40 वर्षे,

व्यवसाय : शेती, रा. सारसा, ता. जि. लातूर.                                                          तक्रारकर्ता

 

                        विरुध्द

 

(1) व्यवस्थापक, युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लि.,

     विभागीय कार्यालय : ऑफीस नं. 202, दुसरा मजला, विनर्स कोर्ट,

     झेड के वरती, लुल्ला नगर, सहाने सुजान पार्क, पुणे - 411 040.

(2) व्यवस्थापक, मे ऑक्झीलियम इन्शुरन्स ब्रोकींग प्रा. लि., प्लॉट नं. 61/4,

     सेक्टर-28, प्लाझा हटच्या पाठीमागे, वाशी, नवीन मुंबई - 400 703.

(3) तालुका कृषि अधिकारी, कृषि कार्यालय, आदर्श कॉलनी, लातूर, जि. लातूर.      विरुध्द पक्ष

 

गणपूर्ती :          श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्‍यक्ष

                        श्रीमती रेखा जाधव, सदस्य

                        श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य

                                   

तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :-  एल. डी. पवार

विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकरिता विधिज्ञ :-  एस. व्ही. शास्त्री

विरुध्द पक्ष क्र. 2 :- अनुपस्थित / एकतर्फा

विरुध्द पक्ष क्र.3 :- स्वत:

 

आदेश 

श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्‍यक्ष यांचे द्वारा :-

 

(1)       तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, महाराष्ट्र शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेखाली विरुध्द पक्ष क्र.1 (यापुढे "विमा कंपनी") यांच्याकडे राज्यातील शेतक-यांना दि.7/4/2021 ते 6/4/2022 कालावधीकरिता विमा संरक्षण दिलेले होते. विरुध्द पक्ष क्र.2 (यापुढे "ऑक्झीलियम इन्शुरन्स") हे विमा योजनेचे सल्लागार असून विरुध्द पक्ष क्र.3 (यापुढे "तालुका कृषि अधिकारी") हे विमा योजनेची अंमलबजावणी करणारे शासकीय अधिकारी आहेत. 

 

(2)       तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, त्यांचे पिता अहमद दगडूभाई पठाण (यापुढे "मयत अहमद") यांच्या नांवे मौजे सारसा, ता. जि. लातूर येथे शेतजमीन गट क्र. 52 मध्ये एकूण 0 हे. 70.67 आर. क्षेत्र होते. दि.20/5/2021 रोजी मयत अहमद त्यांच्या शेतातील आंब्याच्या झाडावर आंबे काढण्यासाठी चढले असता पाय घसरुन पडले. त्यामुळे त्यांना तात्काळ अस्थिरोगतज्ञ डॉ. अशोक पोतदार यांच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. तेथे कोरोना तपासणीमध्ये संसर्ग आढळल्यामुळे गॅलक्सी हॉस्पिटल कोविड सेंटर, लातूर येथे दाखल करण्यात आले. त्यावेळी हॉस्पिटलने घटनेची माहिती एम.एल.सी. द्वारे शिवाजी नगर पोलीस ठाणे यांना कळविली. तपासणीअंती मयत अहमद यांच्या पाठीच्या मणक्याचे 2 फ्रॅक्चर व मेंदूतून आलेली मुख्य नस खराब झाल्याचे आढळले. मयत अहमद यांची प्रकृती गंभीर झाल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दि.30/5/2021 रोजी घरी आणण्यात आले असता त्यानंतर दि.6/6/2021 रोजी त्यांचा मृत्यू झाला.

 

(3)       तक्रारकर्ता यांचे पुढे कथन आहे की, मयत अहमद शेतकरी होते आणि विमा योजनेंतर्गत लाभार्थी होते. तक्रारकर्ता त्यांचे वारस असल्यामुळे विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे विमा दावा प्रपत्रासह आवश्यक कागदपत्रे सादर केले. त्यानंतर विमा दावा प्रस्ताव ऑक्झीलियम इन्शुरन्स व विमा कंपनीकडे पाठविण्यात आला. तक्रारकर्ता यांनी विमा दाव्यासंबंधी त्रुटीच्या पूर्ततेच्या सूचनेनुसार 6-ड कागदपत्राची पूर्तता केली आणि पोलीस अंतीम अहवाल, घटनास्थळ पंचनामा व शवविच्छेदन अहवाल उपलब्ध नसल्यामुळे सादर करता येत नाहीत, असेही कळविले. मात्र  त्यांचा विमा दावा मंजूर न करता प्रलंबीत ठेवण्यात आला आणि सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली आहे. उपरोक्त वादकथनाच्या अनुषंगाने विमा रक्कम रु.2,00,000/- व्याजासह देण्याचा; शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रु.10,000/- व तक्रार खर्च रु.7,000/- देण्यासंबंधी विमा कंपनी, ऑक्झीलियम इन्शुरन्स व तालुका कृषि अधिकारी यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.

 

(4)       विमा कंपनीतर्फे विधिज्ञ जिल्हा आयोगापुढे उपस्थित राहिले. मात्र विमा कंपनीतर्फे लेखी निवेदनपत्र दाखल केले नाही. उचित संधी दिल्यानंतर त्यांच्याविरुध्द 'विनालेखी निवेदनपत्र आदेश' करण्यात आले.

 

(5)       ऑक्झीलियम इन्शुरन्स यांना सूचनापत्र प्राप्त झाल्यानंतर ते जिल्हा आयोगापुढे उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात आले.

 

(6)       तालुका कृषि अधिकारी यांनी अभिलेखावर लेखी निवेदनपत्र सादर केले. त्यांचे कथन असे की, तक्रारकर्ता यांचा प्रस्ताव दि.27/8/2021 रोजी प्राप्त झाला. दि.31/8/2021 रोजी तो प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, लातूर यांच्या कार्यालयाकडे सादर केला. त्यानंतर प्रस्तावातील त्रुटीची पूर्तता त्यांच्या कार्यालयाद्वारे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, लातूर यांच्या कार्यालयाकडे दि.26/9/2022 रोजीच्या पत्राद्वारे केलेली आहे.

 

(7)       तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, तालुका कृषि अधिकारी यांचे लेखी निवेदनपत्र, अभिलेखावर दाखल कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे मुद्दे निश्चित करण्‍यात येतात आणि त्‍या मुद्दयांची कारणमीमांसा त्‍यांच्‍यापुढे दिलेल्‍या उत्‍तराकरिता खालीलप्रमाणे देण्‍यात येते.

                       

मुद्दे                                                                                    उत्तर

 

 

 

 

(1) विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्‍या सेवेमध्‍ये त्रुटी

      केल्‍याचे सिध्‍द होते ?                                                                        होय (विमा कंपनीने)

(2) मुद्दा क्र.1 च्‍या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय  ?                 होय

     असल्‍यास किती ?                                                                         अंतिम आदेशाप्रमाणे

(3) काय आदेश  ?                                                                             अंतिम आदेशाप्रमाणे

कारणमीमांसा

 

 

(8)       मुद्दा क्र. 1 ते 3 :- मुद्दा क्र. 1 ते 3 एकमेकांशी पुरक व संलग्न असल्यामुळे एकत्र विवेचन करण्यात येते. गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजनेसंबंधी कृषि आयुक्त, विमा कंपनी व ऑक्झीलियम इन्शुरन्स यांच्यामध्ये दि.7/4/2021 रोजी अस्तित्वात आलेला विमा संविदालेख अभिलेखावर दाखल असून दि.7/4/2021 ते 6/4/2022 कालावधीमध्ये विमा कंपनीने महाराष्ट्र राज्‍यातील शेतक-यांना अपघाती विमा संरक्षण दिल्याचे निदर्शनास येते. अभिलेखावर दाखल 7/12 उता-यांचे अवलोकन केले असता गाव : सारसा, ता. लातूर येथील गट क्रमांक व उपविभाग : 52 मध्ये क्षेत्र 0.70.67 आर. शेतजमिनीकरिता मयत अहमद यांचे नांव भोगवाटदार असल्याचे निदर्शनास येते. यावरुन मयत अहमद यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेखाली विमा संरक्षण लागू होते आणि ते विमा योजनेचे लाभार्थी होते.

 

(9)       अभिलेखावर दाखल वैद्यकीय उपचाराची कागदपत्रे, पोलीस पाटील व सरपंच यांचे प्रमाणपत्र, पोलीस जबाब, गॅलक्सी हॉस्पिटल यांनी पोलीस ठाण्यास मेडिको लिगल केसबद्दल दिलेले पत्र इ. कागदपत्रांवरुन मयत अहमद यांचा झाडावरुन पडून अपघात झाल्याचे दर्शवितात.  

 

(10)     मयत अहमद यांच्‍या मृत्‍यूनंतर तक्रारकर्ता यांनी विमा रक्कम मिळण्याकरिता रितसर मार्गाने विमा दावा दाखल केलेला दिसतो. मात्र विमा कंपनीने त्यांच्या विमा दाव्यासंबंधी अवास्तव कागदपत्रांची मागणी करुन विमा दावा प्रलंबीत ठेवल्याचे तक्रारकर्ता यांचे कथन आहे.  

 

(11)     विमा कंपनीने लेखी निवेदनपत्र दाखल केले नसल्यामुळे 'विनालेखी निवेदनपत्र' व  ऑक्झीलियम इन्शुरन्स अनुपस्थित राहिल्यामुळे एकतर्फा चौकशी करण्यात आली. त्यामुळे तक्रारकर्ता यांचे वादकथने व कागदोपत्री पुराव्यांकरिता खंडन किंवा विरोधी पुरावा उपलब्ध नाही.

 

(12)     प्रथमत: या ठिकाणी झाडावरुन पडल्यामुळे मयत अहमद यांचा अपघात व मृत्यू झाल्याचे सिध्द होते काय ? हे पाहणे आवश्यक ठरते. अभिलेखावर दाखल सह्याद्री ॲक्सीडेंट ॲन्ड न्युरोकेअर सेंटर, लातूर येथील डॉ. किनीकर एच.जी. यांनी दि.20/5/2021 रोजी दिलेल्या प्रमाणपत्राचे अवलोकन केले असता दि.20/5/2021 रोजी मयत अहमद हे झाडावरुन पडल्यामुळे अपघात झाल्याचा उल्लेख नमूद दिसतो. गॅलक्सी हॉस्पिटल ॲन्ड क्रिटीकल केअर सेंटर, लातूर येथील मयत अहमद यांच्या वैद्यकीय उपचाराचे मुक्तीपत्रक (Discharge Card) पाहता त्यामध्ये  Chief Complaint : H/O Fall from tree in own farm @ Sarsa, Latur at around 11:30 AM  असा उल्लेख दिसतो. गॅलक्सी हॉस्पिटल ॲन्ड क्रिटीकल केअर सेंटर, लातूर यांनी पोलीस ठाणे, शिवाजी नगर, लातूर यांना दि.20/5/2021 रोजी मेडिकोलिगल प्रकरणाच्या अनुषंगाने रुग्णालयामध्ये प्रविष्ठ होताना दिलेले कारण हे झाडावरुन पडल्यामुळे नमूद केलेले आहे. तसेच मयत अहमद यांच्या MRI CERVICAL SPINE मध्ये IMPRESSION : Multileven degenerative disc disease as described above. C3-C4, C4-C5, C5-C6, C6-C7 : diffuse posterior & posterolateral disc bulge noted. Disc  bulge causes bilateral neural foraminal narrowing with impingement over exiting nerve root. Minimal pervertebral colletion at C2 to C5 level. उल्लेख आढळतो. तसेच MRI DORSO-LUMBAR SPINE मध्ये IMPRESSION : Compresion # of D8, D9 vertebra with retropulsion of # fragment causing compression of spinal cord with cord edema. Bony spinal canal stenosis at D8, D9 level. Marrow exema in D8,D9 vertebaral body & posterior elements. Pre & paraspinal soft tissue collectioin at D7 to D12 level. उल्लेख आढळतो. पोलीस पाटील, सारसा व सरपंच, सारसा यांच्या अनुक्रमे दि.24/8/2021 व दि.27/8/2024 रोजीच्या प्रमाणपत्रामध्ये मयत अहमद यांचा आंब्याच्या झाडावरुन पडल्यामुळे अपघात झाल्याचे व दि.6 जुन, 2021 रोजी घरी मृत्यू झाल्यामुळे शवविच्छेदन केले नसल्याचे नमूद आहे. पोलीस चौकशी अमंलदार, पोलीस ठाणे, मुरुड यांच्यासमक्ष तक्रारकर्ता यांनी दिलेल्या जबाबामध्ये मयत अहमद आंब्याच्या झाडावरुन पडल्याचा उल्लेख आढळतो. प्रामुख्याने, कागदोपत्री उल्लेखांनुसार मयत अहमद हे झाडावरुन खाली पडले आणि त्यांच्या मणक्यास इजा झाल्यामुळे रुग्णालयामध्ये दाखल करुन उपचार घ्यावा लागल्याचे सिध्द होते.

(13)     असे दिसते की, विमा कंपनीने दि.24/6/2022 रोजीच्या पत्राद्वारे तक्रारकर्ता यांच्याकडे गाव नमुना 6-ड, पोलीस अंतिम अहवाल, घटनास्थळ पंचनाम/मरणोत्तर पंचनामा/इन्क्वेस्ट पंचनामा, शवविच्छेदन अहवाल इ. कागदपत्रांची मागणी केलेली आहे. तक्रारकर्ता यांनी तालुका कृषि अधिकारी, लातूर यांना दि.6/7/2022 रोजी पत्राद्वारे मयत अहमद यांचा घरी मृत्यू झाल्यामुळे पोलीस पंचनामा व शवविच्छेदन केले नसल्याचे कळविलेले दिसते. त्या अनुषंगाने तालुका कृषि अधिकारी यांनी त्रुटीची पूर्तता केल्याबद्दल मान्यता दिलेली आहे. मात्र विमा कंपनीने तक्रारकर्ता यांच्या विमा दाव्याबद्दल कोणताही निर्णय न घेता तो प्रलंबीत ठेवलेला दिसतो. विमा संविदेचे अवलोकन केले असता 21 दिवसाच्या आत विमा दाव्यासंबंधी निर्णय घेण्याचे विमा कंपनीवर बंधन आहे.

(14)     सकृतदर्शनी, कागदोपत्री पुराव्यांवरुन आंब्याच्या झाडावरुन पडल्यामुळे मयत अहमद यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न होते आणि तो केवळ अपघात असल्याचे ग्राह्य धरावे लागेल. तक्रारकर्ता यांनी मा. राष्ट्रीय आयोगाच्या "Dharmisetty Srinivas Rao Vs. New India Assurance Co. Ltd" 2006 (1) CPJ 11, मा. महाराष्ट्र राज्य आयोगाच्या "New India Assurance Co. Ltd. Vs. Sou. Chanda Sunil Sawant" 2011 (3) CPR 107 व मा. राजस्थान राज्य आयोगाच्या "ICICI Lombard General Insurance Co. Ltd. Vs. Raju Kachhawa" IV (2008) CPJ 312  या न्यायनिर्णयांचा संदर्भ सादर केला. वैद्यकीय कागदपत्रांवरुन अपघाती मृत्यू झाल्याचे सिध्द होत असल्यास पोलीस कागदपत्रे व शवचिकित्सा अहवाल अत्यावश्यक ठरणार नाही, असे न्यायिक तत्व त्यामध्ये विषद आहे. निश्चितच, उक्त निवाडे प्रस्तुत प्रकरणामध्ये सुसंगत असल्यामुळे लागू पडतात.

(15)     झाडावरुन पडल्यामुळे मयत अहमद यांचा मृत्यू झाल्याचे सिध्द होते. दि.24/6/2022 रोजीच्या पत्रानुसार कथित कागदपत्रांची पूर्तता करणे अशक्य असल्याचे तक्रारकर्ता यांनी कळविलेले आहे. असे असताना विमा दाव्याचा निर्णय न घेणे विमा कंपनीच्या सेवेमध्‍ये त्रुटी ठरते. त्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र असून विमा योजनेनुसार रु.2,00,000/- विमा रक्कम मिळण्यास पात्र आहेत. अपघात तारखेपासून विमा रक्कम द.सा.द.शे. 15 टक्के व्याज दराने मिळावी, अशी तक्रारकर्ता यांची विनंती पाहता ग्राहक तक्रार दाखल केल्याच्या तारखेपासून म्हणजेच दि. 10/11/2022 पासून द.सा.द.शे. 9 टक्‍के दराने विमा रकमेवर व्‍याज मिळण्‍यास तक्रारकर्ता पात्र ठरतात.

(16)     तक्रारकर्ता यांनी मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.10,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.7,000/- रकमेची मागणी केलेली आहे. नुकसान भरपाईची रक्‍कम निश्चित करताना त्या–त्‍या परिस्थितीवर गृहीतक आधारीत असतात. असे दिसते की, विमा कंपनीने विमा दावा नामंजूर केल्यामुळे विमा रक्कम मिळविण्‍याकरिता तक्रारकर्ता यांना पाठपुरावा करावा लागलेला आहे. शिवाय, तक्रारकर्ता यांना जिल्‍हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्‍ला व सहायता, प्रकरण शुल्‍क इ. खर्चाच्‍या बाबी आहेत. तसेच ग्राहक तक्रार न्‍यायप्रविष्‍ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो. त्यामुळे तक्रारकर्ता यांना मानसिक व शारीरिक त्रास होणे नैसर्गिक व स्‍वाभाविक आहे. योग्‍य विचाराअंती मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- व तक्रार खर्चाकरिता एकत्रिरित्या रु.3,000/- मिळण्‍यास तक्रारकर्ता पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत येत आहोत.

 

(17)     ऑक्झीलियम हे विमा सल्लागार व तालुका कृषि अधिकारी हे शासकीय यंत्रणेचा भाग आहेत. वाद-तथ्ये व पुराव्यानुसार त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी असल्याचे सिध्द होत नाही.

 

(18)     उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.

 

 

आदेश

 

 

(1) ग्राहक तक्रार अंशत: मंजूर करण्‍यात येते.

(2) विरुध्‍द पक्ष क्र.1 विमा कंपनीने तक्रारकर्ता यांना रु.2,00,000/- (रुपये दोन लक्ष फक्‍त) विमा रक्‍कम द्यावी.

ग्राहक तक्रार क्र. 312/2022.

तसेच, उक्त विमा रकमेवर दि.10/11/2022 पासून संपूर्ण विमा रक्‍कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के दराने व्‍याज द्यावे.

(3) विरुध्‍द पक्ष क्र.1 विमा कंपनीने तक्रारकर्ता यांना मा‍नसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चापोटी रु.3,000/- द्यावेत.

(4) विरुध्‍द पक्ष क्र.1 विमा कंपनीने आदेश प्राप्‍तीपासून 45 दिवसाचे आत उक्त आदेशाची अंमलबजावणी करावी.

 

 

(श्री. रविंद्र शे. राठोडकर)             (श्रीमती रेखा  जाधव)                 (श्री. अमोल बा. गिराम)

             सदस्‍य                                         सदस्‍य                                            अध्यक्ष

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)

-०-

 
 
[HON'BLE MR. Amol B. Giram]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Rekha R. Jadhav]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. Ravindra S. Rathodkar]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.