जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 34/2019. तक्रार दाखल दिनांक : 12/02/2019. तक्रार निर्णय दिनांक : 21/09/2021.
कालावधी : 02 वर्षे 07 महिने 09 दिवस
विठ्ठल पिता ग्यानोबा सुगावे, वय 57 वर्षे, व्यवसाय : शेती,
रा. तळेगांव, ता. शिरुर अनंतपाळ, जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) व्यवस्थापक, महागुजरात सिडस्, 694, चंडक ले-आऊट,
गितांजली प्रेसजवळ, न्यू कॉटन मार्केट, नागपूर - 18.
(2) काबरा फर्टीलायझर्स, प्रोप्रा. महेश काबरा, वय सज्ञान,
धंदा : व्यापार, रा. कामदार रोड, लातूर, जि. लातूर.
(3) प्रसाद फर्टीलायझर्स, प्रोप्रा. बालाजी दत्तात्रय अंचितलवार,
वय सज्ञान, धंदा : व्यापार, रा. शिवनेरी गेट, लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्री. कमलाकर अ. कोठेकर, अध्यक्ष
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
मा. श्रीमती रेखा जाधव, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- धनंजय जी. मिटकरी
विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांचेकरिता विधिज्ञ :- रविकिरण सं. गिरी
विरुध्द पक्ष क्र.3 यांचेकरिता विधिज्ञ :- अमित आर. बाहेती
न्यायनिर्णय
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य यांचे द्वारा :-
तक्रारकर्त्याने प्रस्तुतची तक्रार विरुध्द पक्ष यांनी सदोषबियाणे देऊन नुकसान केल्याबद्दल विरुध्द पक्ष यांच्या विरुध्द दाखल केली आहे.
(1) तक्रारकर्त्याची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे :-
तक्रारकर्ता हा तळेगाव येथील रहिवाशी असून व्यवसायाने शेतकरी आहे. विरुध्द पक्ष क्र.1 ही बियाणे उत्पादन करणारी कंपनी असून विरुध्द पक्ष क्र.2 व 3 हे विरुध्द पक्ष क्र.1 यांचे अधिकृत विक्रेते आहेत. तक्रारकर्त्याची मौजे तळेगाव येथे गट नं. 282 मध्ये 2 हेक्टर 72 आर शेतजमीन असून त्यावर मिळणा-या उत्पन्नातून स्वत:ची व कुटुंबाची उपजीविका चालवितो. तक्रारकर्त्याने दि.22/6/2018 रोजी विरुध्द पक्ष क्र.3 यांच्या शब्दावर विश्वास ठेवून सोयाबीन डी.एस.228 च्या बॅग 4 नग 30 किलो वजनाच्या किंमत रु.9,000/- अदा करुन विकत घेतल्या. त्याबद्दल विरुध्द पक्ष क्र.3 यांनी तक्रारकर्त्यास तशा प्रकारचे बील दिले. सदर बिलात बियाण्याच्या कंपनीचे नांव, लॉट नंबर, एकूण बॅग इ.चा उल्लेख आहे. सदर बियाणे विरुध्द पक्ष क्र.1 यांनी उत्पादीत केलेले आहे.
(2) तक्रारकर्त्याने पेरणीयोग्य रान तयार करुन, जमिनीत पुरेशा ओलावा आहे, याची खात्री करुन सदरचे बियाणे खरेदी केले होते. तक्रारकर्त्याने त्याच्या मालकी असलेल्या क्षेत्र 2 हेक्टर 72 आर क्षेत्रापैकी 1 हेक्टर 12 आर क्षेत्रामध्ये इगल 335 या सोयाबीनचे बियाणे पेरणी केले व उर्वरीत 1 हेक्टर 60 आर क्षेत्रामध्ये सोयाबीन डी.एस.228 बियाण्याच्या एकरी 4 बॅग प्रमाणे पेरणी केले. सदरील क्षेत्रापैकी 1 हेक्टर 60 आर. क्षेत्राची उगवण दिसून आली नाही. म्हणून तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्र.3 यांना त्याची माहिती दिली. त्या वेळेस विरुध्द पक्ष क्र.3 यांनी विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना 8 दिवसात कळवितो, असे सांगितले. परंतु विरुध्द पक्ष यांनी काही केले नाही. म्हणून तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्र.3 यांना नुकसान भरपाई मागितली असता ती दिली नाही. या उलट विरुध्द पक्ष क्र.3 यांनी असे सांगितले की, कंपनीच्या अधिका-याचा फोन आला होता; ज्या शेतक-यांची तक्रार असेल त्याचे मुळ बील घेऊन त्यांना बियाण्याची रक्कम देऊन टाका, असे सांगून तक्रारकर्त्यास मुळ बील जमा करुन बियाण्याची किंमत घेण्यास सांगितले असता तक्रारकर्त्याने ते नाकारले.
(3) तक्रारकर्त्याने तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी दि.9/7/2018 रोजी तक्रारकर्त्याच्या शेतातील सोयाबीनची पाहणी करुन पंचनामा केला. त्यावेळी कृषि अधिकारी, प्रतिनिधी, तक्रारकर्ता, विरुध्द पक्ष क्र.2 व 3 हे हजर होते. सदर अधिका-याने असा निष्कर्ष काढला की, गट नं. 282 मध्ये एकूण मध्ये एकूण क्षेत्र 2 हेक्टर 72 आर. क्षेत्रापैकी 1 हेक्टर 60 आर. एवढ्या क्षेत्रावर सोयाबीन डी.एस.228 हे बियाणे पेरलेले आहे. त्याची उगवणक्षमता न झाल्यामुळे तक्रारकर्त्याने जी.एस.335 महाबीज सोयाबीनचे बियाणे दुबार पेरणी केलेले आहे, असा निष्कर्ष काढून शेरा मारला. तक्रारकर्त्यास सदर क्षेत्राकरिता मशागतीसाठी नांगरणी, पोखरणी, पेरणी, बियाणे खरेदी, डी.ए.पी. व सल्फर खत, गाडी भाडे इ. साठी रु.28,280/- एवढा खर्च आला आहे. तक्रारकर्त्यास 15 क्विंटल उत्पन्न 1 एकर क्षेत्रातून मिळणार होते. प्रतिक्विंटल रु.3,400/- प्रमाणे रु.2,04,000/- आणि 8 क्विंटल गुळी प्रतिक्विंटल रु.2,000/- प्रमाणे एकूण रु.16,000/-, मशागतीसाठी केलेला खर्च रु.28,280/- असे एकूण रु.2,48,280/- चे नुकसान झाले. सदर नुकसान विरुध्द पक्ष यांनी भेसळयुक्त बियाणे दिल्यामुळे झालेले आहे. म्हणून तक्रारकर्त्याने प्रस्तुतची तक्रार विरुध्द पक्ष यांच्याविरुध्द दाखल करुन अशी विनंती केली की, विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास घटना घडल्यापासून रक्कम रु.2,48,280/- 12 टक्के व्याज दराने पदरी पडेपर्यंत, शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.20,000/- व दाव्याचा खर्च रु.10,000/- द्यावा, अशी विनंती केली आहे.
(4) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी या आयोगासामोर हजर होऊन त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील बहुतांश मजकून चुकीचा व खोटा असल्यामुळे अमान्य करुन तो तक्रारकर्त्याने पुराव्यानिशी सिध्द करावा, असे कथन केले आहे. विरुध्द पक्ष यांनी असे कथन केले की, तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांच्याकडून सदर बियाणे खरेदी केले होते. सदर बियाणे विक्री होण्यापूर्वी शासन मान्यताप्राप्त प्रयोगशाळेचा बियाणे उगवणीबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच सदर बियाणे बाजारामध्ये विक्रीसाठी खुले केले जाते. तक्रारकर्त्याने बियाण्याच्या व पेरणीच्या अनुषंगाने आवश्यक असणा-या बाबीची दखल घेतली नाही. सदर बियाणे खरेदी केल्यानंतर तक्रारकर्त्याने ते बियाणे कोठे ठेवले होते, त्याचा वापर कशा प्रकारे केला, पेरणीस कोणत्या पध्दती वापरल्या, या बाबींचा विचार केल्याचे दिसून येत नाही. कारण सदर बाबीवर बियाण्याची उगवणक्षमता अवलंबून असते. तक्रारकर्त्याने तक्रारीमध्ये खोटारडेपणाचे कथन लिहून व पंचनाम्यामध्ये खाडाखोड करुन, कृषि अधिका-याशी हातमिळवणी करुन सदरचा खोटा अहवाल दाखल केला असल्यामुळे तक्रारकर्ता स्वत: त्यास जबाबदार आहे. सदर खोटी तक्रार दाखल केल्यामुळे विरुध्द पक्ष यांना मानसिक व खर्चिक स्वरुपात त्रास झाला आहे. म्हणून तक्रारकर्त्याची प्रस्तुतची तक्रार रक्कम रु.10,000/- प्रत्येकी नुकसान खर्चासह खारीज करावी, अशी विनंती विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी केली आहे.
(5) विरुध्द पक्ष क्र.3 हे या आयोगासमोर हजर होऊन त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले. विरुध्द पक्ष क्र.3 यांनी तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील बहुतांश मजकूर चुकीचा व खोटा असल्यामुळे अमान्य केला आहे. विरुध्द पक्ष क्र.3 ही बियाणे उत्पादन करणारी कंपनी नसून किरकोळ बियाणे विक्री करणारे व्यापारी आहेत. बियाणे विक्री करीत असताना विरुध्द पक्ष क्र.3 हे कंपनीकडून आलेली सिलबंद पिशवी जशाच्या तशी विक्री करतात. कोणतेही बियाणे विक्रीपूर्व शासनाने ठरवून दिलेल्या विविध चाचण्यातून व तपासणीतून योग्य ठरल्यानंतरच तशी विक्री करण्याची परवानगी मिळते. म्हणून प्रस्तुत प्रकरणातील बियाणे हे सुध्दा अशा सर्व चाचण्यातून पडताळणी करुन त्यास विक्री करण्याची परवानगी शासनाने दिली आहे. सदर प्रकरणातील तथाकथित पंचनामा हा विरुध्द पक्ष क्र.3 यांच्या समक्ष झालेला नसल्यामुळे मान्य नाही. शेतामधील उत्पन्न हे विविध गोष्टीवर अवलंबून असते. त्यामुळे त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. पंरतु तक्रारकर्त्याच्या स्वत:च्या चुकीने उगवण झालेली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्यास झालेल्या नुकसानीस विरुध्द पक्ष क्र.3 हे जबाबदार नाहीत. म्हणून तक्रारकर्त्याची प्रस्तुतची तक्रार विरुध्द पक्ष क्र.3 यांच्याविरुध्द खर्चासह खारीज करावी, अशी विनंती विरुध्द पक्ष क्र.3 यांनी केलेली आहे.
(6) तक्रारकर्त्याची तक्रार, तक्रारीसोबत दाखल केलेले कागदपत्रे, शपथपत्र आणि विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांचे लेखी म्हणणे, कागदपत्रे व शपथपत्र इ. चे या आयोगाने बारकाईने अवलोकन केले असता न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
(1) तक्रारकर्ता हा विरुध्द पक्ष यांचा ग्राहक आहे काय ? होय.
(2) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास सदोष बियाणे विक्री करुन
त्या अंतर्गत द्यावयाच्या सेवेत न्युनता ठेवली आहे काय ? नाही.
(3) तक्रारकर्ता हा तक्रारीतील अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? नाही.
(4) काय आदेश ? अंतीम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(7) मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारकर्त्याच्या व विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांच्या विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकला. तक्रारकर्त्याची तक्रार, कागदपत्रे व शपथपत्र व विरुध्द पक्ष यांचे लेखी म्हणणे, कागदपत्रे व शपथपत्र इ. चे या आयोगाने बारकाईने अवलोकन केले. तक्रारकर्त्याने दि.22/6/2018 रोजी सोयाबीन डी.एस.228 या वाणाच्या 4 बॅग प्रत्येकी 30 किलो वजनाच्या रक्कम रु.9,000/- ला विरुध्द पक्ष क्र.3 यांच्याकडून खरेदी केल्या होत्या. सदर बियाणे हे विरुध्द पक्ष क्र.1 यांनी उत्पादन केले असून विरुध्द पक्ष क्र.2 मार्फत विक्रीसाठी विरुध्द पक्ष क्र.3 यांच्याकडे दिले होते. सदर बाबीबद्दल तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांच्यामध्ये कसलाही उजर नसल्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्द पक्ष यांचा ग्राहक होतो, असे आयोगाचे मत आहे.
(8) तक्रारकर्त्याने सदर बियाणे गट नं.228 मधील 1 हेक्टर 60 आर या क्षेत्रात दि.27/6/2018 रोजी पेरल्याचे दिसून येते. सदर पेरणी करीत असताना कंपनीने सांगितलेल्या बाबींचा विचार करणे आवश्यक आहे. त्याबद्दल विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी "पीक लागवड पध्दत – सोयाबीन" या नांवाने कोणकोणत्या बाबीचा विचार सोयाबीन लागवड करताना केला पाहिजे, त्याबद्दल दस्तऐवज दाखल केला. परंतु तक्रारकर्त्याने त्या बाबीची पूर्तता केल्याचे दिसून येत नाही. सदर दस्तऐवजाचे बारकाईने अवलोकन केले असता असे दिसून येते की, ठळक वैशिष्टयै या परिशिष्टाखाली अनुक्रम क्र.3 मध्ये डी.एस.228 या सोयाबीन वाणाची वैशिष्टयै सांगितली आहेत. या उलट, तक्रारकर्त्याने तालुका तक्रार निवारण समिती क्षेत्रीय यांच्याकडे बियाणे दोषाबद्दल तक्रार करुन पंचनामा करुन अहवाल दाखल केला आहे. सदर अहवालाचे या आयोगाने अवलोकन केले असता असे दिसून येते की, विरुध्द पक्ष यांच्याकडून दि.22/6/2018 रोजी खरेदी केलेले बियाणे दि.27/6/2018 रोजी 1 हेक्टर 60 आर. क्षेत्रात पेरणी केले आणि लागलीच 9 दिवसाने म्हणजेच दि.6/7/2018 रोजी त्याच क्षेत्रात दुबार पेरणी केल्याचे निदर्शनास येते. त्याच बरोबर सदर समिती अहवालातील अनुक्रम 18 मधील समितीचा निष्कर्ष या रकान्याचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, तक्रारकर्त्याने सुरुवातीस सोयाबीन डी.एस.228 हे बियाणे पेरले होते. परंतु त्या बियाण्याची उगवण झाली नसल्यामुळे जे.एस.335 सोयाबीन महाबीज कंपनीचे दुबार पेरणी केलेले आहे. परंतु सदर निष्कर्षामध्ये विरुध्द पक्ष यांच्याकडून खरेदी केलेले सोयाबीन डी.एस.228 हे बियाणे सदोष होते, याबद्दलचा कुठलाही निष्कर्ष दिसून येत नाही. सदर अहवालावर संबंधीत अधिकारी, तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष यांच्या प्रतिनिधींच्या स्वाक्ष-या असल्याचे दिसतात. तक्रारकर्त्याने तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे पंचनाम्याची मागणी केल्याचा पुरावा दिसून येत नाही. प्रथम पेरणीनंतर रितसर पंचनामा करुनच दुबार पेरणी करणे आवश्यक होते. परंतु तक्राकर्त्याने पेरणीनंतर पंचनामा केल्याचे दिसून येते, हे संयुक्तिक वाटत नाही. सदर बियाणे सदोष होते, याबद्दलचा योग्य तो पुरावा तक्रारकर्त्याने या आयोगासमोर दाखल केलेला नाही. तक्रारकर्त्याने लागलीच दुबार पेरणी केल्यामुळे तक्रारकर्त्याचा हंगाम वाया गेला किंवा नुकसान झाले, असे म्हणणे उचित होणार नाही. म्हणजेच तक्रारकर्त्याने सोयाबीन या वाणाची पेरणी करीत असताना विरुध्द पक्ष यांनी सांगितलेल्या बाबींचा विचार न करता दुबार पेरणी केली असल्यामुळे विरुध्द पक्ष यांच्याकडून घेतलेले बियाणे सदोष होते, हे म्हणणे योग्य व संयुक्तिक होणार नाही, या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
(9) वरील सर्व बाबींचा विचार करता या आयोगास असे दिसून येते की, तक्रारकर्ता हा विरुध्द पक्ष यांचा ग्राहक आहे. तक्रारकर्त्याने सोयाबीन या वाणाची पेरणी व मशागत करीत असताना त्या अनुषंगाने असणा-या आवश्यक त्या सर्व बाबींची व विरुध्द पक्ष यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींचा विचार करुन सोयाबीन या वाणाची पेरणी करणे आवश्यक होते. परंतु तशा प्रकारचा प्रयत्न तक्राकरर्त्याने केल्याचे दिसून येत नाही. म्हणजेच विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास सदोष बियाणे विक्री करुन नुकसान केले अथवा त्या अंतर्गत सेवेत न्युनता ठेवली, ही बाब तक्रारकर्त्याने शाबीत केली नसल्यामुळे तक्रारकर्ता हा तक्रारीतील अनुतोष मिळण्यास पात्र नाही, असे या आयोगाचे मत आहे. वरील विवेचनाअंती मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी व मुद्दा क्र.2 व 3 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते आणि खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
आदेश
(1) तक्रारकर्त्याची तक्रार नामंजूर करण्यात येते.
(2) खर्चासंबंधी आदेश नाहीत.
(श्रीमती रेखा जाधव) (श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्री. कमलाकर अ. कोठेकर)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-