जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 277/2022. तक्रार दाखल दिनांक : 07/10/2022. तक्रार निर्णय दिनांक : 19/12/2023.
कालावधी : 01 वर्षे 02 महिने 12 दिवस
अनिल माणिकराव कोंबडे, वय 37 वर्षे, व्यवसाय : व्यापार,
रा. हत्ते नगर, रोड नं. 4, लातूर - 413 512. तक्रारकर्ता
विरुध्द
व्यवस्थापक, मण्ण्पुरम फायनान्स लि., चैनसुख रोड, लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष
श्रीमती रेखा जाधव, सदस्य
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- सतिश जी. पतंगे
विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- अरविंद अं. देशमुख
आदेश
श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, त्यांनी दि.2/8/2022 रोजी विरुध्द पक्ष यांच्याकडे 13 ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या तारण ठेवून रु.29,961/- कर्ज घेतले होते. त्यांचा कर्ज क्र. 0134830700025503 व ग्राहक आय.डी. क्र. 34830004281930 आहे. कर्जाची देय तारीख 30/10/2022 होती. तक्रारकर्ता हे दि.9/9/2022 रोजी कर्ज रक्कम परतफेड करण्यासाठी विरुध्द पक्ष यांच्या कार्यालयात गेले असता कार्यालय बंद होते. व्यवस्थापकाकडे फोन करुन चौकशी केली असता कर्मचा-यांचा बेमुदत संप असल्यामुळे थकीत रक्कम जमा करुन तारण सोने परत देता येणार नाही, असे सांगण्यात आले. ज्यामुळे तक्रारकर्ता यांना प्लॉट खरेदी करण्यामध्ये अडचण निर्माण झाली. अशाप्रकारे विरुध्द पक्ष यांनी सेवेमध्ये त्रुटी निर्माण केल्याचे नमूद करुन उक्त वादकथनाच्या अनुषंगाने थकीत रु.7,157/- जमा करुन घेऊन त्यांचे 13 ग्रॅम सोने परत करण्याचा; त्या रकमेवर व्याज व थकीत व्याज न आकारण्याचा; मानसिक त्रासाकरिता व ग्राहक तक्रार खर्चाकरिता प्रत्येकी रु.20,000/- व्याजासह देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.
(2) विरुध्द पक्ष यांनी अभिलेखावर लेखी निवेदनपत्र दाखल केले. त्यांनी ग्राहक तक्रारीमध्ये नमूद बहुतांश मजकूर अमान्य केला. तक्रारकर्ता यांच्या वादकथनाप्रमाणे सोने तारण व्यवहार झाल्याचे विरुध्द पक्ष यांना मान्य आहे. विरुध्द पक्ष यांचे कथन असे की, तक्रारकर्ता हे दि.29/6/2013 पासून सोने तारण कर्ज घेत आलेले आहेत. त्यांच्या कर्मचा-यांनी दि.8/9/2022 पासून बेमुदत संप केला आणि त्याची माहिती 14 दिवस अगोदर नोटीसद्वारे ग्राहकांना दिलेली होती. तक्रारकर्ता यांचा फोन आल्यानंतर कंपनीच्या ॲपवरुन कर्ज रक्कम भरावे आणि संप संपल्यानंतर सोने परत करण्यात येईल, असे सांगितलेले होते. दि.30/9/2022 रोजी संप संपुष्टात आल्यानंतर तक्रारकर्ता यांना फोन करुन सोने घेऊन जाण्यास कळविले; परंतु तक्रारकर्ता यांनी दखल घेतली नाही. विरुध्द पक्ष यांचे पुढे कथन असे की, तक्रारकर्ता यांनी दि.13/9/2022 रोजी त्याच सोन्याच्या अगंठ्यावर कर्ज रक्कम वाढवून रु.7,097/- तर दि.1/10/2022 रोजी रु.11,194/- ऑनलाईन उचललेली आहे. त्यामुळे संपामुळे त्यांच्या प्लॉट खरेदी व्यवहारात अडचण आल्याचे तक्रारकर्ता यांचे कथन खोटे आहे. त्यांनी तक्रारकर्ता यांना दोषपूर्ण सेवा दिलेली नाही आणि ग्राहक तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी, अशी विनंती केलेली आहे.
(3) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी निवेदनपत्र, अभिलेखावर दाखल कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
केल्याचे सिध्द होते काय ? होय
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? होय
असल्यास किती ? अंतिम आदेशाप्रमाणे
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(4) मुद्दा क्र. 1 ते 3 :- मुद्दा क्र.1 ते 3 परस्परपुरक असल्यामुळे त्यांचे एकत्र विवेचन करण्यात येते. प्रामुख्याने, तक्रारकर्ता यांनी दि.2/8/2022 रोजी विरुध्द पक्ष यांच्याकडून 13 ग्रॅम सोन्याच्या अंगठ्या तारण ठेवून रु.29,931/- कर्ज घेतले आणि कर्जाची देय तारीख 30/10/2022 असल्यासंबंधी उभयतांमध्ये मान्यस्थिती आहे. विरुध्द पक्ष यांच्या कथनानुसार त्यांच्या कर्मचा-यांनी दि.8/9/2022 पासून बेमुदत संप केलेला होता आणि दि.30/9/2022 रोजी संप संपल्यानंतर तक्रारकर्ता यांना फोन करुन सोने घेऊन जाण्यास कळविले असता तक्रारकर्ता यांनी दखल घेतली नाही. विरुध्द पक्ष यांचे असेही कथन की, तक्रारकर्ता यांनी दि.13/9/2022 रोजी त्याच सोन्याच्या अगंठ्यावर कर्ज रक्कम वाढवून रु.7,097/- तर दि.1/10/2022 रोजी रु.11,194/- ऑनलाईन उचललेली आहे.
(5) उभयतांचा वाद-प्रतिवाद व कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारकर्ता हे कर्ज रकमेची परतफेड करुन तारण ठेवलेल्या सोन्याच्या अंगठ्या परत स्वीकारण्यासाठी विरुध्द पक्ष यांच्या कार्यालयात गेले होते, ही मान्यस्थिती आहे. तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे तारण ठेवलेल्या सोन्याच्या अंगठ्यांवर पुनश्च: कर्ज स्वीकारले मान्य केले तरी आर्थिक व्यवहाराच्यावेळी त्यांना सोन्याच्या अंगठ्या परत मिळू शकल्या नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आमच्या मते, संपासंबंधी ग्राहकांना दिलेली कथित सूचना किंवा संपाच्या प्रक्रियेसंबंधी विरुध्द पक्ष यांचा असणारा बचाव संबंधीत ग्राहक खातेदारांना झालेल्या हानीचे निराकरण किंवा बचावाचे समर्थन करु शकत नाही. तक्रारकर्ता यांनी तारण सोन्याच्या अंगठ्यांवर पुनश्च: कर्ज स्वीकारले असले तरी त्यामुळे त्यांचा मुख्य हेतू साध्य झाला, असे ग्राह्य धरता येणार नाही. आम्ही वर नमूद केल्याप्रमाणे संपाच्या कालावधीमध्ये तक्रारकर्ता यांना तारण ठेवलेल्या सोन्याच्या अंगठ्या परत न मिळाल्यामुळे जो मानसिक त्रास सहन करावा लागला त्याकरिता तक्रारकर्ता अनुतोष मिळण्यास पात्र ठरतात. तसेच कर्ज रक्कम परतफेड करुन त्यांच्या तारण ठेवलेल्या सोने अंगठ्या ते स्वीकारु शकतात. आमच्या मते, प्रकरणानुरुप परिस्थितीजन्य गृहीतकाच्या अनुषंगाने नुकसान भरपाईची रक्कम निश्चित केली पाहिजे. सोन्याच्या अंगठ्या परत मिळण्याकरिता तक्रारकर्ता यांना विरुध्द पक्ष यांच्याकडे पाठपुरावा करावा लागलेला आहे. तसेच त्यांना जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला व सहायता, विधिज्ञांचे शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. शिवाय, ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो आणि तक्रारकर्ता यांना मानसिक त्रास होणे नैसर्गिक व स्वाभाविक आहे. योग्य विचाराअंती मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.3,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.2,000/- मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत जिल्हा आयोग येत आहे.
(6) उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना मानसिक त्रासापोटी रु.3,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चाकरिता रु.2,000/- द्यावेत.
(3) विरुध्द पक्ष यांनी प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव) (श्री. अमोल बा. गिराम)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-