जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 16/2021. तक्रार दाखल दिनांक : 13/01/2021. तक्रार निर्णय दिनांक : 30/08/2022.
कालावधी : 01 वर्षे 07 महिने 17 दिवस
सौ. विजया यशवंत टाळे, वय 43 वर्षे,
व्यवसाय : घरकाम, रा. कामखेडा, ता. रेणापूर, जि. लातूर. तक्रारकर्ती
विरुध्द
(1) व्यवस्थापक, भारतीय जीवन बीमा निगम, मंडल कार्यालय, औरंगाबाद.
(2) व्यवस्थापक, एल.आय.सी. ऑफ इंडिया, जीवन ज्योती,
नांदेड रोड, अहमदपूर, ता. अहमदपूर, जि. लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ती यांचेकरिता विधिज्ञ :- एम्.बी. गुरमे
विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- सतिश जी. दिवाण
आदेश
श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी आहे की, त्यांचा मुलगा महेश यशवंत टाळे (यापुढे "विमाधारक महेश") यांच्या नांवे विरुध्द पक्ष क्र.2 (यापुढे विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना "बीमा निगम" संबोधण्यात येते.) यांच्याकडून दि.27/10/2015 रोजी रु.3,00,000/- विमा संरक्षण देणारे विमापत्र घेतले होते. विमापत्र क्रमांक 988676570 असून Plan & Policy Term 815, 16-16 आहे. विमा जोखीम कालावधी 16 वर्षाचा होता. विमापत्राकरिता अपघाती लाभासह वार्षिक रु.21,341/- विमा हप्ता होता.
(2) तक्रारकर्ती यांचे पुढे असे कथन आहे की, विमाधारक महेश हे शिक्षण घेत होते. दि.27/10/2015 पासून तक्रारकर्ती यांनी बीमा निगमकडे 5 वार्षिक हप्त्यांचा भरणा केला आहे. दि.29/11/2019 रोजी त्यांनी हप्ता भरणा केलेला होता आणि विमापत्र अखंड सुरु होते.
(3) तक्रारकर्ती यांचे पुढे कथन असे की, दि.20/3/2020 रोजी विमाधारक महेश यांचा अपघाती मृत्यू झाला. तक्रारकर्ती यांनी विमा रक्कम मिळण्याकरिता अर्ज सादर केला. त्यानंतर त्यांना रु.6,00,000/- विमा रक्कम मिळणे आवश्यक असताना दि.1/7/2020 रोजी त्यांच्या खात्यामध्ये रु.84,164/- जमा करण्यात आले. विधिज्ञांमार्फत सूचनापत्र पाठवून उर्वरीत रक्कम देण्याकरिता कळविले असता बीमा निगमने दखल घेतली नाही. उक्त वादकथनाच्या अनुषंगाने उर्वरीत रु.5,15,836/-; मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.50,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.10,000/- देण्याचा बीमा निगमला आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ती यांनी केलेली आहे.
(4) बीमा निगमने लेखी निवेदनपत्र सादर केले आहे. त्यांनी ग्राहक तक्रारीतील विधाने अमान्य केली आहेत. त्यांचे कथन असे की, विमाधारक महेश यांनी त्यांच्याकडून विमापत्र क्र. 988676570 घेतले होते. दि.29/11/2019 पर्यंत विमापत्राचे हप्ते भरण्यात आलेले आहेत. तक्रारकर्ती यांनी विमापत्राचा दि.27/10/2019 चा हप्ता वेळेत दिलेला नाही. विमापत्राच्या अट व शर्त क्र.3 अन्वये ऑक्टोबर 2019 चा विमा हप्ता वाढीव कालावधीसह दि.27/11/2019 पर्यंत देय होता. परंतु विमा हप्ता दि.29/11/2019 रोजी भरणा केला आणि परिणामी विमापत्र दि.29/11/2019 रोजी पुनर्जीवित करण्यात आले. कागदपत्रांचे अवलोकन केले असता विमाधारक महेश यांनी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे.
(5) बीमा निगमचे पुढे कथन असे की, वार्षिक हप्ता रु.21,341/- होता. जमा हप्त्यांची एकूण रक्कम रु.1,06,505/- होते आणि त्यातून अपघात विमा हप्ता रु.1,500/- वजा केले असता रु.1,05,205/- च्या 80 टक्के देय रक्कम रु.84,164/- तक्रारकर्ती यांच्या खात्यामध्ये दि.30/6/2020 रोजी जमा करण्यात आले. त्यांची त्रुटी नसल्यामुळे ग्राहक तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती केलेली आहे.
(6) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी निवेदनपत्र, उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) बीमा निगमने तक्रारकर्ती यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
केल्याचे सिध्द होते काय ? नाही
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ती अनुतोषास पात्र आहेत काय ? नाही
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(7) मुद्दा क्र. 1 ते 3 :- मुद्दा क्र.1 ते 3 हे एकमेकांशी पुरक असल्यामुळे एकत्र विवेचन करण्यात येते. तक्रारकर्ती यांनी विमाधारक महेश यांचेकरिता बीमा निगमकडून विमापत्र क्र. 988676570 घेतले होते, ही बाब विवादीत नाही. विमापत्राचे दि.29/11/2019 पर्यंत हप्ते भरण्यात आलेले आहेत, हे विवादीत नाही. विमाधारक महेश यांचा मृत्यू झाला, हे विवादीत नाही. तक्रारकर्ती यांनी विमा रक्कम मिळण्याकरिता विमा दावा सादर केला आणि बीमा निगमने त्यांच्या खात्यामध्ये रु.84,164/- जमा केले, हे विवादीत नाही.
(8) उभयतांचा वाद-प्रतिवाद पाहता बीमा निगमने रु.6,00,000/- विमा रकमेऐवजी अपूर्ण विमा रक्कम दिली, असा तक्रारकर्ती यांचा वाद आहे. उलटपक्षी, बीमा निगमचा प्रतिवाद असा की, विहीत मुदतीत विमा हप्त्याचा भरणा न केल्यामुळे विमापत्र पुनर्जीवित करण्यात आले आणि विमाधारक महेश यांनी आत्महत्या केलेली असून विमापत्राच्या अट व शर्त क्र.7 अंतर्गत त्यांनी योग्य विमा रक्कम अदा केलेली आहे.
(9) वादविषयाच्या अनुषंगाने दखल घेतली असता सवलत कालावधीसह दि.27/11/2019 रोजीपर्यंत विमा हप्ता देय असताना तो दि.29/11/2019 रोजी भरण्यात आला, ही मान्य स्थिती आहे. विमापत्राच्या शर्त क्र.2 अन्वये वार्षिक हप्ता असणा-या विमापत्राकरिता विमा हप्ता तारखेनंतर 30 दिवस सवलत कालावधी दिसून येतो आणि सवलत कालावधीमध्ये विमा हप्त्याचा भरणा न झाल्यास विमापत्र व्यपगत होते. शर्त क्र.3 अन्वये सवलत कालावधीमध्ये विमा हप्ता भरणा केला नसल्यास विमाधारकाच्या जीवित कालावधीमध्ये त्याचे विमापत्र पुनर्जीवित करता येते; परंतु प्रथम अदेय विमा हप्त्यानंतर सलग 2 वर्षे व विमापत्र संपुष्टात येण्यापूर्वी सातत्यपूर्ण विमाक्षमतेसंबंधी पुराव्याच्या समाधानाअंती उर्वरीत देय हप्त्यांवर व्याज लावण्यात येईल आणि त्याबाबत बीमा निगमला निर्णय घेण्याचा अधिकार असेल.
(10) बीमा निगमचे कथन असे की, तक्रारकर्ती यांनी विमापत्राचा देय विमा हप्ता विहीत मुदतीनंतर म्हणजेच दि.29/11/2019 रोजी विमा हप्ता भरणा केला आणि परिणामी विमापत्र दि.29/11/2019 रोजी पुनर्जीवित करण्यात आले. विमापत्राच्या तरतुदीनुसार विमापत्र पुनर्जीवित झाल्याचे स्पष्ट होते आणि विमापत्र नियमीत स्थितीमध्ये आले होते. अशा स्थितीत प्रश्न निर्माण होतो की, बीमा निगमने विमापत्राच्या शर्त क्र.7 अन्वये विमा रकमेसंबंधी निर्धारण करुन तक्रारकर्ती यांना अदा केलेली रक्कम योग्य ठरते काय ? किंवा कसे ? उक्त प्रश्नाची दखल घेतली असता विमापत्रातील तरतूद क्र. 7 खालीलप्रमाणे दिसून येते.
7. Suicide : This policy shall be void
i) If the Life Assured (whether sane or insane) commits suicide at any time within 12 months from the date of commencement of risk, the Corporation will not entertain any claim under this policy except to the extent of 80% of the premiums paid excluding any taxes, extra premium and rider premiums, if any, provided the policy is inforce.
ii) If the Life Assured (whether sane or insane) commits suicide within 12 months from the date of revival, an amount which is higher of 80% of the premiums paid till the date of death (excluding any taxes, extra premium and rider premiums, if any,) or the surrender value, provided the policy is inforce, shall be payable. The Corporation will not entertain any other claim under this policy.
(11) उक्त कलम (ii) चे अवलोकन केले असता विमाधारकाने पुनरुज्जीवनाच्या तारखेपासून 12 महिन्यांच्या आत आत्महत्या केलेली असल्यास मृत्यूच्या तारखेपर्यंत भरलेल्या हप्त्यांच्या 80 टक्केपेक्षा जास्त रक्कम (कोणतेही कर, अतिरिक्त हप्ता आणि वैकल्पीक (rider) हप्ता वगळून, जर कोणतेही,) किंवा आत्मसमर्पण मूल्य, विमापत्र अंमलात असल्यास देय असेल आणि त्याशिवाय बीमा निगम अन्य कोणत्याही दाव्याची दखल घेणार नाही. प्रस्तुत प्रकरणामध्ये विमा हप्ता भरण्याच्या अंतीम व सवलत तारखेनंतर विमा हप्ता भरण्यात आलेला आहे. त्यामुळे विमापत्र व्यपगत होऊन दि.29/11/2019 रोजी पुनर्जिवीत करण्यात आले. त्यानंतर विमाधारक महेश यांचा दि.20/3/2020 रोजी मृत्यू झालेला असून त्यांचा मृत्यू आत्महत्या होती. विमापत्राच्या पुनरुज्जीवनानंतर 12 महिन्याच्या आत विमाधारक महेश यांनी आत्महत्या केलेली असल्यामुळे उक्त कलम (ii) अन्वये बीमा निगमने वार्षिक हप्ता रु.21,341/- याप्रमाणे जमा हप्त्यांची रु.1,06,505/- रकमेपैकी अपघात विमा हप्ता रु.1,500/- वजा करुन रु.1,05,205/- च्या 80 टक्के देय रक्कम रु.84,164/- तक्रारकर्ती यांच्या खात्यामध्ये जमा केलेली आहे. विमा हा संविदेशी निगडीत विषय आहे. विमापत्रातील तरतुदीनुसार विमा रक्कम अदा करण्यात आलेली असल्यामुळे बीमा निगमचे प्रस्तुत कृत्य चूक किंवा अनुचित दिसून येत नाही. त्या अनुषंगाने बीमा निगमने तक्रारकर्ती यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होत नसल्यामुळे तक्रारकर्ती अनुतोषास पात्र ठरत नाहीत. उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी देऊन खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार नामंजूर करण्यात येते.
(2) खर्चासंबंधी आदेश नाहीत.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-