जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 127/2021. तक्रार दाखल दिनांक : 14/06/2021 तक्रार निर्णय दिनांक : 08/11/2021.
कालावधी : 00 वर्षे 04 महिने 25 दिवस
सुनिता गोविंद मुळे, वय 45 वर्षे, व्यवसाय : घरकाम व शेती,
रा. उमरगा (हाडगा), ता. निलंगा, जि. लातूर. तक्रारकर्ती
विरुध्द
(1) व्यवस्थापक, दी ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लि., विभागीय कार्यालय
नं.3, 321/ए/2, जवाहरलाल नेहरु रोड, ओसवाल बंधु समाज
बिल्डींग, दुसरा माळा, पुणे - 411 042.
(2) व्यवस्थापक, जयका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा.लि., दुसरा मजला,
जयका बिल्डींग, कमर्शिअल रोड, सिव्हील लाईन्स, नागपूर-440 001.
(3) व्यवस्थापक, दी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि.,
सिंध टॉकीजसमोर, सुभाष चौक, लातूर.
(4) तालुका कृषि अधिकारी, कृषि कार्यालय, निलंगा, जि. लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्री. कमलाकर अ. कोठेकर, अध्यक्ष
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
मा. श्रीमती रेखा जाधव, सदस्य
तक्रारकर्ती यांचेकरिता विधिज्ञ :- ए.एम.के. पटेल
विरुध्द पक्ष क्र.1 व 3 यांचेकरिता विधिज्ञ :- एस.जी. डोईजोडे
विरुध्द पक्ष क्र.2 यांचेकरिता विधिज्ञ :- दिपक एम. परांजपे
विरुध्द पक्ष क्र.4 स्वत:
न्यायनिर्णय
मा. श्री. कमलाकर अ. कोठेकर, अध्यक्ष यांचे द्वारा (न्यायकक्षामध्ये) :-
(1) या प्रकरणामध्ये तक्रारकर्तीच्या मुलाचा मृत्यू झाला; जो शेतकरी होता. त्या संबंधाने त्याची वारस आई हिने विमा रक्कम मिळण्यासाठी ही तक्रार सादर केली. विरुध्द पक्षांनी हजर होऊन आपला जबाबही दिला. परंतु दरम्यानच्या काळात असे दिसते की, मुळ विमा रक्कम रु.2,00,000/- विरुध्द पक्ष क्र.1 व 3 विमा कंपनीने तक्रारकर्तीच्या खात्यात जमा केली. त्यामुळे आता मुळ विमा रकमेबद्दलचा वाद शिल्लक नाही. युक्तिवादाच्या वेळी तक्रारकर्तीच्या वकिलांनी असे निवेदन केले की, त्यांनी संपूर्ण कागदपत्रांसह विमा प्रस्ताव मुदतीत सादर केला होता. परंतु विरुध्द पक्षांनी तो नियत कालावधीत पूर्ण केला नाही आणि म्हणून विरुध्द पक्षांनी त्यांना परिपत्रकाप्रमाणे व्याज, खर्च इ. द्यावे. याबद्दल विरुध्द पक्ष क्र.1 व 3 तर्फे युक्तिवादाच्यावेळी काही कागदपत्रे सादर करण्यात आली व असे निवेदन करण्यात आले की, प्रस्तावामध्ये काही त्रुटी होत्या, त्या त्रुटींची पूर्तता झाल्यानंतर विमा मंजूर करुन रक्कम तक्रारकर्तीला दिलेली आहे.
(2) तक्रारकर्तीने आपल्या तक्रारीसोबत जे शासकीय परिपत्रक सादर केले आहे, त्यानुसार तक्रारकर्ती असे म्हणते की, त्यांना द.सा.द.शे. 15 टक्के दराने व्याज देण्यात यावे. कारण विमा कंपनीने मुदतीत पूर्तता केलेली नाही. विमा कंपनीने जी कागदपत्रे सादर केली, त्यावरुन असे दिसते की, जरी प्रस्ताव आलेला होता तरी त्यामध्ये काही त्रुटी होत्या व या त्रुटी जिल्हा कृषि अधिका-यांमार्फत पत्रव्यवहार होऊन व पूर्तता होऊन नंतर विमा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. असे दिसते की, या पत्रव्यवहारामध्ये व पूर्ततेमध्ये काही काळ गेला. जरी तक्रारकर्तीचे निवेदन असे असले की तिला 15 टक्के दराने व्याज मिळावे, तरी एकंदरीत पुरावा व निवेदन विचारात घेता मंचाचे असे मत आहे की, त्रुटींची पूर्तता व त्याबद्दलचा पत्रव्यवहार यामध्ये काही काळ गेला आणि म्हणून विमा कंपनीला सरसकट या कालावधीसाठी 15 टक्के व्याज द्यावयास सांगणे योग्य नाही. परंतु तक्रारकर्तीने तक्रार केल्यानंतरच तिला रक्कम मिळालेली आहे. अशा सर्व बाबी विचारात घेता तक्रारकर्तीला झालेला शारीरिक व मानसिक त्रास, त्याचे तथाकथित व्याज व कार्यवाहीचा खर्च अशा बाबींसाठी काही रक्कम तक्रारकर्तीला देणे योग्य ठरेल.
आदेश
(1) तक्रार अशंत: मंजूर.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 व 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारकर्तीला शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व या कार्यवाहीचा खर्च रु.2,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत द्यावा.
(3) उभय पक्षकारांना या निवाड्यांच्या प्रती विनामुल्य त्वरीत देण्यात याव्यात.
(श्रीमती रेखा जाधव) (श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्री. कमलाकर अ. कोठेकर)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-
(संविक/श्रु/81121)