जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 121/2020. तक्रार दाखल दिनांक : 15/09/2020. तक्रार निर्णय दिनांक : 26/08/2021.
कालावधी : 00 वर्षे 11 महिने 11 दिवस
व्यंकटराव नामदेवराव पाटील, वय 72 वर्षे, व्यवसाय : शेती,
रा. मु.पो. अव्वलकोंडा, ता. उदगीर, जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) व्यवस्थापक, तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ मं.,
उदगीर, मार्केट यार्ड (मोंढा), उदगीर, ता. उदगीर, जि. लातूर.
(2) व्यवस्थापक, महागुजरात सीडस् प्रा. लि., 694, चांडक ले-आऊट,
गीतांजली ड्रेसजवळ, हॉटेल सेंचुरीच्या मागे, न्यू कॉटन मार्केट,
नागपूर – 18. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्री. कमलाकर अ. कोठेकर, अध्यक्ष
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
मा. श्रीमती रेखा जाधव, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ : अनिल के. जवळकर
विरुध्द पक्ष क्र.१ व २ यांचेकरिता विधिज्ञ :- रवीकिरण एस. गिरी
न्यायनिर्णय
मा. श्री. कमलाकर अ. कोठेकर, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्त्याने रु.43,250/- खर्च इत्यादी भरपाईपोटी मिळावेत, यासाठी ही तक्रार सादर केली आहे. त्याचे संक्षिप्त निवेदन असे की, अव्वलकोंडा, ता. उदगीर येथील गट नं. 16 व 17/01 मध्ये त्याची शेतजमीन आहे. 2020 साली या जमिनीमध्ये भुईमुगाचे पीक घेण्यासाठी त्याने विरुध्द पक्ष क्र.2 कंपनीचे बियाणे विरुध्द पक्ष क्र.1 मार्फत खरेदी केले. त्यावेळी त्याला असे सांगण्यात आले की, एकरी 30 ते 32 क्विंटल इतका उतार येईल. बियाण्याची उगवणक्षमता किमान 70 टक्के असेल. त्याप्रमाणे रु.4,800/- देऊन त्याने 20 किलोच्या 2 बॅग खरेदी केल्या. पेरणी करण्यापूर्वी असे आढळून आले की, बॅगमध्ये साधारणत: 2 किलो बियाणे लहान आहे. ते वेचून काढून त्याने 40 किलोपैकी 36 किलो बियाणे पेरले. दि.13/2/2020 रोजी 1 एकर क्षेत्रामध्ये 36 किलो बियाणे पेरल्यावर 8-10 दिवसांनी असे लक्षात आले की, उगवण अत्यंत तुरळक झालेली आहे. बियाण्याची उगवण योग्य प्रतीची नाही. त्याने विरुध्द पक्ष क्र.1 ला सूचित केले असता विरुध्द पक्ष क्र.1 ने सांगितले की, 2-4 दिवस थांबा. परंतु तरीही योग्य उगवण आढळून आली नाही. विरुध्द पक्षक्र.1 कडे तक्रार केली असता त्याने सांगितले की, इतर काही लोकांच्या देखील तक्रारी आलेल्या आहेत. तो विरुध्द पक्ष क्र.2 ला सूचित करेल. पुन्हा दुसरे बियाणे अथवा बियाण्याची किंमत व खताची किंमत परत घ्या, असे सांगितले. काही शेतक-यांनी रक्कम परत घेतल्याचे त्यांनी सांगितले. परंतु तक्रारकर्त्याने मला रक्कम नको; माझा हंगाम वाया गेला, त्याची नुकसान भरपाई द्या, असे म्हटले. त्यामुळे विरुध्द पक्ष क्र.1 ने नुकसान भरपाई पाहिजे असल्यास कृषि अधिका-यांकडे तक्रार करा, असे सूचित केले. त्याप्रमाणे कृषि अधिकारी, उदगीर यांच्याकडे तक्रार केली असता विरुध्द पक्षाला सूचना देऊन जागेवर पाहणी केली. फोटो घेतले. त्यांच्या अहवालानुसार उगवण केवळ 14.14 एवढीच आढळून आली. अशाप्रकारे विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला अयोग्य प्रतीचे बियाणे पुरवून चुकीची व दोषपूर्ण सेवा पुरविली.
(2) 2020 साली भुईमुगाला रु.5,100/- प्रतिक्विंटल असा भाव होता. विरुध्द पक्षाच्या चुकीमुळे अपेक्षीत उत्पन्न मिळू शकले नाही. 1 एकर क्षेत्रातून तक्रारकर्त्याला रु.51,000/- उत्पन्न मिळाले असते. किमान 10 क्विंटल उत्पन्न झाले असते. त्याने बियाण्यासाठी रु.4,800/- व पेरणी, खते इत्यादीसाठी रु.2,950/- असा एकूण रु.7,550/- खर्च केला. तो वजा जाता रु.43,250/- चे त्याचे निव्वळ नुकसान झाले आणि म्हणून अशी नुकसान भरपाई 15 टक्के व्याजासह मिळावी; शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.20,000/- मिळावे व खर्चासाठी रु.10,000/- मिळावेत, अशी तक्रार त्याने सादर केली आहे.
(3) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी आपल्या उत्तरपत्रात संपूर्ण तक्रारीतील मजकूर फेटाळून असे निवेदन केले आहे की, बियाणे ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरल्यामुळे पुल्लीने दबावामुळे बियाणे पेरणीयोग्य राहीले नाही. त्यामुळे उगवण कमी झाली. सदरचे बियाणे बैलाच्या सहाय्याने पेरणी करावे व हाताने टोकन पध्दतीने लावावे, अशी शिफारस केलेली आहे. त्याच प्रमाणे बियाणे लागवडीचा कालावधी जानेवारीच्या 15 तारखेपर्यंत थंडीचे प्रमाण पाहून आहे. तक्रारकर्त्याने फेब्रुवारी महिन्यात उशिरा लागवड केली. त्याने योग्य मशागत केली नाही. बियाण्यासोबत जे औषधे वापरणे आवश्यक होते, ते देखील वापरले नाही. त्याच्या स्वत:च्या चुकीमुळे नीट उगवण झाली नाही. कृषि अधिकारी यांनी विरुध्द पक्षाला सूचना न देता त्याच्या माघारी संगनमत करुन चुकीचा पाहणी अहवाल तयार केला. त्याच प्रमाणे ते बियाणे तपासणीसाठी पाठविणे आवश्यक होते. तशी तपासणी तक्रारकर्त्याने करुन घेतली नाही. अपेक्षीत उत्पन्न चूक दाखविले आहे. खर्च देखील चूक दाखविला आहे. विरुध्द पक्ष क्र.2 ही रजिस्टर्ड कंपनी असून लॅबचा अहवाल व शासन मान्यतेनुसारच ते बियाणे विक्री करतात. त्यावेळी उगवण क्षमतेची तपासणी झालेली असते. तक्रारकर्त्याच्या चुकीमुळे उगवणक्षमतेवर वाईट परिणाम झाला. शिफारशीप्रमाणे खते व औषधे वापरली नाहीत. बावीस्टन बुरशीनाशक योग्य त्या प्रमाणात वापरुन बियाणे पेरणे आवश्यक होते. तक्रारकर्त्याने ते केले नाही. नीट मशागत, हवामान, जमिनीचा पोत इ. घटक देखील गुणवत्तेवर परिणाम करतात. खोटी व चुकीची तक्रार दाखल केलेली आहे. ती फेटाळण्यात यावी व विरुध्द पक्षाला रु.10,000/- नुकसान भरपाई द्यावी.
(4) उभय बाजुंचे निवेदन, उपलब्ध पुरावे इ. विचारात घेता निकालासाठी मी खालील मुद्दे निश्चित करतो व त्यावरील माझा निर्णय कारणमीमांसेसह पुढीलप्रमाणे देत आहे.
मुद्दे उत्तर
(1) विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला चुकीची व दोषपूर्ण सेवा दिली आहे काय ? होय.
(2) विरुध्द पक्षाकडून तक्रारकर्त्याला काही रक्कम दिली जाऊ शकते काय ? होय;
अंतीम आदेशाप्रमाणे
(3) काय आदेश ? अंतीम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(5) मुद्दा क्र. 1 ते 3 :- ज्या बाबीबद्दल विशेष वाद नाही त्या अशा की, तक्रारकर्त्याने आपल्या शेतात पेरणी करण्यासाठी म्हणून भुईमुगाचे बियाणे विरुध्द पक्ष क्र.1 मार्फत खरेदी केले. ते बियाणे विरुध्द पक्ष क्र.2 कंपनीचे होते. या बियाण्याची तक्रारकर्त्याने आपल्या शेतात पेरणी केली. उगवण नीट झाली नाही म्हणून कृषि अधिका-यांकडे देखील तक्रार केली.
(6) याबाबत विरुध्द पक्षाचे म्हणणे असे की, तक्रारकर्त्याने ट्रॅक्टरने पेरणी केल्यामुळे बियाण्याचे नुकसान झाले. टोकन पध्दतीने अथवा बैलाच्या सहाय्याने पेरणी करण्यासाठी शिफारस केलेली होती. असे जरी विरुध्द पक्षांनी म्हटले असले तरी तशा शिफारशीबाबत पुरेसा सुस्पष्ट पुरावा विरुध्द पक्षामार्फत आयोगासमक्ष सादर करण्यात आलेला नाही. त्यामुळे हे बियाणे टोकन पध्दतीने अथवा बैलाच्या सहाय्यानेच पेरणे आवश्यक होते, हे विरुध्द पक्षाचे म्हणणे ग्राह्य धरता येणार नाही.
(7) विरुध्द पक्षाचे असेही म्हणणे आहे की, तक्रारकर्त्याने बियाण्याची पेरणी करताना बुरशीनाशक, खते इ. योग्य प्रकारे वापरले नाही. त्यासंबंधी विरुध्द पक्षातर्फे विशेषत: असा पुरावा सादर करण्यात आलेला नाही. मात्र तक्रारकर्त्याने जो पुरावा सादर केला की, त्यामध्ये असा स्पष्ट उल्लेख आहे की, तक्रारकर्त्याने पेरणी करताना सर्व योग्य ती काळजी घेतली होती. आपल्या शपथपत्रात त्याने असे म्हटले आहे की, त्याने शास्त्रोक्त पध्दतीने पेरणी केली. योग्य ती मशागत देखील केली. परंतु बियाणे कमी प्रतीचे असल्यामुळे उगवण कमी झाली. बुरशीनाशकाबाबत विशेष शिफारस केलेली नव्हती. असे बुरशीनाशक हाताळण्याबाबत लायसन इ. परवानगी विरुध्द पक्षाकडे नाही. बुरशीनाशक योग्य होते किंवा नाही, याबाबत पुरावा नाही. विरुध्द पक्षातर्फे दिलीप भारदवाडकर यांचे शपथपत्र उत्तरपत्रासोबतच सादर करण्यात आलेले आहे. ज्याच्या उत्तरपत्रातील नमूद सर्व बाबींचा उल्लेख केला आहे. परंतु त्यानंतर पुराव्याच्या वेळी इतर शपथपत्र दिलेले नाही.
(8) या प्रकरणात विरुध्द पक्षातर्फे असेही निवेदन करण्यात आले की, तक्रारकर्त्याने ज्या शेतात भुईमुगाची पेरणी केली, त्याठिकाणी पाण्याची सोय नव्हती. परंतु तक्रारकर्त्याने जेव्हा पेरणी केली, त्याबाबतचा 7/12 चा उतारा त्याने सादर केलेला आहे. त्या उता-यात ऊसासारखे पीक देखील दर्शविलेले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पाण्याची सोय नव्हती, असे संयुक्तिक ठरत नाही. हंगाम व पेरणी काळाबाबत असे दिसते की, खरेदीनंतर काही दिवसातच पेरणी केली आहे.
(9) विरुध्द पक्षाचे असेही म्हणणे आहे की, तक्रारकर्त्याने खर्च केलेली रक्कम चुक दाखविलेली आहे. परंतु याबाबत विरुध्द पक्षाने सुस्पष्ट पुरेसा पुरावा सादर केलेला नाही. या उलट ज्याने स्वत: अर्ज केला, त्याने आपल्या पुराव्याच्या शपथपत्रात खर्चाचा तपशील दिलेला आहे. मेहनत-मशागतीचा खर्च रु.2,950/- दाखविलेला आहे व बियाण्याचा खर्च रु..4,800/- दाखविला आहे; जो संयुक्तिक वाटतो. एकूण खर्च रु.7,550/- दर्शविलेला असून तो योग्य वाटतो.
(10) तक्रारकर्त्याने बियाणे खरेदी केले. त्याची नीट उगवण झाली नाही. या संबंधाने तक्रारकर्त्याने काही निवाड्यांचा हवाला दिला आहे. 2017 (2) सी.पी.आर. 645 (एन.सी.) ‘कांता कांथा राव /विरुध्द/ वाय. सूर्य नारायण’ या निवाड्याचा हवाला देऊन असे नमूद करण्यात आले की, तक्रारकर्त्याने बियाण्याचे सॅम्पल जरी तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले नाही तरी त्याबद्दल तक्रारकर्त्याच्या विरुध्द मत बनवणे योग्य ठरणार नाही. ‘सिंजेटा इंडिया लि. /विरुध्द/ टी. सलन्मा’ 2017 (3) सी.पी.आर. (एन.सी.) चा हवाला देऊन असे म्हटले आहे की, बियाणे कमी प्रतीचे होते, असा निष्कर्ष शास्त्रोक्त अहवालावरुन काढला जाऊ शकतो. आपल्या प्रकरणात तसा विशेष शास्त्रीय अहवाल सादर करण्यात आलेला नाही. फक्त कृषि अधिका-यांचा स्थळ पाहणी अहवाल सादर करण्यात आलेला आहे. 1 (2012) सी.पी.जे. 1 (एस.सी.) नॅशनल सिडस् कार्पोरेशन लि. /विरुध्द/ एम. मधुसुदन रेड्डी’ या प्रकरणाचा हवाला देण्यात आला आहे. त्याच प्रमाणे 2019 (1) सी.पी.आर. 858 (एन.सी.) ‘महिंद्रा अॅन्ड महिंद्रा लि. ट्रॅक्टर डिव्हीजन /विरुध्द/ नंदलाल’ या प्रकरणाचाही हवाला देण्यात आला आहे. उपरीनिर्दिष्ठ प्रकरणांचा हवाला देऊन तक्रारकर्त्याने असे नमूद केले आहे की, बियाण्यामध्ये दोष नव्हता, हे सिध्द करण्याची जबाबदारी विरुध्द पक्षाची आहे. कारण बियाणे कंपनीकडे संबंधीत तज्ञ मंडळी उपलब्ध असू शकतात. 2018 एन.सी.जे. 705 (एन.सी.) ‘इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्सको-ऑपरेटीव्ह लि. /विरुध्द/ विजय कुमार’ या प्रकरणाचा देखील हवाला देण्यात आलेला आहे. वरील सर्व प्रकरणांमध्ये निर्दिष्ठ तत्वांचा विचार करुन आपल्या प्रकरणात असा निष्कर्ष काढला जाऊ शकतो की, विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्याला कमी प्रतीचे बियाणे पुरवून चुकीची व दोषपूर्ण सेवा पुरविली. बियाणे कमी प्रतीचे असल्यामुळे उगवण नीट झाली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याचे नुकसान झाले.
(11) तक्रारकर्त्याने 1 एकरात बियाण्याची पेरणी केली. त्याच्या म्हणण्यानुसार त्याला 10 क्विंटल उत्पन्न निघू शकले असते. परंतु पुराव्यावरुन असे दिसते की, खरेदी केलेले संपूर्ण बियाणे पेरले नाही. जे बियाणे बारीक होते व त्याला कनिष्ठ प्रतीचे वाटले, ते 2 किलो बियाणे त्याने पेरले नाही. त्याच प्रमाणे त्या बियाण्याची 100 टक्के उगवण अपेक्षीत नव्हती. 70 टक्के उगवण झाली असती, असे तक्रारकर्त्याचेच म्हणणे आहे. तक्रारकर्त्याने जे कागदपत्रे सादर केली, त्यावरुन 14 टक्के उगवण झाली होती. अशा सर्व बाबी विचारात घेता 10 क्विंटल उत्पन्न निघाले असते, हे ग्राह्य वाटत नाही. एकंदरीत पुराव्याचा सारासार विचार करता 7 क्विंटल उत्पन्न निघाले असते, असे समजण्यास पुरेसा वाव आहे.
(12) संबंधीत काळात भुईमुगाला काय भाव होता, याबद्दल तक्रारकर्त्याने उतारा दाखल केला आहे. ज्यात असे दिसते की, भुईमुगाला जास्तीत जास्त रु.5,100/- व कमीतकमी रु.4,350/- असा भाव होता. या दोन्हीच्या दरम्यान भाव जरी आपण स्वीकारला तरी माझ्या मते रु.4,600/- भाव प्रतिक्विंटल योग्य ठरु शकतो. या दराने 7 क्विंटलचे रु.32,200/- होतात. यामधून तक्रारकर्त्याने एकूण खर्च केलेली रक्कम रु.7,550/- वजा जाता रु.24,650/- हा त्याचा निव्वळ नुकसानीचा आकडा ठरतो. एवढी नुकसान भरपाई विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला देणे न्याय्य व संयुक्तिक वाटते. त्याच बरोबर कार्यवाहीसाठीचा खर्च, शारीरिक व मानसिक त्रासापोटी सुध्दा काही रक्कम दिली जाऊ शकते. म्हणून मुद्दे त्याप्रमाणे निर्णीत करुन खालीलप्रमाणे आदेश करतो.
ग्राहक तक्रार क्र. 121/2020.
आदेश
(1) तक्रार अशंत: मंजूर.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारकर्त्याला या आदेशापासून 30 दिवसाच्या आत एकूण नुकसान भरपाईची रक्कम रु.24,650/- अदा करावी.
(3) ही रक्कम या मुदतीत अदा न केल्यास विरुध्द पक्षांना तक्रारकर्त्याला या रकमेवर द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज तक्रार दाखल तारखेपासून द्यावे लागेल.
(4) विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्याला शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व खर्चापोटी रु.3,000/- द्यावेत.
(5) उभय पक्षकारांना या निवाड्यांच्या प्रती विनामुल्य त्वरीत देण्यात याव्यात.
(श्रीमती रेखा जाधव) (श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्री. कमलाकर अ. कोठेकर)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-