जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 190/2023. तक्रार नोंदणी दिनांक : 23/08/2023.
तक्रार दाखल दिनांक : 24/08/2023. तक्रार निर्णय दिनांक : 27/05/2024.
कालावधी : 00 वर्षे 09 महिने 04 दिवस
लक्ष्मण पि. वसंतराव कांबळे, वय 42 वर्षे,
व्यवसाय : व्यापार, रा. बाबासाहेब आंबेडकर चौक,
औराद शाहजनी, ता. निलंगा, जि. लातूर. :- तक्रारकर्ता
विरुध्द
(1) व्यवस्थापक, जय महेश मल्टीस्टेट व्हेईकल सर्व्हीसेस
को-ऑप. सोसायटी लि., पुणे, कार्यालय धारुर रोड,
करवा पेट्रोल पंपासमोर, माजलगाव, ता. माजलगाव, जि. बीड.
(2) व्यवस्थापक, जय महेश मल्टीस्टेट व्हेईकल सर्व्हीसेस
को-ऑप. सोसायटी लि., पुणे, लातूर शाखा, मंत्री कॉम्ल्पेक्सच्या
बाजुला, कन्हेरी चौक, रिंग रोड, लातूर, ता. व जि. लातूर. :- विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष
श्रीमती रेखा जाधव, सदस्य
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. व्ही. बी. आवचारे
विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. पी. बी. मारडकर
आदेश
श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, त्यांनी विरुध्द पक्ष यांच्याशी निगडीत जय महेश ॲटो मॉल प्रा. लि. क्र. यांच्याकडून दि.31/7/2021 रोजी रु.4,86,000/- मध्ये महिंद्रा बोलेरो झेडएलक्स चारचाकी वाहन नोंदणी क्र. एम.एच.04/जी.जे.3339 खरेदी केले. त्यावेळी तक्रारकर्ता यांनी रु.2,40,000/- भरणा केले असता रु.2,11,000/- दर्शवून उर्वरीत रु.2,75,000/- करिता विरुध्द पक्ष क्र.2 याच्याकडून कर्ज मंजूर करण्यात आले. प्रतिमहा रु.11,400/- प्रमाणे दि.1/8/2021 ते 30/6/2024 पर्यंत 35 महिन्यांमध्ये परतफेड करावयाची होती. तक्रारकर्ता यांनी मासिक हप्त्यांच्या स्वरुपात रु.1,68,202/- रकमेचा भरणा केलेला आहे. तक्रारकर्ता यांना ह्दयविकार झाला आणि व्यापारातील दुर्लक्ष व नगण्य उत्पन्नामुळे जुन 2023 पर्यंत कर्जाचे मासिक हप्ते थकीत राहिले.
(2) तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, त्यांना पूर्वसूचना न देता विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी जुन 2023 मध्ये तक्रारकर्ता यांचे चारचाकी वाहन बळजबरीने ताब्यात घेऊन बेकायदेशीर कार्यवाही केली. त्यानंतर विरुध्द पक्ष क्र.2 यांना थकीत हप्त्यांची रक्कम स्वीकारुन वाहन परत करण्याची विनंती केली असता त्यांच्याकडून थकीत हप्त्यांची रक्कम स्वीकारण्यास नकार देण्यात आला. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी पाठविलेल्या सूचनापत्रामध्ये रु.93,998/- थकीत असून 15 दिवसाच्या आत रक्कम भरणा करुन वाहन परत घ्यावे, असे कळविले. तक्रारकर्ता यांनी रक्कम भरणा करुन घेऊन वाहन परत करण्याची विनंती केली असता विरुध्द पक्ष क्र.2 यांनी स्पष्ट नकार दिला. तसेच वाहन कर्जाची संपूर्ण रक्कम भरणा न केल्यास वाहन विक्री करण्यात येईल, असे विरुध्द पक्ष क्र.1 तर्फे सांगण्यात आले. तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना विधिज्ञांमार्फत सूचनापत्र पाठविले असता दखल घेतलेली नाही. उक्त कथनांच्या अनुषंगाने रु.93,998/- स्वीकारुन वादकथित वाहन परत करण्याचा किंवा त्यांनी वाहन खरेदी व कर्ज हप्त्यांकरिता भरलेले एकूण रु.3,79,202/- व्याजासह परत करण्याचा; मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासाकरिता रु.1,00,000/- देण्याचा व ग्राहक तक्रार खर्चाकरिता रु.50,000/- देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती केलेली आहे.
(3) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी संयुक्त लेखी निवेदनपत्र दाखल केले. ग्राहक तक्रार खोट्या व बनावट माहितीच्या आधारे दाखल केल्याचे नमूद करुन ग्राहक तक्रारीतील बहुतांश कथने त्यांनी अमान्य केले आहेत. त्यांचे कथन असे की, तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष क्र.2 यांच्यामध्ये दि.31/7/2021 रोजी एम.एच.04 जी.जे.3339 महिंद्रा बलेरो वाहन खरेदी-विक्रीबद्दल व्यवहार झाला. वाहनाचे मुल्य रु.4,86,000/- निश्चित केल्यानंतर तक्रारकर्ता यांनी रु.2,11,000/- जमा करुन उर्वरीत रु.2,75,000/- कर्ज रकमेची मागणी केली. त्याप्रमाणे विरुध्द पक्ष क्र.2 यांनी दि.1/8/2021 रोजी तक्रारकर्ता यांना रु.2,75,000/- कर्ज मंजूर केले आणि 35 महिन्यांमध्ये प्रतिमहा रु.11,400/- परतफेड करण्याचे ठरले. तक्रारकर्ता यांनी अनियमीतपणे एकूण रु.1,68,202/- भरणा केले; परंतु निश्चित केल्याप्रमाणे हप्त्यांचा भरणा न केल्यामुळे वाहनाच्या जप्तीबद्दल सूचनापत्र पाठविले असता कर्जाची थकीत रक्कम भरलेली नाही. त्यामुळे दि.12/6/2023 रोजी तक्रारकर्ता यांचे वाहन ताब्यात घेतले आणि त्यानंतर तक्रारकर्ता यांनी थकीत रकमेचा भरणा न केल्यामुळे दि.24/8/2023 रोजी कायदेशीर लिलाव करुन वाहनाची विक्री केली. त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही आणि ग्राहक तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.
(4) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांचे लेखी निवेदनपत्र व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
केल्याचे सिध्द होते काय ? नाही
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? नाही
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(5) मुद्दा क्र. 1 ते 3 :- मुद्दा क्र. 1 ते 3 परस्परपुरक असल्यामुळे त्यांचे विवेचन एकत्रपणे करण्यात येते. प्रामुख्याने, तक्रारकर्ता यांनी खरेदी केलेल्या महिंद्रा बोलेरो झेडएलक्स चारचाकी वाहन नोंदणी क्र. एम.एच.04/जी.जे.3339 करिता विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडून रु.2,75,000/- कर्ज घेतले, ही उभय पक्षांमध्ये मान्यस्थिती आहे. प्रतिमहा रु.11,400/- प्रमाणे 35 महिन्यांमध्ये कर्ज रकमेची परतफेड करावयाची होती, याबद्दल मान्यस्थिती आहे. तक्रारकर्ता यांनी कर्ज हप्त्यांसाठी रु.1,68,202/- रकमेचा भरणा केलेला आहे, याबद्दल वाद नाही. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांचे वादकथित वाहन ताब्यात घेतले, याबद्दल वाद नाही.
(6) सर्वप्रथम हे स्पष्ट करणे आवश्यक आहे की, उभय पक्षांपैकी कोणत्याही पक्षाने कर्ज संविदालेख अभिलेखावर दाखल केलेला नाही. उभय पक्षांचा वाद-प्रतिवाद पाहता तक्रारकर्ता हे कर्जाचे हप्ते भरु शकलेले नाहीत आणि ते थकबाकीदार आहेत, याबद्दल दुमत नाही. तक्रारकर्ता यांचे कथन असे की, त्यांना ह्दयविकार झाल्यामुळे व्यापाराकडे लक्ष देता आले नाही आणि नगण्य उत्पन्नामुळे कर्जाचे मासिक हप्ते भरणा करु शकले नाहीत. उलटपक्षी, हप्ते भरण्याकरिता संधी देऊनही तक्रारकर्ता यांचे हप्ते थकीत राहिल्यामुळे वादकथित वाहन ताब्यात घेऊन विक्री केले, असे विरुध्द पक्ष यांचे कथन आहे.
(7) प्रस्तुत प्रकरणामध्ये तक्रारकर्ता यांनी कर्ज हप्ते नियमीत भरलेले नाहीत आणि त्यांचे कर्ज थकीत राहिलेले आहे. तक्रारकर्ता यांच्या कथनानुसार जुन 2023 पर्यंत त्यांचे कर्ज हप्ते थकीत राहिले आणि विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी पूर्वसूचना न देता जुन 2023 मध्ये त्यांचा वादकथित वाहनाचा बेकायदेशीरपणे ताबा घेतला. त्यानंतर व विरुध्द पक्ष क्र.1 यांच्या दि.15/7/2023 रोजीचे सूचनापत्र प्राप्त झाल्यानंतर थकीत रक्कम भरण्याचा प्रयत्न केला असता विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी रक्कम स्वीकारलेली नाही. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्ता यांच्या वादकथनांचे खंडन केलेले असून तक्रारकर्ता यांचे कर्ज हप्ते थकीत राहिल्यामुळे दि.13/1/2023 रोजी तक्रारकर्ता व जामीनदार यांना सूचनापत्र पाठवून रक्कम भरणा न केल्यास वाहन जप्तीची कार्यवाही करण्यात येईल, असे कळविल्याचे नमूद केले. कथनांच्या पृष्ठयर्थ विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी अभिलेखावर दि.13/1/2023 रोजीचे सूचनापत्र, नोंदणीकृत डाकेच्या पावत्या व डाकेचा लिफाफा तक्रारकर्ता व जामीनदार यांना प्राप्त झाल्याबद्दल डाक विभागाच्या संकेतस्थळावरुन प्राप्त केलेला शोध अहवाल दाखल केला. असे दिसते की, विरुध्द पक्ष क्र.1 यांच्यातर्फे तक्रारकर्ता यांना थकीत कर्ज भरण्याबद्दल पूर्वसूचना व संधी दिलेली असताना त्याबद्दल दखल न घेतल्यामुळे वाहनाचा ताबा घेतलेला आहे. त्यानंतर पुन: दि.15/7/2023 रोजी विफध्द पक्ष क्र.1 यांनी सूचनापत्र पाठवून थकीत रकमेचा भरणा न केल्यास वाहन विक्रीची कार्यवाही केली जाईल, असे कळविले दिसते. थकीत रक्कम भरण्याची तयारी असताना त्यांची रक्कम स्वीकारलेली नाही, असे तक्रारकर्ता यांचे कथन असले तरी धनाकर्ष किंवा धनादेश नोंदणीकृत डाकेद्वारे पाठवून रक्कम भरण्याचा प्रयत्न करता आला असता. वाद-तथ्ये, युक्तिवाद व कागदपत्रे पाहता तक्रारकर्ता यांनी थकीत कर्ज भरण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्यामुळे विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वादकथित वाहन ताब्यात घेतल्याचे दिसून येते. उक्त विवेचनाअंती विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्ता यांना सेवा देण्यामध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होत नाही आणि त्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र नाहीत. करिता, मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर नकारार्थी देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
े
(1) ग्राहक तक्रार नामंजूर करण्यात येते.
(2) खर्चासंबंधी आदेश नाहीत.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव) (श्री. अमोल बा. गिराम)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-