Maharashtra

Latur

CC/14/2022

सुनिल शिवराज मुळे - Complainant(s)

Versus

व्यवस्थापक, आय. सी. आय. सी. आय. लोम्बार्ड जनरल इंश्युरंस कं. लि. - Opp.Party(s)

अ‍ॅड. के. व्हि. शेख

25 Apr 2024

ORDER

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
जिल्‍हा परिषदेचे गेट क्र.2 शेजारी, लातूर - 413512
 
Complaint Case No. CC/14/2022
( Date of Filing : 25 Jan 2022 )
 
1. सुनिल शिवराज मुळे
रा. मलकापुर ता. जि. लातूर
...........Complainant(s)
Versus
1. व्यवस्थापक, आय. सी. आय. सी. आय. लोम्बार्ड जनरल इंश्युरंस कं. लि.
पाप आय सी आय सी आय लोम्बार्ड हाऊस वीर सावरकर मार्ग, सिध्दीविनायक मंदीर जवळ, मेन रोड, मेन गेट, प्रभादेवी, मुंबई -400025
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Amol B. Giram PRESIDENT
 HON'BLE MRS. Rekha R. Jadhav MEMBER
 HON'BLE MR. Ravindra S. Rathodkar MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 25 Apr 2024
Final Order / Judgement

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.

 

ग्राहक तक्रार क्रमांक :  14/2022.                             तक्रार नोंदणी दिनांक : 24/01/2022.                                                                             तक्रार निर्णय दिनांक : 25/04/2024.

                                                                                       कालावधी : 02 वर्षे 03 महिने 01 दिवस

 

सुनिल पि. शिवराज मुळे, वय 36 वर्षे,                                                      :-     तक्रारकर्ता

व्यवसाय : नोकरी, रा. मलकापूर, ता. जि. लातूर.                                                   

 

                        विरुध्द

 

(1) व्यवस्थापक, आयसीआयसीआय लोम्बार्ड मोटार इन्शुरन्स कं.लि.,       :-         विरुध्द पक्ष

     414, आयसीआयसीआय लोम्बार्ड हाऊसवीर सावरकर मार्ग,

     सिध्दीविनायक मंदीराजवळ, मेन रोड, मेन गेट, प्रभादेवी, मुंबई-400 025.

(2) शाखा व्यवस्थापक, आयसीआयसीआय लोम्बार्ड मोटार इन्शुरन्स कं.लि.,

     हॉटेल व्यंकटेश, पाचवा मजला, औसा रोड, लातूर, ता. जि. लातूर-413 512.    

 

गणपूर्ती :          श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्‍यक्ष

                        श्रीमती रेखा जाधव, सदस्य

                        श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य

                                   

तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :-  के.व्ही. शेख

विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :-  सुरेश डोईजोडे

 

आदेश 

 

श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्‍यक्ष यांचे द्वारा :-

(1)       तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की,  त्यांच्या होंडा कंपनीच्या दुचाकी क्र. एम.एच. 24 बी.डी. 1751 करिता विरुध्द पक्ष यांच्याकडे विमापत्र क्र. 3005/2011448384/ 00/000002786 अन्वये दि.7/3/2019 ते 6/3/2024 कालावधीकरिता विमा उतरविलेला होता. विमापत्रानुसार वाहनाच्या मालक-चालक यांच्याकरिता वैयक्तिक अपघात विमा लाभाचे संरक्षण दिलेले होते.

(2)       तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, दि.28/9/2019 रोजी तक्रारकर्ता हे त्यांची दुचाकी चालवत बिदर येथून उदगीर येथे येत असताना रस्त्यावरील दगडावर दुचाकी गेल्यामुळे ते रस्त्यावर पडले आणि त्या अपघातामध्ये त्यांना व त्यांच्यासोबत असणा-या कपिल मुळे यांना गंभीर इजा झाली. तक्रारकर्ता यांना उदगीर, हैद्राबाद व बिदर येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात येऊन उपचार करण्यात आले. अपघातामुळे तक्रारकर्ता यांना 65 टक्के कायमस्वरुपी अपंगत्व आले आणि ते पूर्वीप्रमाणे काम करु शकत नाहीत. अपघाताबद्दल पोलीस ठाणे, उदगीर येथे गुन्हा क्र. 310/2020 नोंद करण्यात आला. अपघातानंतर वैद्यकीय उपचाराकरिता त्यांना रु.15,00,000/- खर्च आला.

 

(3)       तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, वैयक्तिक अपघात विम्याच्या अनुषंगाने नुकसान भरपाई मिळण्याकरिता विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांच्याकडे सर्व कागदपत्रांची पूर्तता केली; परंतु त्यांना नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यामुळे तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र पाठविले असता नुकसान भरपाई देण्याबद्दल दखल घेतलेली नाही. विरुध्द पक्ष यांनी विमा दावा प्रलंबीत ठेवून अकार्यक्षम सेवा दिलेली आहे. अशाप्रकारे उक्त कथनांच्या अनुषंगाने रु.15,00,000/- विमा नुकसान भरपाई व्याजासह देण्याचा; शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रु.10,000/- देण्याचा व ग्राहक तक्रार खर्च रु.7,000/- देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.

 

(4)       विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी अभिलेखावर लेखी निवेदनपत्र दाखल करुन ग्राहक तक्रारीतील बहुतांश कथने अमान्य केलेले आहेत. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांचे कथन असे की, वाहनाच्या मालक चालक यांचा अपघाती मृत्यू झाल्यास वैयक्तिक अपघात लाभ विमा रक्कम रु.15,00,000/- देण्याबद्दल त्यांनी जोखीम स्वीकारलेली आहे. मालक-चालक यांना अपघातामुळे अपंगत्व आल्यास त्याकरिता विमापत्रानुसार जोखीम स्वीकारलेली नाही. त्यामुळे तक्रारकर्ता यांना अपघातामुळे झालेल्या इजेकरिता दावा रक्कम मागण्याचा अधिकार नाही. तक्रारकर्ता यांनी खोटी तक्रार दाखल केलेली आहे आणि त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही. अंतिमत: ग्राहक तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती करण्यात आलेली आहे.

(5)       तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांचे लेखी निवेदनपत्र, अभिलेखावर दाखल कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्‍यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्‍यात येतात आणि त्‍या मुद्दयांची कारणमीमांसा त्‍यांच्‍यापुढे दिलेल्‍या उत्‍तराकरिता खालीलप्रमाणे देण्‍यात येते.

                       

मुद्दे                                                                                              उत्तर

 

(1) विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्‍ये त्रुटी

      केल्‍याचे सिध्‍द होते काय ?                                                                                 होय

(2) मुद्दा क्र.1 च्‍या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय  ?                      होय 

     असल्‍यास किती ?                                                                                  अंतिम आदेशाप्रमाणे

(3) काय आदेश  ?                                                                                     अंतिम आदेशाप्रमाणे

 

कारणमीमांसा

 

(6)       मुद्दा क्र. 1 ते 3 :- मुद्दा क्र.1 ते 3 परस्परपुरक असल्यामुळे त्यांचे विवेचन एकत्रपणे करण्यात येत आहे. प्रामुख्याने, तक्रारकर्ता यांच्या होंडा कंपनीच्या दुचाकी क्र. एम.एच. 24 बी.डी. 1751 करिता विमापत्र क्र. 3005/2011448384/00/000002786 अन्वये विरुध्द पक्ष यांच्याकडे दि.7/3/2019 ते 6/3/2024 कालावधीकरिता विमा संरक्षण दिलेले होते आणि विमापत्रानुसार वाहनाच्या मालक-चालक यांच्याकरिता वैयक्तिक अपघात विमा लाभाचे संरक्षण लागू होते, याबद्दल उभय पक्षांमध्ये मान्यस्थिती आहे.

 

(7)       अभिलेखावर दाखल प्रथम खबर अहवाल, फिर्यादी जबाब, घटनास्थळ पंचनामा, दोषारोप, तपास टिपण इ. कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारकर्ता यांचा रस्ता अपघात झाल्याचे दिसून येते. अभिलेखावर दाखल करण्यात आलेल्या वैद्यकीय उपचारांच्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता अपघातानंतर तक्रारकर्ता यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वैद्यकीय उपचार घेतल्याचे निदर्शनास येते.

(8)       विरुध्द पक्ष  क्र.1 व 2 यांचा प्रतिवाद असा की, वाहनाच्या मालक-चालक यांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्‍यांनी वैयक्तिक अपघात लाभ विमा रक्कम रु.15,00,000/- ची जोखीम स्वीकारलेली आहे. मालक-चालक यांना अपघातामुळे अपंगत्व आल्यास त्याकरिता विमापत्रानुसार जोखीम स्वीकारलेली नसल्यामुळे तक्रारकर्ता यांना दावा रक्कम मागण्याचा अधिकार नाही.

 

(9)       विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी विमा रक्कम देण्याचे दायित्व अमान्य करताना विमा लाभ मिळण्याकरिता विमाधारकाचा मृत्यू अपघाती मृत्यू असला पाहिजे, असे विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांचे कथन आहे. तक्रारकर्ता हे विमा लाभ मिळण्यास पात्र नाहीत, हा विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांचा मुख्य प्रतिवाद आहे आणि त्यापृष्ठर्थ विमा कंपनीने अभिलेखावर Two Wheeler Vehicle Package Policy Wording दाखल केल्या आहेत. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांचा प्रतिवाद पाहता तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांच्याकडे विमा दावा दाखल केल्याचे ग्राह्य धरावे लागेल. तक्रारकर्ता यांच्या विमा दाव्याबद्दल काय निर्णय घेण्यात आला ? याचे स्पष्टीकरण विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी दिलेले नाही. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी आधार घेतलेल्या Section III - Personal Accident Cover For Owner-Driver चे अवलोकन केले असता Owner-Driver यांच्याकरिता होणा-या इजेकरिता नुकसान भरपाई नमूद असून मृत्यूकरिता 100 टक्के, 2 अवयव किंवा 2 डोळ्याची दृष्टी किंवा 1 अवयव व 1 डोळ्याची दृष्टी याकरिता 100 टक्के, 1 अवयव किंवा 1 डोळ्याच्या दृष्टीकरिता 50 टक्के, वरील बाबीशिवाय कायमस्वरुपी पूर्णत: अपंगत्व आल्यास 100 टक्के नुकसान भरपाई देय आहे. विमा प्रमाणपत्रामध्ये PA Cover for Owner-Driver under Section III : CSI Rs.1500000.00 as opted for the above-mentioned period. उल्लेख आहे. विरुध्द क्र.1 व 2 यांनी विमापत्रानुसार Owner-Driver यांना मृत्यू, अवयवास इजा, कायम पूर्ण अपंगत्वास नुकसान भरपाई देय ठरविलेली आहे. त्यामुळे वाहनाच्या मालक-चालक यांचा अपघाती मृत्यू झाल्यास वैयक्तिक अपघात लाभ विमा रक्कम रु.15,00,000/- देण्याबद्दल त्यांनी जोखीम स्वीकारलेली असून त्यांच्या अपंगत्वास जोखीम नसल्याबद्दल घेतलेला विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांचा बचाव ग्राह्य धरता येत नाही.

 

(10)     तक्रारकर्ता यांनी Post Graduate Institute of Swasthiyog Pratishthan, Miraj येथील डॉ. शेखर मालवे D.(Ortho), DNB (Ortho), Chief Trauma Surgeon यांनी दि.27/10/2020 रोजी तक्रारकर्ता यांना दिलेले Physical Disability Certificate दाखल केले आहे. त्यांच्या प्रमाणपत्रानुसार तक्रारकर्ता यांचे Right Compound Distal Femur Fracture व Right Ulna Fracture निदान करण्यात येऊन त्यांनी केलेल्या Examination (Clinical and Radiological) मध्ये 1. Limp while walking. 2. Stiff right knee joint. 3. Sqatting and Sitting cross legged not possible. 4. Shortening of 6 cms of the right lower limb as compared to left lower limb. 5. Avoidance of heavy activities by right upper limb. आढळून आल्याचे नमूद आहे. त्यांनी तक्रारकर्ता यांच्याबाबत Permanent Physical Disability of 65% to Right Lower Limb and 15% to Right Upper Limb निश्चित केलेली आहे. कायम अपंगत्व प्रमाणपत्राचे विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी खंडन केलेले नाही किंवा त्या विरुध्द स्वतंत्र पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे अपघातामध्ये तक्रारकर्ता यांच्या उजव्या पायास इजा होऊन त्यांच्या उजव्या पायास कायमस्वरुपी अपंगत्व आल्याचे मान्य करावे लागेल. निर्विवादपणे, शरिराचे 2 पाय अवयव आहेत आणि अपघातामुळे तक्रारकर्ता यांच्या एका पायाचे नुकसान होऊन कायमस्वरुपी अपंगत्व आल्याचे सिध्द होते. तक्रारकर्ता यांचे अपंगत्व पाहता ते पूर्वीप्रमाणे त्यांचे कामे करण्यास असमर्थ असल्याचे ग्राह्य धरावे लागेल. Two Wheeler Vehicle Package Policy Wording मध्ये नमूद केल्याप्रमाणे एका अवयवाचे नुकसान झाल्यास 50 टक्के नुकसान भरपाई देय आहे. विमापत्रानुसार वैयक्तिक अपघाती लाभाकरिता मालक-चालक यांच्याकरिता रु.15,00,000/- रकमेची जोखीम स्वीकारलेली असून तक्रारकर्ता यांच्या एका अवयवाचे नुकसान झाल्यामुळे त्यांच्या 50 टक्के म्हणजेच रु.7,50,000/- रक्कम मिळण्यास तक्रारकर्ता पात्र ठरतात. तक्रारकर्ता यांनी अभिलेखावर वैद्यकीय उपचाराचे कागदपत्रे व देयके सादर करुन रु.15,00,000/- नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे; परंतु विमापत्राच्या तरतुदीनुसार तक्रारकर्ता हे रु.7,50,000/- मिळण्यास हक्कदार ठरतात. तक्रारकर्ता यांनी अभिलेखावर मा. राष्ट्रीय आयोगाच्या "लाईफ इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया /विरुध्द/ महेंद्र सिंग", 2011 (3) CPR 107 (NC) न्यायनिर्णयाचा संदर्भ सादर केला. मा. राष्ट्रीय आयोगाने त्यांच्यापुढे असणा-या प्रकरणामध्ये विमापत्राच्या तरतुदीचा अर्थ लावून विमा नुकसान भरपाईसंबंधी आदेश दिलेले आहेत.

 

(11)     तक्रारकर्ता यांनी अपघात तारखेपासून विमा रक्कम द.सा.द.शे. 15 टक्के व्याज दराने मिळावी, अशी विनंती केलेली आहे. प्रकरणाची वस्तुस्थिती विचारात घेऊन जिल्हा आयोगामध्ये ग्राहक तक्रार दाखल केल्याच्या तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज देण्याकरिता विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना आदेश करणे न्यायोचित राहील.

 

(12)     तक्रारकर्ता यांनी मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.10,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.7,000/- रकमेची मागणी केलेली आहे. आमच्या मते, प्रकरणानुरुप परिस्थितीजन्य गृहीतकाच्या अनुषंगाने नुकसान भरपाईची रक्कम निश्चित केली पाहिजे. असे दिसते की, विमा रक्कम मिळविण्याकरिता तक्रारकर्ता यांना विरुध्द पक्ष यांच्याकडे पाठपुरावा करावा लागलेला आहे. तसेच तक्रारकर्ता यांना जिल्‍हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्‍ला व सहायता, विधिज्ञांचे शुल्क इ. खर्चाच्‍या बाबी आहेत. शिवाय, ग्राहक तक्रार न्‍यायप्रविष्‍ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्‍यय होतो आणि तक्रारकर्ता यांना मानसिक व शारीरिक त्रास होणे नैसर्गिक व स्‍वाभाविक आहे. योग्‍य विचाराअंती मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- मिळण्‍यास तक्रारकर्ता पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत जिल्हा आयोग येत आहे.

 

(13)     उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.

 

आदेश

 

 

(1) ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्‍यात येते.     

ग्राहक तक्रार क्र. 14/2022.

(2) विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्ता यांना रु.7,50,000/- विमा नुकसान भरपाई द्यावी.

तसेच, विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्ता यांना उक्त रकमेवर दि.24/2/2022 पासून रक्‍कम अदा करेपर्यत द.सा.द.शे. 9 टक्‍के दराने व्‍याज द्यावे.     

(3) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्ता यांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- द्यावेत.

(4) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.

 

 

(श्री. रविंद्र शे. राठोडकर)             (श्रीमती रेखा  जाधव)                 (श्री. अमोल बा. गिराम)

             सदस्‍य                                         सदस्‍य                                            अध्यक्ष

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)

-०-

 
 
[HON'BLE MR. Amol B. Giram]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Rekha R. Jadhav]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. Ravindra S. Rathodkar]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.