Maharashtra

Latur

CC/19/2023

पृथ्वीराज सुनिल सोनकांबळे - Complainant(s)

Versus

व्यवस्थापक, अदित्य बिर्ला हेल्थ इं. कं. लि. - Opp.Party(s)

अ‍ॅड. बी. पी. सोनकांबळे

13 May 2024

ORDER

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
जिल्‍हा परिषदेचे गेट क्र.2 शेजारी, लातूर - 413512
 
Complaint Case No. CC/19/2023
( Date of Filing : 20 Jan 2023 )
 
1. पृथ्वीराज सुनिल सोनकांबळे
लातूर
...........Complainant(s)
Versus
1. व्यवस्थापक, अदित्य बिर्ला हेल्थ इं. कं. लि.
लातूर
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Amol B. Giram PRESIDENT
 HON'BLE MRS. Rekha R. Jadhav MEMBER
 HON'BLE MR. Ravindra S. Rathodkar MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 13 May 2024
Final Order / Judgement

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.

 

ग्राहक तक्रार क्रमांक : 19/2023.                               तक्रार नोंदणी दिनांक : 20/01/2023.

                                                                                         तक्रार दाखल दिनांक : 13/02/2023.                                                                                       तक्रार निर्णय दिनांक : 13/05/2024.

                                                                                        कालावधी :  01 वर्षे 03 महिने 23 दिवस

 

(1) पृथ्वीराज पिता सुनिल सोनकांबळे, वय 26 वर्षे,

     धंदा : व्यापार, रा. सिध्दार्थ हाऊसिंग सोसायटी,

     नांदेड रोड, लातूर, ता. जि. लातूर.

(2) आकाश पिता सुनिल सोनकांबळे, वय 23 वर्षे, व्यवसाय : शिक्षण.

(3) विकास पिता सुनिल सोनकांबळे, वय 21 वर्षे, व्यवसाय : शिक्षण,

     दोघे रा. शिवाजी स्टेडियम, मंगळवार पेठ, पुणे - 411 011.                 :-         तक्रारकर्ते

 

 

 

                        विरुध्द

 

 

 

व्यवस्थापक (दावा विभाग), अदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स कं. लि.,

सहावा मजला, 6 एबीसी ॲन्ड सी बिल्डींग, एमबीसी पार्क, आयफेल

सिटी मॉलजवळ, घोडबंदर रोड, केसर वडवली, ठाणे (पश्चिम).                  :-         विरुध्द पक्ष

 

गणपूर्ती :          श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष

                        श्रीमती रेखा जाधव, सदस्य

                        श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य

 

 

 

            तक्रारकर्ते यांचेकरिता विधिज्ञ : श्री. प्रधान शिवाजीराव सोनकांबळे

विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :-  श्री. के. डी. प्रयाग

 

आदेश 

 

श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष यांचे द्वारा :-

(1)       तक्रारकर्ते यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, त्यांचे पिता विमाधारक श्री. सुनिल इराप्पा सोनकांबळे (यापुढे 'विमाधारक सुनिल') यांनी विरुध्द पक्ष (यापुढे 'विमा कंपनी') यांच्याकडे रु.50,00,000/- चे अपघात विमापत्र घेतलेले होते. विमापत्र क्रमांक 12-20-0060653-00 आहे आणि दावा नोंदणी क्र. 612210003459 आहे. विमापत्र दि.5/11/2020 ते 4/11/2023 पर्यंत वैध होते. विमापत्राकरिता प्रधान शिवाजीराव सोनकांबळे यांचे नामनिर्देशन होते. विमाधारक सुनिल यांच्या पत्नी सौ. रेखा मयत असल्यामुळे तक्रारकर्ते यांनी वारस प्रमाणपत्र मिळविलेले आहे.

(2)       तक्रारकर्ते यांचे पुढे कथन असे की, दि.10/2/2021 रोजी विमाधारक सुनिल हे व्यवसायिक कामासाठी रेल्वेने लातूर ते पुणे प्रवास करीत होते. दि.11/2/2021 रोजी बोरीबेल रेल्वे स्थानकाजवळ लघुशंकेस जात असताना हेलकावा बसल्यामुळे विमाधारक सुनिल दरवाज्यातून खाली पडले. दौंड रेल्वे स्थानकावरील स्टेशन मास्तर यांनी घटनेबद्दल स्टेशन डायरीमध्ये नोंद घेऊन दौंड येथील पिरॅमीड हॉस्पिटलमध्ये उपचारास्तव दाखल केले. त्यानंतर 1.30 वाजण्याच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांची शवचिकित्सा केल्यानंतर दि.12/2/2021 रोजी लातूर येथे धार्मिक विधीसह त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले.

(3)       तक्रारकर्ते यांचे पुढे कथन असे की, विमापत्रासंबंधी माहिती प्राप्त झाल्यानंतर विमा कंपनीकडे सर्व कागदपत्रांसह विमा दावा दाखल केला आणि विमा रकमेची मागणी केली. तसेच विमा कंपनीच्या सूचनेप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता केली. परंतु विमा कंपनीने दि.30/7/2021 रोजीच्या पत्राद्वारे तक्रारकर्ते यांनी दाखल केलेल्या दस्तऐवजाच्या छाननी व पडताळणीमध्ये घटनेबाबत विसंगती व त्रुटी असल्याचे कारण देऊन विमा दावा रद्द केला. उक्त कथनाच्या अनुषंगाने रु.50,00,000/- दावा रक्कम व्याजासह देण्याचा; मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.2,00,000/- नुकसान भरपाई देण्याचा व तक्रार खर्च रु.50,000/- देण्याचा विमा कंपनीस आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ते यांनी केलेली आहे.

(4)       विमा कंपनीने लेखी निवेदनपत्र दाखल केले. त्यांनी ग्राहक तक्रारीतील बहुतांश कथने अमान्य केले आहेत. विमा कंपनीचे कथन असे की, तक्रारकर्ते हे विमाधारक सुनिल यांचे वारस असल्याचे नमूद करतात; परंतु विमापत्रानुसार विमाधारक सुनिल यांचा पुतण्यास नामनिर्देशीत केलेले आहे आणि विमा रक्कम नामनिर्देशीत व्यक्तीस देय असते. त्यामुळे तक्रारकर्ते यांना ग्राहक तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही.

(5)       विमा कंपनीचे पुढे कथन असे की, विमाधारक सुनिल यांच्या पुतण्याने दि.26/2/2021 रोजी विमाधारक सुनिल रेल्वेतून पडल्यामुळे विमापत्रानुसार अपघाती लाभ मिळण्यासाठी कागदपत्रांसह दावा सादर केला. उपलब्ध कागदपत्रे व नातेवाईकांच्या चौकशीमध्ये कित्येक विसंगती आढळून आल्या. तक्रारकर्ते यांनी कथन केल्यानुसार दि.11/2/2021 रोजी जेव्हा रेल्वे बोरिबेल रेल्वे स्थानकाजवळ पोहाचत होती, त्यावेळी विमाधारक सुनिल हे लघुशंकेस जाण्यासाठी दार उघडताना तोल जाऊन रेल्वेतून खाली पडले; परंतु त्या घटनेस साक्षीदार नाही आणि विमाधारक सुनिल यांचा दाराजवळ जाण्याचा उद्देश सिध्द होत नाही. ही शक्यता असू शकते की, त्यांना ढकलले असावे किंवा स्वत: निष्काळजीपणा करुन ते दाराजवळ उभे राहिले असावेत. वस्तुत: विमाधारक सुनिल यांनी आत्महत्या केली असू शकते. विमापत्राच्या अटी व शर्तीनुसार आत्महत्या, कायद्याचे उल्लंघन किंवा विमाधारकाचा निष्काळजीपणामुळे झालेल्या मृत्यूस विमापत्रानुसार संरक्षण नाही.  

(6)       विमा कंपनीचे पुढे कथन असे की, प्रकरणाचे अन्वेषण व मृत्यूचे कारण निश्चित करण्यासाठी त्यांनी तृतीय पक्ष अन्वेषकास नियुक्त केले. अन्वेषकांनी त्यांचा अहवाल सादर केला असून मरणोत्तर पंचनामा व शवचिकित्सा अहवालामध्ये नमूद करण्यात आलेल्या जखमांच्या स्वरुपामध्ये कित्येक विसंगती आढळून आल्या. त्यांनी चेहरा, छाती, पोट व अन्य बाबीमध्ये विसंगती दर्शविल्या आहेत. सर्वसाधारण निकषानुसार शवचिकित्सा केवळ दिवसा करण्यात येते; परंतु विमाधारक सुनिल यांची शवचिकित्सा रात्री 8.00 वाजता करण्यात आलेली असून त्याबद्दल स्पष्टीकरण नाही. रेल्वे स्थानकाच्या द्वारपालाकडे (gateman) चौकशी केली असता अपघाती घटनेबद्दल तो अनभिज्ञ असल्याचे आढळून आले. विमा कंपनीने अपघातस्थळाचे छायाचित्रे, ICPs व ITR तपशील मागविला असता अद्याप अप्राप्त आहे. 5 वर्षापूर्वी विमाधारक सुनिल यांच्या पत्नीचा अशाप्रकारचा अपघात झालेला होता.

(7)       विमा कंपनीचे पुढे कथन असे की, विमाधारक सुनिल यांनी मॅक्स लाईफ, कोटक लाईफ व त्यांच्याकडून वेगवेगळे विमापत्र घेतल्याचे निदर्शनास आले. उक्त तफावती व उणिवा; तसेच अन्वेषण होऊन प्राप्त अन्य माहितीवरुन नामनिर्देशीत व्यक्ती लबाडीने दावा दाखल करण्यामध्ये गुंतल्याचा विश्वास निर्माण झाला आणि तफावती व उणिवामुळे दि.30/7/2021 रोजी विमा दावा रद्द करण्यात आला. दावा व विमाधारकाच्या मृत्यूचे कारण सत्य व वैध असल्याचे सिध्‍द करण्याची जबाबदारी तक्रारकर्ते यांच्यावर आहे. विमाधारक सुनिल हे संशयास्पद स्थितीत मृत्यू पावले आणि त्यांच्या मृत्यूचे कारण तक्रारकर्ते यांनी सिध्द केले नाही. अंतिमत: ग्राहक तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती विमा कंपनीने केलेली आहे.

(8)       तक्रारकर्ते यांची ग्राहक तक्रार, विमा कंपनीचे लेखी निवेदनपत्र, उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच तक्रारकर्ता यांचा व विमा कंपनीकरिता विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्‍यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्‍यात येतात आणि त्‍या मुद्दयांची कारणमीमांसा त्‍यांच्‍यापुढे दिलेल्‍या उत्‍तराकरिता खालीलप्रमाणे देण्‍यात येते.

                       

मुद्दे                                                                                          उत्तर

 

(1) तक्रारकर्ते यांना विमा कंपनीविरुध्द ग्राहक तक्रार  

     दाखल करण्याचा अधिकार आहे काय ?                                                         होय     

(2) विमा कंपनीने तक्रारकर्ते यांना द्यावयाच्या सेवेमध्‍ये त्रुटी

      केल्‍याचे सिध्‍द होते काय ?                                                                            होय

(3) मुद्दा क्र.2 च्‍या अनुषंगाने तक्रारकर्ते अनुतोषास पात्र आहेत काय  ?                  होय  

     असल्‍यास किती ?                                                                              अंतिम आदेशाप्रमाणे

(4) काय आदेश  ?                                                                                 अंतिम आदेशाप्रमाणे

 

कारणमीमांसा

 

(9)       प्रामुख्याने, विमा कंपनीने विमाधारक सुनिल यांना Active Secure - Personal Accident श्रेणीतील रु.50,00,000/- रकमेचे विमापत्र क्र. 12-20-0060653-00 निर्गमीत केले आणि विमा कालावधी दि.5/11/2020 ते 4/11/2023 आहे, ही उभय पक्षांमध्ये मान्यस्थिती आहे. दि.11/2/2021 रोजी विमाधारक सुनिल यांचा मृत्यू झाला, याबद्दल विवाद नाही. विमाधारक सुनिल यांच्या मृत्यूनंतर तक्रारकर्ता यांनी विमा कंपनीकडे विमा दावा दाखल केला, ही मान्यस्थिती आहे. विमा कंपनीने दि.30/7/2021 रोजीच्या पत्राद्वारे विमा दावा रद्द केला, हे विवादीत नाही.

(10)     मुद्दा क्र. 1 :- सर्वप्रथम, विमा कंपनीतर्फे हरकत नोंदविण्यात आली की, तक्रारकर्ते हे विमाधारक सुनिल यांचे वारस असल्याचे नमूद करतात; परंतु विमापत्रानुसार विमाधारक सुनिल यांचा पुतण्यास नामनिर्देशीत केलेले आहे आणि विमा रक्कम नामनिर्देशीत व्यक्तीस देय असल्यामुळे तक्रारकर्ते यांना ग्राहक तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही. वास्तविक पाहता, विमापत्रातील नामनिर्देशीत व्यक्ती प्रधान सोनकांबळे यांनी जिल्हा आयोगाने यापूर्वी विमा रक्कम मिळण्याकरिता दाखल केलेली ग्राहक तक्रार क्र. 19/2022 ते विमाधारक सुनिल यांचे कायदेशीर वारस किंवा लाभार्थी नामनिर्देशीत व्यक्ती असल्याचे सिध्द होत नसल्यामुळे; तसेच ग्राहक संरक्षण अधिनियम, 2019 मधील तरतुदीनुसार ते 'ग्राहक' व 'तक्रारकर्ता' संज्ञेत येत नसल्यामुळे रद्द केलेली आहे. ग्राहक तक्रार क्र. 19/2022 मध्ये विमा कंपनी 'विरुध्द पक्ष' होती आणि त्यांनी त्यामधील आदेशाविरुध्द मा. राज्य आयोग यांच्याकडे अपिल केल्याचे निदर्शनास येत नाही; किंबहुना उभय पक्षकारांचे तसे कथनही नाही. ग्राहक तक्रार क्र. 19/2022 मध्ये दिलेला आदेश कायम झालेला असल्यामुळे ग्राहक तक्रार क्र. 19/2022 मध्ये निर्णीत मुद्दा पुनश्च: दखलपात्र ठरत नाही. शिवाय, तक्रारकर्ते हे विमाधारक सुनिल यांचे कायदेशीर वारस असल्याबद्दल न्यायालयाचे वारस प्रमाणपत्र अभिलेखावर दाखल आहे. कलम 2 (5) अनुसार विमाधारक सुनिल यांच्या कायदेशीर वारसांना ग्राहक तक्रार दाखल करण्याचा अधिकार असल्यामुळे विमा कंपनीची हरकत मान्य करता येत नाही आणि मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.

(11)     मुद्दा क्र. 2 ते 4 :- विमाधारक सुनिल यांच्या मृत्यूपश्चात दाखल करण्यात आलेला विमा दावा विमा कंपनीने नामंजूर केला, ही मान्यस्थिती आहे. विमा कंपनीने दि.30/7/2021 रोजीच्या पत्रामध्ये दावा अस्वीकारार्हतेसाठी खालीलप्रमाणे कारण दिलेले आहे.

            On scrutiny of the documents it has been observed that the claim is not admissible as per the below mention clause.

            Reason : Verificatiion of claim documents reveals claimant has lodged a claim under Accidental Death Benefit. On scrutiny and verification of claim documents, we have noted certain discrepancies and lapses in the event of incident. In view of aforesaid reasons, claim stands repudiated.

            Clasue : Fraudulent Claims

            If any claim is found to be fraudulent, or if any false declaration is made, or if any fraudulent devices are used by You or the Insured Person or anyone acting on their behalf to obtain any Benefit under this Policy then this Policy shall be void and all claims being processed shall be forfeited for all Insured Persons. All sums paid under this Policy shall be repaid to Us by You on behalf of all Insured Persons who shall be jointly liable for such repayment.

 

(12)     उक्त कारणानुसार 'लबाडीचे दावे' हे कलम नमूद करुन दावा कागदपत्रांच्या छाननी व तपासणीमध्ये घटनेच्या वेळी काही तफावती आढळून आल्यामुळे दावा रद्द केल्याचे दिसून येते.

(13)     उभय पक्षांचा वाद-प्रतिवाद पाहता विमाधारक सुनिल यांच्या मृत्यूपश्चात दाखल केलेल्या विमा दाव्यामध्ये लबाडी असल्याचे व घटनेच्या वेळी विसंगती असल्याचे निदर्शनास येते काय ? हा प्रश्न निर्माण होतो. त्या अनुषंगाने विमा कंपनीचा प्रतिवाद व बचाव असा की, विमाधारक सुनिल तोल जाऊन रेल्वेतून खाली पडले, या घटनेस साक्षीदार नाही. विमाधारक सुनिल यांना ढकलले असावे किंवा स्वत: निष्काळजीपणा करुन ते दाराजवळ उभे राहिले असावेत, ही शक्यता आहे. तसेच विमाधारक सुनिल यांनी आत्महत्या केली असू शकते. मरणोत्तर पंचनामा व शवचिकित्सा अहवालातील नमूद जखमांच्या वर्णनांमध्ये कित्येक विसंगती आढळून आल्या. विमाधारक सुनिल यांनी मॅक्स लाईफ, कोटक लाईफ व त्यांच्याकडून वेगवेगळे विमापत्र घेतल्याचे निदर्शनास आले. तफावती व उणिवा; तसेच अन्वेषण होऊन त्यामध्ये प्राप्त अन्य माहितीवरुन नामनिर्देशीत व्यक्तीने लबाडीने दावा दाखल करण्यामध्ये गुंतल्याचा विश्वास निर्माण झाला आणि तफावती व उणिवामुळे विमा दावा रद्द करण्यात आल्याचे विमा कंपनीने नमूद केले.

(14)     तक्रारकर्ते यांनी अभिलेखावर पिरामीड हॉस्पिटल, दौंड यांचे Discharge Card, पोलीस घटनास्थळ पंचनामा, विमाधारक सुनिल यांचे रेल्वे आरक्षण तिकीट, मृत्यू प्रमाणपत्र, मरणोत्तर पंचनामा, शवचिकित्सा अहवाल, आकस्मात मृत्यू नोंदीचे राजपत्र, गोषवारा मंजुरीचा आदेश व अन्य पुरक कागदपत्रे दाखल करण्यात आलेले आहेत.

(15)     उपविभागीय दंडाधिकारी, दौंड पुरंदर उपविभाग, पुरंदर यांच्या दि.26/11/2021 रोजीच्या आदेशामध्ये कै. सुनिल इरप्पा सोनकांबळे यांच्या मृत्यूच्या अनुषंगाने हरकती मागविण्यात आल्याचे व मृत्यू कारणाबाबत संशय व्यक्त करणारी तक्रार प्राप्त झाली नसल्याचे नमूद करुन त्यांचा मृत्यू रेल्वे अपघात मृत्यू घोषीत केल्याचे दिसते.

(16)     तक्रारकर्ते यांनी अभिलेखावर विमा कंपनीच्या Active Secure - Policy Terms and Conditions दाखल केले आहेत. विमा कंपनीने विमा अटी संदर्भात विशिष्ट कागदोपत्रे दाखल केले. त्यामध्ये पान क्र. 19 वर O. Fraudulent Claims बद्दल स्पष्टीकरण दिसते.

(17)     विमा कंपनीने अन्वेषकांचा अहवाल दाखल केलेला. अन्वेषक श्री. निवृत्ती रावसाहेब मगर यांनी दाव्याच्या अनुषंगाने अन्वेषण केलेले आहे. त्यांच्या अहवालामध्ये प्रधान शिवाजीराव सोनकांबळे व उषा गौतम सोनकांबळे यांच्या जबाबातील विसंगतीचा उल्लेख आढळून आल्याचे नमूद आहे. तसेच त्यांनी घटनास्थळाचे वैज्ञानिक अन्वेषण व जखमांचे अन्वेषण केलेले आहे. त्यांनी वैज्ञानिक निरीक्षणे नोंदविले आहे. अंतिमत: त्यांनी नामनिर्देशीत व्यक्ती प्रधान सोनकांबळे व मयताची वहिनी उषा सोनकांबळे यांच्या जबाबामध्ये विरोधाभास असल्याचा, शवचिकित्सा अहवाल व मरणोत्तर पंचनाम्यामध्ये नमूद जखमांबद्दल तफावत असल्याचा व शवविच्छेदन अहवालात नमूद केलेल्या जखमा धावत्या रेल्वेमधून पडून झालेल्या जखमा असल्याचा निष्कर्ष नोंदविलेला दिसतो.

(18)     निर्विवादपणे, विमा कंपनीने अन्वेषक निवृत्ती रावसाहेब मगर यांच्या अन्वेषण अहवालावर भिस्त ठेवून विमा दावा नामंजूर केल्याचे सिध्द होते. असे दिसते की, अन्वेषक निवृत्ती रावसाहेब मगर यांनी प्रधान शिवाजीराव सोनकांबळे व उषा गौतम कांबळे यांचे स्वतंत्रपणे घेतलेले जबाब नाहीत. अन्वेषक निवृत्ती रावसाहेब मगर यांचे प्रतिज्ञापत्र अभिलेखावर दाखल नाही. अन्वेषकांनी केवळ विमा दाव्यासोबत दाखल केलेल्या कागदपत्रांच्या आधारे निष्कर्ष नोंदवून अहवाल दिलेला दिसतो.

(19)     निर्विवादपणे, विमाधारक सुनिल हे धावत्या रेल्वेतून खाली पडले आणि त्या घटनेबद्दल पोलीस यंत्रणेद्वारे चौकशी व कार्यवाही झालेली आहे. त्यानंतर उपविभागीय दंडाधिकारी, दौंड-पुरंदर यांनी मयत सुनिल यांचा मृत्यू अन्य कारणामुळे झाल्यासंबंधी कोणाची तक्रार असल्यास तसे कळविण्याबद्दल जाहीर नोटीस प्रसिध्द केलेली आहे. विमाधारक सुनिल यांच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त करणारी तक्रार प्राप्त न झाल्यामुळे उपविभागीय दंडाधिकारी, दौंड-पुरंदर यांनी दि.26/11/2021 रोजी त्यांचा रेल्वे अपघाती मृत्यू घोषीत केल्याचे दिसून येते. विमाधारक सुनिल यांच्या रेल्वे अपघात मृत्यूबद्दल राजपत्रामध्ये नोंद करण्यात आलेली आहे.

(20)     पोलीस यंत्रणा व उपविभागीय दंडाधिकारी, दोंड-पुरंदर यांनी कायदेशीर तरतुदीनुसार चौकशी केली असता विमाधारक सुनिल यांच्या मृत्यूबद्दल संशय निर्माण होणारी घटना किंवा अन्य कारण निदर्शनास येत नाही. तसेच मरणोत्तर पंचनामा हा पोलीस यंत्रणेने तयार केलेला असून शवचिकित्सा अहवाल हा वैद्यकीय चिकित्सकाने तयार केलेला आहे. पोलीस यंत्रणेद्वारे केवळ बाह्य दृश्य जखमांचा उल्लेख अहवालामध्ये येतो आणि वैद्यकीय चिकित्सकाद्वारे संपूर्ण शरिराचे परीक्षण होऊन अहवाल तयार केला जातो. त्या दोन्ही यंत्रणा स्वतंत्र आहेत आणि विमाधारक सुनिल यांच्या जखमांबद्दल त्यांचे भिन्न निरीक्षण किंवा परिक्षण असू शकते. सकृतदर्शनी, पोलीस यंत्रणेद्वारे झालेल्या तपासानुसार विमाधारक सुनिल यांचा मृत्यू रेल्वे अपघातामध्ये झाला आणि त्यांच्या मृत्यूबद्दल कोणतीही संशयास्पद घटना दिसून आलेली नाही. अशा स्थितीत, विमा कंपनीद्वारे नियुक्त अन्वेषकांनी ज्या जबाब व कागदोपत्री नोंदीचा निष्कर्ष काढला तो केवळ तांत्रिक स्वरुपाचा ठरतो. अन्वेषण अहवालाचा आधार घेऊन विमाधारक सुनिल यांना ढकलले असावे किंवा स्वत: निष्काळजीपणा करुन ते दाराजवळ उभे राहिले असावेत किंवा विमाधारक सुनिल यांनी आत्महत्या केलेली असावी, अशाप्रकारच्या संभाव्यता किंवा शक्यता निर्माण करुन विमा दावा नामंजूर करता येऊ शकत नाही. आमच्या मते, विमा कंपनी त्यांचे दावा नामंजूर करण्याचे कृत्य सिध्द करण्यास असमर्थ ठरलेली आहे आणि विमा रक्कम देण्याचे दायित्व अमान्य करणे असंयुक्तिक व अनुचित आहे. अंतिमत: विमा कंपनीचे दावा नामंजूर करण्याचे कृत्य सेवेतील त्रुटी असल्यामुळे तक्रारकर्ते विमापत्रानुसार रु.50,00,000/- विमा रक्कम मिळण्याकरिता पात्र ठरतात.

(21)     तक्रारकर्ते यांनी द.सा.द.शे. 12 टक्के व्याज दराने विमा रकमेची मागणी केलेली आहे. प्रकरणाची वस्तुस्थिती विचारात घेऊन विमा दावा नामंजूर केल्याच्या तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज देण्याकरिता आदेश करणे न्यायोचित राहील.

(22)     तक्रारकर्ते यांनी मानसिक व शारीरिक त्रासाकरिता 2,00,000/- व ग्राहक तक्रार खर्चाकरिता रु.50,000/- रकमेची मागणी केलेली आहे. आमच्या मते, प्रकरणानुरुप परिस्थितीजन्य गृहीतकाच्या अनुषंगाने नुकसान भरपाईची रक्कम निश्चित केली पाहिजे. असे दिसते की, तक्रारकर्ते यांचा विमा दावा नामंजूर केल्यामुळे त्यांना पाठपुरावा करावा लागलेला आहे. त्यांना जिल्‍हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला व सहायता, विधिज्ञांचे शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. शिवाय, ग्राहक तक्रार न्‍यायप्रविष्‍ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्‍यय होतो आणि तक्रारकर्ते यांना मानसिक व शारीरिक त्रास होणे नैसर्गिक व स्‍वाभाविक आहे.  योग्‍य विचाराअंती मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- मिळण्‍यास तक्रारकर्ते पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत जिल्हा आयोग येत आहे.

(23)     उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र. 2 व 3 चे उत्तर होकारार्थी देऊन मुद्दा क्र.4 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.

 

आदेश

 

(1) ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्‍यात येते.     

(2) विरुध्‍द पक्ष विमा कंपनीने तक्रारकर्ते यांना  रु.50,00,000/- (रुपये पन्नास लक्ष फक्त) विमा रक्कम द्यावी.

तसेच, विरुध्‍द पक्ष विमा कंपनीने उक्त रु.50,00,000/- रकमेवर दि.30/7/2021 पासून रक्‍कम अदा करेपर्यत द.सा.द.शे. 9 टक्‍के दराने व्‍याज द्यावे.     

(3) विरुध्‍द पक्ष विमा कंपनीने तक्रारकर्ते यांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- द्यावेत.

(4) विरुध्‍द पक्ष विमा कंपनीने प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.

 

 

(श्री. रविंद्र शे. राठोडकर)             (श्रीमती रेखा  जाधव)                 (श्री. अमोल बा. गिराम)

             सदस्‍य                                         सदस्‍य                                            अध्यक्ष

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)

-०-

 
 
[HON'BLE MR. Amol B. Giram]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Rekha R. Jadhav]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. Ravindra S. Rathodkar]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.