न्या य नि र्ण य
द्वारा – मा. श्रीमती भारती सं. सोळवंडे, अध्यक्ष
1. प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे कलम 35 अन्वये दाखल केली आहे.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे –
तक्रारदार यांना दुचाकी वाहन खरेदी करावयाचे होते म्हणून त्यांनी जाबदार क्र.1 यांची भेट घेतली असता त्यांनी ओकिनावा I-Praise ही गाडी जास्त मायलेज देणारी व सर्व प्रकारच्या रस्त्यांना अनुकूल आहे असे सांगितले. जाबदार क्र.1 यांचेवर विश्वास ठेवून तक्रारदाराने दि.23/12/2019 रोजी वाहन खरेदीसाठी पैसे भरले. त्यानंतर जानेवारी 2020 मध्ये तक्रारदारांना गाडी ताब्यात मिळाली. तक्रारदारांनी गाडी चालवून पाहिली असता पहिल्याच दिवशी त्यामध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे निदर्शनास आले. तसेच गाडी मायलेज कमी देत असलेचे तक्रारदाराचे निदर्शनास आले. तसेच इंधन इंडीकेशन दाखवत नव्हते. त्यामुळे इंधन भरण्याचा अंदाज सापडत नव्हता. सदरची बाब तक्रारदाराने जाबदार क्र.1 चे मॅनेजर देसाई यांना सांगितली. त्यांचे सूचनेनुसार पुन्हा गाडी चार्ज करुन चालविली परंतु तोच बिघाड दिसून आला. मॅनेजर देसाई व टेक्निशियन सुमित यांनी हा सामान्य बिघाड असून एक सर्व्हिसिंग झालेनंतर व्यवस्थित होईल असे आश्वासन तक्रारदारांना दिले. तदनंतर पहिले सर्व्हिसिंग नियोजित असलेने त्यासाठी तक्रारदाराने गाडी 500 किलोमीटर चालविली. मात्र 500 किलोमीटर रनिंग होईपर्यंत अनेक अडचणी आल्या. दि. 30/01/2020 रोजी गाडीचे पहिले सर्व्हिसिंग करण्यात आले. परंतु तरीही गाडीतील दोष दूर झाला नाही. वाहनामध्ये उत्पादीत दोष असल्याबाबत तक्रारदाराने जाबदारांना सांगितले. जाबदारांनी सर्व्हिस बुकवर त्याची नोंद घेतली नाही. तसेच जाबदारांनी गाडी वापरुन पुन्हा पहा असे तक्रारदारास सांगितले. तक्रारदाराने दोन वेळा गाडी चार्ज करुन वापरुन पाहिली परंतु गाडीतील दोष दूर झाला नाही. तक्रारदाराने जाबदार यांना वारंवार गाडीतील दोषांची कल्पना देवूनही जाबदारांनी त्याचा उल्लेख सर्व्हिस बुकमध्ये केला नाही. तीन सर्व्हिस झाल्या तरी गाडीतील दोष रेकॉर्डवर घेतला नाही. गाडी चार्ज केल्यानंतर देखील 80-90 किलोमीटरवर गेल्यावर गाडी बंद पडते असे टेक्निशियनने सांगितले. स्वतः टेक्निशियनने गाडीची टेस्ट ड्राइव्ह घेवून हे मान्य केले व मालक जाधव साहेब यांना याबाबत बोलतो असे सांगितले. सदरची तक्रार वारंवार येत राहिलेने टेक्निशियन सुमित यांनी दोन दिवस गाडी टेस्टींगसाठी ठेवून गाडी परत दिली व गाडी किंवा बॅटरीमध्ये उत्पादित दोष असलेबाबत सांगितले. वारंवार मागणी करुन देखील बॅटरी व गाडी जाबदारांनी बदलून दिलेली नाही. गाडीमध्ये कोणताही दोष आढळल्यास किंवा स्पेसिफिकेशन प्रमाणे गाडी नसल्यास तात्काळ नवी गाडी किंवा पैसे परत देणेचे आश्वासन जाबदार यांनी दिलेले होते. मात्र प्रत्यक्षात वारंवार मागणी करुनही गाडीतील दोष जाबदारांनी दूर करुन दिले नाहीत व गाडी देखील बदलून दिली नाही. तक्रारदार व जाबदार कंपनी यांचेमध्ये झालेल्या कराराची प्रत वेळोवेळी मागणी करुन देखील जाबदारांनी दिली नाही. जाबदारांनी पोस्टाने कराराची प्रत घरी येईल असे सांगितले. जाबदारांनी गाडी खरेदी करताना गाडीला मोबाईल कनेक्टीव्हीटी असलेबाबत हमी दिली होती. याबाबत फेब्रुवारी 2020 मध्ये विचारणा केली असता अॅग्रीमेंटप्रमाणे दोन महिने अथवा दुसरे किंवा तिसरे सर्व्हिसिंग झालेनंतर जी.पी.एस. कनेक्ट करुन दिलेनंतर गाडी मोबाईल कनेक्ट होईल असे सांगितले. दि. 13/3/2020 रोजी तक्रारदाराने गाडीचे दुसरे सर्व्हिसिंग करुन घेतले. त्यावेळी गाडीमध्ये जी.पी.एस. बसविले असलेबाबत व कंपनीचा व्हेरिफिकेशनसाठी फोन आलेनंतर मोबाईल घेवून सर्व्हिस सेंटरमध्ये यावयास सांगितले. ब-याच काळाने कंपनीने व्हेरिफिकेशनसाठी कॉल केल्यावर तक्रारदार सर्व्हिस सेंटरला गेले असता जी.पी.एस. कनेक्ट झाले नाही. त्यावेळी जाबदार यांनी तक्रारदार यांचा मोबाईल खराब आहे, तो दुरुस्त करावा असे तक्रारदारांना सांगितले. मॅनेजर व टेक्निशियन या दोघांनीही त्यांना जी.पी.एस. बद्दल कोणतेही ज्ञान नसलेचे तक्रारदारांना सांगितले. आजअखेर सदरचे गाडीला जी.पी.एस. कनेक्टीव्हीटी मिळालेली नाही. तसेच अॅंटीथेफ्ट सिक्युरिटी सिस्टीम मिळालेली नाही. इंधन इंडीकेशन नीटपणे न दिल्याने अचानक गाडी बंद पडून अपघात होणेची शक्यता आहे असे वारंवार कळवून देखील गाडीतील सदरचा दोष जाबदारांनी दूर केलेला नाही. वॉरंटी कालावधीमध्ये गाडी दुरुस्त करुन दिलेली नाही. बॅटरी बदलून देणेकरिता जाबदारांनी तक्रारदारास बोलावले प्रत्यक्षात मात्र चारपटीने लहान बॅटरी दिली. गाडीचे सस्पेन्शन चुकीचे व दोषयुक्त असलेबाबत तक्रारदारांनी वारंवार तक्रार करुन देखील जाबदारांनी सदरचे दोष दूर करुन दिलेले नाहीत. तक्रारदार हे जाबदार क्र.1 यांचेकडे वारंवार लेखी अर्ज घेवून जात होते. परंतु त्यांचा अर्ज कोणीही स्वीकारत नव्हते. तदनंतर जाबदारांचे तंत्रज्ञ सुमित यांचेकडून गाडीची कंपनी व डिलर यांचेमध्ये पैशाचा वाद सुरु असलेचे तक्रारदारास समजले. अशा प्रकारे जाबदार यांनी उत्पादित दोष असलेली गाडी तक्रारदारास विकून सेवेत त्रुटी केली आहे. म्हणून तक्रारदाराने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. सबब, तक्रारदाराने याकामी जाबदार यांचेकडून गाडीची किंमत रु.1,15,000/- परत मिळावी, खर्चापोटी रु.30,000/- मिळावेत, नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.2,00,000/- जाबदारकडून मिळावेत अशी मागणी केली आहे.
3. तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत शपथपत्र तसेच कागदयादीसोबत तक्रारदारांनी जाबदार यांचेबरोबर केलेला पत्र व्यवहार, गाडीचे सर्व्हिसिंग डिटेल्स, वाहनाचे नोंदणी कार्ड, वाहन खरेदी करण्यासाठी चेक भरल्याची पावती इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे.
4. जाबदार क्र.1 व 2 यांनी याकामी हजर होवून म्हणणे दाखल केले. जाबदार क्र.1 व 2 यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये, तक्रारदाराचे तक्रारअर्जातील कथने परिच्छेदनिहाय नाकारली आहेत. तक्रारदाराने गाडी खरेदी केलेनंतर सुरुवातीस 558 किमी व 1512 किमी गाडी चालल्यानंतर जाबदार क्र.1 यांनी नियमाप्रमाणे गाडीचे मोफत सर्व्हिसिंग करुन दिले आहे. तसेच तिसरे सर्व्हिसिंग दि.17/5/2020 रोजी करुन दिलेले आहे. यादरम्यान गाडीमध्ये कोणतीही तक्रार उद्भवलेली नव्हती. त्यामुळे तसा कोणताही शेरा सर्व्हिसिंग व्हाऊचरवर नमूद केला गेलेला नाही. दि. 17/5/2020 ते दि. 4/3/2021 यादरम्यान तक्रारदार यांनी सदरची गाडी सर्व्हिसिंग करण्याकरिता न आणता सदर गाडी 14200 किमी चालल्यानंतर जाबदार क्र.1 यांचे सर्व्हिस सेंटरमध्ये आणली. यावरुन तक्रारदार यांचा हलगर्जीपणा दिसून येतो. गाडीमध्ये उत्पादित दोष अगर बॅटरीमध्ये कोणताही दोष नाही तसा कोणताही शेरा जॉबकार्डवर नोंदलेला नाही. गाडीमध्ये इनबिल्ट जी.पी.एस.कनेक्शन आहे. गाडीमध्ये उत्पादित दोष असलेबाबत कोणताही तज्ञाचा अहवाल याकामी तक्रारदाराने दाखल केलेला नाही. सबब, जाबदारांनी सेवेत कोणतीही त्रुटी केली नसल्याने तक्रारअर्ज फेटाळणेत यावा अशी मागणी जाबदार क्र.1 व 2 यांनी केली आहे.
5. जाबदार क.1 व 2 यांनी याकामी पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
6. तक्रारदाराची तक्रार, शपथपत्र, दाखल कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, तसेच जाबदार क्र.1 व 2 यांचे म्हणणे, पुराव्याचे शपथपत्र तसेच उभय पक्षांचा युक्तिवाद यांचे अवलोकन करता खालील मुद्दे निष्कर्षासाठी उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार हा जाबदार यांचा ग्राहक आहे काय ? | होय. |
2 | जाबदार यांनी तक्रारदारास सदोष गाडीची विक्री करुन सेवा देण्यामध्ये त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे जाबदार यांचेकडून गाडी खरेदीपोटी अदा केलेली रक्कम परत मिळणेस व नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहे काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
कारणमिमांसा
मुद्दा क्र.1
7. तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडून ओकिनावा I-Praise हे वाहन खरेदी केले आहे. सदर खरेदीबाबत तक्रारदार यांनी दि.23/2/2019 रोजीची जाबदार क्र.1 यांनी दिलेली पावती दाखल केली आहे. सदरची पावती जाबदार यांनी नाकारलेली नाही. जाबदार यांनी तक्रारदाराने त्यांचेकडून वाहन खरेदी केलेची बाब त्यांचे म्हणण्यामध्ये नाकारलेली नाही. सबब, तक्रारदार हे जाबदार क्र.1 व 2 यांचे ग्राहक आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हा आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2
8. तक्रारदारांनी त्यांचे तक्रारअर्जात जाबदार यांनी तक्रारदार यांना उत्पादित दोष असलेल्या गाडीची विक्री केली असे कथन केले आहे. जाबदार यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये सदरची बाब नाकारली आहे. जाबदारांचे कथनानुसार, जाबदारांनी गाडीमध्ये उत्पादित दोष अगर बॅटरीमध्ये कोणताही दोष नाही, त्यामुळे कोणताही शेरा जॉबकार्डवर नोंदलेला नाही. गाडीमध्ये इनबिल्ट जी.पी.एस.कनेक्शन आहे असे जाबदार यांचे कथन आहे. जाबदारांनी त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारदारांनी त्यांचे गाडीचे सर्व्हिसिंग जाबदारांकडून वेळोवेळी करुन घेतल्याचे नमूद केले आहे. परंतु जाबदारांनी सदर सर्व्हिसिंगचे जॉब कार्ड याकामी दाखल केलेले नाहीत. जाबदारांचे कथनानुसार, जाबदारांनी गाडीमध्ये उत्पादित दोष अगर बॅटरीमध्ये दोष असता तर तो शेरा जॉबकार्डवर नोंदविला असता असे कथन केले आहे. जर जॉब कार्डवर तसा शेरा नमूद नसेल तर जाबदारांनी सदरचे जॉब कार्ड याकामी दाखल करणे आवश्यक होते. सदरचे जॉबकार्ड याकामी दाखल का केले नाहीत याचा कोणताही खुलासा जाबदार यांनी दिलेला नाही.
9. तक्रारदार हे उच्चशिक्षित नाहीत. त्यामुळे तक्रारदार यांना इंग्रजीचे ज्ञान यथातथाच असलेचे दिसते. तक्रारदार यांनी दि.28/11/2023 रोजी ओकीनावा कंपनीचे माहितीपत्रक दाखल केलेले आहे. सदर माहितीपत्रकाचे अवलोकन करता पान नं. 3 व 5 वर तक्रारदार यांनी वाहन चालवित असताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केलेचे दिसते. जाबदार यांनी सदर माहिती तक्रारदार यांना स्पष्टपणे समजावून सांगितली अथवा नाही याबाबत जाबदारांनी त्यांचे म्हणण्यामध्ये कोणतेही कथन केलेले नाही. पान नं.5 वर Guidelines या सदराखाली “If you apply break, power will cut off from motor and vehicle will stop moving” असे स्पष्टपणे लिहिलेले दिसते. म्हणजेच वादातील वाहन अत्यंत तंत्रशुध्दपणे चालविणे आवश्यक होते. सदरची बाब जाबदार यांनी तक्रारदार यांना स्पष्ट केली होती याबाबत जाबदार यांनी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदींनुसार ग्राहक विकत घेत असलेल्या उत्पादनाबाबत पूर्ण माहिती करुन घेणे हा ग्राहकाचा अधिकार मान्य केला आहे. सबब, तक्रारदार यांना वाहन चालविणेबाबत योग्य ती माहिती न देवून जाबदार यांनी सेवात्रुटी केली असल्याचे या आयोगाचे स्पष्ट मत आहे.
10. तक्रारदार यांचे तक्रारीचे अवलोकन करता तक्रारदार यांनी गाडी खरेदी करुन ताब्यात घेतले दिवसापासून तक्रार सुरु आहे. तक्रारदारांचे तक्रारअर्जात टेक्निशियन सुमित यांचा वारंवार उल्लेख केलेला आहे. टेक्निशियन सुमित यांनी वारंवार तक्रारदार यांचे गाडीची तपासणी केली आहे व गाडीमध्ये दोष असलेचे मान्य केले आहे. जाबदारांनी त्यांचे म्हणणेमध्ये, सदर टेक्निशियन सुमित यांचेबद्दल अथवा त्यांनी केलेल्या तपासणीबद्दल कोणताही उल्लेख केलेला नाही.
11. तक्रारदार यांनी त्यांचे पुराव्यासोबत श्री संतोष नलवडे यांचे शपथपत्र व त्यासोबत फोटो दाखल केले आहेत. सदर शपथपत्र व फोटोग्राफ्सचे अवलोकन करता विविध रिडींगला बॅटरी एकसारखीच दाखवत असलेचे दिसते. याबाबत जाबदार यांनी कोणताही तज्ञाचा अहवाल या आयोगासमोर दाखल केलेला नाही.
12. तक्रारदाराने जाबदार यांचेकडे गाडीतील दोषांबाबत अनेक तक्रारी केल्या होत्या. बॅटरी बाऊन्स होते, बॅटरी बाऊन्स होवू नये म्हणून सेफ्टी बेल्ट दिलेला नाही. गाडीत ऑईल सिल समस्या आहे. इंधन इंडीकेटर कॅन्डल सदोष आहे. तथापि सदरचे दोष दूर केलेबाबत तसेच वाहनात कोणताही उत्पादीत दोष नसलेबाबत व वाहन सुस्थितीत असलेबाबतचा कोणताही पुरावा जाबदार यांनी आयोगासमोर आणलेला नाही.
13. तक्रारीचे कलम (K) व (L) मध्ये तक्रारदार यांचे मोबाईल व गाडीला जी.पी.एस. सिस्टीम कनेक्ट करुन देणेकरिता तक्रारदाराने विनंती केली तथापि प्रयत्न करुन देखील मोबाईल व गाडीचे कनेक्शन यशस्वी झाले नाही. जाबदार यांनी तक्रारदार यांना मोबाईल दुरुस्त करणेस सांगितला हे तक्रारदाराचे कथन जाबदारांनी खोडून काढलेले नाही अथवा त्याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही.
14. तक्रारदारांचे कथनानुसार, तक्रारदार यांनी जाबदार क्र.1 यांचेकडून वाहन खरेदी केलेनंतर ते चालवून पाहिले असता पहिल्याच दिवशी त्यामध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे निदर्शनास आले. तदनंतर गाडीचे पहिले सर्व्हिसिंग करण्यात आले. परंतु तरीही गाडीतील दोष दूर झाला नाही. वाहनामध्ये उत्पादीत दोष असल्याबाबत तक्रारदाराने जाबदारांना सांगितले. परंतु जाबदारांनी सर्व्हिस बुकवर त्याची नोंद घेतली नाही. जाबदार यांचे तंत्रज्ञ सुमित यांनीही गाडीची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी गाडीमध्ये किंवा बॅटरीमध्ये किंवा दोन्हीमध्ये उत्पादित दोष आहे तेव्हा मालकाला नवी बॅटरी देण्यास सांगतो असे त्यांनी सांगितले. परंतु तदनंतर जाबदार यांचेकडून याबाबत तक्रारदारास कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. जाबदारांकडून तक्रारदारांना जी.पी.एस. संरक्षण नेव्हीगेशन यंत्रणा प्राप्त झालेली नाही. त्याचप्रमाणे इंधन इंडीकेशन दोष दूर झालेला नाही. तसेच अॅंटीथेफ्ट सिक्युरिटी सिस्टीम मिळालेली नाही. तक्रारदार जाबदार क्र.1 यांचेकडे वारंवार लेखी अर्ज घेवून जात होते. परंतु त्यांचा अर्ज कोणीही स्वीकारत नव्हते असे कथन तक्रारदारांनी केले आहे. सदरची कथने जाबदार यांनी योग्य तो पुरावा देवून खोडून काढलेली नाहीत. जाबदारांनी तक्रारदारांना त्यांचे गाडीमध्ये जी.पी.एस. संरक्षण नेव्हीगेशन यंत्रणा व अॅंटीथेफ्ट सिक्युरिटी सिस्टीम पुरविली होती हे दर्शविणारा कोणताही पुरावा जाबदार यांनी दाखल केलेला नाही. या सर्व बाबींचा विचार करता जाबदारांनी तक्रारदारास सदोष वाहनाची विक्री करुन व सेवेत गंभीर त्रुटी दिली तसेच वाहन चालवत असताना ते वाहन अत्याधुनिक यंत्रणानी युक्त असलेने ते वापरताना कोणतीही माहिती व सुचना न देऊन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. तक्रारदार यांनी त्यांचे तक्रार अर्जामध्ये सरकारी अनुदानाबाबत उल्लेख केलेला आहे. मात्र त्याबाबत तक्रारदार व जाबदार यांनी कोणतीही मागणी न केलेने त्याबाबत कोणतेही आदेश करणे उचित होणार नाही असे या आयोगाचे मत आहे.
जाबदारांनी तक्रारदारांना पुरविलेले वाहन हे दोषमुक्त होते हे दाखविणेकरिता जाबदार यांनी वादग्रस्त वाहनाचा कोणत्याही तज्ञाचा अहवाल या आयोगासमोर दाखल केलेला नाही. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर होकारार्थी देण्यात आले आहे.
मुद्दा क्र.3
15. तक्रारदाराने याकामी जाबदार यांचेकडून गाडीची किंमत रु.1,15,000/- परत मिळावी, खर्चापोटी रु.30,000/- मिळावेत, नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.2,00,000/- जाबदारकडून मिळावेत अशी मागणी केली आहे. तक्रारदार यांना वादग्रस्त वाहन वापरत असताना ते आधुनिक यंत्रणानी युक्त असलेने व जाबदार यांनी तक्रारदार यांना वाहन वापरत असताना योग्य माहिती व सुचना न दिलेने तक्रारदार यांना वाहन चालविताना अनेक अडचणी आलेल्या आहेत. तथापि, जाबदारांनी तक्रारदारांना सदोष वाहनाची विक्री केली असलेने व सदरचा दोष दूर करणेस जाबदार हे असमर्थ ठरले असलेने तक्रारदाराची गाडी खरेदीपोटी दिलेली रक्कम रु.1,15,000/- परत मिळणेची मागणी मंजूर करणेचे निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. तसेच सदोष वाहनामुळे तक्रारदारास मानसिक त्रास सहन करावा लागला तसेच या आयोगात तक्रार अर्ज दाखल करावा लागला. या बाबींचा विचार करता तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रु.20,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब आदेश.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
- जाबदार क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या तक्रारदारास वादातील वाहन खरेदीची किंमत रक्कम रु.1,15,000/- परत करावी.
- जाबदार क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.20,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- अदा करावेत.
- जाबदार क्र.1 व 2 यांनी तक्रारदारास रक्कम रु.1,15,000/- अदा केल्यानंतर तक्रारदार यांनी जाबदार यांना वादातील वाहन परत करावे.
- सदर आदेशाचे अनुपालन जाबदार क्र.1 व 2 यांनी कंपनीने निकालाची प्रत मिळालेपासून 45 दिवसांचे आत करावे.
- जाबदार यांनी विहीत मुदतीत सदर आदेशाचे अनुपालन न केल्यास तक्रारदार यांना ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदींनुसार योग्य ती दाद मागणेची मुभा राहील.
- सदर आदेशाच्या प्रती विनाशुल्क उभय पक्षकारांना द्याव्यात.