तक्रारदार स्वत: हजर.
जाबदेणार क्र. 1 तर्फे अॅड. गायकवाड हजर
जाबदेणार क्र. 2 गैरहजर
द्वारा मा. श्री. व्ही. पी. उत्पात, अध्यक्ष
** निकालपत्र **
(18/12/2013)
प्रस्तुतची तक्रार ही तक्रारदाराने शैक्षणिक संस्था व विद्यापीठाविरुद्ध सेवेतील त्रुटीसंदर्भात ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 12 नुसार दाखल केलेली आहे. तक्रारीतील कथने खालीलप्रमाणे आहेत.
1] तक्रारदार यांना संगीत क्षेत्रामध्ये रस व आवड असल्यामुळे त्यांनी त्या विषयाची पदविका प्राप्त केली आहे. जाबदेणार क्र. 1 ही संगीत शिक्षण देणारी संस्था आहे व जाबदेणार क्र. 2 हे सदर संस्थेशी संलग्न असलेले विद्यापीठ आहे. जाबदेणार क्र. 2 यांच्या प्रवेशाच्या नियम व अटीनुसार ज्या विद्यार्थ्यांनी संगीत विषयाची पदविका प्राप्त केली असेल त्या विद्यार्थ्यांना थेट संगीत पदवीच्या द्वितीय प्रवेश देण्यात येतो. या नियमानुसार जाबदेणार क्र. 1 यांनी तक्रारदार यांना सन 2010-11 या वर्षाकरीता ‘बी.ए. क्लासिकल म्युजिक द्वितीय वर्ष’ साठी प्रवेश दिला व तक्रारदारांनी दि. 29/6/2010 रोजी रक्कम रु. 12,000/- भरले. जाबदेणार क्र. 2 यांनी जाहीर केलेल्या डिसे. 2010 मध्ये होणार्या परिक्षेसाठी तक्रारदार यांनी फॉर्म भरला. सदर परिक्षेच्या वेळापत्रकानुसार दि. 27/12/2010 ते 31/12/2010 या कालावधीमध्ये सर्व विषयांच्या पेपर्सना हजर राहून तक्रारदार यांनी परिक्षा दिली. त्यानंतर तक्रारदार यांनी सदर परिक्षेच्या निकालाबाबत चौकशी केली असता जाबदेणार क्र. 1 यांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली व जाबदेणार क्र. 2 यांच्याकडे चौकशी करण्यास सांगितले. तक्रारदार यांच्या कथनानुसार, वारंवार पुणे येथे समक्ष जाऊनही दाद लागत नसल्याने त्यांनी जाबदेणारांना वकीलामार्फत नोटीस पाठविली व बी.ए. भाग-2 क्लासिक
म्युझिक मध्ये प्रवेश देणेविषयी अथवा प्रवेश फी रक्कम रु. 12,000/- व शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 25,000/- देणेविषयी कळविले. त्या नोटीसीस जाबदेणार यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली. तक्रारदार यांनी जाबदेणार यांचेकडून प्रवेश फीची रक्कम रु. 12,000/-, मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्कम रु. 25,000/-, शैक्षणिक नुकसानीपोटी रक्कम रु. 1,00,000/-, प्रवास खर्च रक्कम रु. 5,000/- व तक्रारीचा खर्च रक्कम रु. 5,000/-, असे एकुण रक्कम रु. 1,47,000/- ची मागणी केलेली आहे.
2] या प्रकरणात जाबदेणार क्र. 2 नोटीस बजवूनही गैरहजर रहीले म्हणून त्यांच्याविरुद्ध एकतर्फा चौकशीचे आदेश पारीत करण्यात आले.
3] जाबदेणार क्र. 1 यांनी मंचामध्ये उपस्थित राहून त्यांचे लेखी म्हणणे दाखल केले व त्यामध्ये तक्रारीतील कथने नाकारली आहेत. जाबदेणार क्र. 1 यांच्या लेखी कथनानुसार त्यांची संस्था ही जाबदेणार क्र. 2 यांच्याशी संलग्न आहे. तक्रारदार यांनी त्यांच्या संस्थेमध्ये प्रवेश घेतला होता, ही बाब ते कबुल करतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा व जाबदेणार क्र. 2 यांच्यामध्ये करार झालेला आहे व त्या करारानुसार परिक्षा घेणे, त्याचे निकाल जाहीर करणे, ही कामे जाबदेणार क्र. 2 यांची आहेत. त्यामुळे जाबदेणार क्र. 1 यांनी कोणत्याही प्रकारची दुषित सेवा दिलेली नाही. तक्रारदार या परिक्षेस पात्र नसल्याबद्दल त्यांना कळविण्यात आलेले होते व तक्रारदार यांनी स्वत:च्या जोखमीवर प्रवेश घेतला होता, त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची दाद या मंचापुढे मागता येणार नाही. तक्रारदार यांनी केलेल्या नुकसान भरपाईच्या मागण्या जाबदेणार क्र. 1 यांनी नाकारलेल्या आहेत. त्यांच्या कथनानुसार त्यांना फक्त
35% रक्कम मिळालेली आहे, उर्वरीत रक्कम ही विद्यापीठाला दिलेली आहे. त्यामुळे सदरची तक्रार फेटाळण्यात यावी अशी विनंती जाबदेणार क्र. 1 यांनी केलेली आहे.
3] दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले शपथपत्र व कागदोपत्री पुरावे आणि लेखी कथने विचारात घेता खालील मुद्दे निश्चित करण्यात येत आहेत. सदरचे मुद्ये, त्यावरील निष्कर्ष व कारणे खालीलप्रमाणे-
अ.क्र. | मुद्ये | निष्कर्ष |
1. | जाबदेणार यांनी तक्रारदार यांना दुषित सेवा दिल्याचे सिद्ध होते का? | होय |
2. | जाबदेणार हे नुकसान भरपाई देण्यासाठी जबाबदार आहेत काय? | होय |
3. | अंतिम आदेश काय ? | तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते |
कारणे
4] या प्रकरणी जाबदेणार क्र. 2 हे गैरहजर राहिल्यामुळे त्यांनी त्यांचे लेखी म्हणणॆ दाखल केले नाही. तरी दोन्ही बाजूंना मान्य असणार्या गोष्टी म्हणजे तक्रारदार यांनी जाबदेणार क्र. 1 यांचेकडे सन 2010-11 या शैक्षणिक वर्षासाठी ‘बी.ए. क्लासिकल म्युजिक द्वितीय वर्ष’ साठी प्रवेश घेतला होता. तक्रारदार यांनी ही बाब सिद्ध करण्यासाठी कागदोपत्री पुरावा दाखल केलेला आहे. त्यामध्ये तक्रारदार यांनी पावती दाखल केलेली आहे. त्यावरुन ही गोष्ट सिद्ध होते. जाबदेणार क्र. 1 यांच्या लेखी व तोंडी युक्तीवादानुसार असे स्पष्ट होते की, जाबदेणार क्र. 1 व 2 यांचेमध्ये करार झालेला होता व जाबदेणार क्र. 1 यांना मिळालेल्या फी च्या रकमेपैकी काही प्रमाणात रक्कम जाबदेणार क्र. 2 यांना दिलेली होती. त्या अनुषंगे जाबदेणार क्र. 1 यांनी कागदोपत्री पुरावा दाखल केलेला आहे. त्याचप्रमाणे सदर वर्षासाठी ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता त्यांची दि. 27/10/2010 रोजीची यादी दाखल केलेली आहे. त्यामध्ये तक्रारदार यांचे नाव दिलेले आहे. यावरुन असे स्पष्ट होते की, तक्रारदार यांना ‘बी.ए. क्लासिकल म्युजिक द्वितीय वर्ष’ साठी प्रवेश दिला होता. त्याचप्रमाणे जाबदेणार क्र. 1 यांनी जाबदेणार क्र. 2 यांना पाठविलेल्या दि. 17/1/2011 रोजीच्या पत्राची प्रतही दाखल केलेली आहे. त्यामध्येही या बाबीचा उल्लेख आहे. जाबदेणार क्र. 2 यांनी दि. 29/1/2011 रोजीच्या पत्रान्वये जाबदेणार क्र. 1 यांना असे कळविले की, त्यांच्या दि. 20/1/2011 रोजीच्या पत्रानुसार मान्यताप्राप्त संस्थेचा संगीत डिप्लोमा उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना, विद्यापिठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या दुसर्या वर्षास प्रवेश देण्याबाबत केलेली विनंती मान्य करता येणार नाही. त्यानंतरदेखील ज्याअर्थी जाबदेणार क्र. 1 यांनी तक्रारदारांना ‘बी.ए. क्लासिकल म्युजिक द्वितीय वर्ष साठी’ प्रवेश दिला, त्यांचा परिक्षा फॉर्म जाबदेणार क्र. 2 यांनी स्विकारला, त्याअर्थी त्यावेळी जाबदेणार क्र. 1 व 2 यांना या बाबी मान्य होत्या असे दिसून येते. या विषयाची परिक्षा झाल्यानंतरदेखील तक्रारदार यांचा प्रवेश गैर आहे, असे जाबदेणार यांनी तक्रारदार यांना कळविले नाही. यावरुन जाबदेणार क्र. 1 व 2 यांनी सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिद्ध होते. जाबदेणार क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारांकडून ज्या कारणासाठी रक्कम स्विकारली होती त्यांना ती सेवा दिली नाही, त्यामुळे ते तक्रारदार यांना नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहेत. जाबदेणार क्र. 1 यांच्या कथनानुसार तक्रारदारांनी त्यांचेकडे मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करुन घेतल्यामुळे त्यांना ही नुकसान भरपाई मागता येणार नाही. या प्रकरणात दाखल कागदपत्रांवरुन असे दिसून येते की, तक्रारदार यांनी जाबदेणार क्र. 1 यांचेकडे रक्कम रु. 12,000/- भरले होते. त्यांनी ज्या कारणासाठी रक्कम जाबदेणारांकडे भरली होती त्या कारणाची पुर्तता जाबदेणार यांनी केलेली नाही. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना योग्य वेळी त्या ‘बी.ए. क्लासिकल म्युजिक द्वितीय वर्ष’ साठी पात्र नाहीत, असे कळविले असते, तर त्यांचे वर्ष वाया गेले नसते. त्यामुळे ते तक्रारदार यांना नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहेत. जाबदेणार क्र. 1 व 2 यांनी तक्रारदार यांना, त्यांनी भरलेली प्रवेश फी रक्कम रु. 12,000/-, त्याचप्रमाणे मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्कम रु. 6,000/- व कोर्ट खर्च व इतर खर्च म्हणून रक्कम रु. 5,000/- द्यावेत, असा आदेश करणे योग्य ठरेल. वर उल्लेख केलेले मुद्दे, निष्कर्षे आणि कारणे यांचा विचार करता, खालील आदेश पारीत करण्यात येतो.
** आदेश **
1. तक्रारदार यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात
येते.
2. जाबदेणार क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारांना वैकक्तीक
व संयुक्तीकरित्या एकुण रक्कम रु. 23,000/-
(रु. तेवीस हजार फक्त) या आदेशाची प्रत मिळाल्या
पासून सहा आठवड्यांच्या आंत द्यावेत.
4. जाबदेणार क्र. 1 व 2 यांनी वरील रक्कम रु.23,000/-
तक्रारदार यांना दिलेल्या सहा आठवड्यांच्या मुदतीत
न दिल्यास त्यावर द.सा.द.शे. 9% व्याज तक्रार दाखल
करण्याच्या तारखेपासून म्हणजे दि.11/06/2012 पासून
ते संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत द्यावे.
5. आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क
पाठविण्यात यावी.
6. दोन्ही पक्षकारांना असे आदेश देण्यात येतात
की त्यांनी आदेशाची प्रत मिळाल्यापासून एक
महिन्याच्या आंत सदस्यांकरीता दिलेले तक्रारीचे
संच घेऊन जावेत, अन्यथा सदरचे संच नष्ट
करण्यात येतील.
स्थळ : पुणे
दिनांक : 18/डिसे./2013