(पारीत व्दारा श्री भास्कर बी. योगी, मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक- 27 मे, 2022)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा -2019 च्या कलम-35 खाली विरुध्दपक्ष फ्युचर जनरली इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि इतर यांचे विरुध्द विमा पॉलिसीपोटी विमा रक्कम मिळण्यासाठी आणि इतर अनुषंगीक मागण्यांसाठी दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे त्याचे विरुध्दपक्ष क्रं 2 युको बॅंके मध्ये सी.सी.लोन खाते क्रं-20930510000472 आहे. त्याने विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंके मधून कर्ज रुपये-2,00,000/- काढले होते, कर्ज घेते वेळी विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेच्याउमार्फतीने विरुध्दपक्ष क्रं 1 फ्युचर जनरली इन्शुरन्स कंपनी कडून विमा पॉलिसी रुपये-3,00,000/- रकमेची काढली होती आणि विमा हप्त्याची रक्कम रुपये-885/- त्याचे विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेच्या कर्ज खात्यातून बॅंकेने कपात केली होती. सदर विमा पॉलिसीचा कालावधी हा दिनांक-18.12.2019 ते दिनांक-17.12.2020 पर्यंत होता. तक्रारकर्त्याचा व्यवसाय हा कौटूंबिक उपजिविकेसाठी असल्याने तो विरुध्दपक्षांचा ग्राहक आहे. सदर विमा पॉलिसी ही तक्रारकर्त्याच्या गोडाऊन मधील असलेल्या साहित्याची होती. तो नियमित पणे बॅंकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करीत होता. दिनांक-30.08.2020 रोजी महापूर आला आणि तो पूर दिनांक-31.08.2020 पर्यंत होतो. सदर पूराचे पाणी तक्रारकर्त्याच्या गोडाऊन मध्ये शिरले आणि गुडघ्या पर्यंत पाणी 24 तास राहिल्यामुळे गोडाऊन मध्ये ठेवलेले साहित्य पुराच्या पाण्यामुळे पूर्णपणे खराब झाले, जे पुन्हा उपयोगात येऊ शकत नव्हते, त्यामुळे त्याचे आर्थिक नुकसान झाले. दिनांक-09.09.2020 रोजी त्याने विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेस भेट दिली आणि अधिका-यांना कल्पना दिली असता त्यांनी विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीची भेट घ्यावी असेसांगितले. त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे प्रतिनिधीशी दुरध्वनी वरुन संपर्क साधला असता त्यांनी ई मेल पाठविण्यास सुचित केलया प्रमाणे दिनांक-09.09.2020 रोजी वि.प. क्रं 2 बैंके कडे ई मेल पाठविला. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे प्रतिनिधीने त्याचे कडून स्टॉक स्टेटमेंट , बॅलन्स शिट त्याचे कडून मागवून घेतली. सदर प्रतिनिधीने गोडाऊनची पाहणी केली तसेच व्ही.डी.ओ. कॉल व्दारे विमा कंपनीला गोडाऊन मधील साहित्य दाखवून विमा रक्कम देण्याचे आशवासन दिले. परंतु विमा रक्कम न मिळाल्यामुळे त्याने वेळोवेळी विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांचेशी संपर्क साधून विमा रकमेची मागणी केली परंतु आज पर्यंत विमा रक्कम मिळाली नाही. त्याने विरुध्दपक्षा कडे अधिवक्ता यांचे मार्फतीने दिनांक-28.12.2020 रोजीची कार्यदेशीर नोटीस पाठवून विमा रकमेची मागणी केली पंरतु पुर्तता केली नाही तसेच नोटीसला विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने उत्तर सुध्दा दिले नाही. विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेनी नोटीसला उत्तर देऊन त्यांची कोणतीही जबाबदारी येत नसल्याचे नमुद केले. अशाप्रकारे विरुध्दपक्षांनी तक्रारकर्त्यास दोषपूर्ण सेवा दिली म्हणून त्याने जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष प्रस्तुत तक्रार दाखल करुन त्याव्दारे विरुध्दपक्षां विरुध्द खालील प्रमाणे मागण्या केल्यात-
- तक्रारकर्त्याचे गोडाऊन मधील साहित्याचे नुकसानी बाबत विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून विमा राशी रुपये-3,00,000/- आणि सदर रकमेवर नुकसानीचा दिनांक-31.08.2020 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-18 टक्के दराने व्याज देण्याचे आदेशित व्हावे.
- विरुध्दपक्षांच्या दोषपूर्ण सेवेमुळे त्याला झालेल्या शारिरीक, मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई रुपये-50,000/- तसेच आर्थिक नुकसानी पोटी रुपये-50,000/- अशा नुकसान भ्रपाईच्या रकमा विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांचे कडून देण्याचे आदेशित व्हावे.
- सदर तक्रारीचा खर्च रुपये-30,000/-विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांचे कडून देण्याचे आदेशित व्हावे.
- या शिवाय योग्य ती दाद त्याचे बाजूने मंजूर करण्यात यावी.
03. विरुध्दपक्ष क्रं 1 फ्युचर जनरली इन्शुरन्स कंपनी तर्फे लेखी उत्त्र जिल्हा ग्राह आयोगा समक्ष दाखल करण्यात आले. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने लेखी उत्तरात नमुद केले की, विमाधारकाचे कथना नुसार घटनेच्या वेळी गोडाऊन मध्ये ठेवलेल्या साहित्याची बाजारभावा प्रमाणे किम्मत रुपये-18,65,152/- होती परंतु विमा रक्कम रुपये-3,00,000/- एवढीच आहे. विमा सर्व्हेअर यांचे अहवाला प्रमाणे जे साहित्य जमीनीवर, रॅकचे खालच्या खणा मध्ये ठेवलेले होते तेच साहित्य पाण्यामुळे खराब झाले परंतु जे साहित्या पाण्याचे पातळीचे वर ठेवलेले होते ते साहित्य पाण्या पासून सुरक्षित राहिले. सर्व्हेअर यांनी साहित्याची पाहणी करुन खराब झालेल्या साहित्याची यादी बनविली तसेच ते साहित्य दुरुस्त करुन पुन्हा उपयोगात आणले जाईल ते लक्षात घेऊन टोटल लॉस बेसीसवर नुकसानी काढली. सर्व्हेअर यांनी झालेल्या नुकसानीच्या रकमे बाबत दिनांक-20.10.2020 रोजी कळविले परंतु तक्रारकर्त्याने त्या रकमे बाबत कोणताही आक्षेप घेतला नाही त्यावरुन सर्व्हेअर यांनी फायनल सर्व्हे अहवाल विमा कंपनी मध्ये दाखल केला. सर्व्हेअर यांचे अहवाला प्रमाणे विमा कंपनीने रुपये-30,515/- विमा रक्कम देण्याचे ठरविले आणि तसे तक्रारकर्ता यास कळविले परंतु वारंवार स्मरण देऊनही तक्रारकर्ता विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी मध्ये आला नाही तसेच विमा रक्कम मान्य नसल्या बाबत कोणतेही कायदेशीर कारण दिले नाही. विमा रक्कम मान्य नसल्यास ती का मान्य नाही हे सिध्द करण्याची जबाबदारी तक्रारकर्त्यावर आहे. त्यांनी तक्रारकर्त्यास कोणतही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. तक्रारकर्ता हा स्वच्छ हाताने जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष आलेला नाही आणि तो न्यायालयाची दिशाभूल करीत आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला नुकसानी बाबत दिनाक-09.10.2020 रोजी कळविले होते. दिनांक-13.10.2020 रोजी तक्रारकर्त्याने आवश्यक दस्तऐवज सर्व्हेअरला पुरविले. सर्व्हेअर यांनी नुकसानीचे निर्धारण करुन दिनांक-20.10.2020 रोजी पाठविले परंतु सदर नुकसानीचे निर्धारण तक्रारकर्त्यास मान्य नव्हते परंतु ते का मान्य नाही हे आज पर्यंत तक्रारकर्त्याने विमा कंपनीला कळविलेले नाही. सर्व्हेअर यांनी त्यांचा दिनांक-03.12.2020 रोजीचा सर्व्हे अहवाल विमा कंपनीला पाठविला. सर्व्हेअर यांचे अहवाला प्रमाणे विमा कंपनीने विमा रक्कम रुपये-30,515/- निर्धारित केली आणि तसे तक्रारकर्त्यास दिनांक-11.12.2020 रोजीचे ई मेल व्दारे कळविले. तसेच पुढे तक्रारकर्त्यास दिनांक-25.12.2020 रोजी स्मरणपत्र पाठविले परंतु तक्रारकर्त्याने काहीही कळविले नाही. तक्रारकर्त्याची कायदेशीर नोटीस विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला प्राप्त झाली होती. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी फुल अॅन्ड फायनल सेटलमेंट पोटी रुपये-30,515/- एवढी रक्कम देण्यास तयार असल्याचे नमुद केले.
04. विरुध्दपक्ष क्रं 2 युको बॅंके तर्फे लेखी उत्तरा मध्ये नमुद केले की, तक्रारकर्त्याने दिनांक-30.08.2021 ते 31.08.2021 चे पुरामुळे झालेल्या नुकसानी बाबत त्यांना दिनांक-09.09.2020 रोजी कळविले असता त्यांनी विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला कळविले. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्त्याचा विमा दावा मंजूर करुन विमा रकमे बाबत तक्रारकर्त्यास कळविले. विमा दाव्या बाबत निर्णय घेण्याचे अधिकार विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला आहे. त्यांनी तक्रारकर्त्याचे नोटीसला दिनांक-12.01.2021 रोजी उत्तर दिले. सबब त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करावी अशी विनंती केली.
05. तक्रारकर्त्याची तक्रार व दाखल दस्तऐवज, विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे लेखी उत्तर, तसेच तक्रारकर्त्याचा आणि विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचा शपथे वरील पुरावा आणि उभय पक्षांचे अधिवक्ता यांचा मौखीक युक्तीवाद यावरुन जिल्हा ग्राहक आयोगा समोर खालील मुद्दे न्यायनिवारणार्थ उपस्थित होतात-
अक्रं | मुद्दा | उत्तर |
1 | विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्त्याचे नुकसानीचे निर्धारण कमी रकमेचे करुन दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते काय? | -होय- |
2 | विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेनी तक्रारकर्त्यास दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते काय? | -नाही- |
3 | काय आदेश? | अंतीम आदेशा नुसार |
मुद्दा क्रं 1 ते 3 बाबत-
06. तक्रारकर्त्याने आपले साक्षी पुराव्यात असे नमुद केले की, पुराचे पाण्यामुळे जे साहित्या दुरुस्त होण्या लायक होते ते त्याने दिनांक-20.04.2021 ते 28.04.2021 कालावधीत दुरुस्त केले त्यासाठी त्याला एकूण रुपये-63,500/- खर्चआला. तसेच कापडी साहित्या पूर्णपणे खराब झाल्याने त्याचे रुपये-1,50,000/- नुकसान झाले. याशिवाय नुकसान झालेल्या साहित्याची जी यादी दिली होती त्या यादी प्रमाणे त्याची किम्मत रुपये-4,50,500/- एवढी होती अशाप्रकारे त्याचे पुरामुळे एकूण रुपये-6,64,000/- नुकसान झाले. तक्रारकर्त्याने तक्रारी सोबत दिनांक-10.09.2019 रोजीचे साहित्याची यादी ज्यामध्ये मंडप डेकोरेशन साहित्य , हॅलोजन लाईट, जनरेटर, फॅन, माईक, सोफा, चेअर्स, ग्रीन मॅट, पाणी ड्रम, गादया, गॅस शेगडी, प्लेट असे साहित्य नमुद असून एकूण किम्मत रुपये-25,76,400/- दर्शविलेली आहे, ज्यावर विरुघ्दपक्ष क्रं 2 बॅंकेची सही व शिक्का आहे, थोडक्यात विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेनी सदर साहित्य प्रमाणित केलेले आहे. तसेच दिनांक-31 मार्च, 2020 रोजीची बॅलन्सशिट तसेच प्राफीट अॅन्ड लॉस अकाऊंट दाखल केलेले आहे. दिनांक-09.09.2020 रोजी नुकसान झालेल्या साहित्याची जी यादी तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला दिलेली आहे, त्या यादी मध्ये जनरेटर, एम्प्लीफायर, माईक, साऊंड बॉक्स , एलईडी लाईटस, कापसाच्या यादया, सिलींग मंडप, गॅस शेगडी, मिक्सर असे साहित्य नमुद असून एकूण नुकसानी रुपये-4,50,500/- दर्शविलेली आहे. या शिवाय तक्रारकर्त्याने वर्मा जनरेटर अॅन्ड इलेक्ट्रिकल्स, नागपूर यांचे कडून नुकसान झालेले जे साहित्य दुरुस्त करुन घेतले त्याचे दिनांक-22.04.2021 रोजीचे रुपये-33,000/-चे बिलाची प्रत दाखल केली. या शिवाय दुर्गा फर्नीचर भंडारा यांचे दिनांक-02.06.2021 रोजीचे रुपये-12,200/- चे बिलाची प्रत दाखल केली.
07. विरुध्दपक्ष क्रं 1 फ्युचर जनरली इन्शुरन्स् कंपनीने विमा पॉलिसीची प्रत दाखल केली, त्या नुसार तक्रारकर्त्याचे मंडप डेकोरेशन आणि बिछायतीचे साहित्या संबधात रुपये-3,00,000/- विमा रकमेची जोखीम स्विकारल्याचे दिसून येते. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने सर्व्हेअर टीम इन्शुरन्स सर्व्हेअर अॅन्ड लॉस अॅसेसरस, नागपूर यांचा दिनांक-03.12.2020 रोजीचा फायनल सर्व्हे अहवाल पुराव्यार्थ दाखल केला. सर्व्हेअर यांनी दिनांक-22.09.2020 रोजी पाहणी केल्याचे नमुद आहे. सर्व्हेअर यांनी अहवालामध्ये जे साहित्या जमीनीवर आणि रॅकचे खालचे खाण्यात ठेवले ते पाण्यामुळे खराब झाले परंतु जे साहित्य पाण्याचे पातळीचे वर ठेवले होते त्याचे नुकसान झाले नाही तर काही साहित्य हे दुरुस्त होण्या लायक होते. तक्रारकर्त्याने रुपये-4,50,500/- चा क्लेम केल्याचे नमुद केले. परंतु सर्व्हेअर यांनी नुकसान झालेले ढोबळ साहित्य रुपये-3,63,500/- नमुद करुन त्यामधून 25 टक्के घसारा रुपये-90,875/- कमी केला. तसेच सॉल्व्हेजची किम्मत रुपये-20,000/- कमी केली आणि नेट लॉस रुपये-2,52,625/- दर्शविला.
08. सदर सर्व्हे अहवालामध्ये पुढे असे नमुद केले की, तक्रारकर्त्याने टोटल स्टॉक् घोषीत केल्या प्रमाणे रुपये-25,76,400/- आहे त्यामधून स्टोअरेज हॅन्डलींग लॉस रुपये-25,764/- वजा करुन उर्वरीत रक्कम रुपये-25,50,636/- दर्शविली, त्यामधून किमती मध्ये झालेली घरसरण रुपये-63,765/- वजा करुन रुपये-24,86,870/- एवढी रक्कम दर्शविली, त्यामधून 6,21,717/- घसारा रक्कम वजावट करुन एकूण साहित्याची रक्कम रुपये-18,65,152/- हिशोबात धरली. सर्व्हेअर यांनी नेट लॉस अॅसेसची रक्कम रुपये-2,52,625/- हिशोबात धरली परंतु सदर नेट लॉस रकमे पैकी 84 टक्के एवढीच रक्कम म्हणजे रुपये-2,11,991.59 पैसे विमा रकमेसाठी हिशोबात धरली आणि सदर रकमे मधून अॅडजेस्टेड लॉसची रक्कम रुपये-40,633.41 पैसे एवढी रककम वजावट केली. या शिवाय पॉलिसी नुसार 5 टक्के क्लेम अमाऊंट कमीत कमी रुपये-10,000/- आणि लेस एक्सेस रुपये-10,000/- अशा रकमांची वजावट केली आणि नेट अॅडजेस्टेड लॉस रुपये-30,633.41 पैसे दर्शविला.
09. सर्व्हेअर यांनी जी नुकसानी काढलेली आहे, ती विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे हित लक्षात घेऊन काढल्याचे प्रथम दर्शनी जिल्हा ग्राहक आयोगास दिसून येते. याशिवाय सर्व्हेअर यांनी जी नेट अॅडजेस्टेड लॉसची रक्कम रुपये-30,633.41 पैसे दर्शविलेली आहे ती अतिशय कमी विचारात घेतल्याचे सुध्दा प्रथम दर्शनी दिसून येते. सर्व्हेअर यांनी पुन्हा अॅडजेस्टेड लॉसची रक्कम रुपये-40,633.41 पैसे एवढी रककम वजावट केली, ती कोठून आणली हे समजून येत नाही. या शिवाय सर्व्हेअर यांचे अहवाला नुसार त्यांनी दर्शविल्या प्रमाणे तंतोतंत रकमांची वजावट करुनही जास्त रक्कम येत असताना त्यांनी एवढया कमी रकमेचे निर्धारण कसे काय केले ही बाब सुध्दा अनाकलनीय आहे आणि त्यामुळे सर्व्हेअर यांचा अहवाल हा विश्वासार्ह नाही असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे.
10. तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे त्याचा मंडप डेकोरेशनचा व्यवसाय असून त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून मंडप व बिछायत साहित्याचा विमा रुपये-3,00,000/- चा काढला होता ही बाब विवादास्पद नाही. तक्रारकर्त्याचे नुकसान झालेल्या साहित्याचे यादी प्रमाणे त्याने एकूण रुपये-4,50,500/- नुकसान झाल्याचे नमुद केलेले आहे. तक्रारकर्त्याने त्याचे झालेल्या नुकसानी बाबत जी रक्कम दर्शविलेली आहे त्यामधून विमा पॉलिसी प्रमाणे क्लेमच्या
रकमेच्या 5 टक्के किंवा कमीत कमी रुपये-10,000/- वजावट करणे आवश्यक आहे, त्यानुसार रुपये-10,000/- रकमेची वजावट केली तर रक्कम रुपये-4,40,500/- येते. यापैकी 25 टक्के रक्कम घसा-याची रक्कम रुपये-1,10,125/- वजावट केली असता ती रक्कम रुपये-3,40,375/- येते त्यामधून पॉलीसी एक्सेसची रक्कम रुपये-10,000/- वजावट केली तर रुपये-3,30,375/- येते. थोडक्यात तक्रारकर्त्याने दिलेल्या नुकसानीच्या यादी प्रमाणे घसारा, पॉलीसी एक्सेस ईत्यादी रकमा हिशोबात घेतल्या तर रुपये-3,30,375/- येते
तर विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे सर्व्हेअर यांनी दिलेल्या अहवाला नुसार घसरा सॉल्व्हेजची रक्कम वजावट करुन रुपये-2,52,625/- एवढी रक्कम दर्शविलेली आहे आणि त्यामधून पॉलिसी एक्सेस रुपये-10,000/- आणि क्लेमच्या रकमे पैकी मिनिमम रक्कम रुपये-10,000/- अशा रकमांची वजावट केली तर रुपये-2,32,625/- एवढी रक्कम येते.
11. जिल्हा ग्राहक आयोगाचे मते तक्रारकर्त्याचे झालेले नुकसान आणि पॉलिसी प्रमाणे घसारा, पॉलिसी एक्सेस अशा रकमांचा वजावट केली असता त्यास विमा पॉलिसी पोटी रुपये-2,70,000/- एवढी रक्कम मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल परंतु विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी तर्फे सर्व्हेअर यांनी अत्यंत कमी रकमेचे निर्धारण करुन तक्रारकर्त्यास दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते आणि त्यामुळे आम्ही मुद्दा क्रं 1 चे उत्तर होकारार्थी नोंदवित आहोत.
12. विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेनी त्यांचे कर्तव्य योग्यरितीने पार पाडलेले असून त्यांनी त्वरीत विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला नुकसानीची सुचना दिलेली आहे. विमा दावा मंजूरीची बाब विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेच्या कार्यक्षेत्रात येत नाही. तसेच विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेनी तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होत नाही त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेनी तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा दिली काय या मुद्दाचे उत्तर आम्ही नकारार्थी नोंदवित आहोत.
13. मुद्दा क्रं 1 चे उत्तर होकारार्थी आल्याने तक्रारकर्त्याची विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे विरुध्दची तक्रार अंशतः मंजूर होण्यास पात्र आहे. त्यामुळे तक्रारकर्त्यास विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून विमा रक्कम रुपये-2,70,000/- देण्याचे आदेशित करणे योग्य व न्यायोचित होईल आणि सदर विमा रकमेवर सर्व्हेअर यांचा दिनांक-03.12.2020 रोजीचा सर्व्हे अहवाला नंतर एक महिन्याची मुदत सोडून दिनांक-03.01.2021 ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.9 टक्के दराने व्याज मंजूर करणे योगय व न्यायोचित होईल. त्याच बरोबर विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- आणि प्रस्तुत तक्रारीचा खर्च रुपये-10,00/- अशा नुकसान भरपाईच्या रकमा विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून देण्याचे आदेशित करणे योग्य व न्यायोचित होईल असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे.
14. उपरोक्त नमुद वस्तुस्थितीचा विचार करुन आम्ही प्रस्तुत तक्रारी मध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::अंतिम आदेश::
- तक्रारकर्त्याची तक्रार विरुध्दपक्ष क्रं 1 फ्युचर जनरली इंडीया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तर्फे विभागीय व्यवस्थापक, नागपूर यांचे विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्यास विमा पॉलिसी क्रं-M1427753 अनुसार मंडप डेकोरेशन आणि बिछायत साहित्याचे पुरामुळे झालेल्या नुकसानी पोटी विमा रक्कम रुपये-2,70,000/- (अक्षरी रुपये दोन लक्ष सत्तर हजार फक्त)
दयावेत आणि सदर विमा रकमेवर दिनांक-03.01.2021 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9 टकके दराने वयाजाची रक्कम विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्त्याला दयावी.
- तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि प्रस्तुत तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) अशा नुकसान भरपाईच्या रकमा विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्त्याला दयाव्यात.
- विरुध्दपक्ष क्रं-2 युको बॅंक मार्फत शाखा व्यवस्थापक, शाखा भंडारा यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
- सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने प्रस्तुत निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.
- निकालपत्राच्या प्रथम प्रमाणित प्रती सर्व पक्षकांराना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
- सर्व पक्षकारांनी अतिरिक्त संच जिल्हा आयोगाचे कार्यालयातून परत घेऊन जावेत.