जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 109/2020. तक्रार दाखल दिनांक : 27/08/2020. तक्रार निर्णय दिनांक : 09/09/2021.
कालावधी : 01 वर्षे 00 महिने 13 दिवस
श्रीमती शारदा भ्र. पंडीत बेवनाळे, वय 38 वर्षे,
व्यवसाय : घरकाम, रा. राठोडा, ता. निलंगा, जि. लातूर. तक्रारकर्ती
विरुध्द
(1) विभागीय व्यवस्थापक, दी ओरिएंटल इन्शुरन्स कं.लि.,
विभागीय कार्यालय, मेफेअर टॉचवर, पहिला मजला, पुणे-मुंबई रोड,
वाकडेवाडी, शिवाजी नगर, पुणे, जि. पुणे - 411 005.
(2) व्यवस्थापक, जायका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा.लि. दुसरा मजला, जायका
बिल्डींग,कमर्शियल रोड, सिव्हील लाईन्स, नागपूर, जि. नागपूर - 440 001.
(3) शाखा व्यवस्थापक, दी ओरिएंटल इन्शुरन्स कं.लि., लोखंडे कॉप्लेक्स,
पहिला मजला, सिंध टॉकीजसमोर, सुभाष चौक, लातूर.
(4) तालुका कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी कार्यालय,
निलंगा, ता. निलंगा, जि. लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्री. कमलाकर अ. कोठेकर, अध्यक्ष
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
मा. श्रीमती रेखा जाधव, सदस्य
तक्रारकर्ती यांचेकरिता विधिज्ञ :- ए.एम.के. पटेल
विरुध्द पक्ष क्र.1 व 3 यांचेकरिता विधिज्ञ :- एस.जी. डोईजोडे
विरुध्द पक्ष क्र.2 यांचेकरिता विधिज्ञ :- दिपक एम. परांजपे
विरुध्द पक्ष क्र.4 स्वत:
न्यायनिर्णय
मा. श्रीमती रेखा जाधव, सदस्य यांचे द्वारा :-
(1) अर्जदार ही मौजे राठोडा येथील रहिवाशी असून मयत पंडीत निवृत्ती बेवनाळे यांची कायदेशीर पत्नी व वारस आहे. अर्जदाराच्या पतीची एकत्रीत कुटुंबात अनुक्रमे गट क्र. 107 मध्ये 33 आर. व गट क्र.72 मध्ये 1 हेक्टर 39 आर. व 1 हेक्टर 72 आर. इतकी सामाईक शेतजमीन आहे. अर्जदाराचे पती दि.30/6/2019 रोजी त्यांचे मित्र शेख इब्राहीम व शेख पाशा मोटार सायकल क्र. एम.एच.21/ए.ए. 5639 च्या पाठीमागे बसून रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पुणे येथील त्यांच्या घराकडे निघाले होते. सदरची मोटार सायकल इब्राहीम शेख चालवत होता. अर्जदाराचे पती पाठीमागे बसले होते. अर्जदाराच्या पतीच्या मोटार सायकलच्या पाठीमागे दुस-या मोटार सायकलवर हणमंत कोळेकर व अमसिध्द कोळगिरी हे ड्रायव्हर सुध्दा मोटार सायकलवरुन पिंपरी चिंचवड येथे त्यांच्या घरी जाण्यास निघाले होते. सदरच्या दोन्ही मोटार सायकलवरुन आंबी येथून एम.आय.डी.सी. रोडने नवी मुंबई हायवे रोडकडे जात असताना डी.वाय. पाटील कॉलेजजवळ रात्री 11.45 चे सुमारास अर्जदाराची पती बसून जात असलेल्या मोटार सायकलच्या पाठीमागून ह्युंडाई कार क्र. एम.एच.14/डी.एफ.6720 चे चालकाने पाठीमागून जोराची धडक देऊन न थांबता निघून गेला. अर्जदाराच्या पतीचा मृत्यू जागीच झाला. इब्राहीम शेख यांना उपचारासाठी दाखल केले असता ते देखील मयत झाले. सदरच्या घटनेची नोंद एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनला गुन्हा क्र.97/2019 द्वारे करण्यात आली.
(2) महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील संपूर्ण शेतक-यांचा विमा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा या योजनेखाली रक्कम रु.2,00,000/- ची पॉलिसी काढली आहे. सदरच्या विम्याची रक्कम गैरअर्जदार क्र.1 कडे भरली आहे. सदर विमा योजनेचा कालावधी दि.8/12/2018 ते 7/12/2019 होता. गैरअर्जदार क्र.4 तालुका कृषि अधिकारी महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्व शेतक-यांसाठी राबविण्यात येणा-या सर्व योजना अंमलात आणण्याची अंमलबजावणी शासनाच्या परिपत्रकानुसार करतात. अर्जदाराने दि.27/8/2019 रोजी कागदपत्रांसह विमा दावा फॉर्म भरुन गैरअर्जदार क्र.4 कडे मुदतीत विमा प्रस्ताव दाखल केला. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी काढलेल्या त्रुटींची पूर्तता गैरअर्जदार क्र.4 मार्फत अर्जदारांनी वेळोवेळी केली आहे. अर्जदाराचा विमा दावा प्रलंबीत ठेवून किंवा काही एक निर्णय न घेऊन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्यामुळे सदरची तक्रार दाखल करण्याचे कारण प्राप्त झाले.
(3) अर्जदाराने तक्रार-अर्जात विमा रक्कम रु.2,00,000/- व त्यावर अपघात तारखेपासून द.सा.द.शे. 15 टक्के व्याज, तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रार-अर्जाचा खर्च रु.7,000/- याप्रमाणे सदरची रक्कम जिल्हा आयोगात जमा करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
(4) अर्जदाराने तक्रार-अर्जासोबत शपथपत्र व 19 कागदपत्रे दाखल केली आहेत.
(5) गैरअर्जदार क्र.1 व 3 चे थोडक्यात लेखी म्हणणे असे की, गैरअर्जदार क्र.1 व 3 यांनी अकार्यक्षम सेवा पुरविली, हे म्हणणे खोटे आहे. अर्जदाराचे पती नामे पंडीत निवृत्ती बेवनाळे हे मृत्यूसमयी शेतकरी होते व त्यांचे वय 48 वर्षे होते, हे गैरअर्जदारास मान्य नाही. अर्जदार हे वारस या नात्याने लाभार्थी ग्राहक होतात, ही बाब अर्जदाराने सिध्द करावी. अर्जदाराने विमा प्रस्ताव गैरअर्जदार क्र.1 व 3 कडे पाठविला, या संदर्भात कसलाही पुरावा नाही. गैरअर्जदाराविरुध्द तक्रार दाखल करण्यास कारण प्राप्त झाले नाही. म्हणून अर्जदाराचा तक्रार-अर्ज खारीज करण्यात यावा.
(6) गैरअर्जदार क्र.2 चे लेखी म्हणणे असे की, गैरअर्जदार क्र.4 ने दि.29/8/2019 ला अर्ज सादर केला. सदरचा अर्ज जिल्हा कृषि अधिकारी यांच्यामार्फत गैरअर्जदार क्र.2 यांना दि.18/3/2020 ला प्राप्त झाला. गैरअर्जदार क्र.2 यांनी दि.4/9/2020 रोजी गैरअर्जदार क्र.1 कडे विमा दावा पाठविला. गैरअर्जदार क्र.2 यांनी त्यांची जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडली आहे. विमा दावा मंजूर करणे अथवा नामंजूर करणे, हे काम विरुध्द पक्ष क्र.1 व 3 चे आहे. गैरअर्जदार क्र.2 हे मध्यस्त म्हणून काम करतात. अर्जदाराचा विमा दावा गैरअर्जदार क्र.1 व 3 यांच्याकडे विचाराधीन आहे. सदरचा तक्रार-अर्ज गैरअर्जदार क्र.2 विरुध्द खारीज करण्यात यावा.
(7) गैरअर्जदार क्र.4 चे लेखी म्हणणे असे की, अर्जदाराचा विमा दावा दि.27/8/2019 रोजी कार्यालयास प्राप्त झाला. सदरचा विमा दावा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, लातूर यांच्याकडे दि.28/8/2019 रोजी सादर केला. सदर कार्यालयाने काढलेल्या त्रुटींची पूर्तता अर्जदाराकडून वेळोवेळी करुन घेऊन सदरचा प्रस्ताव सादर करण्यात आला. विमा कंपनीने पत्र पाठवून मयत व्यक्तीचा वाहन परवाना मागणी केला असता कृषि अधीक्षक कार्यालयामार्फत दि.9/7/2020 रोजी पत्राद्वारे मयत व्यक्ती वाहन चालवत नव्हती व तो पाठीमागे बसला होता, असे कळवून वाहन चालवत असलेल्या व्यक्तीचा वाहन परवाना कार्यालयास दिला.
(8) उभयतांनी सादर केलेला पुरावा, त्यांचे निवेदन, युक्तिवाद इ. विचारात घेता निकालासाठी खालील मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्याचा निर्णय पुढीलप्रमाणे देण्यात येतो.
मुद्दे उत्तर
(1) अर्जदार ही ग्राहक आहे काय ? होय.
(2) गैरअर्जदार विमा कंपनीने सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय.
(3) काय आदेश ? अंतीम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(9) मुद्दा क्र. 1 ते 3 :- अर्जदार व गैरअर्जदार या दोघांनीही महाराष्ट्र शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा काढल्याचे मान्य आहे. अर्जदाराचे मयत पती शेतकरी होते, म्हणून अर्जदार ही पत्नी वारस या नात्याने लाभार्थी ग्राहक या संज्ञेत येते. गैरअर्जदाराने ॲक्सीस बँकेचा खाते उतारा दाखल केला आहे. त्यात दि.16/10/2020 रोजी अर्जदारास विमा रक्कम रु.2,00,000/- दिल्याचे दिसून येते. परंतु तोंडी युक्तिवादाच्या वेळी अर्जदाराने सदर विमा रक्कम ही ग्रुप पर्सनल ॲक्सीडेंट पॉलिसीची असल्याचे म्हणले आहे. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेची रक्कम नसल्याचे युक्तिवादात सांगितले. त्यावर गैरअर्जदाराने तोंडी निवेदन केले की, ग्रुप पर्सनल ॲक्सीडेंट पॉलिसीची विमा रक्कम ही डी.सी.सी. बँकेमार्फत जाते, ॲक्सीस बँकेमार्फत नाही.
(10) अर्जदाराने सदरचा तक्रार-अर्ज दि.27/8/2020 रोजी दाखल केला आहे व गैरअर्जदाराने ॲक्सीस बँकेच्या दाखल केलेल्या उता-यावरुन दि.16/10/2020 रोजी विमा रक्कम NEFT/AXISCN 0059103044/61-10320300102519/SHARDA p याप्रमाणे दिल्याचे म्हणले आहे. सदरची विमा रक्कम ही दावा दाखल केल्यानंतर व गैरअर्जदाराने लेखी म्हणणे दिल्यानंतर जवळपास 2 महिन्यानंतर Debit केल्याचे खाते उता-यावरुन दिसून येते. अर्जदाराच्या पतीचा अपघाती मृत्यू दि.30/6/2019 रोजी झाला असल्याचे दाखल कागदपत्रांवरुन दिसून येते. अर्जदाराने विमा प्रस्ताव दि.27/8/2019 रोजी कागदपत्रांसह दाखल केल्याचे निशाणी क्र.3/1 व 3/2 वरुन दिसून येते. गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमा प्रस्ताव मिळाल्यानंतर जवळपास 9 ते 10 महिन्यानंतर सदरची रक्कम Debit केल्याचे म्हणले आहे.
(11) गैरअर्जदाराने सदरची रक्कम अर्जदार ही विमा रक्कम मिळण्यास पात्र असतानाही जवळपास 10 महिने उशिरा Debit करुन सेवेत त्रुटी केल्याचे दिसून येते. गैरअर्जदाराने सदरची रक्कम अर्जदाराच्या नांवावर केली, असे तोंडी युक्तिवादाच्यावेळी म्हणले आहे. परंतु सदरची रक्कम अर्जदारास मिळाली, याबाबत पुरावा दिसून येत नाही. वरील सर्व बाबींचे अवलोकन केले असता अर्जदारास गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेची रक्कम मिळाली असल्याबाबत पुरावा दिसून येत नाही. खालीलप्रमाणे आदेश.
ग्राहक तक्रार क्र.109/2020.
आदेश
(1) गैरअर्जदार क्र.1 व 3 ने व्यक्तिगत अथवा संयुक्तरित्या अर्जदारास रक्कम रु.2,00,000/- (रुपये दोन लक्ष फक्त) वर्ग केली नसेल तर 30 दिवसाच्या आत सदर विमा रक्कम वर्ग करण्यात यावी. अन्यथा सदर रकमेवर अपघात तारखेपासून 6 टक्के द.सा.द.शे. व्याज दराने देय राहील.
(2) गैरअर्जदार क्र.1 व 3 यांनी अर्जदारास शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व या तक्रार-अर्जाच्या खर्चापोटी रु.3,000/- द्यावेत.
(3) उभय पक्षकारांना या निवाड्यांच्या प्रती विनामुल्य त्वरीत देण्यात याव्यात.
(श्रीमती रेखा जाधव) (श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्री. कमलाकर अ. कोठेकर)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-
(संविक/श्रु/7921)