जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 86/2023. तक्रार नोंदणी दिनांक : 10/04/2023.
तक्रार दाखल दिनांक : 26/04/2023. तक्रार निर्णय दिनांक : 26/06/2024.
कालावधी : 01 वर्षे 02 महिने 16 दिवस
वैशाली बजरंग सगरे, वय 32 वर्षे, व्यवसाय : घरकाम,
रा. चन्नाचीवाडी, ता. निलंगा, जि. लातूर. :- तक्रारकर्ता
विरुध्द
विभागीय व्यवस्थापक, दी ओरिएंटल इन्शुरंस कंपनी लि.,
लातूर, विभागीय कार्यालय : लोखंडे कॉम्प्लेक्स, पहिला मजला,
सिंध्द टॉकीजसमोर, सुभाष चौक, लातूर, ता. जि. लातूर. :- विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ती यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. प्रमोद एल. शिंदे
विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. काशिनाथ जी. देशपांडे (साताळकर)
आदेश
श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, त्यांचे पती बजरंग मधुकर सगरे (यापुढे "मयत बजरंग") हे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था म. चन्नाचीवाडी, या संस्थेचे सभासद होते. सभासद यादीमध्ये क्र. 35 अन्वये त्यांच्या नांवाची नोंद होती आणि रु.215/- भरणा करुन जनता अपघात विमा योजनेंतर्गत त्यांचा विमा उतरविलेला होता. दि.7/2/2021 रोजी रात्री 10.00 च्या सुमारास शेताकडे जात असताना रस्त्याकडेला असणा-या खड्डयामध्ये पडून पाणी त्यांच्या नाक व तोंडामध्ये गेल्यामुळे श्वासोश्वास बंद पडला आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे. घटनेबद्दल आ. मृ. नं. 1/2021 अन्वये नोंद करुन घटनास्थळ पंचनामा व त्यानंतर शवचिकित्सा करण्यात आलेली आहे. विमा रक्कम मिळण्यासंबंधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., लातूर यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आणि त्यानंतर तो विरुध्द पक्ष यांच्याकड पाठविण्यात आला. विरुध्द पक्ष यांनी प्रस्तावामध्ये काढलेल्या त्रुटींची पूर्तता करण्यात आली. मात्र विरुध्द पक्ष यांनी दि.3/8/2022 रोजीच्या पत्रान्वये मयत बजरंग हे फेफरे येऊन पाण्यामध्ये पडल्यामुळे मृत्यू पावल्याचे व आजारामुळे झालेला मृत्यू विमा योजनेमध्ये येत नसल्याचे कारण देऊन विमा प्रस्ताव नाकारला. विरुध्द पक्ष यांनी चूक व बेकायदेशीर कारणाद्वारे विमा दावा नामंजूर करुन सेवेमध्ये त्रुटी केल्याचे नमूद करुन उक्त कथनांच्या अनुषंगाने रु.2,00,000/- विमा रक्कम व्याजासह देण्याचा; मानसिक त्रासाकरिता रु.25,000/- व ग्राहक तक्रार खर्च रु.5,000/- देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ती यांनी केलेली आहे.
(2) विरुध्द पक्ष यांनी अभिलेखावर लेखी निवेदनपत्र दाखल केले. त्यांनी ग्राहक तक्रारीमध्ये नमूद बहुतांश कथने अमान्य केले आहेत. त्यांचे कथन असे की, मयत बजरंग हे विमापत्र घेण्यापूर्वीच मनोरुग्ण होते. त्यांना फेफ-याचा आजार होता. मयत बजरंग यांचे बंधू संदीप यांनी मयत बजरंग यांना फेफरे येत असल्याचे तक्रारीमध्ये नमूद केले आहे. त्याप्रमाणे पंचनामा झालेला आहे. तसेच शवचिकित्सा अहवाल, मरणोत्तर पंचनामा व मृत्यूचे कारण दर्शविणा-या कागदपत्रांमध्ये फेफरे येऊन मयत बजरंग यांचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष काढलेला आहे. फिर्याद, तक्रार, घटनास्थळ पंचनामा, शवचिकित्सा अहवाल, मरणोत्तर पंचनामा, मृत्यूचे कारण दर्शविणारे तात्पुरते प्रमाणपत्र इ. सार्वजनिक कागदपत्रे असल्यामुळे त्याकडे दूर्लक्ष करता येणार नाही. अंतिमत: ग्राहक तक्रार विमापत्राच्या अटी नियमामध्ये बसत नसल्यामुळे नामंजूर करण्यात यावी, अशी विनंती करण्यात आलेली आहे.
(3) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी निवेदनपत्र, अभिलेखावर दाखल कागदपत्रे व युक्तिवादाची दखल घेतली असता वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
केल्याचे सिध्द होते काय ? होय
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? होय
असल्यास किती ? अंतिम आदेशाप्रमाणे
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(4) मुद्दा क्र. 1 ते 3 :- मुद्दा क्र.1 ते 3 परस्परपुरक असल्यामुळे त्यांचे विवेचन संयुक्तपणे करण्यात येते. प्रामुख्याने, जनता वैयक्तिक अपघात (गट) विमा योजनेद्वारे विरुध्द पक्ष यांनी मयत बजरंग यांना रु.2,00,000/- रकमेकरिता विमा संरक्षण दिलेले होते, याबद्दल मान्यस्थिती आहे. रस्त्याच्या कडेला असणा-या खड्डयामध्ये पडून पाण्यामध्ये बुडाल्यामुळे मयत बजरंग यांचा मृत्यू झाला, याबद्दल विवाद नाही. मयत बजरंग यांच्या मृत्यूनंतर विम्याची रक्कम मिळण्याकरिता तक्रारकर्ती यांनी दाखल केलेला दावा विरुध्द पक्ष यांनी नामंजूर केला, याबद्दल विवाद नाही.
(5) अभिलेखावर दाखल कागदपत्रे पाहता मयत बजरंग हे रस्त्याच्या कडेला असणा-या पाण्याच्या खड्डयामध्ये पडले आणि पाण्यामध्ये बुडाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, हे स्पष्ट होते. तसेच अप्राकृतिक मृत्यू नोंद, घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, गोषवारा मंजुरीचे पत्र व त्यासंबंधी आदेश इ. कागदपत्रे पाहता त्यामध्ये मयत बजरंग यांना फेफरे येत असल्याचा उल्लेख आढळतो.
(6) तक्रारकर्ती यांचा युक्तिवाद असा की, मयत बजरंग यांच्या अपघाती मृत्यूच्या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही आणि पोलीस यंत्रणेला नातलगांनी कायदेशीर पेच व अडचणीमुळे दिलेल्या माहितीच्या आधारे जबाब नोंदवून मयत बजरंग यांना फेफरे आल्याचा अभिलेख तयार करण्यात आलेला असून तो केवळ अंदाज आहे. उलटपक्षी, विरुध्द पक्ष यांचे निवेदन असे की, शवचिकित्सा अहवाल, मरणोत्तर पंचनामा व मृत्यूचे कारण दर्शविणा-या कागदपत्रांमध्ये फेफरे येऊन मयत बजरंग यांचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष काढलेला असून ते सार्वजनिक कागदपत्रे असल्यामुळे त्याकडे दूर्लक्ष करता येणार नाही.
(7) उभयतांचे कथने व बचाव पाहता तक्रारकर्ती पोलीस यंत्रणेकडे जबाब देणा-या त्यांच्या नातलगांचे शपथपत्रे अभिलेखावर दाखल केलेले नाहीत किंवा विरुध्द पक्ष यांनी घटनेचे अन्वेषण करणारे अन्वेषक व तज्ञ अहवाल देणारे वैद्यकीय चिकित्सक यांचे शपथपत्र अभिलेखावर दाखल केलेले नाही.
(8) उभय पक्षांचा वाद-प्रतिवाद व कागदपत्रे पाहता मयत बजरंग यांच्या मृत्यूस विमा जोखीम आहे काय ? असा प्रश्न उपस्थित होतो. असे दिसते की, विरुध्द पक्ष यांनी जनता वैयक्तिक अपघात विमापत्राच्या अटी, शर्ती, जोखीम, अपवर्जन इ. स्पष्ट करणारे दस्तऐवज अभिलेखावर दाखल केलेले आहेत. ज्यामध्ये विमा कंपनीने विमापत्र कालावधमध्ये विमाधारकास बाह्य, हिंसक व दृश्य मार्गाने पूर्णत: व थेट शारीरिक इजा होऊन अपघात झालेला असल्यास मृत्यू किंवा अपंगत्वाकरिता विमा रक्कम देण्याचे दायित्व स्वीकारलेले दिसते. तसेच त्यामध्ये 'अपघात' शब्दाची व्याख्या खालीलप्रमाणे दिल्याचे आढळते.
2. DEFINITIONS:
(1) ACCIDENT : An accident is a sudden, unforseen and involuntary event caused by external and visible and violent means.
(9) उक्त संज्ञा पाहता "अपघात" ही बाह्य, दृश्यमान आणि हिंसक माध्यमांमुळे घडणारी अचानक, अनपेक्षित आणि अनैच्छिक घटना आहे. पोलीस यंत्रणेच्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता मयत बजरंग यांना फेफरे आल्यामुळे खड्डयामध्ये पडून पाण्यामध्ये बुडाल्यामुळे मृत्यू झाल्याच्या नोंदी आढळतात. तक्रारकर्ती यांच्या कथनांनुसार मयत बजरंग यांच्या नातलगांनी दिलेल्या माहितीच्या आधारे मयत बजरंग यांना फेफरे येत असल्याचा अंदाज नोंदविलेल्या आहेत. वास्तविक पाहता, तक्रारकर्ती ह्या मयत बजरंग यांच्या पत्नी आहेत आणि मयत बजरंग यांच्या मृत्यूपूर्वी फेफरे येण्याचा आजार होता काय किंवा त्याबद्दल उपचार घेतला काय ? याबद्दल स्पष्टीकरण दिलेले नाही. असे असले तरी, तक्रारकर्ती यांच्याकडून किंवा विरुध्द पक्ष यांच्याद्वारे करण्यात आलेल्या अन्वेषण अहवाल व तज्ञ अहवालामध्ये मयत बजरंग यांना फेफरे येण्याचा आजार असल्याबद्दल उचित कागदोपत्री सिध्दता झालेली नाही.
(10) मयत बजरंग यांचा शवचिकित्सा अहवाल व मृत्यूचे कारण दर्शविणारे प्रमाणपत्र पाहता पाण्यामध्ये बुडून श्वासोश्वास गुदमरल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट होते. प्रश्न असा की, मयत बजरंग पाण्यामध्ये पडण्यामागे त्यावेळी त्यांना फेफरे आले होते काय ? निर्विवादपणे, मयत बजरंग पाण्यामध्ये पडण्याची वेळ रात्री 10.00 होती. त्यावेळी मयत बजरंग यांना रस्त्याच्या खड्डयाकडे जात असताना किंवा त्यामध्ये पडताना पाहिलेले नाही. मयत बजरंग खड्डयामध्ये पडण्यामागे निश्चित कारण सिध्द झालेले नाही. उचित पुराव्याअभावी मयत बजरंग यांना फेफरे आले होते, अशी शक्यता किंवा अंदाज व्यक्त करणे अनुचित ठरते. उलटपक्षी, 'अपघात' शब्दाची संज्ञा पाहता मयत बजरंग यांची पाण्यामध्ये बुडून मृत्यू होण्याची क्रिया बाह्य व दृश्यमान माध्यमांमुळे घडणारी अचानक, अनपेक्षित आणि अनैच्छिक घटना असल्याचे मान्य करावे लागेल.
(11) उक्त विवेचनाअंती, विरुध्द पक्ष यांनी मयत बजरंग हे पाण्यामध्ये बुडाल्याचे मान्य केले असतानाही त्यामागे फेफरे किंवा अपस्पार असल्याचे कारण देऊन त्यांच्या मृत्यूस विमा जोखीम नसल्याचे कारण देऊन विमा दावा नामंजूर करण्याचे कृत्य सेवेतील त्रुटी ठरते. त्या अनुषंगाने तक्रारकर्ती ह्या विमापत्रानुसार रु.2,00,000/- विमा रक्कम मिळण्याकरिता पात्र ठरतात, या निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत. तसेच तक्रारकर्ती यांची विमा रकमेवर व्याज मिळण्याची विनंती पाहता विमा दावा नामंजूर केल्याच्या तारखेपासून म्हणजेच दि. 3/8/2022 पासून द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज देण्याकरिता आदेश करणे न्यायोचित राहील.
(12) तक्रारकर्ती यांनी मानसिक त्रासाकरिता रु.25,000/- व ग्राहक तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- रकमेची मागणी केलेली आहे. आमच्या मते, प्रकरणानुरुप परिस्थितीजन्य गृहीतकाच्या अनुषंगाने नुकसान भरपाईची रक्कम निश्चित केली पाहिजे. असे दिसते की, विमा दावा नामंजूर केल्यामुळे तक्रारकर्ती यांना जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला व सहायता, विधिज्ञांचे शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. शिवाय, ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो आणि तक्रारकर्ती यांना मानसिक त्रास होणे नैसर्गिक व स्वाभाविक आहे. योग्य विचाराअंती मानसिक त्रासाकरिता रु.5,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- मिळण्यास तक्रारकर्ती पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत जिल्हा आयोग येत आहे.
(13) उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ती यांना रु.2,00,000/- (रुपये दोन लक्ष फक्त) विमा रक्कम द्यावी.
तसेच, विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ती यांना उक्त रकमेवर दि.3/8/2022 पासून रक्कम अदा करेपर्यत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज द्यावे.
(3) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ती यांना मानसिक त्रासापोटी रु.5,000/- नुकसान भरपाई व ग्राहक तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- द्यावेत.
(4) विरुध्द पक्ष यांनी प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्री. अमोल बा. गिराम)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-