::निकालपत्र ::
(पारित व्दारा- श्री शेखर प्रभाकर मुळे, मा.अध्यक्ष.)
(पारित दिनांक-04 फेब्रुवारी, 2017)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली अपघातग्रस्त विमाकृत गाडीचा विमा दावा मंजूर न केल्यामुळे विरुध्दपक्ष क्रं-1) व विरुध्दपक्ष क्रं-2) विरुध्द विमा कंपनी विरुध्द मंचा समक्ष दाखल केली.
02. तक्रारकर्त्याची थोडक्यात तक्रार खालील प्रमाणे-
विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) हे रॉयल सुंदरम अलॉयन्स इन्शुरन्स कंपनीचे अनुक्रमे शाखा आणि प्रधान कार्यालय आहे. तक्रारकर्ता हा मारुती स्विफ्ट गाडीचा मालक असून जिचा नोंदणी क्रं-MH-31/CR-4151 असा आहे आणि ती गाडी विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून विमाकृत करण्यात आली होती. विम्याचा अवधी हा दिनांक-04/06/2011 ते दिनांक-03/06/2012 असा होता व गाडीची I.D.V. (Insured Declared Value) रुपये-3,28,800/- एवढी होती. दिनांक-07/02/2012 ला त्या गाडीला अपघात झाला, त्याची सुचना पोलीसांना दिनांक-09/02/2012 रोजी देऊन एफ.आय.आर.नोंदविण्यात आला. त्यानंतर विरुध्दपक्ष विमा कंपनीला सुध्दा अपघात घटनेची सुचना देण्यात आली व त्यांनी तक्रारकर्त्याला गाडीची (I.D.V.) घोषीत विमा राशी देण्याचे आश्वासन दिले कारण गाडी पूर्णपणे क्षतीग्रस्त झाली होती. परंतु आज पर्यंत विरुध्दपक्ष विमा कंपनीने त्याच्या विमा दाव्याचे निराकरण केलेले नाही, जी त्यांच्या सेवेतील कमरतता ठरते, म्हणून तक्रारकर्त्याने रुपये-3,28,800/- चा विमा दावा केला असून त्याशिवाय नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मागितला आहे.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) विमा कंपनी तर्फे एकत्रित लेखी जबाब सादर करुन असे नमुद केले की, तक्रारकर्ता सदर गाडीचा मालक नसून त्यांचा ग्राहक पण नाही, त्याने ती गाडी विनोद भुरानी याला दिनांक-24/01/2012 ला विकली. विनोद भुरानीने घटनेची सुचना विरुध्दपक्षाला दिनांक-28/03/2012 ला दिली होती आणि त्याच्या काही दिवसा नंतर विमा दावा दाखल केला होता. अशाप्रकारे विरुध्दपक्षाला अपघाताची सुचना देण्यास विलंब केला. तसेच तक्रारकर्त्याला सदर गाडीमध्ये कुठलाही विमाकृत अधिकार (Insurable Interest) नाही, म्हणून तक्रार खारीज करण्याची विनंती केली.
04. तक्रारकर्त्याची तक्रार तसेच विरुध्दपक्ष विमा कंपनीचे लेखी उत्तर आणि उपलब्ध दस्तऐवजांच्या प्रतीं तसेच उभय पक्षकारांचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद यावरुन मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे-
:: निष्कर्ष ::
05. विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्याचा विमा दावा मंजूरी संबधाने मुख्यतः दोन आक्षेप घेतलेले आहेत. त्यातील पहिला आक्षेप असा आहे की, तक्रारकर्ता सदर्हू गाडीचा मालक नव्हता, ज्यावेळी त्या गाडीला अपघात झालेला होता आणि म्हणून तक्रारकर्त्याला कुठलाही विमा दावा (Insurable Interest) दाखल करण्याचा अधिकार नाही. दुसरा आक्षेप असा आहे की, अपघाताची सुचना विरुध्दपक्ष विमा कंपनील विलम्बाने देण्यात आली होती, ज्यामुळे विमा करारातील शर्ती व अटीचा भंग झालेला आहे.
06. विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्ता आणि श्री विनोद भुरानी यांच्यात विमाकृत गाडी विक्री संबधाने झालेल्या विक्री करारनाम्याची प्रत अभिलेखावर दाखल केली आहे, त्या विक्री करारनाम्या प्रमाणे तक्रारकर्त्याने ती गाडी श्री विनोद भुरानी याला दिनांक-24.01.2012 ला रुपये-4,20,000/- एवढया किमतीमध्ये विकली आणि त्याच दिवशी गाडीचा ताबा श्री विनोद भुरानी याला देण्यात आला होता. तसेच विनोद भुरानी याने गाडी संबधी पोलीस केस, चालान किंवा अपघात झाल्यास त्याची जबाबदारी त्या दिवसा पासून घेतली होती, म्हणजेच दिनांक-24.01.2012 पासून त्या गाडीचा मालक श्री विनोद भुरानी हा होता आणि म्हणून अपघाता नंतर विमा दावा सुध्दा श्री विनोद भुरानी याने दाखल केला होता, त्या विमा दाव्यावर श्री विनोद भुरानीची स्वाक्षरी असून तो विरुध्दपक्ष विमा कंपनीकडे दिनांक-28/03/2012 ला सादर करण्यात आला होता परंतु त्या गाडीचा जो विमा तक्रारकर्त्याने काढला होता, तो त्याचेच नावाने होता, ज्यावेळी त्या गाडीला अपघात झाला होता. थोडक्यात गाडीच्या विम्याचे हस्तांतरण तक्रारकर्त्या कडून श्री विनोद भुरानीचे नावाने झालेले नव्हते.
07. कुठल्याही गाडीच्या मालकीचे हस्तांतरण झाल्या नंतर गाडीच्या विम्याचे हस्तांतरणा संबधी मोटर वाहन कायद्दाचे कलम-157 मध्ये तरतुद केलेली आहे, त्या कलमा नुसार जेंव्हा गाडीचे नोंदणीचा दाखला एका ईसमा कडून दुस-याकडे हस्तांतरीत होतो, त्यावेळी त्या गाडीचा विमा सुध्दा हस्तांतरीत केलेल्या ईसमाकडे ज्या दिवशी गाडीचा मालकी हक्क हस्तांतरीत होतो त्या दिवसा पासून लागू होतो, असे गृहीत धरण्यात आलेले आहे. परंतु त्यापूर्वी हे आवश्यक असते की, गाडीच्या नोंदणीच्या दाखल्याचे हस्तांतरण झालेले असावे. ज्या ईसमाचे नावे गाडी हस्तांतरीत होते त्याला 14 दिवसांचे आत गाडीच्या विमा पॉलिसी मध्ये आवश्यक ते फेरबदल करुन घेण्यासाठी अर्ज करावा लागतो.
08. या संदर्भात विरुध्दपक्ष विमा कंपनीच्या वकीलांनी “Didar Singh –Versus-Reliance General Insurance Company”-III (2014)CPJ-1(NC) या मा.वरिष्ठ न्यायालयाच्या निवाडयाचा आधार घेतला, ज्यामध्ये गाडी मालकाने गाडी हस्तांतरीत केल्या नंतर गाडीच्या नोंदणी दाखल्याचे हस्तांतरण केले नव्हते परंतु गाडीचा ताबा खरेदीदाराला दिला होता म्हणून गाडीचा विमा हस्तांतरीत करणे आवश्यक होते.
09. प्रतीउत्तरा मध्ये तक्रारकर्त्याने असे म्हटले आहे की, गाडी विकण्या संबधी त्याचा श्री विनोद भुरानी सोबत करारनामा झाला होता परंतु नंतर तो व्यवहार रद्द झाला होता आणि म्हणून त्या गाडीचे हस्तांतरण श्री विनोद भुरानी याचे नावे झाले नाही. या संदर्भात त्याने 02 शपथपत्र दाखल केलेली आहेत, ज्यापैकी एक स्वतःचे असून दुसरे शपथपत्र श्री विनोद भुरानी याचे आहे. शपथपत्रात दोघानीं असे म्हटले आहे की, ज्या दिवशी गाडी विक्रीचा करारनाम झाला होता, त्याच दिवशी तो करारनामा रद्द पण करण्यात आला होता. पुढे असे पण नमुद केले आहे की, तक्रारकर्ता हाच त्या गाडीचा मालक असून तक्रारकर्त्यानेच विरुध्दपक्ष विमा कंपनीकडे अपघातग्रस्त गाडीचा विमा दावा सादर केला होता परंतु पूर्वी सांगितल्या प्रमाणे विमा दावा हा श्री विनोद भुरानी याने भरला असून त्यावर त्याने स्वाक्षरी केलेली आहे. तक्रारकर्त्याने विमा दावा केला नव्हता, इतकेच नाही तर अपघाताचे वेळी श्री विनोद भुरानी हा ती गाडी चालवित होता, असे दस्तऐवजा वरुन दिसून येते आणि या बाबी तक्रारकर्त्याच्या शपथपत्रातील मजकुराला विरोधाभास दर्शवितात आणि म्हणून त्यांच्या शपथपत्रावर विश्वास ठेवणे योग्य वाटत नाही. जर ती गाडी श्री विनोद भुरानीला हस्तांतरीत केली नव्हती तर त्याला त्या गाडीचा विमा दावा भरण्याची गरज नव्हती तसेच विमा रक्कम मागण्याचा कुठलाही अधिकार नाही.
10. तक्रारकर्त्याने गाडीच्या विक्री संबधी व विमा दावा श्री विनोद भुरानीने भरल्या संबधीची वस्तुस्थिती मंचा पासून जाणुनबुजून लपवून ठेवली, या एकाच कारणास्तव तक्रारकर्त्याचा विमा दावा मागण्याचा अधिकार नष्ट होतो. या शिवाय विमाकृत गाडीचे अपघाताची सुचना विरुध्दपक्ष विमा कंपनीला काही दिवसांचे विलम्बाने दिल्यामुळे विमा करारातील अटी व शर्तीचा भंग होतो या कारणास्तव सुध्दा विरुध्दपक्ष विमा कंपनी विमा रक्कम देण्यास बंधनकारक नाही. या सर्व कारणास्तव ही तक्रार खारीज होण्यास पात्र असून त्यावरुन मंच प्रस्तुत तक्रारी मध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
::आदेश::
(1) तक्रारकर्ता श्री दिलीप जयसुखलाल दोशी यांची विरुध्दपक्ष क्रं-1) रॉयल सुंदरम अलॉयन्स इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तर्फे शाखा व्यवस्थापक, वेस्ट हायकोर्ट रोड, नागपूर-15 अधिक-01 यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
(02) खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.
(03) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध
करुन देण्यात याव्यात.