न्या य नि र्ण य
द्वारा – मा. श्रीमती भारती सं. सोळवंडे, अध्यक्ष
1. प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे कलम 35 अन्वये दाखल केली आहे.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे –
तक्रारदार हे सरनाम्यात दिले पत्त्यावरील कायमस्वरूपी रहिवासी आहेत. तक्रारदार हे शेतकरी असून शेती व शेतीपूरक व्यवसाय करून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दरम्यानचे कालावधीमध्ये तक्रारदार यांचे नवीन घर बांधण्याचे नियोजन असल्याने तक्रारदार यांनी घर बांधण्याचे साहित्य आणण्यासाठी मित्र व इतर ठिकाणी चौकशी केली असता जाबदार यांचे लोणंद येथे सिमेंट, लोखंड, पत्रा व इतर सर्व बांधकाम साहित्य विक्री करण्याचे गणेश ट्रेडर्स बिल्डिंग सप्लायरचे दुकान आहे असे समजले. बांधकाम साहित्याची पाहणी करण्यासाठी तक्रारदार जाबदार यांच्या दुकानात गेले असता सामनेवाला यांनी तक्रारदार यांना बांधकाम साहित्याची माहिती व किंमतीची माहिती दिली. यानंतर तक्रारदार यांनी त्यांचे घराचे बांधकामासाठी जाबदार यांच्या दुकानातून साहित्य खरेदी करण्याचे आहे असे जाबदार यांना सांगितले. या कारणाने तक्रारदार व जाबदार यांची ओळख झाली होती व आहे. काही दिवसानंतर तक्रारदार जाबदार यांच्या दुकानात गेले व घर बांधण्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे साहित्य हवे आहे याची माहिती दिली. जाबदार यांनी तक्रारदार यांच्या सांगणेप्रमाणे सर्व बांधकाम साहित्य व त्याची किंमत याचा अंदाज काढला व रक्कम रुपये दहा लाख ते बारा लाख एवढा खर्च बांधकाम साहित्य खरेदी करण्यासाठी होईल असे सांगितले व आज रोजी रु.दहा लाख अॅडव्हान्स जमा करा, मी आपले मागणीप्रमाणे सर्व साहित्य पोहोच करतो, असा विश्वास जाबदार यांनी तक्रारदार यांना दिला. तक्रारदार यांचे घर बांधणीचे नियोजन निश्चित असल्याने व जाबदार हे लोणंद येथील प्रतिष्ठित व्यावसायिक असल्याने जाबदार यांचेवर विश्वास ठेवून तक्रारदार यांनी जाबदार यांना दिनांक 20/03/2021 रोजी दि वाई अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, वाई, शाखा लोणंद, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा येथे असलेल्या त्यांच्या खात्यावरून रुपये 5,00,000/- जाबदार यांचे खात्यावर ट्रान्स्फर केले व त्याच दिवशी तक्रारदार यांनी जाबदार यांना रोख स्वरूपात रुपये 5,00,000/- अदा केले असे एकूण रु.10,00,000/- एवढी रक्कम तक्रारदार यांनी जाबदार यांना घर बांधण्याचे साहित्य खरेदी करणेकामी दि.20/03/21 रोजी अदा केलेली होती व आहे. तक्रारदार यांनी काही दिवसात घराचे बांधकामाचे दृष्टीने तयारी सुरू केली व जाबदार यांना संपर्क करून बांधकाम साहित्य पुरवठा करण्यासंदर्भात बोलणी केली असता सद्य परिस्थितीमध्ये माझे दुकानामध्ये माल उपलब्ध नसल्याने मी आपणास आवश्यक असणाऱ्या बांधकाम साहित्याचा पुरवठा करू शकत नाही, तरी आपण काढलेले घराचे बांधकाम काही दिवस थांबवा, असे जाबदार यांनी तक्रारदार यांना सांगितले. जाबदार यांनी सांगितल्यानुसार तक्रारदार यांनी आठवडाभर वाट पाहून जाबदार यांच्याशी पुन्हा संपर्क साधला असता मी आपणास बांधकाम साहित्य पुरवू शकत नाही, तरी आपण मला दिलेली ॲडव्हान्स रक्कम रुपये 10,00,000/- ही रक्कम परत घेऊन जा, असे जाबदार यांनी तक्रारदार यांना सांगितले. जाबदार यांनी सांगितल्यानुसार तक्रारदार हे दिनांक 16/06/2021 रोजी जाबदार यांच्याकडे आले. त्यादिवशी जाबदार यांनी त्या दिवशीच्या तारखेचा म्हणजेच दिनांक 16/06/2021 रोजीचा जाबदार यांचे बँक ऑफ बडोदा शाखा लोणंद येथील रक्कम रुपये दहा लाख रकमेचा चेक क्रमांक 000118 हा तक्रारदार यांना दिला. सदरचा चेक तक्रारदार यांनी बँकेत वटवण्यासाठी दिला असता तो “फंड्स इनसफिशियंट” या शेऱ्यानिशी न वटता परत आला. सदरची बाब तक्रारदारांनी जाबदार यांना कळवून देखील जाबदार यांनी तक्रारदारांची रक्कम रुपये 10,00,000/- त्यांना परत केली नाही. म्हणून तक्रारदार यांनी जाबदार यांना दिनांक 24/06/2021 रोजी वकिलांमार्फत रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठवली. सदर नोटीस दि.25/06/2021 रोजी मिळून देखील जाबदार यांनी तक्रारदार यांना नोटीसीमधील मागणीप्रमाणे चेकची रक्कम रुपये 10,00,000/- आजपर्यंत अदा केली नाही व ग्राहक सेवा देण्यात कसूर केली आहे. म्हणून तक्रारदाराने सदरची तक्रार या आयोगासमोर दाखल केलेली आहे.
3. तक्रारदाराने कागदयादी सोबत तक्रारदार यांनी जाबदार यांना पाठवलेली कायदेशीर नोटीस तसेच जाबदार यांनी तक्रारदार यांना दिलेला रक्कम रुपये 10,00,000/- च्या धनादेशाची झेरॉक्स प्रत दाखल केलेली आहे.
4. तक्रारदाराची तक्रार आयोगाने दिनांक 9/02/2023 रोजी दाखल करून घेतली व जाबदार यास नोटीस काढली. नोटीस बजावून देखील जाबदार हे या कामी हजर झाले नाहीत. म्हणून त्यांचेविरुद्ध दिनांक 23/11/2023 रोजी एकतर्फा आदेश पारित करण्यात आले.
5. तक्रारदार यांनी दि.10/04/2024 चे कागदीयादी सोबत तक्रारदार यांचे मौजे पाडळी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा येथील ग्रामपंचायत नमुना 8 चा उतारा दि वाई अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, वाई मधील तक्रारदार यांचे खात्याचे स्टेटमेंट, जाबदार यांनी तक्रारदार यांना दिलेल्या दि वाई अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, वाई यांनी चेक न वटलेबाबत दिलेल्या रिटर्न मेमोची प्रत दाखल केली आहे.
6. दिनांक 10/04/2024 रोजी तक्रारदार यांनी पुरावा संपलेची पुरशिस देऊन त्यांचा पुरावा संपवलेला आहे. दिनांक 20/05/2024 रोजी तक्रारदाराने प्रकरण बोर्डावर घेऊन तक्रारदाराने जाबदार यांचेविरुद्ध खंडाळा येथील फौजदारी कोर्टात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट कलम 138 अन्वये दाखल केलेल्या फिर्यादीची सही शिक्क्याची प्रत दाखल केलेली आहे.
7. तक्रारदार तर्फे अॅडव्होकेट आर.सी. शिंदे यांचा युक्तिवाद ऐकला. तक्रारदाराची तक्रार व तक्रारदाराने दाखल केलेली कागदपत्रे यांचे अवलोकन करता खालील मुद्दे निष्कर्षासाठी उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार हा जाबदार यांचा ग्राहक आहे काय ? | होय. |
2 | जाबदार यांनी तक्रारदारास सेवा देण्यामध्ये त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे जाबदार यांचेकडून रक्कम रु.10,00,000/- व्याजासह परत मिळणेस व नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहे काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
कारणमिमांसा
मुद्दा क्र.1
8. तक्रारदाराने जाबदार यांना त्यांचे दि वाई अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, वाई, शाखा लोणंद, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा येथे असलेल्या त्यांच्या खात्यावरून रु.5,00,000/- जाबदार यांचे खात्यावर ट्रान्सफर केले व त्याच दिवशी तक्रारदार यांनी जाबदार यांना रोख स्वरूपात रु.5,00,000/- अदा केले असे कथन केलेले आहे. तक्रारदार यांनी दिनांक 10/04/2024 रोजी कागदयादी सोबत त्यांचे बँक खात्याचे स्टेटमेंट दाखल केलेले आहे. सदर स्टेटमेंटचे अवलोकन करता तक्रारदाराने त्यांचे खात्यावरून जाबदार यांना दिनांक 20/03/2021 रोजी रक्कम रुपये 5,00,000/- ट्रान्सफर केलेचे दिसतात. उर्वरित रक्कम रुपये 5,00,000/- जाबदार यांना दिले बाबतचा पुरावा तक्रारदाराने दाखल केलेला नाही तथापि जाबदार यांनी तक्रारदारांना दिलेल्या रक्कम रु.10,00,000/- च्या चेक नंबर 000118 याचे अवलोकन करता सामनेवाला यांना सदरची रक्कम मान्य आहे ही बाब शाबीत होते. सबब, तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हा आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2
9. तक्रारदार यांनी त्यांचे घराचे बांधकामाचे साहित्य पुरवण्याकरता जाबदार यांना रक्कम रुपये 10,00,000/- अदा करून देखील जाबदार यांनी तक्रारदार यांना बांधकाम साहित्य पुरवलेले नाही व तक्रारदार यांची रक्कम देखील परत दिलेली नाही. सदरची बाब जाबदार यांनी प्रस्तुतकामी हजर होऊन नाकारलेली नाही. तक्रारदारांच्या तक्रारीचे अवलोकन करता त्यांनी त्यांचे तक्रारीसोबत कागद यादी क्रमांक 2 मध्ये जाबदार यांनी तक्रारदार यांना दिलेला रक्कम रुपये 10,00,000/- चा बँक ऑफ बडोदा या बँकेचा चेक क्रमांक 000118 दाखल केलेला आहे. तसेच दिनांक 10/04/2024 च्या कागदयादी सोबत अनुक्रमांक 4 मध्ये जाबदार यांनी तक्रारदार यांना दिलेला चेक न वटता परत आलेबाबतचा चेक रिटर्न मेमो दाखल केलेला आहे. सदरचा चेक तसेच चेक रिटर्न मेमो याचे अवलोकन करता जाबदार यांनी तक्रारदार यांना त्यांची रक्कम रुपये 10,00,000/- परत दिलेली नाही ही बाब शाबीत होते. तसेच तक्रारदार यांनी जाबदार यांना दिनांक 24/06/2021 रोजी वकिलांमार्फत रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठवली. सदर नोटीस दि.25/06/2021 रोजी मिळून देखील जाबदार यांनी तक्रारदार यांना नोटीसीमधील मागणीप्रमाणे चेकची रक्कम रुपये 10,00,000/- आजपर्यंत अदा केली नाही असे तक्रारदाराचे कथन आहे. सदर नोटीसची प्रत तक्रारदारांनी याकामी दाखल केली आहे. तक्रारदाराची सदरची कथने जाबदार यांनी याकामी हजर राहून नाकारलेली नाही. जाबदार यांना प्रस्तुत तक्रारअर्जाचे नोटीसची बजावणी होवूनही जाबदार हे याकामी हजर झाले नाहीत. सबब, जाबदार यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. अशा प्रकारे जाबदार यांनी तक्रारदाराचे तक्रारअर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही. तक्रारदारांनी आपले तक्रारअर्जातील कथनांचे शाबीतीसाठी पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे. सबब, तक्रारदाराचे शपथेवरील कथनांचा तसेच दाखल कागदपत्रांचा विचार करता तक्रारदाराने आपली तक्रार शाबीत केली आहे असे या आयोगाचे मत आहे. सबब, जाबदार यांनी तक्रारदार यांना त्यांचे घराचे बांधकामापोटी अदा केलेली रक्कम रु.10,00,000/- परत न करुन तक्रारदारास सेवा देण्यामध्ये त्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
मुद्दा क्र.3
10. सबब, तक्रारदार हे जाबदार यांचेकडून रक्कम रु.10,00,000/- परत मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. तसेच सदरचे रकमेवर तक्रारदार हे दि.20/03/2021 पासून संपूर्ण रक्कम तक्रारदारास मिळेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. तसेच जाबदार यांनी तक्रारदारास द्यावयाचे सेवेत त्रुटी केल्यामुळे तक्रारदारास मानसिक त्रास सहन करावा लागला तसेच या आयोगात तक्रारअर्ज दाखल करावा लागला. या बाबींचा विचार करता तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रु.20,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु.10,000/- मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब आदेश.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
- जाबदार यांनी तक्रारदार यांना रक्कम रु.10,00,000/- अदा करावी तसेच सदर रकमेवर दि.20/03/2021 पासून संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
- जाबदार यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.20,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.10,000/- अदा करावेत.
- सदर आदेशाचे अनुपालन जाबदार यांनी सदर निकालाची प्रत मिळालेपासून 45 दिवसांचे आत करावे.
- जाबदार यांनी विहीत मुदतीत सदर आदेशाचे अनुपालन न केल्यास तक्रारदार यांना ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदींनुसार योग्य ती दाद मागणेची मुभा राहील.
- सदर आदेशाच्या प्रती विनाशुल्क उभय पक्षकारांना द्याव्यात.