न्या य नि र्ण य
द्वारा – मा. श्रीमती भारती सं. सोळवंडे, अध्यक्ष
1. प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे –
तक्रारदार यांनी जाबदार पतसंस्थेमध्ये मुदत ठेव योजनेपोटी रकमा ठेवलेल्या होत्या. त्यांचा सविस्तर तपशील तक्रारदाराने तक्रारअर्जात नमूद केला आहे. सदर ठेवींची मुदत संपलेनंतर तक्रारदारांनी जाबदार यांचेकडे ठेव रकमांची मागणी केली असता जाबदार यांनी रक्कम परत केली नाही. म्हणून तक्रारदारांनी जाबदार यांना दि. 9/10/2019 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठविली. परंतु तरीही जाबदार यांनी ठेव रक्कम देण्यास टाळाटाळ केली. म्हणून तक्रारदाराने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. सबब, तक्रारदाराने याकामी जाबदार यांचेकडून ठेवींची व्याजासहीत होणारी रक्कम व सदर रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष वसूल होऊन मिळेपर्यंत द.सा.द.शे. 12 टक्के दराने व्याज मिळावे, शारिरिक व मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व अर्जाचा खर्च रु.10,000/- जाबदारकडून मिळावेत अशी मागणी तक्रारदारांनी याकामी केली आहे.
3. तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत शपथपत्र तसेच कागदयादीसोबत ठेवपावत्यांच्या प्रती, तक्रारदार यांनी जाबदार यांना पाठविलेल्या नोटीसची प्रत, जाबदार यांनी दिलेल्या उत्तरी नोटीसची प्रत, सदर नोटीसीच्या पोहोच इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.
4. सदर कामी जाबदार क्र. 2, 6, 13 हे गैरहजर राहिले.
5. जाबदार क्र. 1, 3 ते 5, 7 ते 12 व 14 ते 15 यांनी याकामी हजर होवून म्हणणे व शपथपत्र दाखल केले आहे. सदरचे म्हणणे दाखल करुन घेण्यात आले आहे. तथापि, सदरचे म्हणणेवर जाबदार क्र. 1, 3 ते 5, 7 ते 12 व 14 ते 15 यांची सही नाही. सदरचे म्हणणे हे जाबदारांतर्फे वकीलांच्या सहीने दाखल केलेले आहे. परंतु सदर वकीलांचे वकीलपत्रही याकामी दाखल नाही. सबब, सदरचे जाबदार यांनी दाखल केलेले म्हणणे याकामी विचारात घेता येत नाही असे या आयोगाचे मत आहे.
6. प्रस्तुतची तक्रार उभय पक्षांचे पुराव्यासाठी नेमण्यात आली होती. तथापि तक्रारदार व त्यांचे विधिज्ञ हे सातत्याने गैरहजर राहिले. तक्रारदारांना वारंवार संधी देवूनही तक्रारदारांनी याकामी आपला पुरावा दाखल केला नाही. तद्नंतर दि. 15/12/2023 रोजी जाबदार संस्थेतर्फे अर्ज दाखल करण्यात आला व जाबदार यांनी तक्रारदाराची संपूर्ण रक्कम अदा केलेली आहे असे कथन केले. तद्नंतर दि. 28/12/2023 रोजी जाबदारतर्फे व्यवस्थापक यांनी तक्रारदार यांना ठेव रकमा अदा केलेबाबत तक्रारदारांच्या ठेवपावतीवर घेतलेल्या सहयांची प्रत दाखल केली आहे. तसेच रक्कम अदा केल्यानंतर तक्रारदाराकडून परत घेतलेल्या मूळ ठेवपावत्या याकामी या आयोगाचे अवलोकनार्थ दाखल केल्या. तथापि, तक्रारदार हे याकामी सातत्याने गैरहजर असलेने तसेच त्यांनी याकामी पुरावा दाखल न केलेने सदर प्रकरण निकालासाठी नेमण्यात आले.
7. दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, प्रस्तुत तक्रार पुराव्यासाठी नेमली असता तक्रारदार हे याकामी सातत्याने गैरहजर असलेचे दिसून येते. तक्रारदारांना वारंवार संधी देवूनही त्यांनी आपला पुरावा दाखल केलेला नाही. दि. 15/12/2023 रोजी जाबदार संस्थेतर्फे दाखल करण्यात आलेल्या अर्जामध्ये जाबदार यांनी तक्रारदाराची संपूर्ण रक्कम अदा केलेली आहे असे कथन केले. तद्नंतर दि. 28/12/2023 रोजी जाबदारतर्फे व्यवस्थापक यांनी तक्रारदार यांना ठेव रकमा अदा केलेबाबत तक्रारदारांच्या ठेवपावतीवर घेतलेल्या सहयांची प्रत दाखल केली आहे. तसेच रक्कम अदा केल्यानंतर तक्रारदाराकडून परत घेतलेल्या मूळ ठेवपावत्या याकामी या आयोगाचे अवलोकनार्थ दाखल केल्या. सदर ठेवपावत्यांवर तक्रारदाराने रक्कम परत मिळाल्याबाबत सही केल्याचे दिसून येते. सदरची जाबदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे तक्रारदार यांनी याकामी हजर राहून नाकारलेली नाहीत. सदरची वस्तुस्थिती विचारात घेता, जाबदार यांनी तक्रारदार यांना ठेवींच्या रकमा अदा केल्या आहेत ही बाब स्पष्टपणे दिसून येते. सबब, तक्रारदारांना त्यांची ठेव रक्कम मिळाली असल्याने आता तक्रारदारांची तक्रार राहिलेली नाही असा निष्कर्ष हे आयोग काढत आहे. सबब, तक्रारअर्ज नामंजूर करण्याचे निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येते.
- खर्चाबाबत आदेश नाहीत.
सदर आदेशाच्या प्रती विनाशुल्क उभय पक्षकारांना द्याव्यात.