अॅड ढोबळे तक्रारदारांतर्फे
जाबदेणार एकतर्फा
द्वारा- मा. श्रीमती. क्षितीजा कुलकर्णी, सदस्य
:- निकालपत्र :-
दिनांक 18/6/2014
प्रस्तूतची तक्रार तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986, कलम 12 अंतर्गत सेवेतील त्रुटी संदर्भात दाखल केली आहे. यातील कथने थोडक्यात खालील प्रमाणे-
1. जाबदेणार यांचा फर्निचरचा व्यवसाय असून त्यांच्या दुकानातील फर्निचरची क्वालिटी उत्तम दर्जेदार आहे व वेळेत ऑर्डर पूर्ण करुन देतात, असे समजल्यावरुन तक्रारदारांनी जाबदेणार यांच्याकडून त्यांच्या नवीन सदनिकेसाठी फर्निचर विकत घेण्याचे ठरविले. त्यानुसार दिनांक 4/5/2013 रोजी तक्रारदारांनी जाबदेणार यांच्याकडून 18 एम एम प्लायवूडचे कपाट तयार करुन घेण्याचे ठरविले. तक्रारदारांनी कपाटाच्या सर्व पृष्ठभागावार पॉलिश करण्यासाठी व इतर सामानासाठी ठरलेल्या मजूरी पैकी आगाऊ रक्कम रुपये 5000/- जाबदेणार यांना अदा केली. तसेच देव्हा-यासाठी 18 एम एम प्लायवूडचे आतील बाजूस सनमायक, मागील व साईड बाजूस पांढरा रंग व पुढे फिरत्या काचेच्या दोन झडपा या सामानासाठी मजूरी रुपये 7000/- अशी ठरली होती. एकूण ठरलेली किंमत रुपये 12,000/- पैकी तक्रारदारांनी दिनांक 11/5/2013 रोजी रुपये 7000/- जाबदेणार यांना अदा केली व उर्वरित रक्कम रुपये 5000/- दिनांक 15/6/2013 रोजी अदा केली. जाबदेणारय यांनी दिनांक 30/5/2013 पर्यन्त फर्निचरच्या वस्तू मिळतील असे तक्रारदारांना आश्वासन दिले. परंतू वेळोवेळी फोन करुन, प्रत्यक्ष भेटूनही तक्रारदारांना कपाट व मंदिर तयार करुन दिले नाही. त्यामुळे दिनांक 15/6/2013 रोजी तक्रारदारांनी रक्कम परत मिळावी अशी जाबदेणार यांना विनंती केली असता, दिनांक 22/6/2013 पर्यन्त ऑर्डरची पूर्तता केली नाही तर सर्व रक्कम परत करीन असे जाबदेणार यांनी तक्रारदारांना लिहून दिले. परंतू लिखीत आश्वासनाचीही पूर्तता केली नाही. रक्कमही परत केली नाही. म्हणून तक्रारदारांनी प्रस्तूतची तक्रार दाखल करुन जाबदेणार यांच्याकडून फर्निचरसाठी भरलेली रक्कम रुपये 12,000/- 18 टक्के व्याजास परत मिळावी, नुकसान भरपाईपोटी रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- अशी विनंती केली आहे.
2. जाबदेणार यांना मंचाची नोटीस बजावूनही गैरहजर. सबब जाबदेणार यांच्या विरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश पारीत करण्यात आले.
3. तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीतील कथनांच्या पुष्टयर्थ शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रारदारांनी दाखल केलेल्या, जाबदेणार यांच्या बिल नं 468, दिनांक 4/5/2013 रोजीच्या पावतीवरुन तक्रारदारांनी जाबदेणार यांना कपाटासाठी एकूण रक्कम रुपये 16,000/- पैकी आगाऊ रक्कम रुपये 5,000/- मिळाल्याचे दिसून येते. तसेच बिल क्र 470 दिनांक 11/5/2013 वरुन तक्रारदारांनी जाबदेणार यांना देव्हा-यासाठी संपूर्ण रक्कम रुपये 7000/- आगाऊ दिल्याचे दिसून येते. जाबदेणार यांनी फर्निचरचे काम दिनांक 15/6/2013 पर्यन्त पूर्ण करुन देईन, अन्यथा दिनांक 22/6/2013 रोजी तक्रारदारांना रुपये 12,000/- परत करण्याचे लेखी आश्वासन दिल्याचे दिनांक 15/6/2013 रोजीच्या पावतीवरुन स्पष्ट होते. जाबदेणार यांनी प्रस्तूत प्रकरणात हजर राहून तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने नाकारलेली नाहीत. तसेच तक्रारदारांनी दिलेल्या फर्निचरचे कामही पूर्ण करुन वस्तू दिलेल्या नाहीत, भरलेल्या रकमेचा परतावा मागूनही व लेखी कबूल करुनही दिलेला नाही, ही जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे मत आहे. सबब तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून भरलेली रक्क्म रुपये 12,000/- परत मिळण्यास पात्र आहेत. तसेच तक्रारदारांना झालेल्या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासासाठी नुकसान भरपाई पोटी 2,000/- मिळण्यास व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे.
सबब खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
1. तक्रार अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
2. जाबदेणार यांनी फर्निचरचे काम पूर्ण करुन वस्तू दिलेल्या
नाहीत, भरलेल्या रकमेचा परतावा लेखी कबूल करुनही दिलेला नाही, ही जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी आहे.
3. जाबदेणार यांनी तक्रारदारांना रक्कम रुपये 12,000/- [रुपये बारा हजार फक्त] आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
4. जाबदेणार यांनी तक्रारदारांना शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रुपये 2,000/- [रुपये दोन हजार फक्त ] व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- [रुपये एक हजार फक्त ] आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावा.
5. तक्रारदारांनी मा. सदस्यांसाठी दिलेले संच आदेशाच्या दिनांकापासून एका महिन्यात घेऊन जावेत. अन्यथा संच नष्ट करण्यात येतील.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शूल्क पाठविण्यात यावी.
स्थळ-पुणे
दिनांक-18/6/2014