ठाणे जिल्हा अतिरिक्त ग्राहक तक्रार निवारण मंच,
कोकण भवन, नवी मुंबई.
तक्रार क्रमांक - 30/2011
दाखल दिनांक – 15/03/2011
निकालपत्र दिनांक - 22/01/2014
श्री. मनजितसिंग ओभान,
ऑफिस पत्ता – 303,304 व 305, रिध्दी आर्केड,
प्लॉट नं. 857 सी अॅंड डी, सेक्टर केडब्ल्यूसी,
ठाणे – पनवेल रोड, कळंबोली, नवी मुंबई.
घरचा पत्ता – झेनिथ पार्क, बंगला नं. 4,
देवनार फार्म रोड, एल.जे. गुप्ता रोड,
बी.ए.आर.सी. हॉस्पिटलच्या जवळ,
मुंबई – 400088. ....... तक्रारदार
विरुध्द
1. मे. मित्तल कन्सट्रक्शन्स कं.,
118 – 119, रिध्दी आर्केड,
प्लॉट नं. 857 सी अॅंड डी, सेक्टर केडब्ल्यूसी,
ठाणे – पनवेल रोड, कळंबोली, नवी मुंबई.
व 6 ए, राम कमर्शिअल कॉम्प्लेक्स,
सेक्टर 18, मॅफ्कोच्या जवळ, वाशी, नवी मुंबई.
2. नरेंद्र बी. केसरिया, मालक
3. प्रकाश आर. ठक्कर, भागीदार
दोघांचा पत्ता - मे. मित्तल कन्सट्रक्शन्स कं.,
सेक्टर 18, मॅफ्कोच्या जवळ, वाशी, नवी मुंबई. ....... विरुध्दपक्ष
समक्ष - सौ. स्नेहा स. म्हात्रे, मा. अध्यक्षा
श्री. एस.एस. पाटील, मा. सदस्य
उपस्थिती- तक्रारदारातर्फे अॅड. राजेश जैन हजर.
विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 एकतर्फा.
विरुध्दपक्ष क्र. 3 गैरहजर.
निकालपत्र
(दिनांक 22/01/2014)
द्वारा मा. अध्यक्षा, सौ.स्नेहा स. म्हात्रे
1. तक्रारदार हे मे. हौलेज कॉर्पोरेशन याचे प्रोप्रायटर असल्याने त्यांनी सदर तक्रार त्यांचे नांवे दाखल केली आहे. सदर तक्रारीत विरुध्दपक्ष क्र. 1 ही मित्तल कन्सट्रक्शन्स कं. नांवाची फर्म आहे. विरुध्दपक्ष क्र. 2 हे त्याचे मालक व विरुध्दपक्ष क्र. 3 हे भागीदार असल्याचे म्हटले आहे.
2. तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे –
तक्रारदारांनी विरुध्दपक्षाकडून अनुक्रमे दि. 15/04/06, दि. 03/03/06 व दि. 03/03/06 रोजी रिध्दी आर्केड, कळंबोली, नवी मुंबई, या इमारतीत कार्यालय क्र. 303, 304, व 305 अनुक्रमे 350 चौ.फूट, 320 चौ.फूट व 320 चौ.फूट विकत घेण्यासाठी आरक्षित केले. सदर आरक्षणाच्या वेळी विरुध्दपक्षाने तक्रारदारांना प्रत्येक कार्यालयासोबत ओपन कार पार्कींग देणार असल्याचे सांगितले व याबाबत कार्यालय क्र. 303, 304 व 305 च्या दि. 15/04/06, दि. 03/03/06 व दि. 03/03/06 रोजीच्या बुकींग शीट मध्ये नमूद केले आहे. (नि. Exh. A)
3. उभयपक्षांत सदर कार्यालयाच्या मोबदल्याची किंमत अनुक्रमे कार्यालय क्र.303, रु. 4,62,000/- , कार्यालय क्र. 304 साठी रु. 3,52,000/- व कार्यालय क्र. 305 साठी रु. 3,52,000/- इतकी ठरली. त्यानंतर तक्रारदारांनी सदर कार्यालये खरेदी करण्यासाठी विरुध्दपक्ष यांचेशी दि. 04/11/09 रोजी करारनामा स्वाक्षरीत केला व सदर करारनामा दुय्यम निबंधक, पनवेल यांचेसमोर नोंदणीकृत करण्यात आला व त्यावर मुद्रांकशुल्कही भरण्यात आले. (कार्यालय क्र. 303, करारनामा दि. 04/11/09) (कार्यालय क्र. 304, करारनामा दि. 04/11/09) (कार्यालय क्र. 305, करारनामा दि. 04/11/09)
4. तक्रारदार पुढे म्हणतात की, विरुध्दपक्षाने तक्रारदारांना दिलेल्या कार्यालय खरेदी पूर्वीच्या बुकींगशीट मध्ये कार्यालय क्र. 303 चे एकूण क्षेत्रफळ 350 चौ. फूट इतके आहे, कार्यालय क्र.304 चे एकूण क्षेत्रफळ 320 चौ. फूट इतके आहे व कार्यालय क्र.305 चे एकूण क्षेत्रफळ 320 चौ. फूट इतके आहे. परंतु उभयपक्षांतील कार्यालय विक्रीच्या करारनाम्यामध्ये कार्यालय क्र. 303 चे एकूण क्षेत्रफळ 260 (carpet area) चौ.फूट, कार्यालय क्र. 304 चे एकूण क्षेत्रफळ 200 (carpet area) चौ.फूट दर्शविले आहे व कार्यालय क्र. 305 चे एकूण क्षेत्रफळ 200 (carpet area) चौ.फूट दर्शविले आहे अशाप्रकारे तीन कार्यालयांचे एकत्रित क्षेत्रफळ मिळून 330 चौ.फूट क्षेत्रफळासाठी तक्रारदारांनी विरुध्दपक्षाला एकूण मोबदल्याची रक्कम देऊन सुध्दा तक्रारदारांना सदर जागा 330 चौ. फूट विरुध्दपक्षाने न दिल्याने तक्रारदारांना रु. 3,00,000/- चे आर्थिक नुकसान सोसावे लागले. सदर कार्यालयाचा ताबा विरुध्दपक्षाने तक्रारदारांना दि. 10/04/10 रोजी दिला व याबाबतचे ताबापत्र नि. “D” वर आहे.
5. तसेच तक्रारदारांनी ब-याच मोठया कालावधीपर्यंत Open car parking place साठी वाट पाहूनही विरुध्दपक्षाने पूर्वी बुकींग शीट मध्ये तक्रारदारांना कबूल केल्याप्रमाणे ती दिली नाही. तसेच तक्रारदारांना विरुध्दपक्षाने कार्यालय क्र. 303 बाहेरील पॅसेज एरिया 70 चौ.फूट हा प्रति फूट रु. 1100/- या दराने विकला. व त्यासाठी दि. 15/09/08 रोजीच्या पत्रान्वये सदर पॅसेज साठी तक्रारदारांकडून रु. 77,000/- ची मागणी केली व त्यासाठी तक्रारदारांनी विरुध्दपक्षाला रु. रु.77,000/- भरले. परंतु सदर 70 चौ.फूट जागेबद्दल उभयपक्षांतील स्वाक्षरीत केलेल्या करारनाम्यात काहीच उल्लेख केलेला नाही. व वर नमूद केलेल्या मुद्दयांमुळे तक्रारदारांची फसवणूक झाल्याने तक्रारदारांनी विरुध्दपक्षाचे विरुध्द तक्रार क्र. 30/2011 मंचात दाखल केली आहे.
6. सदर तक्रारीत तक्रारदारांनी विरुध्दपक्षाकडून खालील मागण्या केल्या आहेत –
अ) विरुध्दपक्षाने बुकींगशीट नुसार तंतोतंत तेवढयाच क्षेत्रफळाची जागा पुरवावी किंवा तेवढया
क्षेत्रफळाच्या जागेच्या मोबदल्यात रु. 3,00,000/- द्यावेत.
ब) तीन ओपन कार पार्कींगची जागा रु. 1,50,000/- च्या विलंबशुल्कासह तक्रारदारांना द्यावी.
क) तसेच विरुध्दपक्षाने तक्रारदारांकडून ओपन पॅसेजसाठी घेतलेली रक्कम रु. 77,000/-
परत करावी.
ड) मानसिक त्रासापोटी रु. 3,00,000/- व न्यायिक खर्च व इतर खर्चासाठी रु. 20,000/-
द्यावेत. व वरील सर्व रकमेवर विरुध्दपक्ष यांनी रक्कम अदा करेपर्यंत 18% व्याज
द्यावे.
7. सदर प्रकरणात विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांना जबाब दाखल करणेसाठी पाठविण्यात आलेली नोटीस “ Unclaimed ” या शे-यासह मंचात परत आल्याने पुन्हा दि. 19/05/12 रोजीच्या जनादेश या वृत्तपत्रात विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांना दि. 12/06/12 रोजीच्या सुनावणीस हजर रहाण्यासाठी जाहीर नोटीस प्रसिध्द करण्यात आली. तरीदेखील दि. 12/06/12 रोजीच्या सुनावणीस विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 हे गैरहजर राहिल्याने त्यांचेविरुध्द दि. 09/09/12 रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला. तसेच विरुध्दपक्ष क्र. 3 यांना नोटीस मिळाल्यावर दि. 20/05/11 रोजी त्यांच्या वकीलांनी वकालतनामा व लेखी जबाब दाखल केला. परंतु पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची चार वेळा संधी देऊनही ते दाखल केले नाही. तसेच विरुध्दपक्ष क्र. 3 च्या वकीलांनी दि. 16/12/2013 रोजी विरुध्दपक्ष क्र. 3 तर्फे दाखल केलेला वकालतनामा मागे घेतला. तक्रारदारांनी आपले पुराव्याचे प्रतिज्ञापत्र व लेखी युक्तीवाद दाखल केल्यावर तक्रारदारांचा तोंडी युक्तीवाद ऐकून प्रकरण अंतिम आदेशासाठी ठेवण्यात आले.
8. विरुध्दपक्ष क्र. 3 यांनी त्यांच्या कैफियतीमध्ये तक्रारदारांची तक्रार ही खोटी असून तक्रारदार मंचापासून महत्वाच्या बाबी लपवित असल्याचे कथन केले आहे. तसेच विरुध्दपक्ष क्र. 1 ने सदर कार्यालये क्र. 303, 304 व 305 हे मे. हौलागे कॉर्पोरेशन, हया प्रोप्रायटर फर्मला अनुक्रमे दि. 04/11/09, 04/11/09 व 04/11/09 रोजीच्या करारनाम्याद्वारे विकल्याने तक्रारदारांनी वैयक्तिकरित्या स्वतःच्या नांवाने तक्रार दाखल करणे उचित नाही व त्यामुळे तक्रारदार हे विरुध्दपक्षाचे ग्राहक होऊ शकत नाहीत असे म्हटले आहे. तसेच मे. हौलागे कॉर्पोरेशन यांनी सदर कार्यालये व्यापारी हेतूने व मोठया प्रमाणात नफा कमाविण्याच्या उद्देशाने घेतली असल्याने तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम 2 (1) (डी) च्या व्याख्येनुसार ग्राहक नाहीत व त्यांची तक्रार खारीज करण्यात यावी असे म्हटले आहे. तसेच विरुध्दपक्ष क्र. 2 ने तक्रारदारांना बुकींगशीट क्र. 71, 72 व 103 (कार्यालय क्र. 303, 304 व 305) वर नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक कार्यालयासाठी, त्या कार्यालयाच्या मोबदल्याच्या किंमतीतच प्रत्येकी एक ओपन कार पार्कींग देण्याचे कबूल केले असल्याने व त्यावर स्वाक्षरी केली असल्याने ती द्यावी व त्यासाठी विरुध्दपक्ष क्र. 2 हे बांधील आहेत. परंतु विरुध्दपक्ष क्र. 3 हे त्यात सहभागी नसल्याने ओपन कार पार्कींग बाबत विरुध्दपक्ष क्र. 3 चा संबंध नाही असे म्हटले आहे.
तसेच विरुध्दपक्ष यांची सगळी कार्यालये बुक करताना ती बिल्टअप एरियानुसार आरक्षीत केली जातात, व नियमानुसार करारनामा करताना त्यात केवळ कारपेट एरियाच दाखवला जात असल्याने विरुध्दपक्षाने तक्रारदारांना कमी क्षेत्रफळाची कार्यालये देऊन फसवणूक केली आहे असे म्हणणे चुकीचे आहे व तक्रारदारांनी विरुध्दपक्ष क्र. 1 ला दिलेली रु. 77,000/- ही रक्कम कार्यालयाच्या एकूण मोबदल्यापैकी, काही रक्कम अदा करण्यासाठी दिलेल्या हप्त्याची असून ती ओपन पॅसेजसाठी दिलेली नाही. व सदर तक्रारीची दखल घेण्यास मंचास अधिकार नाही व सदर तक्रार दाखल करण्यास तक्रारदारांना 2 वर्षे 8 महिन्यांचा विलंब असल्याचे नमूद केले आहे.
9. तक्रारदारांनी त्यांच्या पुराव्याचे प्रतिज्ञापत्रात व लेखी युक्तीवादात विरुध्दपक्ष क्र. 3 यांनी केलेले आरोप फेटाळलेले असून तक्रारीतील काही मुद्दयांचा पुनर्उल्लेख केला आहे.
10. सदर तक्रारीच्या निराकरणार्थ मंचाने खालील मुद्दयांचा विचार केला –
मुद्दा क्रमांक 1 - तक्रारदारांची तक्रार चालविण्याचा मंचास अधिकार आहे काय ?
उत्तर - होय.
मुद्दा क्रमांक 2 - तक्रारदारांनी सदर तक्रार विहीत मुदतीत दाखल केली आहे काय ?
उत्तर - होय.
मुद्दा क्रमांक 3 - विरुध्दपक्ष क्र. 1, 2 व 3 यांनी तक्रारदारांना दोषपूर्ण सेवा
दिली आहे काय ?
उत्तर - होय.
मुद्दा क्रमांक 4 - तक्रारदार विरुध्दपक्षाकडून ओपन पॅसेजसाठी भरलेली रक्कम परत
मिळण्यास पात्र आहेत काय ?
उत्तर - नाही.
मुद्दा क्रमांक 5 - तक्रारदार विरुध्दपक्षाकडून नुकसानभरपाई व न्यायिक खर्च
मिळणेस पात्र आहेत काय ?
उत्तर - होय.
विवेचन मुद्दा क्रमांक 1 व 2 - तक्रारदारांनी स्वतःच्या चरितार्थासाठी / स्वतःच्या उद्योगधंद्यासाठी (self employment) सदर कार्यालये क्र. 303, 304 व 305 रिध्दी आर्केड, कळंबोली नवी मुंबई या सोसायटीमध्ये विरुध्दपक्ष क्र. 1 कडून रीतसर करारनामा करुन दि.04/11/09 रोजी अनुक्रमे रु. 4,62,000/-, रु.3,52,000/- व रु. 3,52,000/- एवढया मोबदल्यास विकत घेतली आहेत. व त्याबाबत स्वाक्षरित केलेला करारनामा दुय्यम निबंधक, पनवेल यांचेसमोर नोंदणीकृत करण्यात आला आहे व त्यावर आवश्यक मुद्रांकशुल्कही भरण्यात आले आहे. तक्रारदारांनी हौलाग कॉर्पोरेशनचे प्रोप्रायटर म्हणून सदर करारनामे स्वाक्षरित केले आहेत. त्यामुळे तक्रारदारांना सदर कार्यालयाचे मालक / हौलेज कॉर्पोरेशनचे मालक म्हणून सदर तक्रार दाखल करण्याचा अधिकार आहे. विरुध्दपक्षाचे कार्यालय हे कळंबोली नवी मुंबई येथे असून तक्रारदारांचा विरुध्दपक्षाशी झालेला व्यवहार हा मंचाच्या भौगोलिक कार्यक्षेत्रात झालेला आहे.
तसेच विरुध्दपक्षाकडे सन 2006 मध्ये तक्रारदारांनी तिन्ही कार्यालये आरक्षित केली. दि. 04/11/09 रोजी सदर कार्यालयाचे करारनामे उभयपक्षांनी स्वाक्षरित करुन नोंदविण्यात आलेले आहेत. व दि. 10/04/10 रोजी सदर कार्यालयांचा ताबा विरुध्दपक्षाने तक्रारदारांना दिलेला आहे. व त्यानंतर तक्रारदारांना सदर जागेचे क्षेत्रफळ विरुध्दपक्षाने कमी दिल्याचे लक्षात आल्यावर तक्रारदारांनी मार्च 2011 सदर तक्रार फाईल केल्यावर दि. 15/03/11 रोजी तक्रार दाखल करुन घेण्यात आलेली आहे. तसेच वारंवार विचारणा करुनही विरुध्दपक्ष क्र. 1 ने तक्रारदारांकडून सदर कार्यालये आरक्षित करताना एकूण मोबदल्याच्या रकमेमध्येच तीन ओपन कार पार्कींग देण्याचे कबूल करुनही अद्याप न दिल्याने तक्रारीचे कारण अजूनही अस्तित्वात / कायम आहे व तक्रार विहीत मुदतीत दाखल करण्यात आलेली आहे त्यामुळे त्यास विलंबमाफीच्या अर्जाची गरज नाही. सदर तक्रारदाराने विरुध्दपक्षाकडून स्वतःचा चरितार्थ चालविण्यासाठी (self employment) सदर कार्यालये खरेदी केलेली असल्यामुळे व तक्रारदारांनी मंचाकडे मागितलेल्या प्रार्थना कलमांनुसार तक्रारदारांची तक्रार ही मंचाच्या आर्थिक क्षेत्रातही येते त्यामुळे सदर तक्रार दाखल करुन घेण्याचा मंचास पूर्ण अधिकार आहे. तक्रारदारांनी मे. हौलाग कॉर्पोरेशनचे मालक म्हणून विरुध्दपक्षाशी कार्यालय खरेदीबाबत केलेल्या करारनाम्यावर स्वाक्षरी केली आहे. व तक्रारदार हे मे. हौलाग कॉर्पोरेशनचे प्रोप्रायटर असल्याने त्यांचे नांवाने सदर दावा दाखल करण्याचा तक्रारदारांना हक्क आहे.
विवेचन मुद्दा क्रमांक 3 व 4 - विरुध्दपक्ष क्र. 1 ही एक फर्म असून विरुध्दपक्ष क्र. 2 हे त्याचे मालक आहेत. व विरुध्दपक्ष क्र. 3 हे विरुध्दपक्ष क्र. 1 चे भागीदार असल्याचे तक्रारदारांनी तक्रारीत नमूद केले आहे. तक्रारदारांनी दि. 04/11/09 रोजी विरुध्दपक्ष क्र. 1 शी व्यवहार करुन रिध्दी आर्केड या इमारतीमधील कार्यालये क्र. 303, 304 व 305 आरक्षित केली. विरुध्दपक्षाने सदर कार्यालये आरक्षीत केल्याबाबत तक्रारदारांना दिलेल्या बुकींगशीट मध्ये नि.10, 11 व 12 मध्ये सदर कार्यालये ही अनुक्रमे 350 चौ.फूट, 320 चौ.फूट व 320 चौ.फूट असल्याचे म्हटले आहे. परंतु कुठेही सदर कार्यालयांचे क्षेत्रफळ हे बिल्टअप एरियानुसार असल्याचे नमूद केलेले दिसत नाही. त्यामुळे विरुध्दपक्ष यांनी तक्रारदारांना तीन कार्यालयांचा एकत्रितपणे मिळून 330 चौ.फूटांचे क्षेत्रफळ असलेला एरिया कमी प्रमाणात दिला असल्याचे दिसून येते व सदर 330 चौ.फूटांच्या क्षेत्रफळासाठी विरुध्दपक्ष क्र. 1 कडे तक्रारदार रु. 3,00,000/- इतके जास्त दराने आकारण्यात आल्याने ते अनुचित आहे असे मंचाचे मत आहे.
विरुध्दपक्षाने तक्रारदारांना दि. 15/09/08 रोजीच्या पत्राद्वारे / डिमांड नोटीसद्वारे 70 चौ.फूटांचे क्षेत्रफळ असलेले कार्यालय क्र. 303 समोरील Common Passage ची जागा विकण्यासाठी रु.1100/- प्रति चौ.फूट दराने आकारले असे म्हटले आहे. व, त्याबाबतचे पत्र / डिमांड लेटर नि. "सी" वर जोडले आहे. व पान क्र. 240 वर विरुध्दपक्षाने दि. 22/09/08 रोजी तक्रारदारांचे नांवे दिलेली कार्यालय क्र. 303 साठीची रु.77,000/- चेकद्वारे. (चेक क्र. 364348, दि.22/09/08, सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया)दिल्याबाबतची पावती क्र. ए – 1205 जोडली आहे. व सदर पावतीवर विरुध्दपक्ष क्र. 3 यांची विरुध्दपक्ष क्र. 1 यांचे ऑथोराईज्ड सिग्नेटोरी म्हणून स्वाक्षरी केलेली आहे. परंतु सदर पावतीचे निरिक्षण केले असता कुठेही सदर रक्कम तक्रारदारांचे कार्यालय क्र. 303 समोरील ओपन पॅसेजच्या जागेच्या मोबदल्याची रक्कम म्हणून स्विकारण्यात येते असा उल्लेख दिसत नाही. त्यामुळे कुठल्याही ठोस कागदोपत्री पुराव्याअभावी तक्रारदारांची सदर रक्कम रु. 77,000/- ही विरुध्दपक्षाने ओपन पॅसेजसाठी घेतली असून ती त्यांनी तक्रारदारांना परत करावी. ही मागणी मान्य करता येत नाही. व त्याबाबत तक्रारदार विरुध्दपक्ष क्र. 1, 2 व 3 कडून सदर रक्कम रु. 77,000/- परत मिळण्यास पात्र नाहीत असे मंचाचे मत आहे.
विरुध्दपक्ष क्र. 1 ने तक्रारदारांना दि. 15/04/06 रोजी दिलेल्या बुकींगशीट मध्ये नमूद केल्याप्रमाणे कार्यालय क्र. 303, व कार्यालय क्र. 304 व 305 साठी दि. 03/03/06 रोजी दिलेल्या बुकींगशीट मध्ये नमूद केल्याप्रमाणे ह्या कार्यालयांसमोरील जागेत प्रत्येकी एका कारच्या पार्कींगसाठी जागा उपलब्ध करुन देण्याचे मान्य केले आहे. त्यानुसार तक्रारदार व विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांच्यात ठरलेल्या अटींनुसार व विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी त्यावर स्वाक्षरी केल्यामुळे सदर तीन ओपन कार पार्कींगची जागा तक्रारदारांना पुरविणे हे विरुध्दपक्ष क्र. 2 चे कर्तव्य आहे व त्यास विरुध्दपक्ष क्र. 3 हे सदर फर्मचे पार्टनर असल्याने तितकेच जबाबदार आहेत व ते तक्रारदारांशी त्याबाबत बांधील आहेत. तसेच विरुध्दपक्ष क्र. 1, 2 व 3 यांनी तक्रारदारांना द्यावयाची पार्कींगची सदर जागा कार्यालय क्र. 303 च्या मोबदल्याच्या एकूण किंमतीत समाविष्ट असल्याने व जागा आरक्षणानुसार (बुकींगशीट कार्यालय क्र. 303 , कार्यालय क्र. 304 व .कार्यालय क्र. 305, (निशाणी ए ) द्यावयाची असल्याने, व विरुध्दपक्षाने ती तक्रारदारांना अद्याप न दिल्याने तीन कार पार्कींगच्या विलंबाप्रित्यर्थ्य एकत्रितपणे रु. 30,000/- (10,000 X 3 कार पार्कींग ) तक्रारदार, विरुध्दपक्ष क्र. 1, 2 व 3 यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तरित्या पार्कींगच्या जागेबाबत विलंबापोटी दंड म्हणून मिळण्यास पात्र आहेत.
तसेच विरुध्दपक्ष क्र. 3 ने त्यांच्या कैफियतीमध्ये दाखल केलेल्या मुद्दयांच्या पुष्टयर्थ्य काहीच पुरावा किंवा पुराव्याचे प्रतिज्ञापत्र चार वेळा संधी देऊनही दाखल केलेले नसल्याने विरुध्दपक्ष क्र. 3 चा तक्रारदारांची तक्रार फेटाळण्याबाबतचा दावा अमान्य करण्यात येतो.
विवेचन मुद्दा क्रमांक 5 - तक्रारदार विरुध्दपक्ष क्र. 1, 2 व 3 कडून वैयक्तिक व संयुक्तरित्या सदर तक्रारीत तक्रारदारांना झालेल्या मानसिक त्रासासाठी रु. 25,000/- व न्यायिक खर्चापोटी रु. 20,000/- एवढे मिळण्यास पात्र आहेत.
11. सबब अंतिम आदेश पारीत करण्यात येतो,
अंतिम आदेश
1. तक्रार क्र. CC/30/2011 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरुध्दपक्ष क्र. 1, 2 व 3 यांनी वैयक्तिक / संयुक्तरित्या तक्रारदारांना कार्यालय क्र. 303, 304 व 305 च्या जागेच्या कमी दिलेल्या क्षेत्रफळाबद्दल रु. 3,00,000/- (रु. तीन लाख मात्र) आदेश पारीत तारखेपासून दोन महिन्यांत परत करावेत.
3. विरुध्दपक्ष क्र. 1 , 2 व 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या कार्यालय क्र. 303, 304, व 305 च्या बुकींगशीट मध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रत्येकी एक याप्रमाणे 3 ओपन कार पार्कींगची जागा आदेश पारीत तारखेपासून दोन महिन्यांत तक्रारदारांना द्यावी. व सदर जागा देण्यास विरुध्दपक्षाने विलंब केल्यामुळे प्रत्येकी रु. 10,000/- x 3 = 30,000/- एवढी रक्कम दंड म्हणून तक्रारदारांना द्यावी.
4. तक्रारदारांनी 70 चौ.फूट X 1100 रु. = 77,000/- ही रक्कम ओपन पॅसेज साठी अदा केल्याबाबत काहीच पुरावा तक्रारीसोबत न जोडल्याने तक्रारदार हे रु. 77,000/- विरुध्दपक्षाकडून परत मिळण्यास अपात्र आहेत.
5. तक्रारदार विरुध्दपक्ष क्र. 1, 2 व 3 कडून वैयक्तिक / संयुक्तरित्या तक्रारदारांना झालेल्या मानसिक त्रासासाठी रु. 25,000/- (रु. पंचवीस हजार मात्र) व न्यायिक खर्चापोटी रु. 20,000/- (रु. वीस हजार मात्र ) एवढे मिळण्यास पात्र आहेत.
वर नमूद केलेल्या कलम 2 व 3 मधील रकमा विरुध्दपक्ष क्र. 1, 2 व 3 यांनी तक्रारदारांना विहीत मुदतीत न दिल्यास विरुध्दपक्ष क्र. 1, 2 व 3 यांनी सदर रकमेवर आदेश पारीत तारखेपासून ते प्रत्यक्ष रक्कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे. 5% प्रमाणे दंडात्मक व्याज तक्रारदारांना द्यावे.
6. सदर आदेशाच्या सत्यप्रती उभयपक्षांना पाठविण्यात याव्यात.
दिनांक - 22/01/2014
ठिकाण - कोकण भवन, नवी मुंबई.
(स्नेहा एस. म्हात्रे) (सुधाकर एस. पाटील)
अध्यक्षा सदस्य
अति. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, कोकण भवन, ठाणे.