Dated the 24 Nov 2015
न्यायनिर्णय
द्वारा- सौ.माधुरी विश्वरुपे...................मा.सदस्या.
1. तक्रारदारांनी सामनेवाले नं.1 बिल्डर यांचेकडून दुकानाचा गाळा क्रमांक-27 मौजे तुलींज ता.वसई जिल्हा-ठाणे येथील गोकुल टॉवर इमारतीतील पहिल्या मजल्यावरील 20.90 चौरस मिटर क्षेत्रफळाचा ता.24.04.2007 रोजीच्या करारानुसार रक्कम रु.3,37,500/- रक्कम देऊन विकत घेतला.
2. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार करारामध्ये दुकानाची किंमत रु.3,37,500/- नमुद केलेली असुन प्रत्यक्षात सामनेवाले नं.1 यांनी रु.9,12,500/- एवढी रक्कम तक्रारदारांकडून घेतली आहे. परंतु प्रत्यक्षात 87 चौरसफुट क्षेत्रफळ कमी दिले आहे.
3. तक्रारदारांना सामनेवाले यांनी विक्री केलेल्या दुकानाचा गाळा इमारतीच्या मंजुर नकाशातील योजनेनुसार पॅसेजला संलग्न आहे. सदर पॅसेजचा उपयोग दुकानदार व ग्राहक करतात. परंतु सामनेवाले नं.1 यांनी भिंत बांधुन सदर पॅसेज बंद केला. तक्रारदारांनी सामनेवाले नं.1 यांच्या बेकायदेशीर बांधकामाबाबत सामनेवाले नं.2 यांना ता.04.11.2008 रोजीच्या पत्रान्वये कळविले.
4. सामनेवाले नं.1 यांचे म्हणण्यानुसार तक्रारदारांची तक्रार मुदतीत दाखल नाही. तक्रारदारांना गाळयाचा ताबा एप्रिल-2007 मध्ये दिला आहे. तसेच तक्रारदारांनी सदर तक्रार डिसेंबर-2009 मध्ये दाखल केली आहे. प्रस्तुत तक्रार दिवाणी स्वरुपाची आहे. मंचाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही. सामनेवाले नं.1 यांनी तक्रारीमध्ये नमुद केलेला मजकुर पुर्णपणे नाकारला आहे.
5. सामनेवाले नं.2 यांचे विरुध्द ता.05.04.2010 रोजी विना लेखी कैफीयत आदेश पारित झाला आहे.
6. तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद, सामनेवाले नं.1 यांची लेखी कैफीयत, पुरावा शपथपत्र, यांचे वाचन केले. तक्रारदार व सामनेवाले नं.1 यांचे वकीलांचा युक्तीवाद ऐकला.
अ. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडून गोकुल टॉवर इमारतीतील शॉप नंबर-27, 20.90 चौरस मिटर (Built-up Area) क्षेत्रफळाचे रक्कम रु.3,37,500/- एवढी रक्कम देऊन ता.24.04.2007 रोजीच्या खरेदी करारानुसार विकत घेतले आहे.
ब. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार सामनेवाले यांनी सदर शॉप करीता एकूण रक्कम रु.12,50,000/- घेतली आहे. परंतु खरेदी करारनाम्यामध्ये फक्त रु.3,37,500/- एवढीच शॉपची किंमत नमुद आहे. तक्रारदारांनी सामनेवाले यांना अतिरिक्त रक्कम रु.9,12,500/- दिल्याबाबत कोणताही पुरावा मंचात दाखल नाही. तक्रारदारांनी सदरची बाब पुराव्यानिशी सिध्द केली नाही. सबब ग्राहय धरणे उचित नाही असे मंचाचे मत आहे.
क. तक्रारदारांनी आर्किटेक्चर यांनी शॉप क्रमांक-27 ची मोजणी करुन ता.25.11.2009 रोजी दिलेला अहवाल दाखल केला आहे. सदर अहवालानुसार तक्रारदारांचे शॉपचे क्षेत्रफळ (Built-up Area) 138.36 चौरस फुट असल्याबाबत नमुद आहे. परंतु ता.24.04.2007 रोजीच्या खरेदी करारामध्ये 224.96 चौरस फुट (20.90 चौरस फुट) (Built-up Area) असे नमुद आहे. यावरुन तक्रारदारांना सामनेवाले यांनी 86.60 चौरसफुट जागा कमी दिली आहे. सामनेवाले यांची सदरची कृती व्यापाराची अनुचित पध्दती आहे. तक्रारदारांना शॉपचे क्षेत्रफळ खरेदी करारनाम्यामध्ये नमुद केल्यापेक्षा कमी जागा सामनेवाले यांनी दिल्याची बाब आर्क्टिटेक्ट अहवाल ता.25.11.2009 रोजीच्या नुसार ज्ञात (Know ledge) झालेली आहे. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार ता.30.12.2009 रोजी दाखल केली आहे. ग्राहक संरक्षण कायदा कलम-24 अ नुसार विहीत मुदतीत दाखल केली आहे.
ड. तक्रारदार यांनी तक्रारीमध्ये नमुद केल्याप्रमाणे सामनेवाले यांनी कॉमन पॅसेजमध्ये दुकानाच्या जवळ भिंतीचे बेकायदेशीर बांधकाम केल्याची बाब नमुद केली आहे. तक्रारदारांनी दाखल केलेल्या खरेदी करारासोबत दाखल केलेल्या Ground Floor Plan मध्ये सदर भिंतींचा समावेश नाही. सामनेवाले यांनी सदर भिंत कधी बांधली ? तक्रारदार यांनी बांधकामास सुरुवात झाल्यानंतर तात्काळ सदरची बाब दिवाणी स्वरुपाची असल्यामुळे योग्य त्या न्यायालयात दाखल करणे आवश्यक होते. ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीनुसार तक्रार समरी पध्दतीने चालविली जाते. अशा परिस्थितीत सामनेवाले यांनी शॉप जवळ भिंतीचे बांधकाम बेकायदेशीर आहे का ? असल्यास भिंत काढून टाकण्याबाबतची कार्यवाही वगैरे बाबी सिध्द करण्यासाठी सखोल पुराव्याची आवश्यकता आहे. सबब तक्रारदार यांनी शॉप लगतच्या भिंती बाबतची मागणी मान्य करता येत नाही असे मंचाचे मत आहे. तक्रारदार यांना सदर बाबीसाठी योग्य त्या न्यायालयात प्रकरण दाखल करता येते.
उपरोक्त चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येतो.
“ या मंचातील कार्यभार पाहता व इतर प्रशासकीय कारणांमुळे यापुर्वी ही तक्रार निकाली काढता येऊ शकली नाही ”.
- आदेश -
1. तक्रार क्रमांक-807/2009 अंशतः मंजुर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदारांच्या गाळयाचे क्षेत्रफळ खरेदी करारामध्ये नमुद केलेल्या क्षेत्रफळापेक्षा
कमी क्षेत्रफळाचे देऊन व्यापाराच्या अनुचित पध्दतीचा वापर केला आहे असे जाहिर करण्यात येते.
3. सामनेवाले यांना आदेश करण्यात येतो की, तक्रारदारांना खरेदी करारामध्ये नमुद केलेल्या
क्षेत्रफळापेक्षा कमी क्षेत्रफळाचे दुकान दिले आहे या कारणाकरीता नुकसानभरपाईची रक्कम
रु.50,000/- (अक्षरी रुपये पन्नास हजार मात्र) ता.30.12.2015 पर्यंत दयावी. सदरील रक्कम
विहीत मुदतीत अदा न केल्यास ता.31.12.2015 पासुन दरसाल दर शेकडा 9 टक्के प्रमाणे व्याज
लागु राहिल.
4. सामनेवाले यांना आदेश करण्यात येतो की, तक्रारीच्या खर्चाची रक्कम रु.10,000/- (अक्षरी रुपये
दहा हजार मात्र) ता.30.12.2015 पर्यंत दयावी. सदरील रक्कम विहीत मुदतीत अदा न
केल्यास ता.31.12.2015 पासुन दरसाल दर शेकडा 9 टक्के प्रमाणे व्याज लागु राहिल.
5. तक्रारदारांना तक्रारीमध्ये नमुद केलेल्या पॅसेजमधील भिंत काढून टाकण्याच्या मागणीबाबत
तक्रारदार यांना मुदतीच्या आधीन राहून योग्य त्या न्यायालयात दावा दाखल करण्याची मुभा
देण्यात येते.
6. आदेशामध्ये नमुद न केलेल्या तक्रारदारांच्या इतर मागण्या अमान्य करण्यात येतात.
7. आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य व विनाविलंब पोस्टाने पाठविण्यात याव्यात.
8. तक्रारीचे अतिरिक्त संच असल्यास तक्रारदार यांना परत करण्यात यावे.
ता.24.11.2015
जरवा/