(आदेश पारीत व्दारा - श्री नितीन मा. घरडे, मा. सदस्य)
(पारीत दिनांक : 29 जून 2016)
1. तक्रारकर्ता याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालील प्रमाणे.
2. तक्रारकर्त्याने त्यात नमूद केले आहे की, तक्रारकर्ता उपरोक्त पत्यावर राहात असून त्याने स्वतः व स्वतःचे कुंटूंबाच्या राहण्याकरीता विरुध्दपक्ष मे.ताज बिल्डर अॅन्ड डेवहलपर्स नावाने फ्लॅट बनविणे व विकणे यांचा व्यवसाय असल्याने त्या माध्यमातून तक्रारकर्ता याने ताज गॅलक्सी पॅलेस योजनेतील सदनिका क्र.401 विकत घेण्याचा करारनामा दिनांक 4.4.2012 रोजी केला. फ्लॅटची एकूण किंमत रुपये 16,50,000/- असून त्यापैकी करारनाम्याचे वेळी दिनांक 3.3.2012 रोजी नगदी रुपये 2,00,000/- विरुध्दपक्ष यांना दिले व उर्वरीत रक्कम दोन महिण्याचे आत जमा करुन फ्लॅटचा ताबा व विक्रीपञ करुन देण्याचे आश्वासन विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्याला दिले. बांधकाम अंतिम टप्प्यावर असल्याचे पाहून तक्रारकर्त्याने बँक ऑफ इंडिया यांचेकडून दिनांक 20.10.2012 ला रुपये 13,90,000/- चे कर्ज घेतले व विरुध्दपक्ष यांना एकूण रक्कम रुपये 16,50,000/- देवून दिनांक 20.10.2012 रोजी सदनिका क्र.401 चे विक्रीपञ पंजिबध्द करण्यात आले, त्याप्रमाणे तक्रारकर्त्याला सदनिकेचा ताबा देण्यात आला. विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला ताबा दिला, परंतु सदनिकेच्या आतील बांधकाम पूर्ण झालेले नव्हते. विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला आश्वासीत केले की, सदनिकेत राहायला सुरुवात करा, आठ दिववाचे आत अपूर्ण फिनिशिंग वर्क पूर्ण करुन देतो. त्यामुळे तक्रारकर्त्याने दि.11.11.2012 पासून सदनिका क्र.401 मध्ये राहणे सुरु केले. तक्रारकर्त्याने पुढे असे नमूद करतो की, सदनिका क्र.401 चे मुख्य व्दार तुटलेले आहे ते दुरुस्त केले नाही, पिण्याचे पाण्याची सोय बरोबर केली नसून चौथ्या माळ्यावरुन पिण्याचे पाणी घेण्याकरीता तळ मजल्यावर यावे लागते, स्वंयपाक घरात पिण्याचे पाण्याचे नळ लावले नाही, सदनिकेचे बांधकाम निकृष्ट असून बांथरुमचे टाईल्समधून पाणी झिरपते, सदनिकेच्या सर्व भिंतीतून आलोवा येतो, या सर्व कारणामुळे तक्रारकर्त्याच्या कुंटूंबाचे आरोग्य नेहमी बिघडत असते. बिल्डींगमध्ये वीज पुरवठ्याची वायरींग बरोबर नाही. ही सर्व कामे विरुध्दपक्ष यांना वारंवार सांगून सुध्दा आजपर्यंत पूर्ण केलेली नाही. वीज मीटर बसविण्याकरीता रुपये 20,000/- नगदी वसूल केली, परंतु त्याची पावती दिली नाही व अद्यापही वीजचे मीटर बसविले नाही. ताज गॅलक्सी पॅलेस बिल्डींगमध्ये एकूण आठ सदनिका आहे, परंतु विरुध्दपक्षाने पिण्याचे पाण्याकरीता टाकी सुध्दा बांधलेली नाही. लिफ्टची व्यवस्था केली नाही व लिफ्टसाठी असलेला खड्डा अद्यापही उघडा पडलेला आहे, त्यामुळे दुर्घटना हाण्याची दाट शक्यता आहे. बिल्डींगचे टॅरेसवर रेती गोटे व खुपसारा कचरा साचलेला आहे त्यामुळे अतिशय घाणीमुळे तेथील राहणा-या लोकांचे आरोग्य धोक्यात आहे. चौथ्या माळ्यावरील पॅरापीटची भिंत कमी ऊंचीची असल्यामुळे कधीही दुर्घटना होऊ शकते. तसेच अपार्टमेंटमध्ये अग्निशामक उपकरणे बसविली नाही जी कायदेशिर बंधनकारक आहे. तसेच स्वंयपाक घरात व बेडरुममध्ये कपाटे लावण्याचे विरुध्दपक्षाने मंजूर केले होते त्याकरीता रुपये 50,000/- अतिरिक्त तक्रारकर्त्याने दिले असून त्याचा धनादेश आय.डी.बी.आय. बँकेचा दिलेला होता, परंतु ते सुध्दा काम न केल्यामुळे तक्रारकर्त्याने धनादेश थांबविला. विरुध्दपक्ष हा गुंड प्रवृत्तीचा असून तक्रारकर्ता व त्याचे कुंटूंबाला धमकी देतो, शिवीगाळ करतो. सदर बाबत दिनांक 16.11.2012 ला गिट्टीखदान पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदविली आहे. विरुध्दपक्ष याला वारंवार सदनिकेचे राहिलेले अपुरे काम व तेथे सुख सुविधा पूर्ण करुन देण्यास वारंवार कळवून सुध्दा विरुध्दपक्षाने लक्ष दिले नाही, करीता सरते शेवटी तक्रारकर्त्याने मंचामध्ये तक्रार दाखल करुन खालील प्रमाणे प्रार्थना केली आहे.
1) विरुध्दपक्षाने कोणत्याही प्रकारची दिरंगाई न करता बिल्डींगचे अपूर्ण काम पूर्ण करावे. तसेच सदनिका क्र.401 मधील अपूर्ण फिनिशिंग वर्क पूर्ण करावे, लिफ्ट, पिण्याचे पाणी, अग्निशामक उपकरणे, वीज वीजेची वायरींग, नियमित वीज पुरवठा, मीटर, पाणी साठवणूकीसाठी टँक आणि इतर आवश्यक सुविधा लवकरात-लवकर पूर्ण करुन द्यावे.
2) तसेच तक्रारकर्त्याला तक्रार दाखल करण्यास लागलेला एकूण खर्च रुपये 50,000/- वर 12 टक्के व्याजासह विक्रीपञ पंजिबध्द करुन दिल्याचे तारखेपासून पुर्तता होईपर्यंत करण्यात यावी.
3) शारिरीक, मानसिक ञासापोटी रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 20,000/- देण्यात यावा, अशी मागणी केलेली आहे.
3. तक्रारकर्त्याची तक्रारीला अनुसरुन विरुध्दपक्षाला नोटीस बजावण्यात आली. विरुध्दपक्ष यांनी नि.क्र.12 वर तक्रारीचे उत्तर दाखल केले. परंतु, तक्रारकर्त्याने नि.क्र.20 वरील अर्जावर नमूद केले की, विरुध्दपक्षाला तक्रारीवर उत्तर दाखल करण्याकरीता विलंब झाल्यामुळे रुपये 500/- खर्च घ्यावे असे नमूद केले. तक्रारीचे उत्तर रुपये 500/- खर्चासह दाखल करण्याचा आदेश दिनांक 20.8.2014 रोजी झाला. विरुध्दपक्षाने दिनांक 11.9.2014 रोजी तक्रारीचे उत्तर दाखल केले, परंतु रुपये 500/- खर्च डिपॉझीट केले नाही. त्यामुळे सदरच्या अर्जावर मंचाने दिनांक 18.1.2016 रोजी आदेश पारीत करुन विरुध्दपक्षाचे तक्रारीत सादर केलेले लेखीउत्तर सदरच्या प्रकरणात गृहीत धरावयाचे नाही असा आदेश पारीत केला.
4. तक्रारकर्त्याने सदरच्या तक्रारी बरोबर 1 ते 7 दस्ताऐवज दाखल केले, त्यामुळे प्रामुख्याने विक्रीपञ, पोलीस तक्रार, एफ.आय.आर., डिड ऑफ डिक्लेरेशन, फ्लॅट व बिल्डींग ताज गॅलक्सी पॅलेसचे छायाचिञ लावलेले आहे. तसेच विरुध्दपक्षांनी आपल्या उत्तरा बरोबर 1 ते 4 दस्ताऐवज दाखल करुन त्या प्रामुख्याने एफ.आय.आर., एम.एस.ई.डी.सी.एल. चा आदेश व काही छायाचिञ दाखल केले आहे.
5. तसेच बरीच संधी देवूनही लेखी युक्तीवाद सुध्दा विरुध्दपक्षाने दाखल केला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याचे मंचासमक्ष तोंडी युक्तीवाद झाले व विरुध्दपक्षाला संधी देवूनही त्याचा तोंडी युक्तीवाद मंचासमक्ष झालेला नाही व प्रकरणात विलंब होऊ नये म्हणून मंचाने सदर तक्रार आदेशाला लावली.
6. तक्रारकर्त्याने सदरच्या प्रकरणात लेखी युक्तीवाद दाखल केला, तसेच मंचासमक्ष त्याचा युक्तीवाद ऐकण्यात आला. त्यावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
1) तक्रारकर्ता विरुध्दपक्षाचा ग्राहक होतो काय ? : होय.
2) विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याप्रती सेवेत कमतरता केली : होय.
आहे काय ?
- निष्कर्ष –
7. तक्रारकर्त्याची सदरची तक्रार ही विरुध्दपक्ष यांचेकडून सेवेत ञुटी बाबतची आहे. तक्रारकर्त्याने करारनामा प्रमाणे संपूर्ण रक्कम देवून सुध्दा फक्त विरुध्दपक्षाने त्यांना सदनिकेचा ताबा दिला, परंतु सदनिकेत ज्या आवश्यक सेवा पुरवायच्या होत्या त्या पुरविल्या नाही. उदा. पिण्याचे पाण्याची व्यवस्था, ईलेक्ट्रीकची व्यवस्था, सदनिकेत लिफ्टची व्यवस्था, तसेच सदनिकेतील आतील फिनिशिंग वर्क पूर्ण केलेली नाही, तसेच सदनिका बांधतांना निकृष्ठ दर्जाचे मटेरियल वापरल्यामुळे भिंतीतून पाणी झिरपणे, किंवा सिपेज मारणे अशा ञासाला तक्रारकर्ता तोंड देत आहे. तक्रारकर्ता यांनी दाखल केलेल्या दस्ताऐवजांचे अवलोकन केले असता व दाखल छायाचिञांचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, सदनिकेमधील फिनिशींग व इतर ईलेक्ट्रीक फिटींग अजूनपर्यंत झालेली नाही, लिफ्टची फिटींग झालेली नाही, ती विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास करुन देणे आवश्यक आहे. तसेच विरुध्दपक्ष यांनी दाखल केलेल्या डिड ऑफ डिक्लेरेशन चे अवलोकन केले असता, तक्रारकर्त्याने ज्या तक्रारीत केलेल्या मागण्या आहेत त्या मागण्याचा उल्लेख डिड ऑफ डिक्लेरेशन मध्ये नोंदविला आहे व विरुध्दपक्ष त्या सर्व सुख सोयी तक्रारकर्त्याला पुरविणे गरजेचे आहे. सबब, खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) सदनिका क्र.401 मधील राहिलेले अपूर्ण फिनिशिंग वर्क, लिफ्टची सेवा, पिण्याचे पाणी पुरविण्याची सेवा, अग्निशामक उपकरणे, वीजेची वायरींग तसेच नियमित वीज पुरवठा, मीटर बसवूण देणे आणि पाणी साठवणूक करण्यासाठी टँक बसवूण देणे इत्यादी सर्व कामे विरुध्दपक्षाने पूर्ण करावे.
(3) तसेच विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक ञासापोटी रुपये 10,000/- व तक्रार खर्चापोटी रुपये 3000/- द्यावे.
(4) विरुध्दपक्ष यांनी आदेशाचे तारखेपासून 30 दिवसाचे आत आदेशाची पुर्तता करावी, अन्यथा द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने 30 दिवसानंतर रुपये 13,000/- वर रक्कम तक्रारकर्त्याचे हातात पडेपर्यंत द्यावे.
(5) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 29/06/2016