(Passed on : 20/11/2013)
(मंचाचा निर्णय : श्री. मनोहर चिलबुले - अध्यक्ष यांचे आदेशांन्वये)
-// अं त रि म आ दे श //-
(पारित दिनांकः 20/11/2013)
1. तक्रारकर्ता करिम खान अब्बास खान पठाण याने गैरअर्जदार टाटा सर्व्हीसेस, नागपूर यांचेकडून टाटा डोकोमो, ‘होम टू कोबाईल 125’ या योजने अंतर्गत दूरध्वनी क्र.7126613938 आणि ‘सी.एम.ओ.ग्रेट व्हॅलू 199’ योजने अंतर्गत एक मोबाईल क्र.9225210397 घेतला आहे. वरील दोन्ही फोन खते क्र. 500251226 व्दारे संचलीत केले जात असून दोन्ही फोन वापराचे बिल एकत्र येते. फेब्रुवारी-2013 च्या शेवटास तक्रारकर्त्याचा दूरध्वनी क्र. 7126613938 अचानक बंद पडला त्याबाबत तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांकडे 121 क्रमांकावर तक्रार नोंदविली, परंतु दुरुस्तीसाठी कार्यवाही झाली नाही. म्हणून दि.05.03.2013 रोजी पुन्हा तक्रार नोंदवल्यावर दि.11.03.2013 रोजी गैरअर्जदारांकडून एक व्यक्ति आला व दूरध्वनी संचाची तपासणी केल्यावर काही वेळात फोन सुरु होईल असे सांगून निघून गेला. परंतु त्यानंतर त्या व्यक्तिकडे मोबाईल क्र. 9225243902 वर वारंवार संपर्क साधूनही फोन दूरुस्त झाला नाही. त्यामुळे दि.19.03.2013 रोजी 121 क्रमांकावर तक्रार नोंदविली असता पूर्ण कार्यालयातील नजमा नावाच्या व्यक्तिने फोन 1-2 दिवसांत सुरु होईल असे सांगितले, परंतु फोन दूरुस्त झाला नाही. त्यानंतर दि.28.03.2013, 03.04.2013, 13.05.2013 रोजी तक्रार नोंदवुनही फोन दुरुस्त झाला नाही, मात्र गैरअर्जदारांनी बंद फोनचे बिल देणे सुरुच ठेवले.
2. दिनांक 11.06.2013 रोजी गैरअर्जदाराच्या नागपूर ऑफिसमधून तक्रारकर्त्यास फोन करुन फोन बिल भरण्याचा तगादा लावला. तक्रारकर्त्याने फोन बंद आहे, तो दुरुस्त करा नंतर बिल भरतो, असे सांगितले. परंतु त्याच्या विनंतीस न जुमानता बंद फोनचे बिल भरले नाही म्हणून तक्रारकर्त्याचा मोबाईल बंद करण्यांत आला. तक्रारकर्ता स्कुटर व मोटार सायकल दुरुस्तीच्या दुकानात फोनचा वापर करीत असल्याने व फोन दुरुस्त न करता मोबाईल सेवाही बंद केल्याने तक्रारकर्त्याचा ग्राहकांशी संपर्क होऊ शकत नाही व त्यास धंद्यात दररोज नुकसान सोसावे लागत आहे. गैरअर्जदाराची सदरची कृति ग्राहकाच्या सेवेतील त्रुटी असल्याने व दि.25.07.2013 रोजी नोटीस पाठवुनही गैरअर्जदाराने दूरध्वनी व मोबाईल सेवा पूर्ववत सुरु न केल्याने तक्रारकर्त्याने नुकसान भरपाई मिळावी यासाठी नियमीत ग्राहक तक्रार दाखल केली असुन सदर अर्जाचा निर्णय होईपर्यंत गैरअर्जदाराने खंडीत केलेली दूरध्वनी व मोबाईल सेवा पूर्ववत सुरू करावी यासाठी सदरचा अंतरिम अर्ज दाखल केला आहे.
3. गैरअर्जदाराने सदर अर्जास दि.13.09.2013 रोजी उत्तर दाखल केले असुन करारामध्ये लवादाची तरतुद असल्याने तक्रारकर्त्याची तक्रार ग्राहक तक्रार निवारण मंचासमोर चालू शकत नाही, असा प्राथमिक आक्षेप नोंदविला आहे.
याशिवाय त्यांचे म्हणणे असे आहे की, जूलै-2013 मध्ये प्रथमतःच तक्रारकर्त्याने त्याचा लँडलाईन दूरध्वनी बंद असल्याबाबत तक्रार केली. त्यानंतर कंपनीतर्फे अधिकृत व्यक्ति अजित अधिकारी, यांनी दूरध्वनी संचाची तपासणी केली आणि फेब्रुवारी ते ऑगष्ट-2013 या कालावधीत बंद असलेल्या लँडलाईनचे बिल रु.410/- ची वजावट देण्याचे कंपनीतर्फे आश्वासन दण्यांत आले. परंतु तरीही तक्रारकर्त्याने रु.1,360/- च्या बिलाचा भरणा केला नाही म्हणून त्याची मोबाईल सेवा बंद करण्यांत आली. तक्रारकर्त्याने बिलाचा भरणा केल्यास गैरअर्जदार लँडलाईन व मोबाईल सेवा सुरु करण्यांस तयार असल्याचे दि.19.08.2013 रोजी तक्रारकर्त्याच्या वकीलांना पाठविलेल्या नोटीसच्या उत्तरात कळविले आहे. परंतु तरीही तक्रारकर्त्याने दिलेली सुट रु.410/- वजाकरुन बिलाची उर्वरीत रक्कम न भरता खोटी तक्रार मंचाकडे दाखल केली आहे.
4. वरील प्रमाणे उभय पक्षांचे कथनाचा विचार करता तक्रारकर्त्याने दस्तावेजाच्याखाली सोबत दस्त क्र.3 प्रमाणे मे-2013 चे रु.1,360/- जे बिल जोडले आहे, त्या बिलातून बंद असलेल्या लँडलाईनचे बिलाची रक्कम रु.410/- वजा करता बाकी राहीलेली बिलाची रक्कम रु.950/- तकारकर्त्याने भरणा केल्यास गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याची लँडलाईन व मोबाईल सेवा पूर्ववत चालू करुन द्यावी व यापुढे प्रत्यक्ष वापराप्रमाणे तक्रारकर्त्याने लँडलाईन व मोबाईलचे बिलाचा नियमीत भरणा केल्यास मुळ ग्राहक तक्रार अर्जाचा निर्णय होईपर्यंत तक्रारकर्त्याची लँडलाईन व मोबाईल दूरध्वनी सेवा खंडीत करु नये, असा अंतरिम आदेश देणे न्याय संगत होईल असे मंचाचे मत आहे. म्हणून मंच खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
- // आदेश //-
1. तक्रारकर्त्याचा अंतरिम अर्ज अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. तक्रारकर्त्याने मे-2013 च्या रु.1,360/- बिलाच्या रकमेतून गैरअर्जदाराने देऊ केलेली वजावटीची (सूट) रक्कम रु.410/- वजा करुन बाकी राहीलेली रक्कम रू.910/- गैरअर्जदाराकडे भरणा केल्यावर 7 दिवसांचे आंत गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याचा लँडलाईन व मोबाईल दूरध्वनी सेवा पूर्ववत सुरु करावी.
3. तक्रारकर्त्याने भविष्यातील लँडलाईन व मोबाईल वापराचे बिलाचा नियमीत भरणा केल्यास विरुध्द पक्षाने मुळ ग्राहक तक्रार अर्जाचा निर्णय होईपर्यंत तक्रारकर्त्याची दूरध्वनी सेवा खंडीत/ बंद करु नये.