अॅड सागर सुनिल बेदरकर तक्रारदारांतर्फे
जाबदेणार एकतर्फा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
द्वारा- मा. श्री. व्ही. पी. उत्पात, अध्यक्ष
:- निकालपत्र :-
दिनांक 19/जुलै/2013
प्रस्तुतची तक्रार तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्याविरुध्द त्यांनी सेवेमध्ये त्रुटी निर्माण केल्याबद्यल ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अंतर्गत दाखल केली आहे. यातील कथने थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदार हे महर्षी नगर येथे रहाणार असून जाबदेणार यांच्या घेळ कॅपिटल या नावाची संस्था आहे. सदर संस्थेमध्ये जाबदेणार शेअर्स खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी तक्रारदार यांना आश्वासन दिले की त्यांनी जर रक्कम गुंतविली तर त्यांचा बराच मोठा फायदा होईल. जाबदेणार यांच्या आश्वासना नुसार तक्रारदारांनी दिनांक 09/06/2010 रोजी तक्रारदार यांनी रोख रक्कम रुपये 1,00,000/- जाबदेणार यांच्याकडे 14 महिन्यांकरिता म्हणजेच 8/8/2011 पर्यन्त गुंतविले. तसा करारनामा जाबदेणार यांनी 100/- रुपयांच्या स्टॅम्प वर लिहून दिला व गुंतवणूक परतावा म्हणून रक्कम रुपये 2,30,000/- देण्याचे मान्य व कबूल केले. जाबदेणार यांनी जनता सहकारी बँकेचा चेक क्र 5927 रक्कम रुपये 2,30,000/- चा चेकही तक्रारदारांना दिला. सदरचा करारनामा नोटरी समोर नोंदविला आहे. तक्रारदार यांनी सदरचा चेक 8 ऑगस्ट 2011 मध्ये व 3 फेब्रुवारी 2012 रोजी जमा केला असता खात्यामध्ये पुरेशी रक्कम नसल्यामुळे तो नाकारला गेला. अशा प्रकारे जाबदेणार यांनी तक्रारदार यांची फसवणूक केली व कबूल केलेल्या सेवेमध्ये त्रुटी निर्माण केली आहे. म्हणून तक्रारदार यांनी तक्रारदार यांच्याकडून करारनाम्यामध्ये नमूद केलेली रक्कम रुपये 2,30,000/-, त्यावरील व्याज रुपये 46,000/-, मानसिक त्रासाबद्यल नुकसान भरपाई व इतर खर्च एकूण रक्कम रुपये 75,000/- मागितली आहे.
2. जाबदेणार यांना सदर प्रकरणात नोटीस बजावली असता त्यांनी ती नाकारली. त्यामुळे प्रस्तुतचे प्रकरण एकतर्फा चौकशी साठी नेमण्यात आले. तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीच्या कथनांच्या पुष्टयर्थ स्वत:चे शपथपत्र, जाबदेणार यांनी लिहून दिलेला करारनामा, जनता सहकारी बँकेच्या चेकची प्रत इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. या कागदपत्रातील कथनांवरुन असे स्पष्ट होते की जाबदेणार यांनी तक्रारदार यांना रक्कम रुपये 2,30,000/- देण्याचे मान्य व कबूल केले होते. जाबदेणार हे गुंतवणूकीचा व्यवसाय करतात हे सिध्द करण्यासाठी तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्या संस्थेच्या नोंदणीच्या दाखल्याची प्रत, माहितीपत्रक इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रातील मजकूर जाबदेणार यांनी मंचासमोर उपस्थित राहून नाकारलेला नाही. त्यामुळे तो मान्य आहे असा निष्कर्ष काढण्यात येतो. तक्रारदार यांनी मानसिक त्रासासाठी व इतर कारणांसाठी भलीमोठी रक्कम मागितली आहे. तक्रारदार हे जाबदेणार यांनी कबूल केल्याप्रमाणे रक्कम रुपये 2,30,000/-, मानसिक त्रासासाठी नुकसान भरपाई रुपये 5000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- मिळण्यास पात्र आहेत.
वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
1. तक्रार अंशत: मान्य करण्यात येते.
2. जाबदेणार यांनी तक्रारदारांना कबूल केल्याप्रमाणे रक्कम परत न
करुन सेवेमध्ये त्रुटी निर्माण केली आहे असे जाहिर करण्यात येत आहे.
3. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना रक्कम रुपये 2,30,000/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून सहा आठवडयांच्या आत परत करावी.
4. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना नुकसान भरपाई पोटी रक्कम रुपये 5000/- व तक्रारीचा खर्च रक्कम रुपये 1000/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून सहा आठवडयांच्या आत परत करावी.
5. तक्रारदारांनी मा. सदस्यांसाठी दाखल केलेले संच आदेशाच्या दिनांकापासून एका महिन्याच्या आत घेऊन जावेत. अन्यथा संच नष्ट करण्यात येतील.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.
स्थळ- पुणे
दिनांक –19 जुलै 2013