अॅड माणिक प्र.डुसूंगे तक्रारदारांतर्फे
अॅड एस.एच.वाघ जाबदेणारांतर्फे
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
द्वारा- मा. श्रीमती. गीता घाटगे, सदस्य
:- निकालपत्र :-
दिनांक 6मे 2014
तक्रारदारांच्या घरातील जाबदेणार विद्यूत वितरण कंपनीने खंडीत केलेला वीज पूरवठा पुन: चालू करुन मिळणेसाठी तक्रारदारांनी तक्रारअर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्यात हकीकत खालील प्रमाणे-
1. तक्रारदार हे ओटा क्र 45, पूरग्रस्त वसाहत, पर्वती, पुणे 9 येथे गेल्या 50 वर्षापासून वास्तव्यास आहेत. तक्रारदारांच्या वसाहतीत जाबदेणार विद्यूत मंडळाने विजेची जोडणी करुन दिलेली आहे व विज बीले तयार करणे, वसूल करणे तसेच विज पुरवठा खंडित अथवा विस्कळीत झाल्यास तो सुरळित करुन देणे याबाबी जाबदेणार विज मंडळाच्या अखत्यारीत येतात. गेल्या 15 वर्षापासून तक्रारदार जाबदेणारांमार्फत जोडून देण्यात आलेल्या विजेचा वापर करीत असून त्यांचा ग्राहक क्र 170018281875 असा आहे. तक्रारदारांच्या कथनानुसार त्यांनी कोणत्याही बिलाची रक्कम थकविलेली नाही. असे असतांना देखील कोणतीही पूर्वसुचना न देता, जाबदेणार विज कंपनीने तक्रारदारांचा विद्यूत पुरवठा अचानक खंडित केला. त्यामुळे सुमारे दोन महिन्यांपासून तक्रारदार व त्यांचे कुटूंबीय अंधारात रहात आहेत. त्याचा परिणाम तक्रारदारांच्या मुलांच्या शिक्षणावर व पत्नीच्या आरोग्यावर झालेला आहे व त्यामुळे तक्रारदारांना नाहक खर्चास सामोरे जावे लागत आहे. तसेच शारिरीक व मानसिक त्रासासही सामोरे जावे लागत आहे. म्हणून तक्रारदारांनी त्यांचा विज पुरवठा सुरळित होऊन मिळावा म्हणून जाबदेणार कंपनीकडे अर्जही केला होता. तथापि अद्यापी त्याची दखल घेण्यात आलेली नाही आणि म्हणून तक्रारदारांचा खंडित करण्यात आलेला विज पुरवठा सुरळित होऊन मिळावा याकरिता व विजपुरवठा पुर्ववत होऊन मिळेपर्यन्त प्रत्येक दिवसाला कमीत कमी रक्कम रुपये 30/- इतकी नुकसान भरपाई मिळावी याकरिता तक्रारदारांनी अर्ज दाखल केला आहे. तसेच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी व औषधोपचारापोटी म्हणून एकूण रुपये 25000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 2000/- ची मागणी केलेली आहे.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ तक्रारदारांनी प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे दाखल केली आहेत.
2. मंचाच्या नोटीसीची बजावणी जाबदेणार यांचेवर करण्यात आल्यावर जाबदेणार यांनी विधिज्ञांमार्फत हजर होऊन त्यांचे म्हणणे प्रस्तूत प्रकरणती दाखल केले. त्यांचे म्हणण्यात त्यांनी तक्रारदारांना जाबदेणार यांनी घरगुती विज कनेक्शन दिल्याचे व त्याचा तक्रारदार वापर करीत असल्याचे तसचे तक्रारदारांचा विज ग्राहक क्रमांक इ. बाबी मान्य केल्या आहेत. मात्र त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदारांनी दिनांक 11/1/2013 रोजी दिलेला अर्ज हा मार्केट यार्ड पूणे या उपविभागाला सादर करणे व त्यांना प्रस्तूत प्रकरणी पक्षकार म्हणून सामिल करणे आवश्यक होते. तथापि तक्रारदारांनी तसे केले नाही असे नमूद केले आहे. जाबदेणार त्यांच्या म्हणण्यात पुढे असेही नमूद करतात की, शशीधर किसन तापकिर नावाच्या ति-हाईत इसमाने दिनांक 29/10/2012 रोजी त्यांचेकडे अर्ज सादर केला. या अर्जात ति-हाईत इसमाने असे नमूद केले होते की, तक्रार अर्जात ज्या मिळकतीचा उल्लेख करण्यात आलेला आहे, ती मिळकत ति-हाईत इसमाने दिनांक 12/7/2012 रोजी कै. रुक्मिणी रंगनाथ देशपांडे यांचे वारसांकडून नोंदणीकृत खरेदीपत्राने घेतलेली आहे. तेव्हापासून तेच सदर मिळकतीचे वारस असून कब्जेदारही आहेत. सदर मिळकतीशी तक्रारदारांचा काहीही संबंध नाही. नवीन लाईट मिटर घेण्याच्या उद्येशाने तक्रारदारांनी भाडेकरुन असल्याबाबतचे खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे. यासर्व कथनांची शहानिशा करुनच जाबदेणार कंपनीने तक्रारदारांचा विज पुरवठा खंडित केलेला आहे.
तक्रारदार व ति-हाईत इसम यांचेत मालकी हक्काबाबत वाद चालू आहे. तथापि तक्रारदारांनी जाबदेणार विज कंपनीस नाहक प्रस्तूत प्रकरणी जाबदेणार म्हणून सामिल केलेले आहे. यासर्व कारणांचा विचार होऊन तक्रारदारांचा तक्रारअर्ज खर्चासह नामंजूर करणेत यावा, अशी विनंती जाबदेणार यांनी त्यांच्या म्हणण्यात केलेली आहे. म्हणण्याच्या पुष्टयर्थ जाबदेणार यांनी प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
3. तक्रारअर्ज, म्हणणे, दाखल कागदपत्रे, प्रतिज्ञापत्र व उभय पक्षकारांचा तोंडी युक्तीवाद यांचा साकल्याने विचार करुन खालील मुद्ये मंचापुढे विचारार्थ उपस्थित होतात. सदरहू मुद्ये, त्यावरील उत्तरे व विवेचन खालील प्रमाणे-
अ.क्र | मुद्ये | उत्तरे |
1 | प्रस्तूत प्रकरणी नॉन जॉईंडर ऑफ नेसेसरी पार्टी या तत्वाचा बाध येतो का? | नाही |
2 | जाबदेणार यांनी तक्रारदारांना सदोष सेवा पुरविली ही बाब शाबीत होते काय ? | होते |
3 | कोणता आदेश ? | अंतिम आदेशा प्रमाणे |
विवेचन मुद्या क्र-1
4. जाबदेणार विमा कंपनीने त्यांचे म्हणण्यात मुद्या उपस्थित केलेला आहे की, तक्रारदारांनी विज कंपनीच्या मार्केट यार्ड, पुणे या मंडळाला प्रस्तूत प्रकरणी आवश्यक पक्षकार करणे गरजेचे होते. परंतू तसे न केल्याने तक्रारअर्ज फेटाळण्यात यावा. जाबदेणार यांनी उपस्थित केलेल्या या मुद्याच्या अनुषंगे एक बाब मंचास स्पष्ट करावीशी वाटते ती म्हणजे, तक्रारदारांचा विज पुरवठा सामिल जाबदेणार विज कंपनीने खंडित केलेला होता. तसेच तक्रारदारांनी दाखल केलेल्या विज बिलांचे अवलोकन करता त्यावर सामिल जाबदेणार कंपनीचा म्हणजेच पद्मावती, पुणे यांचा शिक्का दिसून येतो. अशा परिस्थितीत मार्केट यार्ड, पुणे विभागाला पक्षकार म्हणून सामिल केले नाही, म्हणून तक्रारअर्ज फेटाळण्यात यावा, हे जाबदेणार यांचे म्हणणे अत्यंत पोकळ व तथ्यहीन ठरते असा मंचाचा निष्कर्ष निघतो व त्यानुसार मुद्या क्र 1 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
विवेचन मुद्या क्र 2 व 3-
5. प्रस्तूत प्रकरणी तक्रारीचे व त्याअनुषंगे दाखल जाबदेणार यांच्या म्हणण्याचे अवलोकन करता, तक्रारदार ज्या ठिकाणी रहातात त्या जागेवर जाबदेणार विज कंपनीने तक्रारदारांना घरगूती स्वरुपाचा विज पुरवठा केला होता व त्याचा वापर तक्रारदार करत होते, याबाबत उभय पक्षात वाद दिसून येत नाही. तसेच तक्रारदार विज बिले वेळेत भरत नव्हते अथवा त्यांची बिले थकीत होती, अशी जाबदेणार यांची तक्रार नाही. असे असतांनाही जाबदेणार यांनी कोणत्याही कारणाशिवाय व कोणतीही पूर्वसुचना न देता तक्रारदारांचा विज पुरवठा अचानक खंडित केला अशी तक्रारदारांची जाबदेणार यांच्याविरुध्द तक्रार आहे. या तक्रारीच्या अनुषंगे जाबदेणार यांचे म्हणणे व त्यांचे तर्फे दाखल करण्यात आलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करता मंचास असे दिसून येते की, श्री. शशीधर किसनराव तापकीर या ति-हाईत इसमाने, “तक्रारदारांनी राहत्या घरी विज पुरवठा मिळणेसाठी कै. रुक्मिणी रंगनाथ देशपांडे यांचे नोटराईज्ड खोटे संमतीपत्र सादर करुन विजपुरवठा मिळविलेला आहे. वास्तविक तक्रारदार रहात असलेली मिळकत ही श्री. शशीधर तापकिर यांनी कै.रुक्मिणी यांचे वारसदार श्री. मुकूंद रंगनाथ देशपांडे व श्री. दत्तात्रय रंगनाथ देशपांडे यांचेकडून नोंदणीकृत खरेदीपत्राने दिनांक 12/07/2012 रोजी खरेदी केलेली आहे. तेव्हापासून या मिळकतीत मालकी हक्क व कब्जा श्री. शशीधर तापकिर यांचाच आहे. तक्रारदारांचा या मिळकतीशी काहीही संबंध नाही,” अशा आशयाचा अर्ज जाबदेणार विज कंपनीला सादर करुन तक्रारदारांना विज मिटर देऊ नये अशी विनंती केली होती. तथापि तक्रारदारांनी विज कंपनीकडे सादर केलेल्या कै. रुक्मिणी देशपांडे यांच्या संमतीपत्राचा विचार करुन जाबदेणार विज कंपनीने तक्रारदारांना प्रथम विज पुरवठा केला. मात्र जाबदेणार यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी शशीधर तापकिर यांच्या दिनांक 29/10/2012 रोजीच्या तक्रार अर्जाची व त्यासोबत सादर करण्यात आलेल्या सूची II, कै.रुक्मिणी देशपांडे यांचे संमतीपत्र व अन्य कागदपत्रांची शहानिशा करुन त्यानंतरच तक्रारदारांचा विजपुरवठा खंडित केलेला आहे, असे त्यांच्या म्हणण्यात नमूद केलेले आहे. परंतू इथे एका महित्वाच्या बाबीचा विचार करणे मंचास अत्यंत महत्वाचे वाटते ती म्हणजे, जेव्हा जाबदेणार विज कंपनी तक्रारदार व शशीधर तापकिर यांचेतील मिळकती बाबतच्या वादाचा उल्लेख त्यांचे म्हणण्यात करतात व ति-हाईत इसमाने दाखल केलेल्या तक्रारअर्जाची व त्यासोबतच्या कागदपत्रांची दखल घेऊन तक्रारदारांचा विजपुरवठा खंडित करतात, अशावेळी त्यांनी शहानिशा केली म्हणजे नेमके काय केले याबाबतचा कागदोपत्री पुरावा मंचापुढे दाखल करणे अपेक्ष्रित आहे. जेव्हा जमिनीचा वाद अस्तित्वात असतो व त्या वादाच्या अनुषंगाने एखादा महत्वाचा निर्णय घेतला जातो तेव्हा त्या निर्णयास योग्य त्या न्यायालयाच्या आदेशाचा आधार असणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा तो निर्णय सर्वस्वी बेकायदेशिर ठरतो असे मंचाचे स्पष्ट मत आहे. तक्रारदारांचा विज पुरवठा खंडित करण्यापूर्वी जाबदेणार विमा कंपनीने या वादाबाबत योग्य त्या न्यायालयाचा आदेश घेऊनच त्यानुसार कारवाई करणे गरजेचे होते. परंतू प्रस्तूत प्रकरणी तसे झाल्याचे दिसून येत नाही. जाबदेणार विज मंडळाने सर्व निर्णय परस्परच घेऊन त्यानुसार बेकायदेशिर कारवाई केल्याचे प्रस्तूत प्रकरणी दिसून येते. यावरुनच जाबदेणार विज मंडळाने तक्रारदारांना सदोष सेवा दिल्याचे शाबीत होते आणि म्हणून दिनांक 31/10/2010 रोजीच्या मंचाच्या अंतरिम आदेशानुसार तक्रारदारांचा खंडित करण्यात आलेला विज पुरवठा सुरु करुन देण्यात आलेला आहे, तो तसाच सुरु ठेवण्यात यावा असे आदेश पारीत करणे योग्य व न्याय ठरेल असा मंचाचा निष्कर्ष निघतो. त्याचप्रमाणे जाबदेणार विज कंपनीने बेकायदेशिरपणे तक्रारदार यांचा विज पुरवठा खंडित केल्याने त्यांना ज्या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागले, त्याच्या नुकसान भरपाई पोटी म्हणून रक्कम रुपये 10,000/- तक्रारदारांना मंजूर करण्यात येत आहे. तर तक्रारीच्या खर्चापोटी म्हणून रक्कम रुपये 3000/- मंजूर करण्यात येत आहेत. सदरहू रकमा आदेश प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करणेच्या आहेत. अन्यथा रक्कम रुपये 10,000/- वर तक्रार दाखल दिनांकापासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यन्त द.सा.द.शे 9 टक्के दराने व्याज अदा करावे लागेल.
सबब मंचाचा आदेश की,
:- आदेश :-
1. तक्रार अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
2. जाबदेणार विज कंपनीने मंचाच्या दिनांक 31/10/2013
रोजीच्या आदेशानुसार तक्रारदारांना खंडित केलेला विज पुरवठा पूर्ववत करुन दिलेला आहे तो चालू ठेवावा.
3. जाबदेणार विज कंपनीने तक्रारदारांना शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रुपये 10,000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी. अन्यथा सदरहू रकमेवर दिनांक 04/02/2013 पासून संपूर्ण रकमेची परतफेड होईपर्यन्त द.सा.द.शे 9 टक्के व्याज अदा करावे.
4. जाबदेणार विज कंपनीने तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चापोटी म्हणून रक्कम रुपये 3000/- अदा करावेत.
5. उभय पक्षकारांनी मा. सदस्यांसाठी दिलेले संच आदेशाच्या दिनांकापासून एका महिन्यात घेऊन जावेत. अन्यथा संच नष्ट करण्यात येतील.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शूल्क पाठविण्यात यावी.
ठिकाण- पुणे
दिनांक: 06/05/2014