तक्रारदार स्वत:
जाबदेणार एकतर्फा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
द्वारा- श्रीमती. अंजली देशमुख, मा. अध्यक्ष
निकालपत्र
दिनांक 22 जानेवारी 2013
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदारांनी जाबदेणारांकडून सॅमसंग कंपनीचा रेफ्रिजरेटर व टी.व्ही घेण्याकरिता सन 2006 साली कर्ज घेतले होते. रेफ्रिजरेटर चा दरमहा हप्ता रुपये 1017/- व टी.व्ही चा दरमहा हप्ता रुपये 1083/- होता. त्यावेळीच तक्रारदारांनी जाबदेणार यांना दोन्ही हप्त्यांची मिळून होणारी रक्कम रुपये 2100/- चे आठ पोस्ट डेटेड चेक्स दिले होते. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार त्यांनी आठही पोस्ट डेटेड चेक्स पासही झालेले होते. असे असतांनाही बजाज फायनान्स यांनी वेळोवेळी फोन करुन रुपये 1017/- एवढी रक्कम शिल्लक असल्याचे सांगून मानसिक त्रास दिला व सिबिलच्या यादीत तक्रारदारांचे नाव सिबिल थकबाकीदार म्हणून दाखविले. तक्रारदारांना काही कारणास्तव रुपये 4,00,000/- कर्जाची आवश्यकता होती म्हणून एच.डी.एफ.सी बँकेमध्ये गेले असता तक्रारदारांचे नाव सिबिलच्या यादीमध्ये असल्यामुळे तक्रारदारांना कर्ज देता येणार नाही असे सांगितले. थकबाकीदार दाखवितांना जाबदेणार यांनी तक्रारदारांचा रेफ्रिजरेटर घरातून उचलून नेला व तो विकून पैसे वसूल केले असा सिबिल मध्ये शेरा मारला आहे. सिबिलमध्ये नाव आल्यामुळे तक्रारदारांना कोणतीही बॅक आता कर्ज देण्यास तयार नाही. त्यामुळे तक्रारदारांना जो शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून सिबिलच्या यादीमधून नाव काढून घ्यावे, मानसिक त्रासापोटी रुपये 4,00,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- मिळावा अशी मागणी करतात. तक्रारदारांनी कागदपत्रे व शपथपत्र दाखल केले.
2. जाबदेणार यांना मंचाची नोटीस लागूनही गैरहजर. म्हणून जाबदेणार यांच्याविरुध्द मंचाने एकतर्फा आदेश दिनांक 6/12/2012 रोजी पारीत केला.
3. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी जाबदेणार यांच्याकडून रेफ्रिजरेटर व टी.व्ही खरेदीसाठी सन 2006 मध्ये कर्ज घेतले होते. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार त्यांनी वेळोवेळी कर्जाची परतफेड करुनही काही रक्कम शिल्लक असल्याचे सांगून जाबदेणार यांनी तक्रारदारांच्या घरातून रेफ्रिजरेटर उचलून नेला व त्याची विक्री करुन थकबाकी वसूल केली. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची पाहणी केली असता तक्रारदारांनी जाबदेणार यांचे दिनांक 16/5/2012 रोजीचे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकीट दाखल केले आहे. त्यामध्ये तक्रारदारांनी घेतलेल्या कर्जाची थकबाकी पूर्ण झालेली असून दोघातील करारनामा संपूष्टात आल्याचे नमूद केले आहे. असे असतांनाही जाबदेणार यांनी तक्रारदारांचे नाव सिबिल च्या यादीमधून काढले नाही किंवा तसा प्रयत्नही केला नाही. त्यामुळे साहजिकच तक्रारदारांना कुठल्याही बँकेकडून कर्ज मिळू शकत नाही. ही जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी व अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब आहे असे मंचाचे मत आहे. यामुळे तक्रारदारांना साहजिकच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला असेल. म्हणून जाबदेणार यांनी सिबिलच्या यादीमधून तक्रारदारांचे नाव काढून टाकावे व नुकसान भरपाई पोटी रुपये 5,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1,000/- दयावा असा आदेश देत आहे.
वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
[1] तक्रार अंशत: मान्य करण्यात येत आहे.
[2] जाबदेणार यांनी सिबिलच्या यादीमधून तक्रारदारांचे नाव आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत काढून टाकावे.
[3] जाबदेणार यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई पोटी रुपये 5,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1,000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावेत.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.