तक्रारदारातर्फे अॅड. कसबेकर हजर.
जाबदेणारांतर्फे प्रतिनिधी श्री. एस. जी. बोकील हजर
द्वारा मा. श्री. व्ही. पी. उत्पात, अध्यक्ष
** निकालपत्र **
(06/01/2014)
प्रस्तुतची तक्रार ग्राहकाने जाबदेणार बिल्डर-प्रमोटरविरुद्ध निकृष्ट सेवा दिल्याबद्दल ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 12 नुसार सेवेतील त्रुटीसंबंधी दाखल केलेली आहे. तक्रारीतील कथने खालीलप्रमाणे आहेत.
1] तक्रारदार क्र. 1 व 2 हे पती-पत्नी असून, त्यांनी जाबदेणार क्र. 1 या भागीदारी फर्मकडून मौजे धायरी येथे, सदनिका क्र. 302 व कार पार्किंग क्र. 16 खरेदी केलेले आहे. सदनिकेची किंमत रक्कम रु. 14 लाख असून त्याचा करारनामा दि. 30/4/2009 रोजी नोंदविलेला आहे. तक्रारदार यांनी खरेदी केलेले पार्किंग क्र. 16 हे मंजूर नकाशाप्रमाणे आहे. या पार्किंगलगत दुचाकी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था आहे, त्यामुळे तक्रारदारांना स्वत:चे वाहन पार्क करण्यासाठी त्रास होतो व सदरच्या पार्किंगचा मुक्तपणे वापर करता येत नाही. सदरचे दुचाकी गाड्यांचे वाहनतळ काढून टाकण्यासाठी तक्रारदार यांनी जाबदेणार यांना दि. 12/12/2011 रोजी नोटीस पाठविली होती. त्या नोटीसीला जाबदेणार यांनी दि. 24/12/2011 रोजी उत्तर देऊन नोटीसीतील कथने नाकारली. तक्रारदारांनी त्यांच्या कारपार्किंग जवळील दुचाकी पार्किंग बंद करावे, त्यांच्या पार्किंगजवळून सुरु केलेली नागरिकांची वहिवाट थांबवावी, मानसिक त्रास, दु:ख व वेदना याबद्दल त्याचप्रमाणे इतर खर्चाबद्दल रक्कम रु.75,000/- ची मागणी केलेली आहे.
2] प्रस्तुत प्रकरणी जाबदेणार यांनी मंचामध्ये हजर होवून त्यांचे लेखी म्हणणे व फोटोग्राफ्स दाखल केले आहे. जाबदेणार यांच्या कथनानुसार, सदरच्या तक्रारीतील कथने खोटी आहेत. त्यांनी कोणत्याही प्रकारे सेवेमध्ये त्रुटी केलेली नाही. तक्रारदार यांच्या चारचाकी पार्किंगमध्ये दुचाकी वाहनतळाचे कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण नाही. तक्रारदार यांना दिलेल्या पार्किंगमध्ये त्यांची चारचाकी ठेवण्यासाठी पुरेसी जागा आहे. सबब, प्रस्तुतची तक्रार फेटाळण्यात यावी अशी विनंती जाबदेणार यांनी केलेली आहे.
3] दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले शपथपत्र, फोटोग्राफ्स व कागदोपत्री पुरावे आणि लेखी कथने विचारात घेता खालील मुद्दे निश्चित करण्यात येत आहेत. सदरचे मुद्ये, त्यावरील निष्कर्ष व कारणे खालीलप्रमाणे-
अ.क्र. | मुद्ये | निष्कर्ष |
1. | जाबदेणार यांनी तक्रारदार यांच्या पार्किंगमध्ये अडथळा होईल असे दुचाकी वाहनतळ निर्माण केले आहे का? | होय |
2. | अंतिम आदेश काय ? | तक्रार अंशत: मंजूर करण्यत येते |
कारणे
4] दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले कागदपत्रे व फोटोग्राफ्स विचारात घेतले असता विशेषत:, तक्रारदार यांनी दाखल केलेल्या मंजूर नकाशाचे अवलोकन केले असता असे स्पष्ट होते की, त्यामध्ये तक्रारदार यांच्या वाहनतळाच्या आसपास कोणतेही दुचाकी वाहनतळ नाही. या गोष्टीला जाबदेणार यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेल्या फोटोग्राफ्स मध्ये तक्रारदार यांच्या चारचाकी वाहनाजवळ दुचाकी वाहनतळ दिसून येते. यावरुन जाबदेणार यांनी रिक्त जागेवर दुचाकी वाहनतळास मंजूरी दिल्याचे दिसून येते. ही बाब जाबदेणार यांनी नाकारलेली नाही. जर मंजूर नकाशामध्ये दुचाकी वाहनतळ नसेल तर जाबदेणार यांना तक्रारदार यांच्या चारचाकी वाहनतळाभोवती दुचाकी वाहनतळ करता येणार नाही. या अनुषंगाने असे सिद्ध होते की, जाबदेणार यांनी तक्रारदार यांच्या चारचाकी वाहनतळाभोवती दुचाकी वाहनतळास परवानगी देऊन सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली आहे. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 नुसार सेवा पुरवठादाराने सदरची त्रुटी दूर करणे आवश्यक आहे व त्या त्रुटी दूर करण्यासाठी नुकसान भरपाई देणे बंधनकारक आहे. सबब, खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
** आदेश **
1. तक्रारदारांची अंशत: मंजूर करणेत येत आहे.
2. असे जाहीर करण्यात येते की, जाबदेणार यांनी
तक्रारदार यांच्या चारचाकी वाहनतळाभोवती
दुचाकी वाहनतळ निर्माण करुन सेवेमध्ये त्रुटी
केलेली आहे.
3. जाबदेणार यांना असे आदेश देण्यात येतात की,
त्यांनी तक्रारदार यांच्या वाहनतळाजवळील
दुचाकी वाहनतळ दूर करुन सेवेमधील त्रुटी
दूर करावी.
4. जाबदेणार यांना असेही आदेश देण्यात येतात
की त्यांनी तक्रारदार यांना झालेल्या त्रासासाठी
व सेवेतील त्रुटीसाठी रक्कम रु. 7,000/-
(रु. सात हजार फक्त) नुकसान भरपाई म्हणून
द्यावे त्याचप्रमाणे रक्कम रु. 3,000/- (रु.तीन
हजार फक्त) तक्रारीच्या खर्चापोटी या आदेशाची
प्रत मिळाल्यापासून सहा आठवड्यांच्या आंत द्यावेत.
5. आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क
पाठविण्यात यावी.
6. पक्षकारांना असे आदेश देण्यात येतात की त्यांनी
आदेशाची प्रत मिळाल्यापासून एक महिन्याच्या
आंत सदस्यांकरीता दिलेले तक्रारीचे संच घेऊन
जावेत, अन्यथा सदरचे संच नष्ट करण्यात येतील.
स्थळ : पुणे
दिनांक : 06/जाने./2014