तक्रारदारातर्फे अॅड. श्रीमती जोशी हजर.
जाबदेणार गैरहजर
द्वारा मा. श्री. मोहन एन. पाटणकर, सदस्य
निकालपत्र
14/07/2014
तक्रारदार यांनी जाबदेणार यांचेकडून घेतलेल्या सेवेतील त्रुटीबाबत प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेली आहे. जाबदेणार यांची पर्यटन संस्था, पुणे – 2 येथे व्यवसाय करीत असून तक्रारदार हे बावधन, पुणे 21 येथील रहीवासी आहेत. तक्रारीमधील कथन थोडक्यात असे आहे की,
1] तक्रारदार यांना जून 2013 मध्ये चारधाम यात्रा करावयाची होती. त्यानुसार त्यांनी जाबदेणार यांचेकडून, माहितीपत्रकासह माहिती घेतली. दि. 18/06/2013 ते 29/06/2013 दरम्यानच्या चारधाम सहलीसाठी तक्रारदार यांनी जाबदेणार यांना प्रत्येकी रक्कम रु. 36,000/- प्रमाणे एकुण रक्कम रु. 72,000/- धनादेशाने दिले. या सहलीमध्ये तक्रारदार यांचे अन्य 14 जण सहभागी झाले. केदारनाथ यात्रा करणेसाठी तक्रारदारांनी हेलिकॉप्टरसाठी एकुण रक्कम रु.21,000/- धनादेशाने अतिरिक्त दिले. या दरम्यान ढगफूटी आणि प्रचंड पावसाने निर्माण झालेल्या गंभीर संकटाच्या बातम्या प्रसार माध्यमामध्ये येऊ लागल्यामुळे सदर सहल रद्द करण्याबाबत तक्रारदार यांनी जाबदेणार यांना विनंती केली. परंतु जाबदेणार यांनी अन्य मार्गाने यात्रा पूर्ण केली जाईल असे आश्वासन दिले. पुणे व दिल्ली येथील विमानतळावर प्रसारीत बातम्या पाहून तक्रारदार यांनी यात्रा रद्द करण्याबाबत दि.17/06/2013 रोजी पुन्हा-पुन्हा विनंती केली. त्याकडे जाबदेणार यांनी दुर्लक्ष केले. तक्रारदार दिल्ली ते हरीद्वार प्रवास करुन दि. 17/06/2013 रोजी हरिद्वार येथे मुक्कामास पोहचले. दि. 18/06/2013 रोजी सहल व्यवस्थापक यशवंत यांनी चारधाम यात्रा बंद आहे, हॉटेल बाहेर पडू नका अशी तंबी दिली. चारधाम यात्रेऐवजी अन्य जवळपासची पर्यटन स्थळे पाहण्यास व्यवस्थापक यांनी सांगितले. तसेच, तक्रारदार यांना पुणे येथे परतीची व्यवस्था होवू शकत नसल्याचे सांगितले. दि. 19/06/2013 रोजी व्यवस्थापकाने तक्रारदार यांना दिल्ली येथे मुक्कामास आणले. दि. 20/06/2013 रोजी विमानप्रवासाची सोय करुन तक्रारदार यांना पुण्यास पाठविले. याबाबतची बातमी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली. तक्रारदार यांनी दि. 21/06/2013 रोजी जाबदेणार यांची भेट घेतली; त्यावेळी वृत्तपत्रातील बातमीमुळे बदनामी केल्याबद्दल फिर्याद करण्याची धमकी तक्रारदारांना दिली. तक्रारदारांची सहल खर्च विमानाचा खर्च वजा करुन परत करण्याची विनंती जाबदेणार यांनी फेटाळली. दि. 15/06/2013 रोजी तक्रारदारांनी पाठविलेल्या नोटीसला जाबदेणार यांनी उत्तर दिले नाही. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना फसवणूकीने विनाकारण हरीद्वार पर्यंत नेऊन आणले. झालेल्या मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासापोटी ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 14 अन्वये एकुण रक्कम रु.1,32,374/- खर्च व भरपाईसह मिळण्यासाठी तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केलेली आहे.
2] जाबदेणार हे या प्रकरणात वकीलांमार्फत हजर झाले, परंतु अनेक वेळा संधी देऊनही त्यांनी लेखी जबाब दाखल केली नाही. सबब, त्यांच्याविरुद्ध विनाकैफियत आदेश पारीत करण्यात आला.
3] तक्रारदार यांचे कथन सादर केलेली शपथपत्रे संबंधीत कागदपत्रे आणि तोंडी युक्तीवाद अभ्यासता खलील मुद्दे या मंचाच्या विचारार्थ उपस्थित होतात. सदर मुद्दे, त्याबाबतचे निष्कर्ष आणि कारणमिमांसा खालीलप्रमाणे
अ.क्र. | मुद्ये | निष्कर्ष |
1. | जाबदेणार यांचे सेवेमध्ये त्रुटी असल्याचे तक्रारदार यांनी सिद्ध केले आहे काय? | होय |
2. | जाबदेणार तक्रारदार यांचा झालेला खर्च आणि शारिरीक व मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई आणि खर्च देण्यास जबाबदार आहेत काय? | होय |
3. | अंतिम आदेश ? | तक्रारदार यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते. |
वरील मुद्द्यांच्या अनुषंगाने खालील कारण मिमांसा नमुद करण्यात येते.
4] तक्रारदार आणि अन्य सभासदांची नियोजित यात्रा दि. 17/06/2013 रोजी सुरु झाली. त्याअगोदरच दि. 13/06/2013 रोजी चारधाम परिसरात ढगफूटी आणि पाऊस यांची फार मोठी नैसर्गिक आपत्ती ओढविली होती. या आपत्तीच्या गंभीरपणाबाबत प्रसिद्धीमाध्यमात सातत्याने वार्तांकने प्रसारीत होत होती. तक्रारदार यांनी सहल निघण्यापूर्वी सहल रद्द करण्याबाबत जाबदेणार यांना विनंती केली होती. तसेच दि. 17/06/2013 रोजी पुणे व दिल्ली विमानतळावरुन सहल पुढे न नेण्याची विनंती जाबदेणार यांनी फेटाळली आहे. या मार्गाने चारधाम यात्रा पूर्ण करुन देण्याचे जाबदेणारांचे आश्वासन खोटे व फसवे होते. कारण अन्य मार्ग उपलब्ध असते तर पूर्वी गेलेले यात्रेकरु अडकून न पडता, अन्य मार्गाने सोडवण्याचे काम प्रशासनाने केले असते, ही बाब विचारात घेणे क्रमप्राप्त आहे. जाबदेणार यांनी सदर चारधामसाठी अन्य कोणते मार्ग आहेत, हे मंचसमोरही स्पष्ट केलेले नाही. जाबदेणार यांची प्रवासी संस्था 1968 पासून सहली आयोजित करीत असल्याचे त्यांचे माहितीपत्रकावरुन दिसून येते. सहलीच्या ठिकाणांचा पूर्वानुभव तेथील अडचणी यांची पूर्ण माहिती जाबदेणार यांना होती असा निष्कर्ष त्यामुळे स्पष्ट होतो. तरीही सदरची सहल पुढे नेऊन तक्रारदारांना त्या परिसरातील भयावह परिस्थितीला सामोरे जाण्यास भाग पाडले. ही जाबदेणार यांच्या सेवेतील गंभीर त्रुटी आहे. या कृत्यामुळे तक्रारदार यांना शारिरीक व मानसिक त्रासास सामोरे जावे लागले. नैसर्गिक आपत्ती उद्भवलेल्या परिसरापासून तक्रारदारांना दूर ठेवणे जाबदेणार यांना शक्य असूनही जाबदेणार यांनी तशी कृती केलेली नाही. सबब, जाबदेणार यांचे सेवेतील ही गंभीर त्रुटी होती, असे या मंचाचे मत आहे. तक्रारदारांचे आर्थिक, शारिरीक व मानसिक हानीसाठी जाबदेणार हे जबाबदार आहेत. त्यमुळे तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 14 अन्वये भरपाई मिळण्यास पात्र आहेत. सबब, खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
आदेश
1.
येते.
2. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना दिलेल्या सेवेमध्ये त्रुटी निर्माण केली आहे, असे जाहीर करण्यात येते.
3. जाबदेणार यांना असा आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदारांनी त्यांच्याकडे सहल खर्चापोटी भरलेली रक्कम रु. 95,232/-(रक्कम रु.पंच्यान्नव हजार दोनशे बत्तीस फक्त) तक्रारदार यांना या आदेशाची प्रत मिळाल्यापासून सहा आठवड्यांच्या आंत द्यावेत.
4. जाबदेणार यांना असेही आदेश देण्यात येतात की त्यांनी तक्रारदार यांना मानसिक व शारिरीक हानीपोटी भरपाई म्हणून रक्कम रु. 5,000/- (रु. पाच हजार फक्त) आणि तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु. 2,000/- (रु. दोन हजार फक्त) या आदेशाची प्रत मिळाल्यापासून सहा आठवड्यांच्या आंत द्यावेत.
5. आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क
पाठविण्यात यावी.
6. पक्षकारांना असे आदेश देण्यात येतात की त्यांनी आदेशाची प्रत मिळाल्यापासून एक महिन्याच्या आंत सदस्यांकरीता दिलेले तक्रारीचे संच घेऊन जावेत, अन्यथा सदरचे संच नष्ट करण्यात येतील.